लाखाचे बारा हजार, जवाबदार कोण?

Vishwasmat    12-Dec-2014
Total Views |

fraud_1  H x W: 
भरघोस व्याजदर देणारी कंपनी- सात्त्विक फायनॅन्शियल कंपनीच्या संचालकांना अटक झाल्याची बातमी कानावर पडली. तत्पूर्वी वासनकर, श्रीसूर्या, झामरे, मंचलवार अशी अनेक नावे आपण वर्तमानपत्रात वाचलीत. हे झाले स्थानिक व्यावसायिक. देशपातळीवर सहारा, सारधा, कल्पतरू, पीअरलेस यांचीदेखील नावे आपण वाचलीत. आता कुणीही व्यावसायिक बाजारात, कोणत्याही निष्पाप गुंतवणूकदाराला लुबाडणार नाही, कारण आता सर्वच गजाआड झाले आहेत, असे वातावरण नेहमीच, कुणालातरी अटक झाली की निर्माण होत असते.
 
कुणाला अटक झाल्यावर ती व्यक्ती किती वाईट होती, याची चर्चा जोरात होते. वर्तमानपत्रे रकानेच्या रकाने भरतात आणि तो कसा गजाआड गेला, यातच धन्यता मानतात. कोणताही घोटाळा उघडकीस आला की, त्या एका व्यक्तीला सर्व दोष देऊन इतर सर्वच आपण कसे फसवले गेलो, या सहानुभूतीमध्ये रममाण होतात. स्पेक्ट्रमच्या घोटाळ्यात ए. राजाची जी भावना आहे, तशीच अवस्था ठेवी स्वीकारणार्‍या व्यक्तीची असते. अनेकांना त्यातून फायदा होतो. मात्र, जबाबदारी एकावर टाकून आपण कसे प्रामाणिक, भोळे किंवा बेकसूर आहोत, हे सिद्ध करण्याची चढाओढ लागते. त्यात प्रसारमाध्यमे तर, आम्हीच गुंतवणूकदारांचे तारणहार आहोत, या चढाओढीत भाग घेतात.
 
खरे तर आज प्रत्येक व्यक्ती कितीही भोळी असली, तरी कुणाला पाचशे रुपये देतानादेखील सजग असते. तिला स्वत:पुुरता व्यवहार चांगलाच कळतो. त्या व्यवहारात काही फायदा असल्याशिवाय ती रक्कम देत नाही आणि ज्याला देत असते त्या व्यक्तीबद्दलदेखील आपापल्यापरीने शहानिशा करून घेत असते. आता जी व्यक्ती लोकांकडून पैसे ठेवी म्हणून स्वीकारते, तिचीही काहीतरी ‘पुण्याई’ म्हणा किंवा ‘पत’ असते म्हणूनच लोक त्यावर विश्वास ठेवतात. तो जर मुळातच बदमाश किंवा धोकेबाज असेल, तर त्यावर कुणी विश्वास ठेवील का? एखाद-दुसरा बदमाश असू शकतो, पण सर्वच बदमाश कसे म्हणता येतील? दुसरीकडे, गुंतवणूकदारदेखील आपला स्वकष्टार्जित पैसा त्याच्याकडे गुंतवितात. म्हणजे गुंतवणूकदार आणि ठेवी स्वीकारणारा ही दोघेही भली माणसे असू शकतात, हे मान्य करावे लागेल. मग असे प्रसंग का निर्माण होतात? याला एकटा व्यावसायिकच दोषी असतो का? दोषींना शिक्षा व्हायलाच पाहिजे, त्यांची पाठराखण कुणीच करू शकत नाही. मात्र, दोषी केवळ तोच नसून, अजून कोण कोण आहे, हेदेखील तपासणे आवश्यक आहे. मी माझ्या मागील लेखांमधूनदेखील लिहिले होते, की कोणताही घोटाळा हा शेवटचा आहे असे आपण म्हणू शकत नाही, कारण ते सालाबादाप्रमाणे चालणारच आहे! तशी त्याची कारणेदेखील यात दडली आहेत.
 
पहिले कारण म्हणजे गुंतवणूकदार आणि व्यावसायिक- दोन्ही जरी प्रामाणिक असले, तरी त्यांचे ‘बिझनेस मॉडेल’च मुळात चुकीचे असते. काय असते त्यांचे मॉडेल? तर- आम्ही अमुक अमुक टक्क्याने परतावा देऊ. आणि तो टक्का इतका जास्त असतो, की तेवढा नफा कमावण्यासाठी तुम्हाला पैशाची गुंतवणूक अशा ठिकाणी करावी लागेल की, जेथून त्याहीपेक्षा जास्त परतावा मिळेल. अशा प्रकारच्या कोणत्याही- छातीठोकपणे सांगणार्‍या स्कीम बाजारात कधीच नसतात. शेकडो वर्षांची बँकिंग सिस्टीम कार्यरत असताना त्यांचा व्याजदर आठ आणि नऊ टक्क्यांवर फिरत असतो. पाव टक्क्यासाठी त्यांची आकडेमोड आणि मारामारी सुरू असते. मोठमोठे व्यवसाय आणि त्यांचा ताळेबंद पाहिला, तर त्यांनादेखील नफा कमाविताना नाकीनऊ येतात. थोडक्यात काय, गुंतवणूक करणारा आणि ती स्वीकारणारा हे दोघेही ‘भली माणसं’ असली, तरी त्यांचे ‘बिझनेस मॉडेल’ घात करीत असते. मी एका कंपनीत माझ्या ठेवी ठेवल्या, त्यात परतावा आहे तेरा टक्क्यांचा. म्हणजे बँकेपेक्षा तीन ते चार टक्क्यांनी जास्त. मी त्यांच्या संचालकांकडून त्यांचे ‘बिझनेस मॉडेल’ समजावून घेतले की, त्यांना ते कसे परवडते? त्यांनी पूर्ण पारदर्शकतेने मला समजावले. ते म्हणाले, ‘‘आम्ही दुचाकी वाहनांना कर्ज देतो, जे १४ ते १५ टक्क्यांचे असते. मग आम्हाला प्रोसेसिंग फीस वगैरेच्या माध्यमातून निधी मळतो, ज्याचा इफेक्टिव्ह रेट १७ टक्क्यांपर्यंत जातो.’’ म्हणजे काय, ती कंपनी १७-१३= ४ टक्क्यांवर आपला व्यवसाय करते.
 
आपण धन्यता कशात मानतो, तर मला ‘अमक्याने’ सांगितले म्हणून ‘तमका’ मला फसवणार नाही या आधारावर! जास्तीत जास्त परतावा का हवा असतो आपल्याला? तर आपली आवश्यकता हा एक भाग आणि दुसरा मोठा भाग म्हणजे हव्यास! पूर्वी हव्यासाचे प्रमाण कमी होते म्हणून मानसिक शांतता होती. निवृत्तीपर्यंत स्वत:चे घर करण्याचादेखील विचार न करता, आलेला प्रत्येक दिवस तणावमुक्त वातावरणात घालविणे, अशी पद्धती होती. तेव्हा शिल्लक पैसे काढणे, हाच आग्रह होता. मात्र, कालांतराने चमचमीत/झगमगीत दुनियेचा आविष्कार झाला आणि बचतीच्या सवयीने आर्थिक सुरक्षिततेच्या नावाखाली, जणू सात पिढ्यांची सोय करण्याची जबाबदारी आपलीच आहे, या आवेशाने आपण कामाला लागलो. मला घर पाहिजे, गाडी पाहिजे, मुलांना अमक्या प्रकारचे शिक्षण दिलेच पाहिजे… अशा प्रकारच्या गरजा आपण वाढवून घेतल्या. प्रत्यक्षात आपण काय बघतो? खरोखरच आपल्या मनासारखे किती जणांचे घडते? तरीही असा अट्टहास का असतो? आपण बहुतांशी लोक दैवावर, अध्यात्मावर विश्वास ठेवतो. प्रवचन-कीर्तनाला गर्दी करतो. त्यातील श्रवणातून बोध घेतो का? एकीकडे कर्माचा सिद्धांत आपणास मान्य असतो, मात्र स्वत:वर वेळ आली की, पूर्णपणे आंधळे होऊन जातो! एखाद्या ‘ढ’ व्यक्तीकडे सुबत्ता असेल, तर त्याला त्याच्या संचित कर्माने ती प्राप्त झाली असते, हे आपण का विसरतो? मलाही तसे पाहिजेच, हा अट्टहास का करतो? आपल्यालाही अनेक गोष्टी जास्तीच्या मिळाल्या आहेत, याकडे लक्ष न देता, ज्या नाही मिळाल्या त्यासाठीच रडत बसतो आणि हाच खरा सर्वांच्या दु:खाचा विषय आहे!
 
ठेवी स्वीकारणारा जर दोषी असेल, तर गुंतवणूकदारदेखील तेवढाच दोषी असतो. गुंतवणूकदारांसोबत मधले दलाल आणि वर्तमापनत्रेदेखील तेवढीच जबाबदार आहेत. स्वत:ला जाहिराती मिळतात व लाभ होतो म्हणून वर्तमानपत्रेच तर अशा व्यावसायिकांना मोठे करतात. मात्र, कुठेतरी आपल्या लाभावर गदा आली, तर त्या व्यावसायिकाला नेस्तनाबूत करण्याचा चंग बांधतात! त्याला अटक होईस्तोवर जंग जंग पछाडतात. अनेकदा वर्तमानपत्राच्या स्वत:च्या काही स्वार्थामुळे अशा प्रकारची मोहीम राबवून चांगला चालणारा व्यवसायदेखील बंद पडतो. अचानक बंद पडल्याने सर्वच हितधारक-ठेवीदार यांचे जास्तच नुकसान होते. कोणताही व्यावसायिक आपली ‘पत’ शाबूत ठेवण्याचा प्रयत्न करतो. त्याला सर्वांत जास्त भीती असते आपण जेलमध्ये गेलो तर काय? मात्र, ती वेळ त्याच्यावर आणलीच, तर त्याचे विचारचक्र पूर्णपणे बदलते. आधी तो लोकांचे पैसे कमीअधिक का होईना, मात्र द्यायचा विचार करीत असतो. एकदा जेलमध्ये गेला की, आलेले पैसे स्वत:च ठेवून, आता कुणाला काय करायचे ते करा, या भूमिकेत जातो अन् नुकसान ठेवीदारांचेच होते.
 
कोणत्याही व्यवसायात निरनिराळ्या मार्गाने पैसा उभा केला जातो. मात्र, अचानक पैसा परत करायची वेळ आली, तर तो उद्योगधंदा बंदच पडतो. एक जण जेलमध्ये जातो, काहींना त्याचा आनंद होतो, मात्र अनेकांचे पैसे मिळण्याची सोय नसते. अनेकदा व्यक्ती जेलमध्ये गेल्यावर अट्टल गुन्हेगारीकडे वळते. कित्येक व्यावसायिकांना- ‘मला पैसे परत करायचे आहेत,’ या विवंचनेत वावरताना आपण पाहतो. त्यातील काही महाभाग असतील, की ज्यांना पैसे बुडवायच्याच हेतूने व्यवसाय सुरू करायचा असतो. मात्र, त्यात काही चांगलेही असतात. जास्त परतावा देण्याच्या दबावाने ते ठेवींची गुंतवणूक शेअर बाजार किंवा जमिनीत करतात. देणार्‍यांचे पैसे कॅशमध्ये असतात आणि त्यांना आपले नाव बाहेर येऊ नये असे वाटते. म्हणून अनेकदा व्यावसायिक गुंतवणूक स्वत:च्या नावानेच करतो. मात्र, पेपरबाजीमध्ये असे चित्र निर्माण केले जाते की, त्याने करोडोची संपत्ती आपल्या नावावर विकत घेतली. ती विकून पैसा उभा करायला वेळ लागतोच. मात्र, त्या संधानात ५-१० गुंतवणूकदार पोलिसांमध्ये तक्रार करतात नि सर्वच खेळ बिघडतो! त्यात कुणाचा फायदा होतो हे माहीत नाही, मात्र गुंतवणूकदार सर्व काही गमावून बसतात! जेव्हा जेव्हा असे प्रसंग एखाद्या व्यवसायात येतात, तेव्हा तेव्हा व्यावसायिकाने पारदर्शकतेने सर्व गुंतवणूकदारांना सर्व काही सांगितले पाहिजे आणि गुंतवणूकदारांनीदेखील आतापर्यंत जे मिळाले याचे भान ठेवून, व्यावहारिक विचार करून, मिळतात त्या पैशावर समाधान मानले, तर कदाचित त्यांना कमी हानी पोहोचेल…