वडील म्हणजे अव्यक्त आईच!

Vishwasmat    14-Nov-2014
Total Views |

father_1  H x W 
आपण भूतलावर अवतरतो ते केवळ आपल्या आई-वडिलांमुळेच. तरीही नऊ महिने उदरात आणि जन्मानंतर संगोपन करण्याचं काम आई करीत असल्यामुळे, आईला अढळ स्थान प्राप्त होणं स्वाभाविकच आहे. कोणत्याही गोष्टीचं माहात्म्य, पावित्र्य सांगायचं असल्यास आईचीच उपमा दिली जाते. जसे, जननी-जन्मभूमी, भारतमाता, वंदे मातरम्, गोमाता, मा भगवती इत्यादी. आईचं माहात्म्य आपणा सर्वांनाच माहीत असतं आणि स्वीकार्यदेखील! शिवाजी महाराज म्हटले, की जिजाबाई आठवतात, कृष्ण म्हटला, की यशोदा आणि देवकी आठवतात. अगदी आजच्या युगातदेखील प्रत्येक व्यक्ती दैनंदिन जीवनात आपल्या आईचं माहात्म्य अधोरेखित करीत असते. त्याचे कारण म्हणजे त्यास आईकडून आलेली प्रचीती आणि त्याचबरोबर युगानुयुगे आईबद्दल सांगितली गेलेली उदाहरणं, तिचं प्रेम, त्याग इत्यादी.
 
मात्र, गेल्या पंधरवड्यात पितृछत्र गमावल्यामुळे, प्रथमच वडिलांबाबतच्या स्मृती डोळ्यांसमोर तरळून गेल्या. असे वाटले की, कुठेतरी आपण सर्वच आईचे माहात्म्य अनुभवत असताना, जपत असताना, वडिलांनादेखील आवश्यक न्याय देत असतो का? शिवाजींना वाढवताना जिजाबाईंइतकीच शहाजी राजांची तडफड कुठल्या इतिहासकाराने रंगवली किंवा वसुदेवाने यमुनेच्या पुरातून बाळकृष्णाला नेण्याच्या साहसाचे वर्णन कीर्तनात किती शब्दांत आटोपते? आपण जरा खोलात जाऊन विचार केला, तर लक्षात येईल की, वडील म्हणजेदेखील ‘व्यक्त न झालेली आईच!’ वडिलांची भूमिकाच अशी असते की, त्यांनी कर्तव्य म्हणून खस्ता खात राहाव्यात आणि मनातल्या मनात त्या शांतपणे पचवून, बाहेर त्या कुणाला कळू न देता जीवनप्रवास चालू ठेवावा. आई घराला घरपण प्रदान करीत असते, तर वडील घराला अस्तित्व प्रदान करीत असतात. ज्या घरात दुर्दैवाने वडील गेलेले असतात, त्या घरात पत्नीला आणि मुलांना असुरक्षित वाटते. समाजदेखील अशा घराकडे वेगळ्या नजरेने बघायचे धारिष्ट्य करतो.
आपण सर्वत्र प्रवचनांतून, कीर्तनातुन सुंदर-सुशील आईचा महिमा ऐकतो. मात्र, वडिलांचे चित्र रंगवताना बहुदा हेकड, व्यसनी, मारझोड करणारा, तापट असेच चित्र उभे केले जाते. प्रत्यक्षात असतील असे काही लोक, परंतु सरसकट असेच वडील पाहायला मिळतात का? बहुतांश आई, शांत-सुशील आणि दररोज कुटुंबाच्या जेवणाची सोय करताना आपल्याला दिसते. मात्र, सकाळी घराबाहेर पडणारा, नोकरी-धंद्यात सर्व प्रकारचे कडू-गोड अनुभव पचवून, घर चालवण्यासाठी सर्व व्यवस्था करणारा आणि सर्व क्षीण चेहर्‍यावर न येऊ देता मुलांसमोर येणारा बाप आपणास दिसत नाही.
 
मुलं आपले हट्ट आईपर्यंत नेतात आणि त्या सर्व लाड-हट्टांची पूर्तता आई करते, पण कुणाच्या भरवशावर? मुलांना लागणारा शिक्षणाचा खर्च, त्यांच्या आवडी-निवडी, कपडेलत्ते त्यासाठी अधिक पैशाची आवश्यकता असल्यास ओव्हरटाईम करणारा बाप दिसत नाही. मुलांच्या कितीतरी मागण्या पूर्ण करताना आर्थिक ओढाताण सहन करून पैशांची जुळवाजुळव करताना होणार्‍या तडफडीचे आपण साक्षी असतो खरे! पण, त्याचा गांभीर्याने कधी विचार करतो? कठीण आणि दु:खाच्या क्षणी आई अश्रूंना वाट करून मोकळी होते. मात्र, वडील सर्वांना धीर देण्याच्या नादात मनातल्या मनात अश्रू साठवतात. त्यामुळेच हृदयबंद पडून मृत्यूचे प्रमाण स्त्रियांपेक्षा पुरुषांचे जास्त आहे.
 
मुलीला निरनिराळे आधुनिक ड्रेस आणि कॉस्मेटिक किंवा मुलाला अत्यंत ‘आधुनिक स्मार्टफोन‘ वा ‘सेल्फस्टार्ट बाईक’ देणारा बाप स्वत: मात्र नंबर बदलला तरी चष्मा बदलत नाही किंवा जुनी, शंभर किक मारायला लावणारी ‘स्पिरिट’च चालवतो! स्वत:च्या खर्चात काटकसर करून मुलांच्या सर्व मागण्या पूर्ण करण्याचा आटापिटा करीत असतो. मग, त्यासाठी ऐपतीचा विचार करीत नाही. पण, त्या मागण्या आईमार्फत आल्यामुळे बापाच्या कष्टातून, काटकसरीतून पूर्ण झाल्या, याची जाणीव असणारी मुलं किती असतील? नव्हे, वडील म्हणून हे त्यांचे कर्तव्यच आहे, असेच मानणारी मुलं आज दिसतात. तरीही त्यांना न दुखविता, प्रसंगी मुलंकडूनच कडू बोल पचवणारे वडीलच असतात.
 
मुलगा बारावी झाल्यावर ऐपत नसतानाही मेडिकल, इंजिनीअरिंगसाठी कर्ज घेऊन प्रवेश मिळवून देणारे वडील, पुढे रिटायर्डमेंटच्या पैशातून कर्जफेड करताना पाहिले की, किंवा दक्षिणेकडील मुलीचे बाप, आपल्या मुलीचे उत्तम वराशी लग्न व्हावे म्हणून राहते घर विकून हुंडा/सोने देताना पाहिले की, नमन करताना कीवही येते. तेव्हा ते हा विचार करीत नाही की, माझं म्हातारपण कसं जाईल. त्यांचे विचारचक्र केवळ मुलाबाळांच्या आणि संसाराच्या हितासाठीच अखंड सुरू असते आणि त्यात स्वत:ला अजीबात स्थान नसते.
 
घरामध्ये नवीन सून येणार म्हणून सर्व घरात आनंदी वातावरण असते. मात्र, नव्या वातावरणात ती अवघडते. सर्व नवी नाती जुळविण्याच्या तिच्या प्रयत्नात बहुतांश ‘वडील’ (तिचे सासरे) मोठीच भूमिका बजावतात. विशेषत: सासू-सुनांच्या संबंधात येणारे अडसर दूर करणारे ‘बाबा’च असतात. घराणे आणि त्याची पत राखण्यासाठी वडीलच सर्वांत जास्त प्रयत्नरत असतात. कारण कोणतेही घर हे त्या व्यक्तीच्या कर्तव्यपरायणता, दक्षता, माणुसकी, प्रामाणिकपणावर अवलंबून असते. तो घराण्याचा चेहरा असतो. ते कमावण्यासाठी, जपण्यासाठी तो किती त्याग करीत असतो, हे आपणास दिसत नाही.
वडील म्हणजे पाषाणाचे हृदय असलेलेच, कोणत्याही संकटांना धीराने तोंड देणारे, कर्तव्यकठोर अशा प्रकारचे गुणविशेष असतातच, असे आपण गृहीत धरतो. मात्र, त्यांनादेखील मन, हृदय व भावना असतात, हे आपण विसरतो. घराघरांत वडील जेव्हा वृद्धत्वाकडे झुकतात तेव्हा त्यांना मुलांकडून एकच अपेक्षा असते की, ‘‘मी गेल्यावर आईचा सांभाळ नीट करा. तिची काळजी घ्या.’’ मात्र, वृद्ध आई, वडिलांसाठी असा विचार मनात आणते का? कारण ती हे गृहीतच धरते की, ‘यांना काही प्रॉब्लेम येणार नाहीत, कारण ते जन्मत: पुरुषच आहेत.’
 
मुलगा जेव्हा बाप होतो, तेव्हा त्याच्यातील जन्मदाता म्हणून विशिष्ट संवेदना जाग्या होतात. निर्मितीचे नवे पर्व असते ते! एक नवं नातं! माझा अंश! अशा कितीतरी संमिश्र भावना असतात. पहिल्यांदाच आई होणार म्हणून जननीचे खूप कौतुक होते. पण, मॅटर्निटी होमच्या आवारात अस्वस्थपणे चकरा मारणार्‍या त्या बाळाच्या बापाची दखल कुणाच्या लक्षात राहते? आधुनिक काळात या भावना स्पष्टपणे व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य मिळाले आहे. परंतु, आधीच्या पिढीला असे स्वातंत्र्यही नव्हते. अशा दाबून ठेवलेल्या भावना व्यक्त न करण्यातूनच एक करारी किंवा कठोर बाप तयार होत असे. त्यामुळे मुलांना एक अनामिक धाक असे. म्हणून आई जवळची वाटायची. अगदी लग्नाळू मुलगासुद्धा आईशी ज्या मोकळेपणाने बोलतो त्यामानाने वडिलांशी बोलणे टाळतो. मात्र, त्याच्या सर्व इच्छा-आकांक्षा पूर्ण करणारे वडीलच असतात.
 
लहानपणीच वडील गमावलेला मुलगा किंवा मुलगी मात्र वरील वर्णनाला अपवाद आहेत. अशांना, वयाचा विचार न करता अनेक जबाबदार्‍या पेलाव्या लागतात, एकेका वस्तूसाठी संघर्ष करावा लागतो, समाजातील स्थानासाठी झगडावे लागते तेव्हा कळते- बाप नावाचे अस्तित्व सर्वोच्च का आहे!
वडीलांचे महत्त्व कुणाला? तसं तर ते सर्वांनाच. मात्र, तेपण सुप्त असतं. छोट्याछोट्या संकटांमध्ये आई चालते, पण मोठमोठी वादळं पेलताना वडिलांची आठवण होते. उदाहरणच पाहायचं तर, फटका नाहीतर चटका बसला तर ‘आई गंऽऽ’ असं आपसूकच तोंडातून निघतं. मात्र, एखादा प्रसंग जिवावर बेतणारा आल्यास तेव्हा ‘आई गंऽऽ’ असे न निघता ‘बाऽप रेऽ’चं निघत! एखादं आर्थिक किंवा सामाजिक संकट आलं तर कुणी आईकडे जात नाही, तर तिथे बाबांचाच सल्ला योग्य समजला जातो.
वरील प्रकारचे विवरण असलेले अनेक लेख, विचार आपणापर्यंत वेगवेगळ्या माध्यमातून पोहोचलेच असतात. मात्र, आपण ते केवळ, छान लिहिलं आहे, अशी कौतुकाची थाप मारू विसरून जातो. का म्हणून आपण आपल्या भावना वडिलांच्या हयातीतच त्यांच्याजवळ व्यक्त करू नये?