भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रत्येक कार्यक्रमात बोलताना नेहमीच काहीतरी नवीन विचार देत असतात. ऐकताना तो तसा सरळ आणि सोपा वाटतो, मात्र त्यामध्ये काहीतरी दडलेले असते. मोदी जे काही बोलतात त्यात भावार्थ असतो. हा भावार्थ समजून घेता आला, तर पुढचा मार्ग सुकर होतो. पुण्यात बँकांच्या एका संमेलनात बोलताना ते म्हणाले की, ‘‘चंचल लक्ष्मीवर सरस्वतीद्वारे नियंत्रण ठेवले पाहिजे.’’ आर्थिक क्षेत्रातले आणि बँकेचे सर्वच दिग्गज तेथे बसले होते. ते सर्वच चक्रावून गेले असतील. कारण, इतक्या सहज आणि सोप्या भाषेत पंतप्रधानांनी मर्मावरच बोट ठेवले होते!
आज बँकप्रणाली कशी चालते हे तपासू या. बँक सुरू करायची म्हटली की, तिला सुरुवातीला प्रवर्तकाकडून भागभांडवल लागते, ज्याद्वारे ती एक संस्था म्हणून कार्य करू शकते. त्यात मग कर्मचारी, कार्यालयीन खर्च, जाहिराती, सरकारी फी वगैरेसारखे खर्चांचे नियोजन असते. नंतर मग लोकांकडून ठेवी स्वीकारणे, त्या ठेवींवर आकर्षक व्याजदर देणे. स्वीकारलेल्या ठेवींवर पहिल्याच दिवसापासून खर्च सुरू झालेले असतात. म्हणून तो पैसा ताबडतोब व्यवसायात लावणे आवश्यक असते.
बँकेचा व्यवसाय काय, तर लोकांना-संस्थांना कर्जवाटप करणे. कर्जवाटप करताना त्यावर व्याजदर आकारणे. कर्जावरील व्याजदर फार जास्त ठेवला, तर कर्ज घ्यायला कुणी येत नाही. आलाही तरी त्याची केस पहिल्याच दिवसापासून वादाच्या भोवर्यात सापडणार, हे निश्चित असते. कारण, त्याचा हेतूच अनेकदा चांगला नसतो. म्हणून बँका जर कर्जावर दहा टक्के आकारत असतील, तर ठेवींवर व्याजाचा दर दहा टक्क्यांपेक्षा कमी म्हणजेच आठ टक्क्यांच्या घरात देत असते. मधले दोन टक्के बँकेला तिचा खर्च चालविण्यासाठी आणि भागधारकांना डिव्हिडंड देण्यासाठी होत असतो. या तारेवरच्या कसरतीवर बँका जर खर्या उतरल्या, तर संस्था म्हणून त्यांचे भवितव्य राहते. मात्र, आवश्यक खर्चाच्या व्यतिरिक्त पैसा दिला गेला की, मग बँक आणि कर्ज घेणारा हे दोघेही त्यांच्या त्यांच्या व्यवसायात माघारतात आणि मग बोंबा मारतात. हा खर्च कोणता असतो, तर टेबलाखालून दिलेला आणि घेतलेला खर्च, म्हणजेच भ्रष्टाचार! म्हणजेच दोन टक्क्यांच्या मार्जिनवरच व्यवसाय करणे अपेक्षित. तुम्हाला जास्त पैसा कमवायचा असेल, तर व्यवसायवृद्धी करून त्या दोन टक्क्यांची रक्कम जास्त करून घेता येईल. मात्र, तसे न करता पैसा कमवायचा म्हटला, की मग जे श्रीसूर्या, वासनकर इत्यादी कंपन्यांचे झाले तेच होत असते! बरेचदा व्यवसाय करणारे आणि त्यात गुंतवणूकदार हे दोघेही प्रामाणिक असू शकतात. मात्र, त्यांनी निवडलेले व्यवसायाचे मॉडेल जर चूक असेल तर दोघांचेही नुकसान होत असते.
लक्ष्मी आणि सरस्वती यांची सांगड घालण्याची आवश्यकता मोदींना का पडली आणि त्यांना काय सुचवायचे होते, हे आपल्या लक्षात आलेच असेल. लक्ष्मीला चंचल आणि सरस्वतीला स्थिर असे का म्हटले असावे? लक्ष्मीचे रूप दोन्ही प्रकारचे पाहायला मिळते- स्थिर आणि चंचल. सरस्वती मात्र स्थिरता प्रदान करणारी. सरस्वती कशी प्राप्त होते, तर अध्ययनाने. अध्ययन हा आपल्या मेंदूशी निगडित विषय आहे. जर आपल्याला सद्बुद्धी झाली आणि कठोर परिश्रम केले, तर सरस्वती प्राप्त करता येते. अध्ययन म्हणजे केवळ पुस्तके वाचणे किंवा पदव्या प्राप्त करणे नव्हे! अध्ययन म्हणजे जे जे दृश्य-अदृश्य रूपात दिसते त्याला बुद्धीच्या कसोटीवर तपासणे. उघड्या डोळ्यांनी सृष्टिरूपी पुस्तकात वाचत राहणे आणि हे ‘असे का?’ अशा चौकस बुद्धीने ज्ञानाचा साठा वाढविणे; तर लक्ष्मी प्राप्त करण्यासाठी केवळ कष्ट करून चालत नाही. अन्यथा कष्टकरी जनता श्रीमंत दिसली असती! तिचा संबंध सरस्वतीशीही नाही, कारण सर्वच हुशार मंडळी श्रीमंत दिसत नाही. तसेच सर्वच श्रीमंत हुशार असतात असेही नाही. मात्र, ते तसे भासतात. कारण, कोण काय बोलतो त्यापेक्षा तो कसा आणि किती ठामपणे बोलतो, यावरून आपण त्याची हुशारी ठरवीत असतो. खिशात पैसे असताना आपण कसे आश्वस्त होऊन वागतो. तेच पैसे संपले की, कसे गर्भगळीत होतो. त्यामुळे ज्याच्याजवळ पैसा आहे, तो विश्वासाने वावरतो. ज्याला आपण ‘पैसा बोलता हैं!’ असे म्हणतो. आज केवळ पैसा कमाविणे हाच शिष्टाचार झाला आहे. पूर्वी व्यवसायातपण भरपूर पैसा कमाविला जात होता, मात्र त्यात सामाजिक बांधिलकी आणि समाजोपयोगी योगदान हा उद्देश असे आणि त्यातून पैसा हा बायप्रॉडक्ट असे. जसे शेतकरी शेतीचा व्यवसाय करताना उगवलेल्या अन्नापैकी स्वत:ला जेवढे पोते धान्य लागेल तेवढेच काढून ठेवत असे आणि बाकीचे वाजवी दराने विकत असे. स्वत:पुरती काढलेली पोती म्हणजे त्याचा नफा असे. याच धर्तीवर वाजवी नफा कमावून टाटासारख्या समूहांनी चांगला पायंडा पाडला. मात्र, कालांतराने केवळ नफा कमाविण्याच्या उद्देशाने उद्योगधंदे निघाल्याने स्थिर लक्ष्मीपेक्षा चंचल लक्ष्मी जास्त प्रमाणात दिसू लागली.
बेलसरे महाराजांनी स्वत:च एक अनुभव घेतला होता. ते मुंबईच्या मालाड येथील घरापासून खिशात एक दमडीदेखील न घेता, खायची-प्यायची शिदोरी न घेता, गोंदवल्याला जायला निघाले. पायी पायी चालताना, हिवाळ्याच्या दिवसांत त्यांच्यावर काय काय प्रसंग आले, हे त्यांनी वर्णन केले आहेत. कुणी आपल्याला बसमध्ये बसवून घेईल का, कुणी आपल्याला पाणी प्यायला देईल का, पोटाची खळगी भरण्यासाठी कुणी खायला देईल का, अशा अनेक प्रकारच्या प्रश्नांनी त्यांच्या मनात घर केले. मन कसे घाबरून जाते, सैरभैर धावते तरीही आपण तरून जातो- जर सरस्वतीची म्हणजेच सत्याची कास सोडली नाही तर! नेमक्या अशाच परिस्थितीत तुम्हाला मन बरोबर उलटे आणि चुकीचे निर्देश देत असते आणि मग आपण बरेचदा आपद्धर्माच्या नावाखाली गैरप्रकाराला बळी पडतो. त्यालाच आपण ‘भ्रष्टाचार’ म्हणतो ज्यामुळे आज आपला देश मोठ्या संकटात सापडला आहे. याच पार्श्वभूमीवर मोदींनी सुचविले आहे की, अशा वेळी सरस्वतीचा धावा करा आणि सदसद्विवेक बुद्धीला जागृत करा.
सरस्वतीचा आणि लक्ष्मीचा वास हा कशाच्या आधारावर आपल्या जीवनात येत असावा? कदाचित सरस्वतीची कृपा ही वर्तमान आयुष्यात प्राप्त करण्यासारखी आहे, तर लक्ष्मीची कृपा ही वर्तमान, त्याचबरोबर संचित कर्माशी निगडित असावी. कर्माच्या सिद्धांताप्रमाणे आपण जन्माला येताना संचित कर्म घेऊन येतो. लक्ष्मीचाच विचार केला, तर कुणी पूर्वजन्मीचे बँक बॅलन्स घेऊन येतो, तर कुणी ओव्हरड्राफ्ट! नंतर त्या त्या प्रकारे तो वर्तमान आयुष्यामध्ये भर घालून आपली आर्थिक स्थिती सुदृढ करण्याचा प्रयत्न करतो. संचित कर्मातून आलेल्या लक्ष्मीला जर सरस्वतीची जोड मिळाली, तर ती स्थिर लक्ष्मी म्हणून मान्यता प्राप्त करते आणि सरस्वतीची जोड नसली की, ती अस्थिर म्हणून गणली जाते. लक्ष्मी चंचल किंवा अचंचल नसतेच. मन चंचल असते. मनावर ताबा केवळ सरस्वतीद्वारेच प्राप्त होऊ शकतो. लक्ष्मी आणि सरस्वती दोघीही कुणाहीपाशी आनंदाने नांदू शकतात. पाचशे रुपयांची नोट श्रीमंताकडे राहिली काय किंवा गरीब भिकार्याकडे गेली काय, तिला त्याचे काही सुख-दु:ख नसते. दु:खी होते ते मन!
आपण बरेचदा एखाद्याला दानशूर म्हणतो, कारण तो लोकहितार्थ काम करीत असतो. सत्पात्री लक्ष्मी आणि चांगले कर्म हे सर्वांत उचित लक्षण. वाममार्गाने मिळविलेली लक्ष्मी आणि तिचा चांगल्या कामासाठी विनियोग करणे हे दुसर्या क्रमांकाचे उचित लक्षण म्हणता येईल. मात्र, वाममार्गाने कमाविलेला पैसा केवळ मीच पचवणार, असा विचार बाळगणे म्हणजे अस्थिर आणि अचंचल लक्ष्मी (संपत्ती) बाळगणे. कारण तेथे सरस्वतीचा वास नसतो. थोडक्यात काय, तर सरळ मार्गाने पैसा कमाविणे आणि त्याचा सुयोग्य विनियोग करणे म्हणजे लक्ष्मी आणि सरस्वतीची उपासना करणे. ज्याद्वारे स्थैर्य, आरोग्य आणि मन:शांती प्राप्त होते, तर ज्या पैशावर आपला अधिकारच नाही, तो पैसा प्राप्त करणे म्हणजे सरस्वतीच्या परवानगीशिवाय लक्ष्मी घरात आणणे. ती चचंल असते आणि त्या लक्ष्मीसोबत आपले स्थैर्य, आरोग्य आणि मन:शांती सर्वच दुरावते आणि तशी प्राप्त केलेली लक्ष्मी, सुंदर सुंदर महाकाय दवाखान्यात डॉक्टरांच्या खिशात प्रवेश करते…!