प्रसिद्धीसाठी धाडस!

Vishwasmat    08-Dec-2015
Total Views |
 

default pic_1  
शनीिंशगणापूर हे अहमदनगर जिल्ह्यातील छोटेखानी गाव. तसा नगर जिल्हा फार प्रसिद्ध जिल्हा नसला, तरी शनीिंशगणापूर या शनीच्या मंदिरामुळे, तेथील दर्शनार्थींच्या संख्येमुळे प्रसिद्ध आहेच. शिर्डीला येणारे भाविक शनीिंशगणापूरला सहसा जातातच, त्याचप्रमाणे शनीिंशगणापूरचे दर्शनार्थी शिर्डीला सहसा जातातच. तेथे शनीची जागृत मूर्ती आहे, अशी श्रद्धा आहे व ती मूर्ती कोणत्याही छताविना आहे! कारण काय, तर संपूर्ण आकाश म्हणजेच छत! अशी भाविकांची धारणा आहे. ती मूर्ती एका चौथर्‍यावर विराजमान आहे. शनीिंशगणापूरचे वैशिष्ट्य म्हणजे, गावातील लोकांची श्रद्धा आहे की, शनिदेवता त्यांच्या गावाची रक्षा करते. म्हणून आजही लोक आपल्या घराला कुलूप लावत नाहीत. िंकबहुना जगातील पहिली बँकेची शाखा तेथे सुरू झाली ती कुलुपाविनाच! असे हे छोटेखानी गाव जगावेगळे उदाहरण प्रस्तुत करत असताना, ग्रामस्थांच्या आस्थेला धक्का लागावा असे कृत्य गावात घडले. शनी महाराजांच्या मूर्तीचे दर्शन चौथर्‍यावरून घेण्यास महिलांना मज्जाव असताना, एका महिलेने ती प्रथा मोडीत काढली व त्या देवतेचा, ग्रामस्थांचा व श्रद्धाळू लोकांचा रोष ओढवून घेतला.
 
लागलीच सर्वच दूरदर्शन चॅनेलवर ते दृश्य सतत दाखविले गेले, बुद्धिवंतांच्या चर्चा झडल्या, रूढी-परंपरा, स्त्रीची मुस्कटदाबी, पुरुषप्रधान संस्कृती या विषयांना परत पेव फुटले. अशा प्रकारची घटना घडली की, तथाकथित रूढी-परंपरा यांच्या विरोधात बोलणारी, मूठभरच का होईना, सर्वच मंडळींना एकदम जोर येतो. रूढी-परंपरा मानणारी, मात्र कुंपणावर बसलेली मंडळी तात्पुरती त्या तथाकथित मंडळींच्या कळपात घुसतात. खरोखरच रूढी-परंपरा मानणारी व जपणारी मंडळी पूर्णपणे अल्पमतात आल्यासारख्या मानसिकतेतून स्वत:ला अपराधी समजतात. परिस्थिती पूर्ववत झाली की, परत तथाकथित मंडळी अल्पमतात जाते व दर्शनासाठी परत रांगा लागतात… स्त्रिया आज राष्ट्राध्यक्षा, पंतप्रधान, विधिमंडळाच्या अध्यक्षा, विरोधीपक्षनेत्या, अंतराळवीरांगणा, वैमानिक, मोठमोठ्या कंपन्यांच्या सीईओ, संतपदी, क्रीडाक्षेत्रात, राजकारणात, रेल्वेत, पोलिस दलात, पौरोहित्य करणे इत्यादी क्षेत्रात आहेत. मग एखादी घटना घडली की, परत स्त्रियांची मुस्कटदाबी, पुरुषप्रधान संस्कृती, असे विषय इतके रंगविले जातात की, कदाचित नसलेली स्थितीदेखील वातावरण बिघडवण्यास कारणीभूत ठरते! केवळ भारतातच स्त्री व पुरुष यांचे सहजीवन दीर्घकाळ व जास्त यशस्वीपणे चालत आहे. भारताला प्राचीन संस्कृती लाभलेली असल्याने काही परंपरा निर्माण झाल्या. परंपरा एक िंकवा दोन पिढ्यांत निर्माण होत नसून, सातत्याने त्या काळाच्या कसोटीवर उतरवून जपल्या जातात. परंपरांची निर्मिती केव्हा झाली हे माहीत नसल्यास िंकवा त्यामागचा उद्देश बरेचदा माहीत नसला, की त्या रूढींमध्ये परिवर्तित होतात. रूढी म्हणजे अंधानुकरण, असा प्रचार केला जातो.
 
स्त्रियांना धार्मिक स्थानावर जाण्यास काही ठिकाणी मज्जाव आहे. तो भारतातच नाही, तर परदेशातदेखील व परधर्मातदेखील आहे. त्याचा संबंध कदाचित मासिक पाळीशी असावा व त्यावरून सरळसोट, शंका नको म्हणून सर्वच स्त्रियांना बंदी घातली असावी. मासिक पाळीविषयी दोन्ही बाजूंनी मुद्दे मांडले जातात, सामान्य जनता नेहमीच त्या विषयावर बुचकळ्यात पडते. आपल्या परंपरेचा एक भाग म्हणून वडीलधार्‍यांचे ऐकले जाते व समाज त्यावर मार्गक्रमण करीत असतो. अनुभवी लोकांचे ऐकून मार्गक्रमण करण्यात जर नुकसान नसेल, तर का म्हणून उगाचच त्याला विरोध करावा? व्यक्ती, कुटुंब, समाज व देश अशा प्रकारे राष्ट्र तयार होत असते. त्यात धर्म व जात यालादेखील स्थान मिळाले आहे. प्रत्येक व्यक्तीची भूमिका क्षणोक्षणी बदलत असते. प्रचंड गर्दीच्या मंदिरात सर्वच स्वत:ला एक समजतात. बाहेर पडल्यावर तो परत आपला मोहल्ला, घर, जात, परंपरा याप्रमाणे वागू लागतो. म्हणून समाजाला स्वयंचलित मोडमध्ये ठेवले तर तो अधिक सुरळीतपणे चालत असतो.
 
शनीिंशगणापूरला एका महिलेने ती परंपरा मोडली, त्या क्षणाला कॅमेरे, चॅनेलवाले वगैरे मंडळी आधीच कशी काय तयार होती? त्या महिलेला खरोखरच एवढी करुणा तयार झाली असेल का? ठाण्यामध्ये एक शनीमंदिर आहे, तेथे स्त्रियांना दर्शनासाठी मज्जाव नाही, तेथील शनीचे तिने दर्शन घेतले असेल का? ती नेहमीच अनेक मंदिरांत दर्शनाला जाते काय? असे प्रश्न एवढ्यासाठीच निर्माण होऊ शकतात की, बरेचदा हा स्वस्त प्रसिद्धीचा देखील घाट असू शकतो. त्यावर भाष्य करणारे स्त्री व पुरुषदेखील इतकी जोरकसपणे पाठराखण करतात व स्वत:ची नेतेगिरी उभारतात. त्यांना एवढा पुळका आहे, तर स्वत: का नाही असे धाडस करून प्रथा मोडत? का म्हणून कुणाच्या तरी खांद्यावर बंदूक ठेवून स्वत:चे दुकान चालवितात? काही झाले की संविधानाचा दाखला द्यायचा. सर्वसामान्यांना संविधानाचा अभ्यास नसल्याने, दोन्हीकडचे वाद-प्रतिवाद बरोबरच वाटतात. वर उल्लेख केल्याप्रमाणे, अशा प्रकारच्या परिस्थितीत एकाच बाजूने बोलणारे विद्वान समोर आलेले असतात. कारण तसे मुद्दे मांडणे सर्वांत सोपे काम असते. एखाद्या विचारांची परंपरा उभी करायला कितीतरी पिढ्या खपतात, मात्र तिच्यावर टीका करणे सर्वांत सोपे काम असते.
काय योग्य आहे, हेदेखील सांगण्यासारखे यांच्याजवळ नसते. संविधान म्हटले की झाले! परंपरा-रूढी या हजारो वर्षांपासून अस्तित्वात आहेत, तर संविधान 65 वर्षांपूर्वी अस्तित्वात आले. संविधानकारांनी फार बारकाईने व सुज्ञपणे संविधानात सर्वच धर्माच्या व जातीच्या चालीरीतींना, परंपरांना संरक्षण दिले आहे. म्हणून तर आपल्या देशातील बहुआयामी संस्कृती, विविधता टिकून आहे. महिलांनी स्त्री व पुरुष या भेदाचे जास्त उदारीकरण केले, तर पुरुषांचादेखील उद्वेग होऊ शकतो. दुबईमध्ये िंकवा अमेरिकेमध्ये वाहन उजव्या बाजूने चालते व तीच त्यांची परंपरा आहे. जावे एखाद्या बुद्धिवादी महिलेने तेथे व चालवावे वाहन डाव्या बाजूने! काय होईल? कित्येक धर्माच्या धर्मस्थळात इतर धर्मियांना मज्जाव आहे. का नाही जात तेथे धाडसी स्त्री? अनेक असे बुद्धिवंत आहेत, ते केवळ चिथावणीखोर बुद्धिभेद करतात. स्वत: सर्वच परंपरा-रूढी घरात पाळतात, बाहेर मात्र वेगळे. कारण, दुकान चालले पाहिजे म्हणून!
 
कॉंग्रेसच्या आमदार प्रणितीताई िंशदेंनी वरील घटनेचा पुरस्कार केला, तर पंकजाताई मुंडेंनी, परंपरा पाळणे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, असे निर्भीडपणे विचार मांडले. शनीिंशगणापूरच्या स्त्रियांना जर इतकी वर्षे काही तक्रार नसेल तर िंकवा त्यांनी ती परंपरा पाळण्यास मदत केली असेल, तर का नाही त्यांना सुस्नात त्यांच्या परंपरेत जगू द्यावे? कितीतरी मंदिरे आहेत जेथे महिला जाऊ शकतात. जाऊन आल्या का या महिला त्या सर्वच धर्मस्थळात? उगाच एकाच ठिकाणचा अट्‌टहास करून सामाजिक संतुलन बिघडवण्याचा यांना काही अधिकार नाही. ‘क्रांतिज्योती’ सावित्रीबाई फुले यांचे नाव घेणे सोपे आहे, मात्र त्यांच्यासारखा अभ्यास, सातत्य व समाजाविषयीची तळमळ जर असेल, तरच समाज तुम्हाला ‘समाजसुधारक’ म्हणून स्वीकारतो. केवळ पुरस्कार वापसी, भाषणबाजी व कॅमेरासमोरील धाडस करून कोणतीही महिला िंकवा पुरुष मोठा होऊ शकत नाही…