नव‘जात’

Vishwasmat    07-Nov-2014
Total Views |

navajat_1  H x  
स्वातंत्र्योत्तर सदुसष्ट वर्षांच्या काळानंतरदेखील जात-पात यांच्या पलीकडच्या राजकारणात आपण अजूनही प्रवेश करण्यात यशस्वी झालो का, हा प्रश्‍नच आहे. तो इतक्या सहजपणे सुटेल, असेही वाटत नाही. हजारो वर्षांपासून आपण जाती-पातींना घेऊनच जगत आलेलो आहे. शेकडो वर्षे आपला देश, आधी मुघलांच्या आणि नंतर इंग्रजांच्या अधिपत्याखाली होता. स्वातंत्र्य मिळाल्यावर तरी आपली यातून मुक्तता होईल, अशी आशा होती. काही काही लोकांना कधीकधी आता जातपात काही राहिली नाही याचा प्रत्यय येतो, तर काहींच्या दृष्टीने जाती-पातीचा मुद्दा अजूनही आहे असे वाटते; किंबहुना वाढतोच आहे असे वाटते. समाजव्यवस्था चालण्यासाठी ब्राह्मण, क्षत्रीय, वैश्य आणि शूद्र अशा स्वरूपात वर्णव्यवस्था निर्माण झाली, ती चुकीची आहे, त्याला विरोध केलाच पाहिजे म्हणून जनजागृती झाली. पण, ती व्यवस्था संपली का? समाज चालविण्यासाठी कुठलीतरी व्यवस्था लागणारच आहे. आपण असे गृहीत धरू या की, चातुर्वर्ण्य व्यवस्था आता अस्तित्वातच नाही. मग समाज कसा चालतो, हा प्रश्‍न निर्माण होतो. त्याचे कारण म्हणजे जुन्या चातुर्वर्ण्य व्यवस्थेची जागा नव्या व्यवस्थेने घेतली, अगदी संविधानाच्या माध्यमातून ज्याचा आपण प्रथमश्रेणी, द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ श्रेणी कर्मचारी म्हणून स्वीकार केला. या व्यवस्थेतदेखील समतोल आणायच्या नावाखाली जुन्या चातुर्वर्ण्य व्यवस्थेचे विस्मरण होणार नाही अशीच कृती सरकारची राहिली. प्रत्येक सरकारी कागदावर जात-उपजात हे जाहीर रीत्या सांगायची आवश्यकता असते.
 
जसा भ्रष्टाचाराचा आणि काळ्या पैशाचा उगम हा आसक्ती आणि लालसेमध्ये आहे तसेच जातिव्यवस्थेचा उगम अधिकारशाहीमध्ये दडलेला आहे. त्यामुळे दोघांचेही उच्चाटन पाहिजे तेवढे सोपे नाही. कारण तो विषय व्यक्तीच्या शरीराला जन्मापासून चिकटलेल्या माया, मोह आणि मत्सर यावर आधारलेेला आहे. तो मृत्यूनंतरच जातो. मृत्यू व्यक्तीचा होतो, समाजाचा प्रवाह अव्याहत असतो.
 
पूर्वी ब्राह्मणांना, मंदिराच्या प्राप्तीच्या माध्यमातून अर्थार्जनाची इतरांपेक्षा चांगली सोय होती. त्यामुळे आर्थिक सुबत्ता होती. जेव्हा आर्थिक सुबत्ता असते, खिशात पैसे असतात तेव्हा आत्मविश्वास निर्माण होतो आणि त्यातून ज्ञानार्जनाची इच्छा निर्माण होते. म्हणजेच ‘अक्कल’ प्राप्त होते. कालांतराने मुघलांच्या काळात मंदिरांवर संक्रांत कोसळल्याने ब्राह्मणांवर ‘एक गरीब बिचारा ब्राह्मण’ म्हणून संबोधण्याची पाळी आली. मात्र, तो त्याच्या बौद्धिक संपन्नतेमुळे तरून गेला, किंबहुना तरायला शिकला. त्यातून त्याच्याकडे अधिकार आले. अधिकार आले की सत्ता येते आणि सत्ता आली की त्यातून एकाधिकारशाही जन्माला येते. मग एकाधिकारशाहीविरुद्ध समाज एकवटतो आणि परिवर्तन घडवण्याचा प्रयत्न करतो. परिवर्तन झाले, अधिकार मिळाले की ती व्यवस्थादेखील एकाधिकारशाहीकडे वाटचाल करते. हे चक्र असेच सुरू राहते…
 
अधिकारप्राप्तीला सत्ता आवश्यक असते. ती मिळविण्याचे तंत्र वेगळे असते. त्यात साम-दाम-दंड-भेद अंगीकारले जातात. मग त्याला, राजकारण हे समाजाच्या उत्थानाचे साधन आहे, असे आपण म्हणतो. समाजाचे उत्थान झाले का? राजकारण्यांची गरिबी मात्र नक्कीच गेली. स्वातंत्र्योत्तर काळात कोणत्याही पक्षाजवळ आजच्यासारखा पैसा उपलब्ध नव्हता. म्हणून कॉंग्रेसने, जे इंग्रजांनी केले तेच राजकारण केले. समाजाला विखुरलेल्या अवस्थेत ठेवले. जाती-पातीत वाटले. मग लोक म्हणू लागले, कॉंग्रेसपेक्षा इंग्रजांचे राज्य बरे होते! त्यातूनच चौधरी चरणसिंग, बाबू जगजीवनराम, जी. के. मूपनार, यशवंतराव चव्हाण यांच्यासारख्या नेत्यांच्या मार्फत त्या त्या जातीचे राजकारण सुरू झाले. त्यातून गल्ली-बोळातील नेत्यालादेखील, तुझ्यामागे तुझ्या समाजामध्ये किती लोक आहेत, असे जाहीर रीत्या विचारले जाऊ लागले. निवडणुकांच्या वेळीदेखील हाच मापदंड स्वीकारला जाऊ लागला. कॉंग्रेसने अशा पद्धतीने निवडणूक लढविण्याचे आणि जिंकण्याचे मापदंड तयार केले आणि त्यांना पराभूत करण्यासाठी आपणही तसेच वागायला हवे म्हणून काही काळ भाजपाने आणि इतर पक्षांनीही तोच कित्ता गिरविला. त्याचा प्रभाव इतका जबरदस्त होता की, नरेंद्र मोदींसारख्या नेत्यानेदेखील लोकसभेच्या निवडणुकांमध्ये, तेदेखील अन्य बहुजन समाजातले आहेत हे सांगून टाकले! आपली चूक लगेच लक्षात आल्याने, त्यांनी लागलीच त्यात सुधारणा केली. अन्यथा मोदींची जात काय हे माहीत करून घेण्याची आवश्यकता नव्हती. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील मुख्यमंत्रिपदाचे प्रबळ दावेदार एकनाथ खडसे यांच्या कर्तृत्वावर महाराष्ट्राला विश्वास आहे, त्यामुळे तेदेखील कोणत्या जातीचे आहेत, हे महाराष्ट्राला जाणून घेण्यात स्वारस्यच नव्हते.
या सर्व पार्श्‍वभूमीवर, डॉ हेडगेवारांचे शंभर वर्षापूर्वींचे विचार आणि दृष्टी किती महान होती, याचा प्रत्यय आता येतो. संघाच्या दैनंदिन शाखांमधून ज्याप्रमाणे खेळ, विचार, एकत्रित बसून जेवणे, खाणे, एकमेकांचा डबा खाणे आणि संपूर्ण समाज, देश म्हणजेच एक आणि एकमेव ‘जात’ अशा प्रयत्नांना यश येऊ लागले आहे. सध्याचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत आपल्या प्रत्येक भाषणात आवर्जून सांगतात की, संघ समजायचा असेल तर शाखेत येऊन बघा! शाखेत काय अनुभवास येते? कोणतीही व्यक्ती कुठलीही औपचारिकता न करता शाखेत येऊ शकते. त्याला फॉर्म भरायची, नाव सांगायची, जात सांगायची आवश्यकता नाही. येण्याची सक्ती नाही. एकत्र कवायती, खेळ, बौद्धिक, बसणे, उठणे, जेवणे सर्वच गोष्टी. आणि बौद्धिकांच्या माध्यमातून केवळ राष्ट्रभक्ती आणि राष्ट्रहित यावरच चर्चा होत असते. त्यातूनच वाजपेयी, मोदी, गडकरी, खट्टर, फडणवीस निर्माण होऊ लागले. महात्मा गांधींनीदेखील जेव्हा संघशिक्षा वर्गाला भेट दिली आणि तिथले वातावरण पाहिले, तेव्हा त्यांचा संघाबद्दलचा दृष्टिकोन पार बदलून गेला. तत्समच अनुभव अनेकांना येत असल्याने देशात परिवर्तनाची प्रक्रिया अनुभवाला मिळत आहे. मात्र तो विचार रुजवायला जवळजवळ ९० वर्षे म्हणजेच चार पिढ्या खपल्या.
 
नरेंद्र मोदी हे स्वत: प्रचारक होते, त्यामुळे जात-पात, धर्मभेद न पाळता केवळ राष्ट्राभिमान आणि त्याप्रती समर्पण या माध्यमातून त्यांनी देशाला एका महत्त्वाच्या वळणावर आणून ठेवले आहे. ते आल्यानंतरच्या निवडणुकांमध्ये पहिल्यांदाच देशाने जाती-पातीमुक्त विचारांवर निवडणुका लढविल्या. निवडणुकांचे विषय काय, तर देशाला विश्वगुरुपदी नेणे, प्रत्येक जिल्ह्याचा, राज्याचा आणि प्रत्येक व्यक्तीचा विकास करणे, जगापुढे मान न झुकविणे, आर्थिक आणि सुरक्षेच्या बाबतीत स्वयंसिद्ध होणे, विज्ञानाचा पुरेपूर उपयोग करून प्रगती करणे. त्यासाठी जी जी व्यक्ती सक्षम असेल, प्रामाणिक असेल त्या त्या व्यक्तीला जबाबदारी देणे आणि ईप्सित साध्य करणे. हे करताना कुठेही जातपात याला थारा नव्हता. ‘‘मी खाणार नाही, कुणाला खाऊही देणार नाही’’, ‘‘काही बनण्याचे स्वप्न बघण्यापेक्षा काहीतरी करून दाखविण्याचे स्वप्न बघा’’ किंवा ‘‘सरकार टिकवण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा जनहिताचे निर्णय घ्या’’ अशा प्रकारच्या साध्या साध्या तत्त्वज्ञानामुळे मोदींनी देशावर आपली छाप पाडली आहे. केवळ त्याच आधारावर हरयाणामध्ये, संघाचे प्रचारक राहिलेले खट्टर म्हणा किंवा महाराष्ट्रातले देवेंद्र फडणवीस म्हणा, मुख्यमंत्रिपदी आरूढ झाले.
 
देशामध्ये आता एक नवीन ‘जात’ निर्माण होत आहे. त्या जातीला चांगले दिवस येणार आहेत. त्यांच्या माध्यमातून देशाचे चित्र बदलणार आहे. जे जे स्वप्न आपल्या देशातील अनेक राष्ट्रपुरुषांनी पाहिले ते स्वप्न आता खरे ठरण्याची चिन्हे दिसत आहेत आणि ती नवनिर्मित जात कोणती तर प्रामाणिक, राष्ट्रभक्त आणि निष्कलंक लोकांची! खर्‍या अर्थाने ‘अच्छे दिन’ आता सचोटीने काम करणार्‍यांना येणार आहेत. त्यासाठी जातीचा, पोटजातीचा विशेष फायदा किंवा अडसर नाही. केवळ तो भारतीय असायला हवा. आता खर्‍या अर्थाने प्रत्येकास संधी मिळणार आहे. मात्र, ज्याला केवळ खडे फोडायचे आहेत त्याला ही ‘जात’ स्वीकारण्याची नैतिक ताकद एकवटता येईल का? हाच खरा प्रश्‍न आहे.