संचित कर्म!

Vishwasmat    15-Dec-2015
Total Views |

salman khan_1   
सन 2002 च्या ‘हिट अॅण्ड रन’ म्हणून गाजलेल्या केसमध्ये, सलमान खानला मुंबई उच्च न्यायालयाने निर्दोष मुक्त घोषित केले. सलमानचा परिवार, चाहते, प्रेक्षक- सर्वांचाच जीव भांड्यात पडला. एका सज्जन, निरागस, समाजाला ज्याची फार आवश्यकता आहे अशा व्यक्तीला न्याय मिळाला, अशी भावना निर्माण झाली. आता त्याची ‘दबंग’गिरी पडद्यावर अजून जोरात दिसून येईल. खटला म्हटला, की एकाला न्याय मिळतो व दुसर्‍याला, अन्याय झाला, असे वाटणे साहजिकच आहे. आपली न्यायप्रणाली वैभवसंपन्न होती. अनेक न्यायाधीश, अनेक वकील, अनेक न्यायालयीन कर्मचारी हे सर्वच, कोणत्याही प्रकारच्या आमिषाला बळी पडत नसत. अशी मंडळी आजही आहेत, ज्यांच्यामुळे लोकांना न्याय मिळत असतो.
 
सलमान खानच्या खटल्यात जो पोलिस कॉन्स्टेबल रात्री गस्तीवर होता, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार होता, त्याच्या आईने न्यायालयाच्या निकालावर जे भाष्य केले, ते फारच बोलके आहे. ती सहज म्हणून गेली की, ‘‘न्याय हा केवळ श्रीमंतांनाच मिळतो, गरिबांना नाही!’’ तिचा मुलगा आज हयात नाही. रवींद्र पाटील नामक हा पोलिस कॉन्स्टेबल, ‘त्या’ रात्री त्या स्थानावर हजर होता. त्याने सर्व पाहिले होते. त्यानेच सर्वप्रथम जवळच्या पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल केला होता. तो ठामपणे म्हणत होता की, कार चालवणारा सलमान खानच होता! पुढे गूढ रीत्या तो नोकरीवर गैरहजर राहू लागला, त्याच्या नावानेच वॉरण्ट निघाला. तो साक्ष बदलायला तयार नव्हता. पुढे त्याला दुर्धर रोग जडतो व त्याचा मृत्यू होतो. खरं तर कायद्यात अशी तरतूद आहे की, साक्षीदार जर उलटतपासणीसाठी हयात नसेल, तर त्याचा शेवटचा जबाब ग्राह्य धरला जावा.
ट्रायल कोर्टातदेखील अनेक विषय समोर आले होते. सलमान खान रात्री बारमध्ये होता. हॉटेलमधून बाहेर पडल्यावर तोच गाडी चालवायला बसला होता. अपघात झाल्यावर त्याने व अशोक िंसहने गाडी उचलून, खाली अडकलेल्या लोकांना काढण्याचा प्रयत्न केला होता. अशोक िंसह हा त्याचा वैयक्तिक चालक- जो 2002 नंतर खटल्यातील सुनावणीमध्ये एकदमच गायब झाला होता! 13 वर्षांनी तो अवतरतो व कबूल करतो की, ‘‘मी गाडी चालवीत होतो.’’ म्हणजे 13 वर्षे चाललेल्या खटल्यात सलमान म्हणतो की, मी गाडी चालवीत नव्हतो, मात्र गाडी कोण चालवीत होता, हे ना सलमानने सांगितले, ना त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न झाला. अशोक िंसह 13 वर्षांनी अवतरल्यामुळे सलमान सुटला व आता अशोक िंसहवर खटला चालवून, परत 13 वर्षे वाट पाहणे आले, असेच म्हणावे लागेल. न्यायालयात अनेक वाद-प्रतिवाद झाले. सलमान जे पीत होता ते पाणी होते. बकार्डी नावाची दारू व पाणी सारखेच दिसते, मान्य आहे. पण, बारमध्ये रात्री 12 वाजता कोण पाणी प्यायला जाणार? असे अनेक प्रश्न सामान्यांच्या मनात निर्माण होणारच.
 
या पृष्ठभूमीवर मातेच्या वरील विधानाचा ऊहापोह करणे आवश्यक आहे. वकील मंडळी ही फारच सुपीक डोक्यांची असते. कायद्याचा कीस पाहिजे तसा ते काढतात. अशिलाला खोटंनाटं बोलायचा सल्ला देतात. अशीलही िंकबहुना तशी तयारी दर्शवितो. म्हणूनच दारू नाही पाणी, अपघात झाला तेव्हा गाडीचे टायर फुटले होते, सलमानने सर्वच पीडितांना 20-20 लाख मदत म्हणून दिले. केवळ रवींद्र पाटीलला दिले नाहीत, ज्याला दुर्धर आजार झाला होता व पैशाची आवश्यकता होती तो. सबब काय, तर त्याला पैसे दिले तर त्याला प्रभावित केल्याचा आरोप होऊ शकेल म्हणून! कायदेशीर लढाई िंजकणे ही आता धोरणात्मक बाब झाली आहे. खटला कोणत्या न्यायाधीशासमोर जाणार, त्यानुसार कोणता वकील लावायचा, युक्तिवाद सुरू असताना अशिलाच्या बाजूला कोणत्या वजनदार व्यक्तीला उभे करायचे, न्यायालयाचा बेंच बदलला की परत संच कसा बदलायचा, ‘तारीख पे तारीख’ कशा घ्यायच्या… या विषयी धोरणे ठरतात. विरुद्ध बाजूने एखादा नामवंत उभा राहू नये म्हणून त्याला आधीच ‘ब्लॉक’ केले जाते. म्हणजे त्याच्याकडे त्या खटल्याविषयी मत रीतसर मागितले जाते. त्याने ते दिले की, मग तो वकील तुमच्या विरोधात उभा राहू शकत नाही. हे वकील महाशयदेखील शब्दाचे पाहिजे तेवढेच पालन करतात.
एकदा अशाच एका नामवंत वकिलाला ब्लॉक करण्यात आले, तेव्हा त्याच वकिलाने आपल्या मुलाच्या माध्यमातून तो खटला चालवायला घेतला. म्हणजे दोन्हीकडून चांदी! कधीकधी नामवंत लोकांना ब्लॉक करण्यासाठी डझनभर लोकांकडे ‘केस फॉर ओपिनियन’ पाठविली जाते, भरमसाट फी दिली जाते. ‘हिट अॅण्ड रन’सारखा खटला हा फौजदारी स्वरूपाचा असतो. फौजदारी खटल्यात एफआयआर दाखल करणे आवश्यक असते. एकदा एफआयआर दाखल झाला की, मग तो खटला राज्य सरकारच चालवीत असते. जसे सलमानच्या केसमध्ये ‘स्टेट ऑफ महाराष्ट्र विरुद्ध सलमान खान व इतर’ अशा स्वरूपाची ती लढाई असते. म्हणजेच एकीकडे खाजगी वकिलांची फौज, तर दुसरीकडे सरकारी यंत्रणा! या पृष्ठभूमीवर वरील मातेचे म्हणणे किती बरोबर आहे, हे लक्षात येईल.
 
याला अपवाद नक्कीच आहे. कसाबच्या खटल्यात सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी जे काम पाहिले, ते खरोखर कौतुकास्पदच म्हणावे. इतकी वर्षे खटला चालला, अनेक दबाव आले असणार- अगदी राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयदेखील! मात्र, ज्या पद्धतीने त्यांनी हा लढा लढला, त्याने न्यायव्यवस्थेवरचा विश्वास अनेक पटींनी वाढला होता. तोच सलमान खानच्या खटल्यात मात्र वाढला, अशी भावना निर्माण होत नाही. िंकबहुना ती घटली, अशीच सर्वसामान्य भावना आहे. अर्थात, अजून सर्वोच्च न्यायालय आहेच, त्यामुळे अजून सर्वच विषय संपला, असे म्हणणे आततायीपणाचे होईल. खरे काय व खोटे काय, हे मात्र सलमानलाच माहीत! ‘कर्माचा सिद्धांत’ नावाचे एक छोटेखानी पुस्तक हरिभाई ठक्कर यांनी लिहिले आहे. ठक्कर स्वत: न्यायाधीश होते व त्यांनी हे पुस्तक लिहिले आहे. त्यांची कर्माच्या सिद्धांतावर अतोनात श्रद्धा होती व ते पुस्तक वाचल्यास सर्वांनाच ते पटावे, असे आहे. ते एका छोट्या गावात न्यायाधीश असतानाचा प्रसंग आहे. ते प्रात:र्विधीसाठी पहाटेच्या अंधारात नदीकाठी गेले असताना, त्यांनी आपल्या डोळ्यांनी ‘अ’ने ‘ब’चा खून करताना पाहिले. त्याचा खटला त्यांच्याचकडे येणार होता व त्यांनी ‘अ’ला ओळखले होते. खटला सुरू झाला. आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडल्या. ‘अ’ कुठेच नव्हता. नवीनच एका ‘क’च्या विरोधात अत्यंत तगडे पुरावे तयार झाले होते, साक्षी होत्या. न्यायाधीशांना सत्यस्थिती माहीत असूनदेखील त्यांनी ‘क’ला फाशीची सजा सुनावली. आपले कायदे हे पुराव्यांशिवाय न्याय देत नाहीत. ‘क’ने फाशीची शिक्षा शांतपणे स्वीकारली. सुनावणीनंतर न्यायाधीशांनी त्याला एकट्यात विचारले की, ‘‘तू खून केला नाही, मात्र पुरावेच तसे होते तुझ्या विरोधात, तरीही तू ते कसे स्वीकारीत आहे?’’ त्यावर तो शांतपणे म्हणाला की, ‘‘साहेब, मी यापूर्वी तीन खून केले व तिन्ही खटल्यांत सुटलो. मला माहीत होते की, एकदा ना एकदा मी पकडला जाणार आहे, तशी माझी तयारी होतीच.’’ यालाच म्हणतात संचित कर्म! संचित कर्माचा संबंध तत्कालीन घटनेशी नसतो, तर येणार्‍या भविष्यकाळाशी असतो. याला कुणीच अपवाद राहू शकत नाही, अगदी पुढच्या जन्मीसुद्धा…!