बरेचदा आपण अनेक गोष्टी पारंपरिक रीत्या करतो. अर्थात, परंपराही उगाच चालून आलेल्या नसतात. कधी त्यामागे विज्ञान असते, तर कधी अनुभूती; कधी श्रद्धा, तर कधी स्वार्थ! यातील पहिल्या तीन प्रकारांत आपले वर्तन अवचितपणे घडत जाते, तर स्वार्थ मात्र नेहमीच संधी शोधत असतो. मुंबईत बॉम्बस्फोट झाल्यानंतर प्रार्थनास्थळांवर गर्दी होणे, रस्त्याने जाताना अगदी वाहन चालवितानाही प्रार्थनास्थळ दिसले की नमस्कार करणे, सत्ता बदलली की निष्ठा बदलत जाणे, धोरणात परिवर्तन घडणे, असे प्रकार घडत असतात. अशात आपण आपली परंपरा बदलणे, ही बाब तितकीच अशक्यप्राय होऊन जाते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच एक विधान केले, ‘‘राजकारणात पाया पडणे बंद करा.’’ नितीन गडकरी यांनी भाजपाच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर त्यांनीसुद्धा असेच विधान केले होते. क्षणिक लोकप्रियता किंवा प्रतिमाविस्तार या अर्थाने तपासले, तर या विधानात दम आहे. पण, केवळ असे म्हटल्याने कुणी कुणाच्या पाया पडणे का बंद करणार आहे? बंदच करायचे झाले, तर पाया पडूनही काही उपयोग होत नाही, हे पाया पडणार्यांच्या मनावर बिंबविता आले पाहिजे. शिवाय पाया पडण्याला एक आधार आहे. पाया पडण्यातून समर्पण व्यक्त होते, आदर व्यक्त होतो. पाया पडणे ही तशीही मानमर्यादेला अनुसरून केलेली कृती ठरते. त्यामुळे पाया पडणे बंद होईल काय?
पाया पडण्यात वयाची भावना नसते. भावना असते ती आदराची. आता नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदी नियुक्त झाल्यावर लालकृष्ण अडवाणी, डॉ. मुरलीमनोहर जोशी यांच्या पाया पडून त्यांचे आशीर्वाद घेतलेच ना! खरे तर पंतप्रधान झाल्यानंतर ती व्यक्ती त्या देशाचे प्रतिनिधित्व करीत असते. सुमित्रा महाजन लोकसभेच्या सभापती झाल्या. संपूर्ण सभागृहाच्या प्रमुख म्हणून त्यांनी आपल्या ज्येष्ठ नेत्यांचे, भर लोकसभेत पाया पडून आशीर्वाद घेतलेच ना! खरे तर लोकसभेच्या सभापती म्हणून त्या आता निष्पक्ष भूमिकेत गेल्या आहेत. सर्वच पक्ष आणि सर्वच नेते त्यांच्यासाठी आता समान पातळीवर उभे आहेत. पण, तरीही परंपरेला फाटा देत त्यांनी त्यांच्या पक्षाने केलेले संस्कार अधिक जपण्याचा प्रयत्न केला.
एकतर आता ज्यांच्या पायावर डोके ठेवता येईल, असे पायच कमी उरले आहेत! सरळ पडणार्या पावलांपेक्षा वाकड्या पडणार्या पावलांचाच आज सुळसुळाट आहे. पूर्वी अनेक वडीलधारी मंडळी आदर्श आणि तत्त्व पाळणारी असायची आणि त्यामुळे डोके आपोआप त्या पायांकडे झुकत असे. त्यातून तत्त्वांची शिकवण आणि आत्मिक आनंद- दोन्ही प्राप्त व्हायचे. दैवी गुण, ज्ञान असलेल्या आपल्यापेक्षा वयाने लहान असलेल्यांच्याही पाया पडायला संकोच कधीच वाटत नाही. अर्थात, पायावर डोके ठेवायचे की नाही, यावरून अध्यात्मात वाद असू शकतो. कुणी म्हणतात की, आपली आध्यात्मिक शक्ती कुंडलिनी जागृत करत ज्या गत्यंव्य स्थानाला जाते, ते शीर्षस्थान मस्तिष्कात असते. तेथे परमेश्वराचा वास असतो आणि म्हणून ते डोके कुणाच्या पायावर ठेवू नये. दुसरा प्रवाह सांगतो की, ज्ञानी, दैवी माणसातील शक्ती आपल्यामध्ये प्रवाहित व्हावी म्हणून नेहमी चांगल्या लोकांच्या चरणी डोके ठेवले पाहिजे. परमेश्वराची आराधना करतानाही म्हणूनच ‘घालीन लोटांऽगण, वंदीऽन चरण, डोळ्याने पाहीऽन रूऽप तुझेऽ’ असे आपसूकच मुखातून बाहेर पडते.
अगदी एखाद्या अडचणीच्या प्रसंगी माणसाच्या तोंडून हेच वाक्य बाहेर पडतात- ‘‘तुझ्या पाया पडतो, पण मला सोडून दे.’’ रस्त्यावरच्या गुंडाचा अहंकार शमविण्याचाच हा प्रयत्न असतो. आई-वडील मुलांसमोर थकले की, हेच म्हणतात- ‘‘तुझ्या पाया पडतो, पण आता त्रास देऊ नको.’’ किंवा ‘अडला नारायण गाढवाचे पाय धरी!’ अशा पाया पडण्यामागचा भाव वेगळा असतो.
पाया पडण्यात जशी नम्रता आहे, समर्पण आहे तसाच पाया पाडून घेण्यात अहंकारही मोठा आहे. हा विषय शरीरधर्माशी निगडित षड्रिपूंशी संबंधित आहे. साधे उदाहरण घ्या. घरात सायंकाळी तुळशीजवळ दिवा लागला की, मोठ्यांच्या पाया पडण्याची प्रथा आहे. मुले आई-वडील, आजी-आजोबांच्या पाया पडतात, तेव्हा मोठा भाऊ लहानग्याला लगेच सांगतो- ‘‘आता माझ्याही पाया पड. मी तुझ्यापेक्षा मोठा आहे.’’ येथे पाया पडून घेण्यातील आनंद व्यक्त होतो. हीच बाब मोठ्यांच्या बाबतीत अहंकारात परावर्तित होते. नात्यांमध्ये एकमेकांकडे आल्यानंतर पाया न पडण्याहून कितीतरी मने दुखावली जातात. अलीकडे तर पाया पडण्यातही बर्यापैकी फॅशन आली आहे. विशेषत: उत्तर भारतीयांमध्ये तर अगदी रस्त्यावरसुद्धा मोठे दिसले की, वाकून पाया पडले जाते. थोडे वाकून केवळ टोंगळ्यापर्यंत डावा हात नेणे, ही तर तरुणाईमध्ये लोकप्रिय फॅशन आहे! सिनेमात तसे दाखवितात म्हणतात. या काही परंपरा असतात.
एकदा विमानाने प्रवास करीत होतो, तेव्हा अभिषेक बच्चन बाजूलाच बसला होता. विमानात आल्या आल्या तो झोपी गेला. प्रवास संपता संपता त्याला जाग आली, तेव्हा मागे त्याच्या ओळखीचे कुणीतरी बसले होते. त्याने लगेच वाकून नमस्कार केला. माझ्या मनात त्या वेळी, अभिषेक मोठा असूनही एक संस्कारित असण्याचा भाव आपसूकच आला. एकदा बहरीनमध्ये एका खटल्यात भाग घेताना विचित्रच अनुभव आला. आरोपी हा त्या देशातील नव्हता. त्यामुळे तेथील चालीरीती ठाऊक असण्याचे काही कारण नाही. आरोपी दोन्ही हात समोर एकमेकांवर ठेवून उभा होता. न्यायाधीश महोदय संतप्त झाले. त्या देशात न्यायाधीशांसमोर असे उभे राहणे याला मगरुरी म्हणतात. त्याने हात मागे ठेवूनच उभे राहायचे असते. न्यायाधीशांची समजूत काढली आणि प्रसंग टळला. थोडक्यात काय, तर प्रत्येक कृतीमागे एक संस्कार असतो आणि त्याला त्या संस्कृतीत एक अर्थ असतो. भारतीय संस्कृतीत पाया पडण्याला असाच मोठा आणि व्यापक अर्थ आहे. त्याला नम्रतेचा, शालीनतेचा, संस्कारांचा संदर्भ आहे.
अर्थात, राजकारणातील पाया पडणे याला संस्कार कमी आणि प्रवृत्ती अधिक कारणीभूत ठरत असते. त्यामागे स्वार्थ दडला असतो. अनेक नेते पाया पाडून घेण्यासाठी सकाळपासून दरबार भरवून बसले असतात. त्यांना हे सारे प्रकार दिवसभरासाठी भरपूर ऊर्जा प्राप्त करून देतात. घरात नमस्कार, बाहेर पडताना नमस्कार, रस्त्यात नमस्कार, विमानात नमस्कार, उतरल्यावर नमस्कार… अशी ही वेगळीच दुनिया असते! या दुनियेत रममाण व्हायला त्या नेत्यालाही आवडत असते. म्हणूनच मोदींनी म्हटले त्याप्रमाणे पाया पडणे हा प्रकार राजकारणात थांबवायचा असल्यास, चाटुगिरी करणार्यांना त्यांचा रस्ता दाखविण्याचे काम नेत्यांनी करायला हवे. ज्याचे काम खरेच कायद्याच्या कक्षेत आहे, ज्यांच्यावर खरोखर अन्याय झाला आहे, अशांनाच जवळ केले पाहिजे.
ेवळ खुशमस्कर्यांमुळे राजकारणात कधीही यशस्वी होता येत नाही. त्यांच्यामुळे खड्ड्यातच जाण्याची पाळी येते. खरी विद्वता, ज्ञान, कसब, निष्ठा ज्यांच्याकडे आहे, त्यांनाच जवळ ठेवले पाहिजे. एकदा का ही संस्कृती राजकारण्यांकडून रुजविणे प्रारंभ झाले की, पाया पडणार्यांची जमात आपोआप नष्ट होत जाईल. समस्या खरेच मोठी आहे, पण त्यावर औषध राजकारण्यांनाच लावावे लागणार आहे. पाया पडणार्यांना दूर सारण्यासाठी आवाहन करून चालणार नाही. कारण, हे पाया पडणारे त्या विनम्र आवाहनाच्या पलीकडे गेलेले असतात. त्यांना त्यांचा स्वार्थ साधून घ्यायचा असतो. पाया पडून आपण मोहित होणार नाही, आपला अहंकार शमवून घेणार नाही, याची काळजी राजकारण्यांना घ्यावी लागेल. सध्या ज्या प्रकारे कामाचा धडाका आणि सपाटा मोदींनी लावला आहे, त्यात प्रत्येक मंत्र्याला पाया पाडून घेण्याला उसंतच मिळणार नाही आणि कामगिरी दाखवायची म्हटली, की चाटुगिरी आपोआप कमीच होणार आहे…!