देशपातळीवर नरेंद्र मोदी हे वादळ गेले आठ महिने घोंघावत होते. कोणाला ते वावटळ वाटत होते. किंबहुना ते वावटळ ठरावे म्हणून काहींनी देव पाण्यात ठेवले होते. १६ मे चा दिवस उजाडला आणि ज्यांना ते वावटळ असेल असे वाटले, त्यांचा पुरता अपेक्षाभंग झाला, तर ज्यांना वादळ वाटले होते त्यांचाही सुखद अपेक्षाभंग झाला. ते वादळ नव्हते, तर त्सुनामी होती.
बाहेरून पहाणारे लोक ‘हत्ती कसा असतो’ याचे आपापल्या परीने आकलन करीत असतात. मात्र, हत्तीसाठी शांतपणे आणि दृढपणे चालत राहणे हा एक प्रवास असतो. तसाच अव्याहत असा प्रवास मोदींचा जाणवतो आहे. ते जे करतात ते काहीतरी वेगळं आणि नावीन्यपूर्णच वाटतं. खरे तर १६ मे नंतर लवकरच २१ किंवा २२ तारखेला शपथविधी आटोपणे त्यांच्याकडून अपेक्षित होते. मात्र, कोणत्याही दबावाला बळी पडले तर ते मोदी कसले? त्यांनी २६ मे चा मुहूर्त निवडला आणि तेही सकाळच्या ऐवजी संध्याकाळची वेळ ठरविली. परिपाठीला बगल देऊन सार्कच्या सर्व सदस्य देशांच्या प्रमुखांना देखील बोलाविले. साधुसंतांनापण बोलाविले. उद्योजकांना पण बोलाविले. त्यांच्या निवडणुकीच्या फॉर्मवर अनुमोदन करणार्या चहावाल्याला पण बोलाविले.
१६ मे ते २६ मे ते स्वस्थ नाही बसले. तेवढ्या वेळेत सर्व सरकारी यंत्रणा समजून घेतली. सरकारी अधिकार्यांना निर्देश दिले की, आपापल्या खात्याच्या प्रोजेक्टच्या स्थितीविषयी एक सादरीकरण करा. संपूर्ण मंत्रिमंडळ तयार केले. कोणाला कोणती खाती द्यायची याचा देखील निर्णय केला. मित्रपक्षांना डावलले देखील नाही आणि डोक्यावर देखील बसू दिले नाही. प्रसारमाध्यमांना काहीही हवा लागू दिली नाही की आत काय काथ्थ्याकूट चालू आहे. कधी नव्हे भाजपाच्या आतल्या गोटातूनच होणार्या ऑफ द रेकॉर्ड ब्रिफिंगला देखील पूर्णपणे लगाम बसला होता. सर्व कसे सुरळीत सुरू होते. बरोबरच आहे की मंत्रिमंडळ आणि खातेवाटप हे देशाचा पंतप्रधानच ठरवितो आणि जोपर्यंत त्याचा शपथविधी होत नाही तोपर्यंत खातेवाटप करणे आणि त्यांची घोषणा करणे हे अगतिकपणाचेच आहे. मात्र, असा वेगळा विचार करणे ‘आऊट ऑफ दी बॉक्स’ विचार करणे म्हणजेच नरेंद्र मोदी!
त्यांच्या मंत्रिमंडळात देखील चांगल्या प्रकारे तारतम्य बाळगले. खरे तर वरिष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी आणि मुरलीमनोहर जोशी यांचा शपथविधी होणार नाही, हे ठरले असताना देखील मोदींनी दोघांनाही ज्या पद्धतीने हाताळले आणि त्यांचे सहकार्य मिळविले हे वाखाणण्यासारखे होते. अडवाणी तर एक वडीलधारी व्यक्ती आपल्या घरच्या कार्यात जसे आदरातिथ्य करते, तसे सर्वांचे स्वागत करीत होते. मोदींच्या मंत्रिमंडळात ३८ वर्षांच्या सर्वात कमी वयाची स्त्री स्मृती इराणी आहेत. त्याचबरोबर सर्वात ज्येष्ठ देखील स्त्रीच म्हणजे डॉ. नजमा हेपतुल्ला, ज्यांचे वय ७४ वर्षांचे. मंत्रिमंडळाचे सरासरी वय ६०.मंत्रिमंडळ ठरविताना कोठेही त्यांच्यावर दबाव आला असावा असे वाटत नाही. एकतर त्यांना संपूर्ण बहुमत प्राप्त होते आणि दुसरे त्यांची दृढता आणि मुत्सद्दीपणा/धक्कातंत्र ही त्यांची एक पद्धती येथेही दिसून आली. प्रकाश जावडेकरांची वर्णी म्हणा, स्मृती इराणींना एकदम मनुष्यबळ हे खाते म्हणा. अरुण जेटलींना सर्वात जास्त महत्त्वाची खाती देण्यात आलीत. जावडेकर कोणत्याही प्रकारचे खासदार नाहीत, तर स्मृती इराणी आणि जेटली दोघेही निवडणुकीत पराभूत झालेले. मात्र, प्रत्येकाची गुणवत्ता हेरून विश्वासपात्रता लक्षात घेऊनच खातेवाटप झाल्याचे दिसते.
गेले आठ महिने देश मोदींच्या नावाने काव्यमय झाला होता. मोदी म्हणजे सुपरमॅन अशी प्रतिमा तयार झाली आहे. अपेक्षांचा डोंगर उभा ठाकला आहे. महागाई, सुरक्षा, भ्रष्टाचार, आतंकवाद, नक्षली समस्या, बेरोजगारी या सर्वच विषयांमध्ये मोदींच्या येण्याने फरक पडणार आहे, अशी लोकांची धारणा आहे. जसे विक्रम-वेताळाच्या किंवा चाचा चौधरीच्या गोष्टींमध्ये आपण वाचायचो. त्याप्रमाणे मोदींच्या हातात २८२ जागा निवडून देणे म्हणजे जादूची कांडी दिली असे वाटते आहे. या सर्व गोष्टींची मोदींना कल्पना नक्कीच असणार आणि सर्वच गोष्टींवर एकदम उपाय नाही याची पण जाणीव असणारच. तरीही त्यांना यश नक्कीच येणार आहे. पहिल्याच दिवशी त्यांनी ‘काळा पैसा’ या विषयी चौकशी व्हावी म्हणून एसआयटीची घोषणा करणे ही त्याचीच चुणूक आहे. त्यांच्याच पावलावर पाऊल म्हणून त्यांचे सहकारी मंत्री पीयुष गोयल यांनी पहिल्याच दिवशी अधिकार्यांना दम भरला की कोळसा वाटप विषयीच्या भेटीगाठी साठी कोणत्याही प्रकारचे दलाल तेथे दिसता कामा नये.
मुळात ‘काही तरी करायचे’ स्वप्न घेऊन मोदी आपलं जीवन समाजासाठी व्यतीत करीत आहेत, ‘काही बनण्यासाठी’ नाही. ज्याला करायचाच ध्यास असतो त्याला मार्ग पण सापडतो आणि यश पण येत असते. खातेवाटप जरी केले तरी शेवटी ते स्वत: प्रत्येक खात्याच्या हालचालीवर लक्ष ठेवतील. कोणता मंत्री कमी पडतो आहे त्याचा देखील ते सतत अभ्यास करतील आणि समाधानकारक प्रगती न झाल्यास कारवाई करायला घाबरणार नाहीत.
मुळात यश आणि अपयश हे एकत्रित प्रयत्नांवर अवलंबून असलं, तरी एकत्रित प्रयत्न प्रगतीच्या दिशेने घडवून आणणे हे प्रमुखाचं काम असतं. डॉ. मनमोहनसिंग एक विद्वान आणि प्रामाणिक पंतप्रधान होते, तरीही त्यांना अपयश का आले? कर्णधाराला काम करायचं नसते, तर काम करवून घ्यायचं असते. स्वत: काम करणं हे जरी सोपं असलं, तरी त्याला मर्यादा असतात. मात्र, काम करवून घेणं हे नेहमीच आव्हानात्मक आहे. नरेंद्र मोदींचे नेमके हेच गुण त्यांना मनमोहनसिंगांपेक्षा उजवे ठरविणार आहेत. दुसरा महत्त्वाचा फरक की मनमोहनसिंग ‘मी पैसेखात नाही’, याच गोष्टींवर समाधानी होते, तर नरेंद्र मोदी ‘मी पैसे खात नाही व खाऊही देत नाही’, असं वागतात
.
मोदींसाठी प्राप्त यंत्रणेला सोबत घेऊन यश संपादन करणे आव्हानात्मक आहे. गुजरातचे मुख्यमंत्री असताना ते एका प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या सी. ई. ओ. च्या भूमिकेतून वागत. आता मात्र पंतप्रधान म्हणून त्यांना एका पब्लिक लिमिटेड कंपनीच्या सी. ई. ओ. सारखे वागणे अपेक्षित आहे. आव्हानं अनेक आहेत व सर्वच बाबतीत जनतेला दिलासा त्वरित देणे शक्य नाही. तरी काही गोष्टी अल्प मुदतीच्या, तर काही दीर्घ मुदतीच्या, अशी वाटणी केली तर त्यांना काम करणे सोपे जाणार आहे. सुशासनाद्वारे कामाची गती वाढवून आणि भ्रष्टाचाराला आळा घालून आपल्या कामाची चुणूक दाखविली, तर जनतेला आश्वस्त करतील आणि मग जनता देखील संयमाने दीर्घ मुदतीच्या गोष्टीसाठी वाट पाहून सहकार्य करेल.
नरेंद्र मोदींना यश मिळणार हे निश्चित आहे. कारण की, ते ध्येयवेडे आहेत. स्वत: २० तास काम करण्याची क्षमता ठेवतात. कठोरातले कठोर निर्णय घ्यायला कचरत नाहीत. जी व्यक्ती स्वत:च्या उदाहरणाद्वारे स्वत:ला प्रस्तुत करते तिला आपल्या सहकार्याकडून कामे करवून घेणे अशक्य नसते. ‘दुसर्या सांगे ब्रह्मज्ञान’ असल्यास अपयश नक्कीच असते. जसे जनतेला आशा-अपेक्षा आहेत, त्यात गुंतवणूकदारांना आणि उद्योजकांना आशा आहेत. जे गुजरातमध्ये केले तेच देशामध्ये करण्यात त्यांना यश आले तर समजायचं की पुढील १० वर्षे मोदीच पंतप्रधान राहतील.
राहिला प्रश्न विरोधी पक्षांचा, कॉंग्रेसने विरोधी पक्ष म्हणून चांगले काम करणे गरजेचे आहे. केवळ ४४ जागांचा विरोधी पक्ष असणे हे देखील लोकशाहीसाठी मारकच आहे. विरोधी पक्ष जर आपली भूमिका चोखपणे निभावत नसेल, तर सत्तापक्ष मनमानी करू शकतो, ज्याने लोकशाहीला बाधा येऊ शकते आणि देशाचे देखील नुकसानच होऊ शकते. राज्याराज्यातील पक्षांना देखील अंतर्मुख व्हावे लागेल आणि यापुढील राजकारण केवळ मुस्लिम अनुनय, धर्मनिरपेक्षतावाद, सोशल रिइंजिनीअरिग या नावाखाली करता येणार नाही कारण जनतेला आता त्याचा उब आला आहे.