गरज प्रत्यक्ष कृतीची

Vishwasmat    04-Oct-2014
Total Views |

modi_1  H x W:  
‘नमो’ नावाचा झंझावात थांबेल असे सध्यातरी वाटत नाही. मागील नोव्हेंबरपासून नरेंद्र मोदी नावाचे वादळ, भारतभर एकहाती सर्वांना प्रभावीत करीत आहे. त्यांचे वागणे, चालणे, बोलणे, आचार, विचार, पेहराव वगैरे, सर्वच गोष्टी चर्चेचा विषय ठरत आहेत. लोकसभेमध्ये २० वर्षानंतर पहिल्यांदाच एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले ते केवळ नरेंद्र मोदींमुळे! त्यांचे नाव पंतप्रधानपदाचा उमेदवार म्हणून जाहीर करताना अनेक अडचणी होत्या. त्या दूर करणे आणि फलिताची तमा न बाळगता त्या अंगावर घेणे, हे मोठेच जोखिमेचे काम होते. ते काम ज्यांनी कोणी केले, खरेतर आधी त्यांचे अभिनंदन करायला हवे, ती त्यांच्या द्रष्टेपणाचीच सफलता म्हणायला हवी. आपल्याला शिवाजी महाराज दिसतात मात्र, जिजाऊंचा विसर पडतो. अलीकडचा सचिन तेंडुलकर दिसतो मात्र, आचरेकरसर आठवत नाहीत, त्याचप्रमाणे…
 
जो चमत्कार भारतात घडला, त्याची चर्चा जगभर झाली. प्रत्येक देशातल्या सत्ताधीशांना आणि जनतेला मोदींना भेटायची इच्छा होतीच. नेपाळ, भुतान, जपान, चीन आणि ऑस्ट्रेलिया या सर्वच देशांच्या राष्ट्रप्रमुखांची भेट झाली. मोदींच्या नेतृत्त्वाची झलक त्यांना पहायला मिळाली. मात्र त्यावर कळस चढवल्या गेला जेव्हा, मोदी अमेरिकेत दाखल झाले. आजपर्यंत कोणत्याही बाह्यदेशातील राष्ट्रप्रमुखांना अशी मानवंदना दिली गेली नव्हती, जशी वंदना मोदींना अमेरिकेत मिळाली. मेडिसन स्क्वेअरवर २० हजार लोकांनी तिकीट काढून येणे, टाईम्स स्क्वेअरवर तेवढ्याच लोकांनी मोठ्या पडद्यावर त्यांना बघणे, संपूर्ण भारतात घराघरात टीव्हीद्वारे प्रत्येकाने त्यांना ऐकणे आणि त्याचप्रमाणे इतर देशांमधून एकाचवेळी मोदींना बघणे, हा एक विक्रमच असावा. भारतीय वंशाच्या अमेरिकी नागरिकांना संबोधित करताना त्यांनी केलेला पेहराव आणि बोलण्याची शैली बघून लोक भारावून गेले होते. अनेकांनी तर स्वामी विवेकानंदांच्या शिकागोच्या १८९३ मधील भाषणाशी त्यांच्या संबोधनाची तुलना केली. स्वामींनी हिंदुधर्माची सहिष्णुता आणि सर्वसमावेशकता याचेे वर्णन केले होते. विवेकानंदांनी स्वत:ला हिंदू आणि हिंदुराष्ट्राचा प्रतिनिधी म्हणून गौरवान्वित होत आहे असे म्हटले होते, तर मोंदीनीदेखील त्याच धर्तीवर गीतेची प्रत अमेरिकेचे राष्ट्रपती ओबामांना देऊन, त्यांचे जीवन केवळ १२५ कोटी जनतेला समर्पित असून, त्यांच्या विकासाचा एकमेव ध्यास, त्यांनी घेतल्याचे स्पष्ट केले.
 
याच प्रवासात मोदींनी जगातल्या १० प्रमुख कंपन्यांच्या प्रमुखांशी देखील चर्चा केली आणि भारतात अधिकाधिक गुंतवणूक करण्यासाठी त्यांना आमंत्रित केले. स्मार्ट सीटीज् निर्माण करणे, स्वच्छ भारत अभियान राबविणे, सुरक्षा विषयक आयुधं निर्माण करण्यासाठी लागणारे तंत्रज्ञान आणणे, अन्न सुरक्षेविषयी योजना राबवणे अशा अनेक मुद्यांना मोदींनी स्पर्श केला.
मोदी जिथे जिथे जात आहेत तिथे तिथे भारताची प्रतिमा उंचावत आहेत, आत्मनिर्भरतेेचा दृढसंकल्प दर्शवित आहेत. हिंदीमध्ये भाषण करून, त्यांनी राष्ट्रभाषेचाच नव्हे तर, देशाचाही गौरव वाढविला आहे. त्यामुळे ज्यांना इंग्रजी भाषा येत नाही, त्यांच्या मनातील न्यूनगंड दूर होण्यास मदतच होणार आहे. भारतीय पेहराव आणि भगवा कोट घालणे म्हणजे संकुचित विचारधारा असे मानणार्‍यांना देखील चपराक बसली आहे. व्हाईट हाऊसमध्ये जाऊन विश्‍व नेतृत्वासोबत जगातल्या उत्तमोत्तम पदार्थांची मेजवानी असताना देखील मॉं जगदंबेच्या व्रताचा विसर त्यांनी पडू न देता आपला उपवास पाळला. मेजवानीत केवळ कोमट पाणी पिणे वगैरे सारख्या बर्‍याच गोष्टी खूप काही शिकवून जातात. बहुतांश सामान्य माणसे अशा अनेक न्यूनगंडातून काही गोष्टी आत्मसात करतात, ज्याची काहीही आवश्यकता नसते आणि गरजही नसते.
 
जेव्हा एखाद्या व्यक्तीचे ग्रह बलवान असतात तेव्हा त्या व्यक्तीच्या प्रत्येक गोष्टी भावस्पर्शी वाटतात. त्याचे बोलणे म्हणजे ब्रह्मवाक्य तर त्याचे चालणे एका रोल मॉडेलसारखे वाटते. त्याचे व्यक्तिमत्त्व वलयांकित होते आणि मग जनता त्याच्याकडे सुपरमॅन म्हणून बघत असते. तो सर्वच गोष्टींचे निवारण करू शकतो, अशा अपेक्षा निर्माण होतात. आज मोदींनी जे वलय प्राप्त केले, उंची प्राप्त केली आहे, त्याच्या आसपास कोणतीही राजकीय व्यक्ती दिसत नाही. याचा प्रत्यय उद्यापासूनच महाराष्ट्रातील निवडणुकांच्या सभांवरून दिसणार आहे. सध्यातरी मोदी या नावाच्या वादळाला कोणी पराभूत करू शकेल, असे व्यक्तिमत्व भारतात नाही. अनेकांच्या नशिबात असा सुवर्णकाळ मर्यादित काळासाठी असतो, असा इतिहास आहे. मग ते अमेरिकेचे बिल क्लिंटन असो, रशियाचे गोर्बाचेव्ह असो, भारतातील पंडीत नेहरू असो किंवा अटलबिहारी वाजपेयी.
 
नरेंद्र मोदी आज राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय जनसमुदायासमोर आहेत. त्यांच्यावर अपेक्षांचे प्रचंड ओझे आहे. देशाचा विकास करायचा म्हटले तर गुंतवणूक आवश्यक आहे. गुतवणूकदारांना कितीही आकर्षित केले तरी, ते आपला निर्णय स्वतंत्रपणे घेत असतात. जसे; व्यक्तिगत जीवनात साधा फ्लॅट विकत घेत असताना आपण त्याचा सर्वंकष विचार करतो. देशातील पायाभूत सुविधा, संधी आणि यंत्रणेची तत्परता असेल तर, गुंतवणूकदार आपोआपच येणार आहेत.
 
आपल्या देशात अनेक आव्हानं आहेत. पर्यावरण विषयक कायद्यात बदल करणे, कामगार विषयक कायद्यांमध्ये बदल करणे, जमीन खरेदीविषयक कायद्यांमधील सुधारणा, सरकारी यंत्रणेवरील नियंत्रण शिथिल करणे, लोकांची मानसिकता बदलणे, भ्रष्टाचाराचे उच्चाटन करणे, आतंकवादासारखा विषय हाताळणे, नक्षलवादी समस्या आणि देशाच्या सीमेपलीकडली घुसघोरी वगैरे… या सर्व बाबींवर नियंत्रण मिळवून विकासाचे स्वप्न पहायचे आहे. हे करताना मंत्रीमंडळ विस्तार करून अनुभवी मंत्र्यांची भरती करणे, त्यांना लागणारे स्वातंत्र्य, ही सर्व आव्हानं मोदींना पेलावी लागणार आहेत.
 
आज अमेरिका प्रगत का दिसतो तर त्यांना स्वातंत्र्य मिळाले १७७६ मध्ये, म्हणजे त्यांची लोकशाही सुमारे अडीचशे वर्षांची झाली आहे. आज ती सर्वात जुनी लोकशाही आहे. तर भारत जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेला देश असला तरी त्याला सत्तरच वर्ष होत आलेली आहेत. असे असले तरी गुलामगिरीच्या मानसिकतेतून, जातीभेद, धर्म-पंथभेद यांच्याबाहेर राष्ट्र आलेले नाही. केवळ अमेरिकेबरोबर मैत्रीपर्व प्रारंभ करून चालणार नाही. आपल्याला आपली लढाई लढावी लागणार आहे. अमेरिका एक धूर्त राष्ट्र आहे आणि त्याच्या प्रत्येक कृतीमधील मापदंड बदलत असतात. इराण, इराक असो, पॅलेस्टाईन वा अफगाणिस्तानविषयक भूमिका असो, याबाबत नेहमीच अमेरिकेने सोयिस्कर भूमिका घेतली असून, त्याला बलिदानाचा रंग देण्याचाही प्रयत्न केला आहे. आतंकवादापासून त्यांना खरोखरच मुक्ती पाहिजे म्हणून ते हस्तक्षेप करीत आहेत असे ग्राह्य मानले तर, पाकिस्तानात खुलेआम दहशतवादी प्रशिक्षण सुरू असताना, त्यांच्याबाबत वेगळे मापदंड का? मोदींचे एक यश मानायलाच हवे की, प्रथमच अमेरिकेने पाकिस्तानातील दहशतवाद्यांविरुद्ध एकत्रितरित्या लढा लढण्याचे जाहीररीत्या मान्य केले.
 
थोडक्यात काय, लोकांच्या अपेक्षांना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी मोदी जरी सक्षम असले तरी, अनेक गोष्टी त्यांच्या नियंत्रणाच्या बाहेर असल्यामुळे इप्सित साध्य करण्यासाठी वेळ हा लागणारच आहे. आज सर्वत्र मोदींविषयीच्या सद्‌भावनांचे प्रकटीकरण होत आहे, लोकांच्या सेंटिमेंट्‌स फारच सकारात्मक असल्यामुळे, त्याचे परिणाम शेअर बाजारामध्ये दिसत आहेत. मोदींनी व्यक्त केलेला निर्धार, अमलात आणलेले कठोर नियम या सर्व बाबींमुुळे बिजारोपण व्यवस्थित झाले आहे. केवळ यामुळेच ‘स्टँडर्ड अँड पूवर्स’सारख्या नामांकित आंतरराष्ट्रीय रेटिंग कंपनीने भारताची आर्थिक जगतातील पत निगेटिव्हरून न्यूट्रलवर अपग्रेड केली आहे. तरीही खर्‍या अर्थाने फलप्राप्ती होण्यासाठी बरीचशी आव्हानं पेलावी लागणार आहेत. लोकांना त्यासाठी संयम पाळावाच लागेल. केवळ भावनिक न होता, वास्तविकतेचे भान राखावे लागेल. त्यादृष्टीने परवाच जाहीर झालेले रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांचे पतधोरण बरेच काही सांगून जाते. अन्यथा त्यांनी व्याजदरात कपात केली असती. भारताच्या दृष्टीने योग्य वेळी नरेंद्र मोदींसारखे पंतप्रधान आणि रघुराम राजन यांच्यासारखे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर लाभले आहेत, हे भाग्याचे लक्षण आहे.