हुकमाचे पान!

Vishwasmat    24-Nov-2015
Total Views |
 
nitin gadkari_1 &nbs
 
देशपातळीवरच्या राजकारणात महाराष्ट्राला नेहमीच विशेष स्थान मिळालेले आहे. एक तर हे राज्य पुरोगामी आहे व दुसरे म्हणजे मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी महाराष्ट्रात आहे. म्हणूनच या राज्याचा मुख्यमंत्री सर्वात शक्तिशाली समजला जातो. त्याचे एकमेव कारण म्हणजे महाराष्ट्राकडून राष्ट्रीय पातळीवर होणारे आर्थिक योगदान. म्हणूनच स्वातंत्र्योत्तर काळात महाराष्ट्राने केंद्रात मंत्री म्हणून सी. डी. देशमुख, यशवंतराव चव्हाण, शंकरराव चव्हाण, वसंत साठे, एन. के. पी. साळवे, मधु दंडवते, शरद पवार, सुरेश प्रभू, विलासराव देशमुख अशा कितीतरी दिग्गजांना मंत्री म्हणून पाठविले. सर्वांनी आपापल्या परीने योगदान दिले.
 
यशवंतराव चव्हाण तर थेट उपपंतप्रधान झाले. त्यांच्या व सी. डी. देशमुखांच्या कामाची वाहवा आजही होत असते. त्यामानाने शरद पवार जे महाराष्ट्राचे यशस्वी मुख्यमंत्री म्हणून गणल्या गेले, त्यांची कारकीर्द खूप गाजली असे म्हणता येत नाही. परंतु एक नाव आहे, ज्यांची कारकीर्द महाराष्ट्रातून पाठविलेला केंद्रीय मंत्री म्हणून सदैव लक्षात राहणार आहे व ते म्हणजे नितीन गडकरी!
मोदी सरकारचा दीड वर्षाचा कार्यकाळ संपला आहे. आता साडेतीन वर्षांनंतर निवडणुकांना सामोरे जाताना त्यांना त्यांच्या सरकारच्या उपलब्धीची यादी सादर करावी लागणार आहे. त्या यादीमध्ये सर्वात उठावदार कामगिरी दिसणार आहे ती नितीन गडकरींची. नरेंद्र मोदी सहसा कोणाची तारीफ करीत नाहीत. मात्र, त्यांनी गडकरींच्या कामाच्या धडाक्याची नुकतीच जाहीर तारीफ केली. मोदींनी त्यांना भुपृष्ठ परिवहन, जहाजबांधणी ही दोन्हीही मंत्रालये दिली. सुरुवातीला अशी वदंता होती की रेल्वेे देखील त्यांच्याकडे जाणार म्हणून, तसे झाले असते तर संपूर्ण भुपृष्ठ वाहतूक विभाग त्यांच्याकडे आला असता व त्यांनी एक समग्र कार्यक्रम भारताला दिला असता. तरीही आहे तो विभाग देखील फार मोठा आहे व त्यात बरेच काही करण्यासारखे आहे. तसा या खात्याचा अनुभव त्यांच्या पाठीशी होताच. १९९५ मध्ये युती सरकारमधे, एक वर्ष उशिरा मंत्रिपद मिळाले तरीही सर्वात यशस्वी मंत्री म्हणून त्यांनी नावलौकिक मिळविलाच होता. केवळ भाजपाचाच नाही, तर बाळासाहेब ठाकरेंचा देखील त्यांनी विश्‍वास संपादन केला होता. त्यांनी मुंबईत उभारलेले उड्डाण पूल, पुणे-मुंबई द्रुतगती मार्ग, सगळीच बोलकी उदाहरणे आहेत. त्यांनी पैशाची मागणी तत्कालीन अर्थमंत्र्यांकडे न करता स्वत:च एमएसआरडीसीच्या माध्यमातून लोकांच्या भागीदारीतून पैसा उभा केला व कामे केली. अर्थात गडकरींना स्वत:ला सिद्ध करायला गाठीशी अनुभव पाहिजेच असे नाही.
 
मिळेल त्या संधीचं सोनं करणे ही त्यांची विशेषता. विधान परिषदेचे आमदार असो, विरोधी पक्ष नेता असो, मंत्री असो किंवा अजून काही… प्रत्येक भूमिकेला समर्थपणे न्याय देण्यात ते यशस्वी झाले. काय रसायन असेल त्यांच्या शरीरात? का ते कोठेही सहजतेने वावरतात व यशस्वी होतात? एकतर ते सामान्य व संस्कारित कुटुंबातून आल्याने, शेतकरी कुटुंबातून आल्याने, जमिनीवर राहून लोकांच्या समस्या अनुभवल्याने उंच भरारी मारताना देखील पाय जमिनीवर घट्टच ठेवण्यात यशस्वी झाले. दुसरे त्यांच्या स्वभावात गंड नाही. त्यामुळे ते साधारणातल्या साधारण कार्यकर्त्यापासून रतन टाटापर्यंत किंवा विदेशातील मोठा राजकीय पुढारी वा उद्योगपती असो, सगळ्यांशीच सारखे वागू शकतात. खरे तर यशाच्या प्रवासात, तेही देदीप्यमान प्रवासात भले भले लोक भरकटतात. मात्र, गडकरी कोणतीही गोष्ट एका क्षणात त्यागण्याची तयारी बाळगतात म्हणून त्यांना यश गवसणी घालत असते. ते तसे कर्मयोगीच. कारण सतत त्यांना काम करायला आवडते. एकाच वेळी त्यांच्या डोक्यात अनेक विषय सुरू असतात व ते प्रत्यक्षात कसे आणावे याचा त्यांचा ध्यास सुरूच असतो.
 
म्हणूनच त्यांना केंद्रात जबाबदारी मिळाल्याबरोबरच त्यांनी सर्वच आघाड्यांवर धडाका लावला. यंत्रणेला कसे राबवायचे हे त्यांना चांगलेच माहीत आहे. खात्याचा अभ्यास करून लागलीच रोड ट्रान्सपोर्ट व सेफ्टी बिल आणले. लहान लहान आवश्यक ते बदल केले. जसे एका राज्यातून दुसर्‍या राज्यात कार स्थानांतरित करायची असल्यास दोनदा कर लागत असे तो आता विभागल्या जातो आहे, रस्त्यावरील अपघातात मृत्यूंचे कारण शोधल्यावर त्यांच्या लक्षात आले की, अपघातग्रस्ताला वेेळेवर वैद्यकीय सेवा उपलब्ध होत नाही. त्या दृष्टीने व विमा योजनेच्या माध्यमातून त्यांनी यात बदल घडवून आणले. राष्ट्रीय महामार्गावरील ६२ टोल नाके बंद केले. टोल नाक्यांवर होत असलेली वाहतूक अडवणूक पाहून त्यांनी इलेक्ट्रॉनिक टोल वसुली प्रणाली सुरू केली, परवाना मिळविण्यासाठी चालकांची स्वयंचलित कॅमेर्‍याच्या माध्यमातून परीक्षा पद्धती सुरू केली, ज्यामुळे पारदर्शकता आली व भ्रष्टाचाराला आळा बसला, राष्ट्रीय महामार्गाच्या कडेला रूक्ष रूप पालटून उपाहार गृह, शौचालयाची सोय, मॉल्स आणण्याचा निर्धार केला. त्यांनी आपल्या विभागाला सूचना केल्या की दररोज सरासरी १५ कि. मी. अंतराचे रस्त्यांचे बांधकाम व्हायलाच पाहिजे व त्याप्रमाणे ते सुरू आहे, ज्याचा आढावा ते स्वत: नित्य घेतात. २००० सालापासून तयार झालेल्या एक लाख किमी रस्ते बांधकाम योजना कूर्मगतीने सुरू होती, तिला गती देऊन जवळ जवळ तीस हजार किमीचे काम मार्गी लागले आहे. हे सर्व करताना त्यांनी महाराष्ट्राकडे देखील दुर्लक्ष न करता, कुणाचीही भिडमुर्वत न बाळगता बर्‍याच कामांना मान्यता दिली आहे.
प्रत्येक गोष्टीत नावीन्य आणणे ही गडकरींची विशेषता. जसे एनटीपीसीच्या फराक्का वीजनिर्मिती केंद्राला हलदियाहून गंगेच्या पात्रातून कोळशाची वाहतूक होत आहे. त्याने नवा वाहतूक मार्ग तयार झाला व कोळशाची खरेदी किंमत देखील कमी झाली. ज्याने सामान्य वीजग्राहकांना फायदा होणार आहे. सामान्यांसाठी इ-रिक्षा देखील सुरू केली. शिपिंगमधे देखील मोठी कामे सुरू आहेत. इराणला पोर्ट तयार करून भारतातील पोर्टला जोडणे, वाहतुकीचा खर्च वाचविणे देखील सुरू आहे. गडकरींची विशेषता म्हणजे ते स्वत:ला कोणत्याही मर्यादित विचारात किंवा चौकटीत ठेवत नाहीत. मनाचा मोठेपणा व विचारांचे कवाड उघडे ठेवत असल्यामुळे आलेल्या प्रत्येक व्यक्तीकडून काही तरी नवीन शिकतात, नवीन विचारांना आत्मसात करतात व प्रत्यक्षात उतरवण्याची संधी शोधतात.
 
विदेशात गेले तरी सर्व गोष्टी बारकाईने न्याहाळतात व आपल्या देशात त्याचा कसा उपयोग करता येईल हे बघतात. ते भाजपामधे असले तरी त्यांची विचार करण्याची व काम करवून घेण्याची पद्धत हटके आहे. सुसंस्कृत व सभ्य माणसांशी जेवढे सभ्यपणे वागतात तेवढेच इतरांशी त्यांना जशी भाषा कळेल तसे वागायला मागेपुढे पाहात नाहीत. आजही त्यांच्या प्रचंड व्यस्ततेमधून त्यांना भेटणार्‍यांची संख्या तेवढीच आहे. सर्व स्तरावरच्या व सर्वात जास्त लोकांना प्रत्यक्ष भेटण्याच्या बाबतीत ते सर्वात वरच्या क्रमांकावर आहेत. कोणाला काय वाटेल याचा जास्त विचार न करता स्वत:ला काय वाटते व जनहितासाठी काय केले पाहिजे, याला ते महत्त्व देतात. आज सर्वच सहकारी मंत्र्यांच्या तुलनेत त्यांचे काम व त्यांची कामगिरी सर्वात दमदार असावी. सनदी अधिकारी व गुंतवणूकदार दोघेही या खात्याच्या कार्यशैलीने प्रभावित आहेत. जरी इतरही मंत्री जसे सुरेश प्रभू, पीयूष गोयल, मनोहर पर्रीकर, सुषमा स्वराज आपापल्या विभागात चांगले काम करीत असले, तरी पुढील निवडणुकांमध्ये गडकरींच्या खात्याच्या प्रगतिपुस्तकाचे सर्वात जास्त सादरीकरण होणार आहे. कारण पायाभूत सुविधांच्या माध्यमातूनच विकासाला, गुंतवणुकीला खरी गती येत असते. म्हणूनच नितीन गडकरी नरेंद्र मोदींचा हुकमी एक्का सिद्ध होणार आहे!