उद्या सरते वर्ष संपून नवीन वर्षाची पहाट होणार आहे. प्रत्येक नवीन वर्ष नवीन आशा व आकांक्षा घेऊन येत असते. व्यग्र लोकांना, वर्ष कसे येते व सरते, हे कळतदेखील नाही! इतरांसाठी एक एक दिवस कठीण वाटत असतो. येणारे वर्ष कसे जाणार हे माहीत नसते, मात्र गेलेले वर्ष कसे गेले, हे आपण नक्कीच तपासू शकतो. देशाचा विषय घेतला, तर सर्वसामान्यांसाठी काय उपलब्धी, याचादेखील ऊहापोह होत असतो. महागाई वाढली की घटली, याचीदेखील चर्चा होऊ शकते. दोन्ही बाजूंनी दावे-प्रतिदावे होतील. तत्काळ लाभ झाला की नाही, हे सांगता येणार नाही किंवा वादाचा मुद्दा होऊ शकतो. मात्र, काहीतरी ठोस व दीर्घकाळ उपाययोजना करण्याचा प्रयत्न केंद्र सरकारमार्फत होतो आहे, याची चाहूल लागत आहे.
देशाला सर्वांत चांगले काही लाभले असतील, तर ते पंतप्रधानांच्या रूपाने मिळालेले नरेंद्र मोदी! एक अद्भुत व्यक्तिमत्त्व. स्वकीयांचे कडबोळे नसलेले व्यक्तिमत्त्व. दूरदर्शी विचार करणारे, विषयाच्या खोलात जाऊन निर्णय घेणारे, इतरांपेक्षा दोन पावलं पुढे असणारे, वचकदार, राष्ट्रनिष्ठा असणारे व सर्वांत महत्त्वाचे म्हणजे मिळालेल्या संधीचं सोनं करणारे नेतृत्व! सन २००० पर्यंत त्यांचा राजकारणाशी प्रत्यक्ष काहीच संबंध नव्हता. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक म्हणून स्वत:ला झोकून देत काम करणारे नरेंद्र मोदी. अचानक संधी मिळाली व राजकारणामध्ये आपली छाप पाडली- ती थेट पंतप्रधानपदी आरूढ होऊनच! ज्या ज्या देशांनी त्यांना, एका राज्याचा मुख्यमंत्री असतानासुद्धा त्यांच्या देशाचा व्हिसा नाकारला होता, ते सर्व देश आता त्यांना पायघड्या घालीत आहेत. त्यावर कडी म्हणजे जो देश सर्वांत कट्टर भारतविरोधी, किंबहुना नरेंद्र मोदीविरोधी वाटायचा, त्यांनी तर मागच्या आठवड्यात, नरेंद्र मोदींना व्हिसादेखील न विचारता सरळ पाकिस्तानच्या लाहोरला विमान उतरविण्याची परवानगी देऊन त्यांचे जोरदार स्वागत केले. स्वत: पंतप्रधान नवाज शरीफ त्यांना घ्यायला आले. निमित्त होते- नवाज शरीफांच्या जन्मदिवसाचे! मोदींनी सकाळचा चहा-नाश्ता काबूलला, दुपारचे चहापान लाहोरला व रात्रीचे जेवण दिल्लीला घेतले. त्यांच्या लाहोरभेटीने त्यांनी ‘मास्टरस्ट्रोक’ मारला, असे जगभर बोलले जात आहे. राजकीय मुत्सद्देगिरीमध्ये ते वरचढ ठरत आहेत. त्यांच्या पंतप्रधानपदाच्या शपथविधीला त्यांनी नवाज शरीफांना बोलावून पहिला ‘मास्टरस्ट्रोक’ मारला व आता दुसरा. गोलंदाज जेव्हा यॉर्कर टाकतो, तेव्हा फलंदाजाला तो चेंडू खेळावाच लागतो. त्याचप्रमाणे मोदी करीत आहेत. यॉर्कर फार तोलूनमापून वापरला जातो.
क्रिकेटचाच विषय निघाला म्हणून, मोदींची कार्यपद्धती एकदम महेंद्रसिंग धोनीसारखी आहे. धोनी हा मैदानावर शंभर टक्के योगदान देतो. जिंकण्यासाठी खेळतो, प्रतिस्पर्धी संघामध्ये धडकी निर्माण करतो. त्याचबरोबर नवनवीन क्लृप्त्या वापरतो- ज्याने सर्वच विसकटून जाते. स्वत: शांत असतो. डोक्यात नवनवीन कल्पनांना जन्म देत असतो. जसे मधूनच गोलंदाज बदलणे, क्षेत्ररक्षण वेगळेच लावणे, टॉस जिंकल्यावर बॅटिंग न घेता क्षेत्ररक्षण स्वीकारणे वगैरे वगैरे. म्हणूनच तो सर्वांत जास्त सफल कर्णधार झाला आहे. त्याचप्रमाणे नरेंद्र मोदींचे नेतृत्व दिसते.
गेल्या १० वर्षांत एकदाही भारताचा पंतप्रधान पाकिस्तानात गेला नसताना, अचानक आणि तेही नाट्यमय रीत्या जाणे किती जोखमीचे होते. जोखीम घेत नसेल तर ते नेतृत्वच कसले व मोदी कसले? जेवढी जास्त जोखीम तेवढीच मोठी फलप्राप्ती होत असते. मोर रिस्क मोर रीवॉर्ड! यातून काय साध्य होणार आहे, याचा विचार करू या. एकतर मोदींनी आंतरराष्ट्रीय समुदायाला एक संदेश दिला आहे की, आमचे मतभेद आम्हीच सोडविण्यास समर्थ आहोत, तुमची आवश्यकता नाही. तुम्ही केवळ राजकारण करता व न्यायाधीशांच्या खुर्चीत बसण्यात धन्यता मानता. दुसरे म्हणजे, आपल्या शेजार्याशी चांगले संबंध ठेवणे यातच देशाचे हित असते, हे कोणत्याही पंतप्रधानाला अनुभवास येतच असणार. कारण भारतासारख्या देशाचा गाडा हाकायचा म्हणजे आर्थिक जुळवाजुळव आवश्यक आहे. त्यासाठी आंतिरक व बाह्य शांतता नांदणे आवश्यक आहे. आज पाकिस्तानकडून तीच अपेक्षा आहे. तो देश तसा वागणार नाही, हे वारंवार पटत असले तरी गत्यंतर नाही. तेथील काही लोक आतंकवादाच्या नावाने थैमान घालत आहेत. आपला देश विसकळीत करीत आहेत. एकतर त्यांना अमेरिकन स्टाईलने उत्तर द्यायची आपली क्षमता पाहिजे किंवा दुसरा कोणतातरी मार्ग निवडणे आवश्यक आहे. आज आपल्यात मोदींच्या रूपाने धमक आहे, मात्र तेवढी क्षमता नाही, ही वस्तुस्थिती आहे. म्हणून मोदींनी उचललेले पाऊल फार विचारपूर्वकच उचलले, असेच म्हणावे लागेल!
स्वातंत्र्यानंतर आपली लोकसंख्या ४० कोटी होती- ज्यात ३६ कोटी हिंदू व चार कोटी मुसलमान होते. आज स्थिती काय आहे? १२० कोटी लोकसंख्येत मुसलमान २० कोटींच्या वर आहेत. २० कोटी मुसलमानांना हुसकावता येईल काय? आज प्रत्येक गावात, शहरात एक छोटे पाकिस्तान दडलेले आढळते. ही वस्तुस्थिती असताना वेगळा विचार होणे आवश्यकच आहे. नुसते हातात हात घालून नाही चालणार. म्हणून मोदींचे कौतुक करावे लागेल. त्यांच्या या मुत्सद्देगिरीचे जगात सर्वत्र कौतुक झाले, स्वागत झाले- पाकिस्तानातल्या वर्तमानपत्रांत व मीडियातदेखील! तेथील कट्टरपंथी सोडले किंवा त्यांचा तत्कालीन आवेष सोडला, तर साधारण पाकिस्तानी कसा आहे? तो भारतीय नागरिकांविषयी काय विचार करतो? हे सगळे अनुभवण्यासारखे आहे. त्यांना भारताविषयी प्रचंड कुतूहल आहे. ते त्यांच्या लाहोरमध्ये दिल्ली शोधतात, तर कराचीत मुंबई शोधतात! तेथील वस्त्या, राहणीमान, रस्त्यावरील खाऊ, गल्ल्या वगैरे सगळं सारखंच. पाहुणचार, स्वयंपाक बनवण्याची पद्धत सर्वच सारखं. केवळ धर्माचे पांघरूण घातल्याने अडचणी येत असतात.
आपण जर दुबईला किंवा लंडनला पाहिले, तर भारतीय, पाकिस्तानी, बांगलादेशी- सर्वच एकमेकांशी गुण्यागोविंदाने वागतात- राहतात. एकत्र सिनेमे बघतात. त्यांच्या आवडीनिवडी सर्वच सारख्या. क्रिकेडवेड तर सारखेच. असे असताना किती दिवस एकमेकांशी भांडायचे व आपापली आर्थिक स्थिती अजून कमजोर करायची? संपूर्ण जग अनुभवत आहे की, देशाला नैसर्गिक सीमा असल्या की त्या टिकतात. कृत्रिमपणे निर्माण झालेल्या सीमा गळून पडतात. आज भारत व पाकिस्तान दोघांकडेही अणुशक्ती आहे. पाकिस्तान हा देश सैनिकांच्या हातात आहे. ते तसे माथेफिरूच! म्हणून आपणच जपून राहणे क्रमप्राप्त आहे. म्हणूनच मोदींसारखे कणखर नेतृत्वदेखील जपूनच पावले टाकीत आहे. सामान्य जनतेला भले कितीही वाटले की युद्ध करा व आरपार करून टाका, तरीही ते आता शक्य राहिले नाही. युद्ध आता युद्धभूमीवर लढण्याचे दिवस संपले. ते लढण्याचे आता आयाम बदलले आहेत.
या पृष्ठभूमीवर मोदींनी उचललेले पाऊल खरोखरच कौतुकास्पद आहे. त्यांच्या हातून या देशाचे भले होणार, असे भाकीत केलेलेच आहे. त्यांच्या पाकिस्तानभेटीबद्दल अनेक तर्कवितर्क होऊ शकतात. कॉंग्रेसने परत रडीचा खेळ सुरू केला आहे. कारण मोदींचे प्रत्येक असे पाऊल पडणे म्हणजे कॉंग्रेसला सत्तेपासून दूर ठेवणे आहे, असेच वाटते. भारत व पाकिस्तान एका समान व किमान कार्यक्रमावर काम करू शकतात. त्याने दोन्ही देशांचा संरक्षणावरचा खर्च वाचून, त्या त्या देशातील गरीब जनतेच्या भल्यासाठी तो निधी वापरता येईल. पाकिस्ताननेदेखील लक्षात घ्यायला हवे की, ते अजून किती दिवस परावलंबी देश म्हणून टिकाव धरणार आहेत? त्या देशाचा नेहमीच उपयोग केला गेला आहे. त्यांनी सर्व शक्ती एकवटून, आतंकवाद्यांच्या जाचाला झुगारून भारताबरोबर शांतता स्थापित केली, तर केवळ पाकिस्तानचेच भले होणार नाही, तर भारतखंडाचे भले होणार आहे! तिसरी शक्ती उदयाला येऊन, इतर देशांची दादागिरी कमी होणार आहे व त्यांची नशा खाडकन् उतरणार आहे…!