भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सतत चिंतनशील असणारे व्यक्तिमत्त्व! त्यामुळे त्यांच्या प्रतिभेतून अनेक भन्नाट कल्पना येत असतात. ते स्वप्नही पाहत असतात आणि स्वप्नपूर्तीसाठी सातत्याने प्रयत्नरतही राहतात. त्यांचा हा डोळस स्वभाव त्यांना इतरांपेक्षा वेगळा आणि उजवा सिद्ध करतो. जसे, गरिबांची आर्थिक अस्पृष्यता संपवणे, या नवीन विचाराने त्यांनी ‘पंतप्रधान जन-धन योजना’ आणली. त्या अंतर्गत एकाच दिवशी एक कोटींच्या वर खाती बँकेत उघडली गेली. या योजनेत पाच हजार रुपयांपर्यंत कर्जाची सुविधा तसेच एक लाख तीस हजार रुपयांचे विम्याचे संरक्षण दिले आहे. सर्व स्तरातील आणि तळागाळातील जनतेला सुविधा पुरविण्यासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही देण्यात आली आहे. खातेदारांच्या संख्येचा हा एक कोटींचा आकडा हळूहळू १२ कोटींच्या लक्ष्यापर्यंत निश्चितपणे पोहोचेल. या संकल्पनेने, करोडो भारतीय जोडले जातील आणि लाखो लोकांना या माध्यमातून रोजगार प्राप्त होणार आहे. त्यांच्या दृष्टीने ते आता १२५ कोटी जनतेचे ‘सेवक’ आहेत.
देशात अशा कितीतरी योजना येतील, त्यामुळे रोजगारात वृद्धी होईल. जनतेचे दरडोई उत्पन्न वाढेल. देशातील नागरिकांचे जीवनमान उंचावेल. विकसित राष्ट्रांसारख्या सुविधाही भोगता येतील. पण, एवढ्यानेच देशाची प्रगती होईल काय? देशाची इज्जत-मान वाढण्याकरिता अजून कितीतरी आयामांवर कर्तव्यनिष्ठेने काम करावे लागेल, तेव्हाच जग आपल्याला विकसित म्हणेल. त्यापैकीच एक म्हणजे सार्वजनिक स्वच्छता आणि पावित्र्य!
महात्मा गांधींनी स्वातंत्र्यलढ्याएवढेच महत्त्व स्वच्छतेला दिले होते. गांधीजींच्या जन्माला २०१९ मध्ये दीडशे वर्षे पूर्ण होत आहेत. हा मुहूर्त त्यांच्या स्वप्नातील पवित्र भारतासाठी पंतप्रधानांनी निवडला आहे. हे अभियान देशाचा कायापालट करेल, हे निश्चित! ग्राम स्वच्छता ते नागरी स्वच्छता अशा विविध आघाड्यांवर योजना होतील आणि त्या दिशेने सरकारी स्तरावर कामही होईल. परंतु, केवळ सरकारच हे करू शकत नाही, तर देशातील प्रत्येक घराने- घरातील प्रत्येकाने- स्वच्छतेचा दृढ संकल्प घेतल्याशिवाय देशाचा असा कायापालट अशक्यप्राय आहे.
आरोग्याच्या दृष्टीने सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजेे स्वच्छ परिसर! निरामय जीवनासाठी वैयक्तिक स्वच्छता आणि सार्वजनिक स्वच्छता आग्रहपूर्वक अंगी बाणली गेली पाहिजे. आपण एखादे नवे घर विकत घेण्यासाठी किंवा किरायाने घेण्यासाठी जातो, तर तेथील परिसर किती स्वच्छ आहे, हे आपण प्रथमदर्शनी बघतो. किंमत अथवा भाडे ठरवतानासुद्धा हा मुद्दा अतिशय महत्त्चाचा ठरतो. एखाद्या सहनिवासातील सदनिका बघायला गेलो, तर उत्तम रंगरंगोटी केलेली, धूळ नसलेलीच सदनिका आणि परिसर स्वच्छ असल्यासच पसंत करतो. (मग थोडीफार जास्त रक्कम खर्च होत असेल, तरी हरकत नसते.) म्हणजेच काय, तर सर्वांनाच स्वच्छता आवडते. पण, ती स्वच्छता राखण्यासाठी आम्ही किती सजग असतो? याच अनुषंगाने विदेशी लोकदेखील आपले मत भारताविषयी बनवत असतात.
विदर्भातील संत गाडगेबाबा हे स्वच्छतेचे पुरस्कर्ते होते. ते स्वत: हातात झाडू घेऊन रस्ता स्वच्छ करत असत. बाबा पंढरपूरला जात, पण ते कधीही मंदिरात जात नसत. याबाबत शिष्याच्या शंकेला उत्तरादाखल म्हणाले, ‘‘नुसते कमरेवर हात ठेवून उभ्या असलेल्याला म्हणावे, तुझ्याच भक्तांनी मंदिराच्या परिसरात किती घाण केली आहे. त्यांना जरा स्वच्छता राखण्याची बुद्धी दे!’’ ‘‘मी मंदिराची स्वच्छता करतो आहे म्हणजे त्याचीच भक्ती करतो आहे असे समजतो! विठ्ठलाने भक्तांना या परिसरातल्या घाणीबरोबर मनातलीही घाण काढून टाकण्याची बुद्धी द्यावी!’’
परवा पंतप्रधान मोदींनी त्यांच्या भाषणात नागपूरकरांना प्रश्न विचारला- ‘‘क्या सिंगापूर देखा हैं? कितना सुंदर हैं! क्या नागपूर ऐसा नही हो सकता?’’ सिंगापूर, दुबई किंवा हॉंगकॉंग या शहरांमधील स्वच्छता आणि योजकता, तेथे येणार्या पर्यटकांना मोहवून टाकते. केवळ पैशांनी ही विकत घेता आली असती काय? निश्चितच नाही. कठोर परिश्रम आणि प्रसंगी कठोर अनुशासन, याच कारणांनी या शहरांना हा बहुमान मिळाला आहे. तेथील रहिवासी अनुशासनाने राहतातच, पण पर्यटकांनाही तसेच राहावे लागते. नागपूरचे जनप्रिय नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी एक किस्सा सांगितला : ते सिंगापूरला गेले असताना नव्या प्रकारचे चॉकलेट त्यांनी खाल्ले. पण, त्याचे रॅपर टाकण्यासाठी डस्टबीन दिसले नाही, म्हणून त्यांनी तो कागद खिशात ठेवला आणि हॉटेलवर आल्यावर तेथील डस्टबीनमध्ये टाकला. प्रांजळपणे ते म्हणाले, ‘‘जर मी भारतात असतो तर काय केले असते?’’
आमचे काही नागपूरकर नेते दिल्ली येथे एका अधिवेशनाला गेले होते. त्यांच्यासोबत प्रवास करताना गमतीदार अनुभव आला. आम्ही कारमधून प्रवास करीत होतो. दिल्लीचे ते चकाचक रस्ते मन प्रसन्न करीत होते. आमच्यातील एक नेते चालकाला मध्येच ‘उऊंऽऽ’ करून इशारा करू लागले की (तोंडात पानाचा तोबरा भरून असल्यामुळे), ‘कारचा वेग थोडा हळू कर!’ कार थांबल्यासारखी झाल्यानंतर त्यांनी दरवाजा थोडासा उघडला आणि ते पचकन थुंकले! रस्त्यावर लाल रंगाचे ओघळ वाहू लागले. स्वच्छतेची अशी ऐसीतैसी इतरांना फार बोचली नाही, कारण त्यांनीही असे बरेचदा केले होते! मात्र, मला कसेसेच झाले. असाच एक किस्सा आठवतो. आम्ही क्रिकेटची मॅच खेळत होतो. नॉन स्ट्राईकर एंडला जो फलंदाज होता, त्याच्या तोंडात खर्र्याचा तोबरा होता, त्यामुळे तो बोलू शकत नव्हता. एक चोरटी धाव घेण्यासाठी तोंडातील थुंकीमुळे त्याला कॉल देणे अशक्य झाले आणि धावबाद होऊन तंबूत परतावे लागले. असे प्रसंग नागपूर आणि विदर्भात आपण नेहमीच बघतो.
एखादा स्कूटर/बाईकस्वार चालत्या वाहनावरून पचकन थुंकतो. त्याचे कितीतरी कण मागच्या वाहनस्वाराच्या तोंडावर उडतात, पण त्यांना त्याचे काही शल्य, सोयरसुतक नसते. यामुळे रोगाची लागण होऊ शकते, हे त्यांच्या गावीही नसते! त्यामुळे मध्यंतरी हेल्मेट आवश्यक केले असताना, या लोकांची चांगलीच गोची झाली होती. मोठ्या माणसांनी असे सातत्याने केले की, लहान मुलांवर तसेच संस्कार होतात आणि तेही तोच वसा पुढे चालवतात. यामुळेच भारतात कधी सुधारणा होतील, यावरचा आपला विश्वासच ढळला आहे. आज असे सुंदर-स्वच्छ-निरामय भारताचे स्वप्न कुणी रंगवले की, आपण त्याला वेड्यातच काढतो! म्हणूनच नरेंद्र मोदींना कॉंग्रेसने ‘स्वप्न विकणारा’ (सपनों का सौदागर!) म्हटले आहे.
आशेचा एक किरण भारतात नव्हे, तर अगदी विदर्भात आपल्याला दिसतो आहे, ते म्हणजे श्रीक्षेत्र शेगावचे श्रीगजानन महाराज संस्थान! आनंदसागर वा संस्थानचा अन्य परिसर, आपणही ‘हे’ करू शकतो, याची पदोपदी साक्ष देतात. एखादा संकल्प कसा सारे काही बदलवून टाकतो, त्याचे उत्तम उदाहरणच आहे ‘आनंदसागर!’ शिवशंकरभाऊ पाटील या व्यक्तीने एका स्वतंत्र पॅटर्नने (खास पद्धतीने) हे अशक्यप्राय काम शक्य करून दाखवले. तिथे स्वयंस्फूर्तीने आलेले सेवक, परिसराचे पावित्र्य राखण्यासाठी दिवसरात्र झटत असतात. त्यांच्याकडे पाहिल्यावर, तेथे आलेले पर्यटक स्वत:हूनच नियमांचे बांधील होऊन जातात आणि जे होत नाही त्यांना संयमाने वेळोवेळी सांगणारे असतातच. कुणी आपल्याला बंधनात ठेवतो आहेे, असा भाव नसूनही, एक अनामिक बंधन आपल्याला तेथे पावित्र्य ठेवण्यास अंत:र्मनातून प्रेरित करीत असते.
शेगावला हे का शक्य झाले? कारण तेथे शिवशंकरभाऊंसारख्यांचा निर्धार आणि गजानन महाराजांवरील श्रद्धा यामुळे! म्हणजेच विना निर्धार आणि श्रद्धा हे अशक्य आहे. त्याचप्रमाणे नरेंद्र मोदींचा निर्धार आणि त्याला राष्ट्राप्रती श्रद्धेची जोड मिळाली, तर संपूर्ण भारत महात्मा गांधींच्या १५० व्या जयंतीपर्यंत स्वच्छ होण्यास काहीच अडचण येणार नाही…