परफॉर्मन्स ऑडिट

Vishwasmat    19-Dec-2014
Total Views |

narendra modi_1 &nbs 
नागपूर शहर तसे ‘थंड’ म्हणूनच ओळखले जाते. त्यात नोव्हेंबर-डिसेंबर महिना आला की, गुलाबी थंडीमुळे ते जास्तच आल्हाददायक होत असते. उपराजधानी म्हणून राज्याचे हिवाळी अधिवेशन येथे दरवर्षी भरविले जाते. संपूर्ण महाराष्ट्र राज्याचे छोटेखानी स्वरूप नागपूरला आलेले असते. मंत्र्यांच्या लगबगीने आणि त्यांच्यासोबत असलेल्या जंत्रींमुळे थंडीतही वातावरणात एक वेगळीच ऊब जाणवते आणि आता तर मुख्यमंत्री नागपूरचेच असल्याने, संपूर्ण नागपूर शहर एका यजमानाच्या भूमिकेत वावरताना दिसत आहे.
 
विधानभवन, रविभवन, रामगिरी हा नागपूरचा सिव्हिल लाइन्स परिसर एरवी केवळ दिवसाच व्यस्त दिसतो. मात्र, या दिवसांत हा परिसर २४ तास वर्दळीचा वाटतो. मी दररोज सकाळी फिरायला जात असतो. काल फिरता फिरता, ग्रामीण भागातील, धोतर-टोपी घातलेली एक शालीन व्यक्ती इकडेतिकडे बघत फिरताना दिसली. तिच्याकडे पाहिले असता ती जरा दचकून माझ्याजवळ आली. तिच्या भाबड्या चेहर्‍यावरून मी कदाचित त्या व्यक्तीला खडूस वाटलो असावा. त्याने मला विचारले, ‘‘एकनाथराव खडसेंचा बंगला कुठे आहे?’’ मी त्यांना पूर्ण सहकार्याच्या भावनेने पत्ता सांगितला, तेव्हा त्या व्यक्तीच्या देहबोलीवरून असे जाणवले, की त्यांनी खडसेंची ओळख दाखविली म्हणून मी जास्त नम्रतेेने वागलो असेल. त्यानंतर मी मागे वळून पुन्हा एकदा कटाक्ष टाकला असता, त्या व्यक्तीची देहबोली जास्त आत्मविश्वासाने भरलेली, छाती दोन इंच फुगलेली आणि उंची एखाद इंचाने वाढल्यासारखी वाटली!
 
जसा अनुभव त्या खानदेशी व्यक्तीला आला तसाच अनुभव नागपूरकरांना मुख्यमंत्रिपद मिळाले म्हणून, चंद्रपूरकरांना अर्थमंत्रिपद मिळाले म्हणून येत आहे. नागपूरची जनता स्वत:त आता जास्त आत्मविश्वास बळावल्यागत वागत आहे. महाराष्ट्रात सत्ताबदल झाल्यापासून सर्वच जनता आश्‍वस्त झाली आहे. त्यांना आपली उंची वाढल्यासारखी वाटते आहे. जे महाराष्ट्रात तेच देशपातळीवर जाणवत आहे. नरेंद्र मोदींच्या रूपाने एक कणखर आणि जादूगार आपल्याला मिळाल्याची भावना लोकांच्या मनात आहे. त्यामुळे देशातील जनतेलादेखील आपली उंची वाढल्यागत अनुभव येत आहे. हे चक्र इथेच थांबत नाही, तर विदेशातदेखील आपले पंतप्रधान जातात, वावरतात, भाषण करतात, तेव्हा परदेशातील भारतीय जनतेलादेखील, त्यांचीही उंची वाढल्यासारखी भासत आहे. काहींच्या मते तर आता आपल्या पंतप्रधानांची उंची अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामांपेक्षादेखील वाढली आहे. वास्तविक, एका ठरावीक वयानंतर उंची वाढत नाही किंवा कमीही होत नाही. मात्र, तसा भास होत असतो, तो आत्मविश्वास वाढल्याने किंवा गमावल्याने होत असतो.
 
अनेक वर्षांच्या पराभूत मानसिकतेतून जनतेला केंद्रात नवीन सरकार प्राप्त झाल्याने त्यांच्या आशा पल्लवित झाल्या. त्याला कारण म्हणजे मतदानाच्या वेळी दिलेली आश्‍वासनंदेखील होती. केंद्रात सरकार स्थापन होऊन सात महिने होत आहेत. सरकारने काय केले आणि कुठे कमी पडले, याची दबल्या आवाजात चर्चा होऊ लागली आहे. इंग्रजी माध्यमं खरेतर दबल्या आवाजात नाही तर चढ्या आवाजात बोलण्यासाठी प्रसिद्ध आहेत. मात्र, येथे गाठ मोदींशी असल्याने त्यांनादेखील भीती वाटणे साहजिकच आहे. २००२ च्या गोध्रा हत्याकांडानंतर माध्यमांनी आणि विरोधकांनी मोदींना ज्या प्रकारे घेरले, त्याप्रमाणे एखाद्या व्यक्तीने राजसंन्यास घेतला असता किंवा आत्महत्याच केली असती! पण, ही व्यक्ती आपली लढाई एकटीच लढत लढत इतकी ताकदवान झाली की, त्यामुळे त्यांच्यावर आता सगळेच टीका करताना घाबरतात. मोदी न बोलता उत्तरे देतात. जसे, सचिन तेंडुलकर केवळ बॅटने उत्तर देत असे तसेच, मोदी आपल्या सुधारणांद्वारे उत्तरे देतात, कृतीद्वारे उत्तरे देतात. त्याला लागतो दुर्दम्य असा आत्मविश्वास!
काय आहे दबल्या आवाजातली चर्चा? तर, ‘‘मोदी हे इंदिरा गांधींसारखेच एकतंत्री अंमल चालवितात.’’ त्यात तथ्य असेल तर एक लक्षात घ्यायला हवे की, ती काळाची गरज आहे की नाही? मिळमिळीत लोकशाहीपेक्षा ढळढळीत एकतंत्रीपणा ही काळाची गरज असते. त्याचा अतिरेक होऊ नये, हे मात्र बरोबर आहे. दुसरी चर्चा ही की, आपल्या देशातील औद्योगिक उत्पादन निर्देशांक सात टक्क्यांवरून चार टक्क्यांवर आला. म्हणजे काय, तर उद्योगधंद्यात अजूनही मरगळ आहे. सरकारचे औद्योगिक धोरण अस्वस्थ करणारे आहे. गुंतवणूकदारांना अजूनही अंदाज येत नाही. सरकारचे करप्रणालीचे धोरणदेखील अजून स्पष्ट नाही. व्होडाफोन या कंपनीवर पूर्वलक्षी प्रभावाने कर लावण्यामुळे अजूनही आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदार धजत नाही. म्हणजे त्याचाच परिणाम की काय, तर परवा मुंबई स्टॉक एक्स्चेंजचा निर्देशांक ५०० च्या वर अंकांनी ढासळला. अजून एक कारण म्हणजे रिझर्व्ह बँकेने व्याजदरात कपात केली नाही.
 
दुसरी बाजू ही की, नोव्हेंबर महिन्याचा महागाई दर गेल्या पाच वर्षांतील नीचांकावर आला आहे, शून्यावर आला आहे. म्हणजेच महागाई कमी झाली आहे, आटोक्यात आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती ११० बॅरेल प्रती अमेरिकन डॉलरवरून ६० डॉलर प्रती बॅरेलपर्यंत घसरल्याने व्यापारात अनेक चढउतार पाहायला मिळत आहेत. अमेरिका एक लबाड देश आहे. ‘चिंता करितो विश्वाची’ असा आभास निर्माण करीत असतो अन् त्यातूनच आपली पोळी भाजून घेत असतो. कच्च्या तेलाच्या किमती अजून आपटवून रशियासारख्या देशांवर कुरघोडी करीत आहे. अमेरिका आपल्या शत्रूचा काटा काढत असतानाच, आपण कसे जगाच्या आणि माणुसकीच्या कल्याणासाठी कार्य करीत असतो, हे तो बिंबवीत असतो. शेअर बाजारात बुल आणि बेअर असे दोन प्रकारचे दलाल असतात. ‘बुल’ला शेअर मार्केट तेजीत गेले की आनंद होतो, कारण तो पडलेल्या भावाने शेअर खरेदी करून जास्त भावात विकू इच्छित असतो; तर ‘बेअर’ दलालाला शेअर बाजार पडला की आनंद होतो. कारण ते चढ्या भावात शेअर विक्रीचा सौदा करतात आणि तेच शेअर कमी भावात उचलतात. अमेरिकादेखील एकाच वेळी या तत्त्वावर खेळत असते. आधी कच्च्या तेलाच्या किमती प्रतिबॅरल ४० वरून १०० पर्यंत नेऊन अर्थकारण केले, आता त्या प्रतिबॅरल ६० पर्यंत पाडून पुन्हा फायद्याचे राजकारण करायचे आहे.
 
मोदी सरकारपुढील दुसरे आव्हान म्हणजे व्यापार तूट ही दीड वर्षाच्या उच्चांकावर पोहोचली आहे. निर्यात दर जरी सात टक्क्यांवर राखण्यात यश मिळाले असले, तरी आयात मात्र वाढली आहे. सणांचा काळ संपला तरी सोन्याची वाढती आयात चिंताजनक आहे. याने चालू खात्यातील तूटदेखील वाढणार आहे. या सर्व बाबींची नरेंद्र मोदी यांना नक्कीच जाण आहे. म्हणूनच त्यांनी परवा एका कार्यक्रमात सर्व मंत्र्यांना आणि खासदारांना दम भरला की, कोणत्याही प्रकारची वायफळ बडबड बंद करा आणि आपापली कामगिरी सिद्ध करा. यावरून लक्षात येते की, मोदी सध्या ‘परफॉर्मन्स’ देण्याच्या प्रचंड दबावात आहेत आणि त्यांना अपयश नको आहे. ते काहीही करून त्यांना हव्या असेलल्या विकासाचा अजेण्डा राबविणार आहेत. कोणत्याही मंत्र्याने कामाशिवाय वायफळ विधान करून कामांची गती कमी करणे त्यांना मान्य नाही. सर्वच यंत्रणा मोदींच्या पवित्र्याने धास्तावलेल्या आहेत. या शिस्तीचा फायदा लवकरच दिसणार आहे. नागपूरला एक मंत्री आपल्या बाबूवर रागावला होता. कारण काय, तर त्यांनी सभागृहात विषय मांडताना त्यांच्या मनासारखी माहिती न देऊ शकल्याने तो मंत्री रागावताना म्हणाला की, ‘‘तुमच्या अकार्यक्षमतेमुळे माझे गुण कटतील.’’ म्हणजेच काय, तर ‘परफॉर्मन्स ऑडिट’ हा विषय आता खोलवर रुजत आहे आणि त्याची फळे लवकरच चाखायला मिळतील…