नरेंद्र मोदी सरकारचे साठ दिवस झाले. साठ दिवसांत एखाद्या सरकारचे मूल्यमापन खरे तर होऊ शकत नाही. ‘भातावरून शिताची परीक्षा’ घेण्याचा मोह होऊ शकतो. शीत हातात घेतल्यावर कुणी ‘अर्धशिजलेला’ म्हणू शकतो, तर कुणी त्याला ‘अर्धकच्चा’ म्हणू शकतो. कॉंग्रसने मोदी सरकारला अपयशी सरकार म्हणून संबोधिले, तर मोदींनी प्रत्युत्तरात ‘साठ साल बनाम साठ दिन’ याचा फैसला जनतेवर सोडला. नुकत्याच घेतलेल्या ऑनलाईन सर्वेमध्ये एक लाख तेरा हजार लोकांनी सहभाग नोंदविला. त्यातील पन्नास टक्के लोकांनी सरकारच्या कामकाजावर समाधान व्यक्त केले, वीस टक्के लोकांनी अपेक्षेपेक्षा चांगले म्हणून मत नोंदविले, तर तीस टक्के लोकांनी अपेक्षाभंग म्हणून मत नोंदविले.
कॉंग्रेस आणि भाजपा अशी तुलना होतच राहणार. जोपर्यंत भाजपाला कॉंग्रेसच्या बरोबरीने म्हणजे ६० वर्षांची संधी मिळत नाही तोपर्यंत ते कॉंग्रेसला वरील युक्तिवादाने चूप करण्याचा प्रयत्न करतील. कॉंग्रेसची जमेची बाजू म्हणजे ‘अ पार्टी विथ डिफरन्स’ वगैरेच्या भानगडीत ते कधी पडलेच नाहीत. त्यांना कुणी चोर म्हटले तरी कधी मनावर घेतले नाही. ‘चोर म्हणून एकदा कपाळावर शिक्का बसला,’ की आयुष्य कसे सुकर होते! त्यामुळे लोकांना अपेक्षित असलेली १० पैकी पाच कामे कॉंग्रेसने केली तरी लोकांना मोठाच दिलासा मिळायचा. ती पाच कामेपण कॉंग्रेसजन असे वाजवून घेतात की, जणूकाही त्यांनी १० पैकी पाच नाही, तर १० पैकी १५ कामे केली! मात्र, मागील निवडणुकीत त्यांनी १० पैकी एकपण काम लोकांच्या अपेक्षेप्रमाणे न केल्याने त्यांनी पर्यायांचा शोध सुरू केला. पर्याय म्हणून जनतेला मोदींच्या रूपाने पूर्णच्या पूर्ण १० कामे करू शकणारा नेता गवसला. जनतेचा भाजपाकडे पाहण्याचा दृष्टिकोन नेहमीच विरुद्ध असतो. मोदींनी १० पैकी ९ कामे केली, तरी एक काम करण्यात अपयश आले, याचीच चर्चा जास्त होणार आहे.
जनतेच्या अपेक्षा आणि आकांक्षा पराकोटीला गेल्या आहेत. ‘अच्छे दिन’ची प्रतीक्षा आहे. जनतेचा संयम नेहमीच ‘चट मंगनी पट ब्याह’ असाच असतो. दबक्या आवाजात सामान्य जनता आता कुरबुरायला लागली आहे. भाजीपाल्याचे भाव, मोठमोठ्या शहरातील गुन्हेगारी, सीमेवरील आतंकी कारवाया, सरकारी पातळीवरील भ्रष्टाचार, रेल्वेचे अपघात या सर्वच गोष्टींमध्ये काहीही फरक पडलेला नाही, असे त्यांना वाटते आहे. अर्थात, याचे मूल्यमापन ६० दिवसांत होऊच शकत नाही, हे त्यांनाही मान्य असले, तरी मुळात आपली राजकीय पद्धती ही लोकांना आश्वासन देण्यावर आधारित असल्याने, ती आश्वासने पूर्ण न झाल्यास आम्ही जनतेसाठी काहीतरी करतो, हे दाखविण्यासाठी मोर्चा काढणे, उपोषण करणे वगैरे केले जाते. मोदींनी भाजपाच्याच महाराष्ट्रातील खासदारांना घरचा अहेर दिला. ते म्हणाले- ‘‘तुम्ही लोकांचे गार्हाणे काय आणता, लोकांना सरकारची बाजू समजावून सांगा. रेल्वे दरवाढ कमी करा असा दबाव आणण्यापेक्षा ती का आवश्यक आहे, हे पटवून सांगा.’’ या पवित्र्याने खासदारपण चक्रावून गेले असणार.
मंत्र्यांच्या बाबतीतदेखील त्यांना वेगळा अनुभव येत आहे. सोमवार ते शुक्रवार सकाळी नऊ ते रात्री उशिरापर्यंत त्यांना कार्यालयातूनच काम करणे अपेक्षित आहे. उगाचच घोषणाबाजीवर लगाम लागलेला दिसतो. हार, फुलं, रिबिनी कापणं- सगळंच बंद. साधा स्वीय सचिव निवडण्यासाठीदेखील पूर्णपणे मुभा नाही. आजपर्यंत जनतेला जी सवय लागली होती, त्याचप्रमाणे सर्व मंत्री वागतील, असे वाटले होते. मात्र, या नवीन नियमावलीमुळे लोकांचा भ्रमनिरास होताना दिसतो आहे. मंत्र्यांच्या बरोबरीने सरकारमध्ये भागीदारी असते ती बाबूंची! त्यांनादेखील आता खाली मान घालून काम करावे लागत आहे. खाण्यापिण्याच्या पार्ट्यांचे प्रमाण एकदम घटले आहे. १९६४ नंतर आयएएस अधिकार्यांच्या नोकरीविषयक नियमांत कधी बदल केला नव्हता, तो आज मोदी सरकारने केला आहे. त्यांच्यावर आता अनेक निर्बंध लावण्यात आले आहेत. राजकीय पक्षांशी सलगी नको, कॉर्पोरेटच्या दबावाखाली वागू नये, नातेवाईकांना जवळ करू नये, भ्रष्टाचार करू नये वगैरे वगैरे. त्यांचेही आता धाबे दणाणले आहे. याचा एक चांगला परिणाम म्हणजे, आता प्रामाणिकपणे काम करण्याची स्पर्धा सुरू होऊ शकते. जसे, सीबीआयच्या संचालकांनी स्वत:च फोन टॅप करून एका बँकेच्या अध्यक्षाला ५० लाखाची लाच घेताना पकडले.
स्वत: नरेंद्र मोदींचे वागणे जनतेला कळायला वेळ लागणार आहे. ते जेव्हा बोलतात तेव्हा भरपूर आणि दमदारपणे बोलतात आणि कधीकधी १५-१५ दिवस काहीच बोलत नाहीत! खरेतर ‘जिथे बोलायचे’ तिथे भीडभाड न पाळणे आणि ‘जिथे बोलू नये’ तिथे संयम दाखवणे, हेच मुत्सद्देगिरीचे आणि यशस्वीपणाचे लक्षण असते. लोकांशी संवाद ठेवण्याकरिता माध्यमांचा उपयोग करीत नाहीत, असे एक ना दोन कितीतरी आरोप त्यांच्यावर लागत आहेत. कुणी त्यांना मनमोहनसिंगांसारखे ‘मौनीबाबा’ही म्हटल्याचे प्रसिद्ध झाले आहे. राजकारण्यांच्या प्रत्येक बोलण्यातून विपर्यास निर्माण करून आपला टीआरपी वाढवणार्या वाहिन्यांची मोठीच नाकेबंदी झाली आहे. नरेंद्र मोदी, विदेशी किंवा देशी प्रवासात स्वत:बरोबर पत्रकारांना नेत नाहीत. यामुळे आजपर्यंत भोगलेल्या विविध देशांच्या शाही पाहुणचारांच्या अभावाने माध्यमातील तथाकथित स्टार्सची गोची झाली आहे.
कॉंग्रेसच्या राज्यात मंत्रिपद म्हणजे ‘ऐश’ अथवा ‘कुरण,’ असे समीकरण झाले होते. वर्तमान केंद्र सरकारातील मंत्री कामाच्या ओझ्याने पार दबून गेले आहेत. अपेक्षांचे ओझे वाहताना कार्याचा व्याप वाढतो. नियमांचे आणि कामाच्या गुणवत्तेचे कठोर पालन करणारे मोदी इतरांकडूनही तशीच अपेक्षा करीत आहेत, ज्याची सवय काही मंत्र्यांना होती. तर काहींना हा जाच वाटू लागला असेल.
नोकरशाहीच्या नावाने खडे फोडणारी आधीची सरकारे आणि वर्तमानातील बड्या अधिकार्यांना टेन्शन देणारे हे सरकार! त्याच्या जोडीला आयएएस अधिकार्यांच्या नियमावलीत केलेला बदल उल्लेखनीय ठरावा. हेडमास्तरच्या भूमिकेतून पंतप्रधान पहिल्यांदाच बघितल्याने, सध्यातरी सर्व उत्साहाने सहभागी झाल्यासारखे दिसत आहेत. मात्र, अति झाले तर काय? स्वातंत्र्यापासून म्हणजेच नेहरूंपासून सर्वच पंतप्रधानांनी या सगळ्यांना घेऊन चालण्याची परंपरा पाळली. अगदी इंदिरा गांधी कठोर पंतप्रधान असल्या, तरी अधिकारी व मंत्र्यांसाठी मवाळच होत्या. मोदी राजकारणात आले अपघाताने! त्यांचे मूळ लक्ष्य होते सामाजिक विकास. ते त्यांचे ‘पॅशन’ आहे. राजकारणाचा आणि सत्तेचा उपयोग मूळ लक्ष्यासाठी करण्याचे व्रत त्यांनी घेतले. स्वत:साठी अथवा कुठल्याही नातेवाईकासाठी काही करण्याचा त्यांचा उद्देशच नसल्याने, त्यांना काही गमावण्याची भीतीच नाही! त्यामुळे ते जे करतात ते बिनधास्त करतात. त्यांचे वेगळेपण याचमुळे ठसठशीतपणे दिसते. भारतीय राजकारणात मुत्सद्यांची कमी नाही. ते केवळ सत्ताकारणातच आहेत असे नाही, नोकरशाहीतही आहेत. वर उल्लेख केलेले ‘टेेन्शन’ अति झाले तर दबा धरून असलेली मंडळी एकत्र येतील आणि तो हल्ला परतवणे कठीण होईल. देशात हितसंबंध, जातीयवाद आणि जोडीला पैसा-राजकारणाची दशा व दिशा बदलवू शकतात. नरेंद्र मोदींकडून देशाला फार अपेक्षा आहेत. काही विघ्नसंतोषी लोक त्यांचा बळी घेण्याचा प्रयत्न करतील, मात्र ते ‘हिट विकेट’ म्हणून बाद झाले, तर देशाचे दुर्दैव म्हणावे लागेल.
क्रिकेटचा शहेनशाह सचिनचे उदाहरण घेऊ. सचिन उत्तम क्रिकेटपटू आहे. त्याच्यातील इतर गुणांकडे अथवा दोषांकडे एवढे लक्ष देण्याची गरज वाटू नये. परंतु, तो जेव्हा भारतीय क्रिकेट टीमचे नेतृत्व करीत होता तेव्हा टीममध्ये शिस्त आणण्याचा प्रयत्न केला. तो जसा सकाळी उठून सराव करतो तसा सगळ्यांनी केला पाहिजे, बॅटस्मनने सेंच्युरी काढलीच पाहिजे वगैरे वगैर. तो स्वत: परफेक्शनिस्ट असल्यामुळे इतरांकडूनही त्याच्या त्याच अपेक्षा होत्या, ज्या पूर्ण होणे अशक्य होते. या वागण्यामुळे मूळ भारताला जिंकवून देण्याचे लक्ष्य दुरावत गेले. नरेंद्र मोदींच्या बाबतीत अशी आशा करू या की, सर्वच यंत्रणा त्यांना हवं तसं सहकार्य करतील आणि देशाचे चित्र बदलेल, ‘अच्छे दिन…’ येतील आणि तशा काही घोषणा आजच्या दिवशी लालकिल्ल्यावरून होतील.
मोदींच्याच कवितेतील ओळी घ्यायच्या झाल्यास-
माझा सूर्याच्या दिशेने प्रवास, पतंगाचा जीव दोर्यात
पतंगाची शिव आकाशात, पतंगाचा दोर माझ्या हाती
माझा दोर शिवाच्या हाती…