प्रामाणिकपणाचे राजकारण

Vishwasmat    18-Nov-2015
Total Views |


default pic_1  
 
सप्टेंबर व ऑक्टोबर हे दोन्ही महिने बिहारमधील निवडणुकीने गाजले. भाजपाविरुद्ध सर्व अशी अटीतटीची लढाई होती ती. भाजपा जिंकल्यास राष्ट्रीय पातळीवर अनेक घटनांना गती येणार होती, तर इतर सर्वच विरोधी पक्षांसाठी ती अस्तित्वाची लढाई होती. आठ नोव्हेंबरला निकाल हाती आले आणि भाजपाचा पराभव झाला. भाजपाचा पराभव म्हणजेच मोदींचा पराभव, असाच त्याचा अर्थ काढला गेला. त्यात फार चुकीचे पण नाही. कारण गेल्या लोकसभा निवडणुकीत व त्यानंतर हरियाणा, महाराष्ट्र, जम्मू काश्मीरसारख्या राज्यांतील निवडणुकांत भाजपाला यश मिळाले ते मोदी फॅक्टरमुळेच, ही देखील वस्तुस्थिती होती. त्यामुळे मोदींची हार म्हणून अनेकांना आनंदाच्या उकळ्या आल्या. शक्तिशाली व्यक्तीला हारवू शकत नाही, या मानसिकतेच्या लोकांना ती व्यक्ती परस्पर हारली की आनंद होणे स्वाभाविकच होते!
 
का म्हणून मोदींनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली असणार? एवढे परिश्रम घेतले असणार? २०१४ च्या लोकसभा निवडणुकींमध्ये जनतेने मोदींच्या हाती एकहाती सत्ता सोपविली. जनतेला त्यांच्याकडून अनेक विषयांवर अपेक्षा होती व आहे. देशपातळीवर सुधारणा करायच्या म्हटल्यास केवळ लोकसभेतील बहुमताने भागत नाही. लोकसभेबरोबर राज्यसभेत देखील बहुमत असणे आवश्यक होते. म्हणून बिहारच्या विधानसभा जिंकणे गरजेचे होते. विकास व सुधारणा करण्याकरिता जमीन अधिग्रहण कायदा व जीएसटी लागू करण्यासाठीचा कायदा करणे आवश्यक आहे. हे दोन्हीही कायदे लागू झाल्यास मोदींची विकासयात्रा जोमाने पळणार, हे विरोधकांना चांगले माहीत होते. जे यश मोदींना गुजरातेत मिळाले तेच यश देशपातळीवर मिळाल्यास विरोधी पक्षांना पुढील दहा वर्षे तरी संधी दिसत नव्हती. त्यामुळे सर्व पक्षांनी जसे नितीशकुमार, लालूप्रसाद यादव, कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, त्यात भर म्हणून शिवसेनासारखे पक्षदेखील एकट्या मोदींच्या विरोधात सरसावले होते. काहींनी या युद्धाला अभिमन्यूची देखील उपमा दिली आहे. बिहारच्या निवडणुका आटोपल्या व एकदम पुरस्कार वापसी, असहिष्णुता वगैरे विषय बंद पडले. हे सर्वच एकत्र का आले हे समजणे देखील आवश्यक आहे. साम्यवादी विचारांचे अनेक गट आहेत व ते आपापले पक्ष वेगवेगळ्या प्रकारे चालवितात. समान शत्रू मिळाला की एकत्र होतात व ताकदीनिशी लढतात. शत्रू नसला की परत भरकटतात. आपापसात भांडतात. लालू व नितीशकुमार यांचा संसार किती दिवस चालणार आहे, हे यावरून लवकरच लक्षात येईल. ते वर्षभरातच भांडले तर काय अवस्था होईल? परत नितीशकुमार भाजपाकडे पाठिंब्यासाठी आले तर काय होईल, हे सर्वच पाहण्यासारखे राहाणार आहे.
 
मोदींना झिडकारण्याचे कारण काय तर म्हणे त्यांची जादू आता ओसरली आहे. त्यांनी पाहिजे तसे काम अजून केलेले नाही वगैरे वगैरे. हे जरी क्षणभर मान्य केले तरीही एकदम मोदींपेक्षा लालू कसे काय बरे ठरतात? त्यांना सर्वात जास्त जागा मिळतात. ते तर तुरुंगात जाऊन आलेले, गुन्हा सिद्ध झालेले राजकारणी! जनता देखील कोणाला तरी धडा शिकवण्याच्या नादात स्वत:च धडा घेत असते. गेली साठ वर्षे धडेच घेत आलेली असताना, मोदींना निवडून दिलेले असताना का नाही उसंत पाळत. एकाच वर्षात कसे काय त्यांच्या कामांचे मूल्यमापन करते? ज्या कॉंग्रेसच्या राजवटीत कोळसा घोटाळा, स्पेक्ट्रम घोटाळा झाला होता त्याच विषयांवर मोदी सरकारने किती पारदर्शक व कठोर कायदे तयार केले. काळ्या पैशाच्या विषयावर मुसक्या आवळायला सुरुवात झालीच आहे ना? भारतभर अचानक घरांची खरेदी-विक्री का मंदावली आहे? का बिल्डर लॉबी कासावीस झाली आहे? याचा संबंध काळ्या पैशाविषयी केलेल्या कायद्याशी आहे. पहा लवकरच बिल्डर लोकांना आपला माल कमी किमतीत विकल्याशिवाय गत्यंतर राहाणार नाही.
 
विदेश पातळीवर मोदींनी ‘डंके की चोट’पर भारताचा झेंडा गाडलाच ना? बिहारच्या निवडणुकांच्या नंतर लागलीच लंडन येथे मोदींना मिळालेल्या यशाकडे कानाडोळा कसा करता येईल? ज्या अमेरिकेने व इंग्लंडने त्यांना दहा वर्षे व्हिसा नाकारला त्याच देशांनी व त्याच राष्ट्रप्रमुखांनी त्यांच्यासाठी पायघड्या का घातल्या? ब्रिटनमध्ये तर ‘गार्ड ऑफ ऑनर’ केवळ राष्ट्रप्रमुखांना दिल्या जातो, म्हणजेच आपल्या राष्ट्रपतींना मिळणारा मान पंतप्रधानांना देखील दिला गेला, तो केवळ मोदी या व्यक्तिमत्त्वामुळेच. इंग्लंडमध्ये साठ हजारांचा जनसमुदाय पहिल्यांदाच एकत्र येऊन विदेशातील नेत्याला ऐकत होता. लाखो कोटींची गुंतवणूक त्यांनी आपल्या देशात आणू घातली आहे. पहिल्यांदाच दुर्दम्य आत्मविश्‍वास असलेला नेता भारताला लाभलेला आहे व त्याद्वारे आंतरराष्ट्रीय सुरक्षा परिषदेवर स्थायी सदस्यत्व मिळावे म्हणून पाठिंबा दिला आहे. प्रथमच भारताला ‘आऊट ऑफ बॉक्स’ विचार करणारा नेता मिळाला आहे. स्वतःच आपली मॅनेजमेंट स्टाईल विकसित करून, आंतरराष्ट्रीय स्तरावर लोकांना मोहीत करीत आहे.
 
तरीही बिहारच्या निवडणुकीतील पराभव मोदींचा पिच्छा पुरविणार आहे. कारण माध्यमांना व विरोधकांना हाती कोलित मिळाले आहे. येणार्‍या संसद अधिवेशनात देखील विरोधक आक्रमक झालेले पाहायला मिळतील. मात्र, मोदींसारख्या चाणाक्ष नेत्याला सावरायला वेळ लागत नाही. झालेल्या चुका किंवा फसलेले गणित यात दुरुस्ती करणे, अपयशातून भरारी घेणे म्हणजेच मोदी! त्यांना ठावूक आहे की जनतेने जरी दिल्लीत व बिहारमध्ये यश पदरी पाडले नसले तरी त्यापूर्वीच महाराष्ट्र, हरियाणा, जम्मू-काश्मीर येथे भरभरून यश दिलेच आहे. त्यामुळे पुढील प्रयत्न उत्तरप्रदेशात होणार्‍या निवडणुकीवरच राहाणार आहे. जे बिहारमध्ये घडले किंवा दिल्लीत घडले ते उत्तरप्रदेशमध्ये घडणार नाही, याची व्यूहरचना ते आतापासूनच करायला लागतील. उत्तर प्रदेशात भाजपाला यश मिळू शकेल. कारण, तेथील स्थानिक नेतृत्व व बिहारमधील नितीशकुमाररूपी नेतृत्व यात जमीन आसमानाचा फरक आहे.
 
मोदींची जादू बिहारमध्ये व दिल्लीमध्ये न चालण्याचे कारण काय असू शकते, ते शोधणे आवश्यक आहे. मोदींचे मोदीत्व निर्माण होण्यात त्यांच्यातील कणखरपणा, निर्णयक्षमता, विकासाचे राजकारण, वगैरे भाग तर आहेच. मात्र, त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे त्यांची भ्रष्टाचाराविरुद्ध लढणारी व प्रामाणिक नेत्याची प्रतिमा. खाणार पण नाही व खाऊ पण देणार नाही ही प्रतिमा. या एका वेगळेपणामुळे इतर सर्वच राज्यांतील स्थानिक नेतृत्व कुठेच स्पर्धेत नव्हते. महाराष्ट्रात कॉंग्रेस-राष्ट्रवादीची भ्रष्टाचारी प्रतिमा, तेच हरयाणा व इतर राज्यांत. मात्र, दिल्ली व बिहारमध्ये नेमके त्याच प्रतिमेचे स्थानिक नेतृत्व मोदींच्या उधळणार्‍या रथाला रोखण्यात यशस्वी झाले. केजरीवालांची प्रतिमा जनसामान्यांमध्ये प्रामाणिक नेता म्हणूनच होती. नितीशकुमारांच्या बाबतीत तुम्ही कुठे बोट ठेवणार? ते देखील प्रामाणिक, लोकांसाठी झटणारे, लोकांची नाळ ओळखणारे, लालूंच्या जंगलराजमधून बिहारला प्रगतीपथावर नेण्यात नितीशकुमार नक्कीच यशस्वी झाले आहेत. या केवळ एकाच गुणामुळे मोदींना पाहिजे तसे यश मिळाले नाही. प्रामाणिकपणा, विकासाचे राजकारण, लोकांविषयीची तळमळ असणारे नेतृत्व एकमेकांच्या विरोधात लढत देऊ लागले, स्वत:ची यशाची रेघ दुसर्‍याच्या यशाच्या रेघेपेक्षा लांब तयार करू लागले, तर खरोखरच जनतेला ‘अच्छे दिन’ येणार आहे व भारताला खर्‍या अर्थाने जगातील सर्वात मोठी व यशस्वी लोकशाही म्हणून मान मिळणार आहे.