कृतिशील नेतृत्व

Vishwasmat    02-Jan-2015
Total Views |

dhoni_1  H x W: 
आज नवीन वर्षाचा दुसरा दिवस. मागील वर्ष अनेक कटु-गोड घटनांनी भरलेले होते. सर्वच घटना आपल्याला एकदम आठवत नाहीत. मात्र, वर्षाच्या शेवटच्या आठवड्यातील घटना आपल्या मनावर जास्त छाप पाडून जातात. तशीच एक घटना म्हणजे महेंद्रसिंग धोनीची अनपेक्षित रीत्या कसोटी क्रिकेटमधून घोषित झालेली निवृत्ती! धोनीच्या कार्यशैलीवर नजर टाकल्यास, निदर्शनास येते की, त्याचा निर्णय त्याच्या स्वभावानुसारच आहे. समोरच्यांना चकित करणे, ही त्याची पद्धत. मैदानावरदेखील मध्येच कुणास तरी ऐन मोक्याच्या क्षणी गोलंदाजी देणे, फलंदाजीच्या क्रमात बदल करणे वगैरे. टी-ट्वेण्टीच्या पहिल्या जागतिक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात अंतिम षट्‌क कुणाला दिले, तर नवख्या जोगिंदर शर्माला आणि त्याने तो चषक जिंंकला!
अनिल कुंबळे कर्णधार असताना ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिले दोन सामने अनिर्णित राखल्यावर त्याने निवृत्ती पत्करली. उर्वरित दोन सामन्यांचे नेतृत्व धोनीने केले आणि ते जिंकले. विजयी चषक स्वीकारताना, तो स्वत: न घेता अनिल कुंबळेला पाचारण केले. कोणताही विजयी चषक घेतल्यावर तो आधी आपल्या सहकार्‍यांच्या हाती सोपवायचा आणि मग स्वत: अलिप्त होऊन त्याचा आनंद लुटायचा. मैदानाबाहेर आणि मैदानावर कुठेही त्याने आपला तोल न जाऊ देता सदैव ‘मिस्टर कूल’ म्हणून वागला. शब्दांपेक्षा कृतीला जास्त महत्त्व द्यायचा. आताही टीमचे प्रबंधक रवी शास्त्री आणि विराट कोहली यांची जवळीक झाल्याने धोनीची घुसमट झाली म्हणून त्वरित बाहेर पडून तो मोकळा झाला, अशी चर्चा आहे. दुसरे कारण हेही जोडले जात आहे, की मुदगल समितीच्या अहवालात त्याचे नाव यायची शक्यता असल्याने त्याने कसोटीमधून निवृत्ती पत्करली. या सर्व गोष्टींमध्ये तथ्य असते, तर त्याने सर्वच प्रकारच्या स्पर्धेतून माघार घेतली असती.
 
धोनीचा निर्णय हा त्याचा स्वत:चाच निर्णय जास्त वाटतो, कारण तो त्याचा स्वभावधर्मच आहे. कुणाचेही अशा प्रकारचे निरोप घेऊन जाणे हे चटका लावून जाणारेच आहे. ‘का नाही जात’ म्हणून विचारण्यापेक्षा ‘का गेला,’ असे विचारले जाणे, यातच त्याचा विजय आहे. सर्वच क्षेत्रात भल्याभल्यांना जे जमत नाही ते धोनीने केले. राजकारण असो, समाजकारण असो, सर्वत्रच लोक पदाला चिटकून बसतात. पदाशिवाय आपण जगूच शकत नाही, अशी त्यांची धारणा असते. आपण फक्त क्रिकेटचाच विचार केला तरीही कपिलदेव, मोहिंदर अमरनाथ किंबहुना काही अंशी सचिन तेंडुलकरांसारखे अनेक दिग्गज आपली कारकीर्द लांबविण्याच्या प्रयत्नात होते. शेवटी त्यांना जा म्हणून सांगावे लागले! तेच गावस्कर, श्रीनाथ, गांगुली यांनी बर्‍यापैकी योग्य वेळी निवृत्ती घेतली. मात्र, धोनी त्यांच्याही पुढे जाऊन वयाच्या ३३ व्या वर्षीच कसोटी क्रिकेटमधून निवृत्त झाला. ज्या व्यक्तीचा स्वकर्तृत्वावर विश्वास असतो तीच व्यक्ती असे निर्णय घेऊ शकते.
 
मी मात्र धोनी हे व्यक्तिमत्त्व क्रिकेटच्या पलीकडे जाऊन बघतो. ‘मॅनेजमेंट’च्या विद्यार्थ्यांसाठी हे समजून घेणे आवश्यक आहे. जो मैदानावर क्रिकेट खेळलेला असतो, त्याला त्याचा फायदा मॅनेजमेंटमध्ये चांगला होत असतो. या खेळाचे नेतृत्व करताना तुम्हाला आपल्याकडील संसाधनांचे/आयुधांचे नियोजन कसे करावे हे शिकायला मिळते. दररोज ‘शेवटचे २० चेंडू, २ विकेट्‌स हातात आणि ४० धावांची आवश्यकता’ अशा स्थितीचा सामना करावा लागतो. खेळामध्ये हार-जीत चालणारच हे खरे असले, तरी विजयी कर्णधार आणि त्याच्या चमूला विजयाची गोडी लागल्यावर तो जिंकण्यासाठी जिवाचे रान करतो. ते करताना कर्णधाराची भूमिका सर्वांत जास्त महत्त्वाची असते. सर्वच गोष्टी मुबलक असल्या की, कर्णधाराचे काम सोपे, मात्र अटीतटीच्या परिस्थितीत कर्णधाराची भूमिका निर्णायक असते. अशा अनेकपरिस्थितीत धोनीने संघ हाताळला आणि विजयश्री खेचून आणली म्हणून त्याची आकडेवारी स्वत:च बोलते.
 
अटीतटीच्या परिस्थितीत यश मिळवायचे असल्यास सर्वांत महत्त्वाचे असते मानव संसाधन! म्हणजेच सहकार्‍यांच्या पोटात घुसून संबंध निर्माण करणे, त्यांना पाहिजे तशा नैसर्गिक रीत्या क्षमता सिद्ध करू देणे, चूक झाली तरी त्याच्या पाठीशी ठामपणे उभे राहाणे, त्याला पडत्या काळात धीर देणे, चांगली कामगिरी केल्यास उत्तेजनासाठी पाठीवर थाप मारणे वगैरे वगैरे. मात्र, तेच करताना कुणी जर वागण्यात शहाणपणा केल्यास, तो कितीही मोठा असला तरी त्यास ताकीद देणे. कर्णधाराला यश मिळवायचे असल्यास सर्वांत जास्त आवश्यक असलेला गुण म्हणजे वाईटपणा घेता येणे. वाईटपणा तेव्हाच घेता येतो जेव्हा तुमचा त्यात स्वार्थ दडला नसतो. मात्र, वाईटपणा घेताना तो क्षणिक असावा, तिच्यात खुन्नस नसावी, दुसर्‍या दिवशी परत पूर्ववत वर्तणूक असावी, अन्यथा दोघांच्याही कामावर/खेळावर त्याचा प्रतिकूल परिणाम होत असतो. त्याच्या नेतृत्वाचे समर्पक वर्णन- ‘लीडिंग बाय एक्झाम्पल इज बेस्ट पॉलिसी!’ त्याच्या वर्णनानुसार धोनी प्रत्येक गोष्ट इतरांना सांगण्यापूर्वी स्वत: करीत असे. कुठलाही उपदेश हा कृतीच्या पार्श्‍वभूमीवर दिला गेला तरच त्याचे महत्त्व इतरांना पटते. वेळोवेळी स्वत:च्या कामगिरीतून संघासमोर उदाहरण ठेवले म्हणूनच त्याचे नेतृत्व इतर सदस्यांनी निर्विवादपणे मानले.
 
जरा आठवा, धोनी जेव्हा कर्णधार झाला तेव्हाची स्थिती. त्याच्या संघात सचिन तेंडुलकर, अनिल कुंबळे, राहुल द्रविड, लक्ष्मण, गांगुली असे दिग्गज होते. समजा घरात चार चार सासवा असताना सुनेची स्थिती कशी होणार? त्यात अपेक्षांचे प्रचंड ओझे आणि त्यात मग यश संपादन करणे. त्यात धोनी खरोखरच यशस्वी झाला. ज्येष्ठांचा यथोचित सन्मान करताना त्याने अनेकदा त्यांना समज द्यायला मागेपुढे पाहिले नाही. ते करताना संघाचे हित, हा एकच ध्यास असल्याने त्याला घवघवीत यश मिळाले. कोणत्याही कर्णधाराचे मूल्यमापन इतिहासातील त्याच्या आकडेवारीवरूनच होते, याची पक्की जाण धोनीला होती. मॅनेजमेंटमध्ये स्वत:चे बलस्थान आणि प्रतिस्पर्ध्यांचे कच्चे दुवे समजून चाल करणे जसे आवश्यक आहे, त्याहीपेक्षा स्वत:चे कच्चे दुवे आणि प्रतिस्पर्ध्यांची बलस्थाने समजणे आवश्यक आहे. थोडक्यात काय, तर स्वत:चे मूल्यमापन जर करता आले नाही, तर माणूस आयुष्यभर गटांगळ्या खात असतो आणि त्याला यश हुलकावणी देत असते.
 
यश मिळवण्यासाठी अनुकूल परिस्थिती प्राप्त होत नसते, तर प्राप्त परिस्थितीला अनुकूल करून घेणे, हेच महत्त्वाचे असते. आपला प्रयत्न लक्ष्यप्राप्तीसाठी सातत्यपूर्ण असावा लागतो, त्यात शॉर्टकटला थारा नाही. मार्गक्रमण करताना भरकटत जाता कामा नये. निराशा तर येऊच देऊ नये. त्यासाठी स्वत:वर विश्वास असणे आवश्यक आहे. जर स्वत:वर विश्वास नाही हे आपल्यास कळले, तर इतर कुणावर किंवा देवावर विश्वास ठेवावा. मात्र, कुणावरच विश्वास न ठेवणार्‍यांची संख्या अमाप असल्याने निराशा पदरी येत असते. कधी आपण लाचारीला समर्पण म्हणवून घेण्यात धन्यता मानतो, तर समर्पण म्हणजे लाचारी हे समजण्यात चूक करतो. मानसिक संतुलन बिघडण्याचे हेच मुख्य कारण असते.
 
प्रत्येकाला स्वत:चा आत्मसन्मान राखण्याचा अधिकार आहेच. परंतु, कधीकधी परिस्थितीला शरण येणे हेदेखील अपेक्षित असते. जसे, (महापुरे झाडे जाती| तेथे लव्हाळे वाचती॥ पुरामध्ये वृक्ष उन्मळून पडतात, पण छोटी झाडे सुखरूप तरतात. याच गोष्टीचे भान असणे आवश्यक आहे. धोनीला जेव्हा बदललेली परिस्थिती कळते, तेव्हा तो असे निर्णय घेतो. योग्य वेळी योग्य निर्णय घेऊन आपण जर बाजूला झालो, तर ती व्यक्ती अजून मोठी झालेली असते. राजकारणासंदर्भात नानाजी देशमुख म्हणायचे की, ‘‘राजकारणातदेखील ६०व्या वर्षी निवृत्त व्हावयास हवे.’’ आणि त्यांनी ते करून दाखवले! पुढे जाऊन त्यांच्या हातून समाजोपयोगी अतुल्य कार्य घडले. लोकांसाठी ते आदर्श राजकारणीपण झाले आणि आदर्श समाजसेवीपण. जीवन हा प्रवास म्हणून आपण मानतो. मात्र, बसस्टॉप आला की आयुष्य संपले, या भीतीने आपण वागतो. यशस्वी पुरुषाला बसस्टॉपनंतरचे आयुष्य आणि संधी दिसत असतात. त्यामुळे त्यांचा पुढचा प्रवासदेखील नावीन्यपूर्ण असतो. नंतर मग आपण त्यांच्या यशाचे गोडवे गात असतो. धोनीदेखील हेच सिद्ध करणार आहे…