‘तरुण भारत’ या दैनिकाशी वाचक म्हणून अनेक वर्षे संबंध असला, तरी या दैनिकासाठी प्रत्यक्ष काम करायला आज चार वर्षे उलटली. अन्यान्न प्रकारचे व्यवसाय सांभाळायचे मला भाग्य जरी लाभले, तरी ‘तरुण भारत’ हा विषय जरा हटकेच आहे, असे ऐकले होते. मात्र, अनुभवातून एक विश्वास होता की, येथेही आपण काही ना काही प्रमाणात यश संपादन करूच! कारण व्यवसायाचे क्षेत्र जरी भिन्न असले, तरी मॅनेजमेंट हे सगळीकडे सारखेच असते.
कोणताही व्यवसाय म्हटला की, त्यात दोन प्रकारची कार्यक्षेत्रे असतात, एक म्हणजे ‘कोअर’ कार्य आणि दुसरे म्हणजे ‘सपोर्ट’ कार्य. या दोन्ही कार्यांत जर गल्लत झाली, तर व्यवसायात अपेक्षित यश मिळणे शक्यच नसते. कोअर कार्य म्हणजे ज्यासाठी व्यवसाय सुरू केला आहे ते. त्याला लागणारी सर्व प्रकारची मदत म्हणजे सपोर्ट कार्य. जसे वर्तमानपत्र चालविताना संपादकीय कार्य हे कोअर कार्य असते, तर त्याला लागणार्या अन्य सुविधा जसे-मनुष्यबळ, आर्थिक मदत, छपाई, लेखा व परीक्षण, मार्केटिंग, वितरण, जाहिरात व्यवसाय या सर्व सपोर्टमध्ये मोडणार्या क्रिया असतात. कोअर आणि सपोर्ट या गोष्टी संचालकांसाठी समजणे आवश्यक असते. प्रत्यक्षात सर्वच कार्ये त्या त्या ठिकाणी महत्त्वाची असतात. त्यामुळे व्यवसायप्रमुखाला सगळ्याच विभागप्रमुखांना त्यांचे कार्य किती महत्त्वाचे आहे, हे बिंबविण्याबरोबरच केवळ तुम्हीच एकमात्र महत्त्वाचे आहात, हा अहंभाव निर्माण न होऊ देणेदेखील तितकेच गरजेचे असते.
प्रमुख म्हणून तुम्हाला कोअर कार्य समजलेच पाहिजे. अन्यथा तुम्हाला कामावर पकड येणे शक्यच नसते. म्हणून ‘तरुण भारत’मध्ये लिखाण कसे होते, यादृष्टीने समजण्यास सुरुवात केली. थोडेबहुत र्हस्व आणि दीर्घ हेदेखील समजण्याचा प्रयत्न केला. मराठी वाचन केवळ वाचन म्हणून न करता, शब्दवेध, वाक्यांची रचना, विचार मांडण्याची पद्धती हे वेगवेगळ्या लेखकांकडून शिकायला मिळत गेले. ‘तरुण भारत’च्या मुख्य संपादकांकडून सूचना येतच होत्या की, काही विषय जे ‘तरुण भारता’त सहसा येत नाहीत, ते तुम्ही लिहीत जा. अशी अचानक सुरुवात झाली आणि बघता बघता दीडशेच्या वर लेख सातत्याने लिहिले गेले. आठवड्यातून एकदा, सातत्याने लिहिणे किती कठीण काम आहे, याचा अनुभव घेत होतो. अनेकदा अनेक अडचणी आल्या, तरी साप्ताहिक लेख चुकू दिला नाही. मात्र, गेल्या एक महिन्यापासून मी लिहू शकलो नाही, कारण आता ‘तरुण भारता’सोबत दुसरी एक जबाबदारी स्वीकारल्यामुळे, त्यात प्रवासदेखील असल्याने लिखाणाला न्याय देता येईल, असे वाटत नाही.
लेखन कसे असावे, वाचकांना काय आवडते, विषय कसे असावे, एखादा लेखक नेहमीच सातत्यपूर्ण का लिहू शकतो, असे अनेक प्रश्न माझ्या मनात, लेखन सुरू करण्यापूर्वी घोंघावत होते. दर्जेदार लेखनाद्वारे लोकांना मार्गदर्शन करणारे अनेकदा देवत्व प्राप्त करून घेतात. एकेका लेखात एवढी ताकद असते की, अनेकदा एका लेखामुळे वाचकाची आयुष्याकडे बघण्याची दृष्टी बदलून जाते. मीदेखील एक वाचक म्हणून लेखकांच्या प्रती तोच आदरभाव बाळगायचो. मात्र, जेव्हा लेखकांशी प्रत्यक्ष संपर्क, संवाद आणि मैत्री निर्माण झाली तेव्हा लक्षात आले की, तेदेखील हाडामांसाचे प्राणी आहेत. ते जे लिहितात तसे ते वागतातच असे नाही, किंबहुना तशी अपेक्षा करणेही चुकीचे आहे. आदर्शवाद आणि आदर्शवादी लिखाण प्रत्येकालाच प्रेरणादायी वाटते. परंतु, त्यानुसार जगणे हे फार कठीण असते. जसे- अनेक निगेटिव्ह रोल करणारे अभिनेते प्रत्यक्षात तसे असतातच का? किंवा प्राणसारखा अभिनेता प्रत्यक्षात खूप चांगला माणूस होता, हे आपल्याला सुखद धक्का देत असतात. त्याचप्रमाणे लेखकांचेदेखील असते. म्हणून लेखन करणे हे विज्ञान आहे की कला, हा प्रश्न माझ्या मनात सुरुवातीला निर्माण झाला होता, ज्याचे उत्तर कालांतराने मला मिळाले.
एक लेख लिहिणे म्हणजे तुम्ही लेखणी हातात घेतल्यावर त्या वेळेचे तुमच्या मनातले विचार कागदावर उतरवणे असेच असते. ते विचार काय आहेत, हे बरेचदा तुम्हालाही माहीत नसते. कधीकधी आपण लेख लिहून काढल्यावर आपणही चकित होतो की, अरे वा! हे मी लिहिले का? परत दुसर्या दिवशी तोच लेख लिहायला घेतला, तर तो तंतोतंत तसा उतरत नाही. कधीकधी लेख लिहायला सुरुवात केल्यावर काही व्यत्यय आला आणि परत तासाभराने तो पूर्ण करायला घेतला, तर लक्षात येते की, लिहायचे होते एक आणि लिहिले दुसरेच! ते मग जास्त चांगलेपण असू शकते. तरीही काही लेखकांचे लेख सातत्यपूर्ण चांगलेच का असतात? तर ते लेखनाप्रती गंभीर असतात आणि विषय सुचल्यावर शंभर टक्के फोकस असतात म्हणून. दुसरे म्हणजे, ते आपल्या टीआरपीचा विचार न करता मनातील बेधडक लिहितात. विचारांमध्ये स्वातंत्र्य असते. पण, ते स्वातंत्र्य यायला तुम्ही स्वतंत्र असावे लागेल. ते स्वतंत्रपण अनेक कारणांनी बाळगता येत नाही. संपादकामध्ये चांगली लेखणी असली, तरी वर्तमानपत्राच्या ध्येयधोरणाशी सुसंगतच लिहिणे त्यांना अपेक्षित असते. दुसरे, त्यांना आठवड्यात सतत लिखाण करायचेच असते. त्यामुळे लिहिण्यात नावीन्य कमी आणि सराईतपणा जास्त दिसू लागतो. तो त्यांचा दोष नसून, त्यांचा कार्यभागाशी संबंधित विषय असतो. म्हणूनच कदाचित नोकरी करणार्या संपादकांपेक्षा स्वतंत्र स्तंभलेखक लोकांच्या पसंतीस उतरतात.
लेखकांनी लिखाण करताना एक तारतम्य बाळगणे आवश्यक आहे. आपण लिहिलेला लेख छापून आल्यावर परत वाचक म्हणून त्याच्याकडे बघावे. अनेक वाचक आपणास त्यांच्या भावना कळवितात. मात्र, त्यापैकी ८० टक्के या प्रामाणिक असतातच, असे नाही. २० टक्के मात्र नक्कीच प्रामाणिक असतात. प्रत्यक्ष तोंडावर, लेख आवडला नाही म्हणून सांगणारे जवळजवळ नसतातच. त्यामुळे वाचकांकडून दिशाभूल न करून घेता, स्वत: स्वत:चे मूल्यमापन केल्यास लेखाचा दर्जा टिकू शकतो. लिखाण थेट हृदयातून असले की, वाचकांच्या हृदयाला भिडते. त्याला मेंदूद्वारे फिल्टर लावला की, मग शब्दांचे फुलोरे, कृत्रिमपणा जोडला जायची शक्यता जास्त असते आणि मग उत्कृष्ट भाषेचा नमुना जरी सादर होत असला, तरी त्यात गाभा हरवलेला असू शकतो.
लेखनामध्ये लिखाण आणि त्यातील अर्थ व विचार या दोन्ही गोष्टी आवश्यक आहेत. बरेचदा काहींचे लिखाण किंवा वक्तृत्व हे शब्दफुलोर्याने ओतप्रोत भरलेले असते. मात्र, त्याचा प्रभाव आईस्क्रीम खाल्ल्यासारखा असतो. मात्र, काहींचे लिखाण/वक्तृत्व चटणी-भाकरीसारखे जरी असले, तरी भूक शमवणारे असते. दोन्हींचा एकत्र योग, हे चांगले लिखाण म्हणून पसंतीस उतरत असते. लेखक साहित्याची चोरी करणारा असेल, तर त्याची आयपीएलच्या टी-ट्वेण्टी स्पर्धेत खेळणार्या खेळाडूसारखी अवस्था होते. अनेकदा वाचकांकडून लेखकाची फसगतदेखील होत असते. वाचक पावती देत असतात की, लेख अभ्यासपूर्ण होता म्हणून. काही वाचक त्याला अभ्यासपूर्ण न मानता, नवीन काय दिले, असे मानतात. काही लेखकांना भरपूर माहिती देणे आवडते. मग वाचक जर अभ्यासू असेल, तर तो म्हणतो, त्यात नवीन काय दिले, हे तर सर्वत्र- नेटवरदेखील उपलब्ध आहे. तेच तो अभ्यासू वाचक नसेल, तर त्याला तो अभ्यासपूर्ण लेख वाटतो. जे लेखक सातत्याने चांगले लिखाण करतात, ते मूलत: पब्लिक डोमेनमधील माहितीचा पाढा वाचत नाही, तर नवनवीन संकल्पना घेऊन लिहीत असतात. स्वत:चा कॉन्सेप्ट मांडणारे लेखक वाचकांच्या पसंतीला दीर्घकाळ उतरत असतात. लेखनामध्ये ज्ञानाच्या अहंकाराचा दर्प असल्यास वाचक त्याला पसंती देत नाहीत. म्हणूनच एखादाच ‘आर. के. लक्ष्मण’ का होतो, तर ते सामान्य लोकांच्या मनातले प्रतिबिंब सोप्या आकृतीद्वारे, विषय ताजा ताजा असताना रेखाटायचे म्हणून! जे आर. के. लक्ष्मण करायचे तेच लेखनात ज्याला करणे शक्य आहे, तो लोकांच्या पसंतीस उतरत असतो.
तर प्रिय वाचकांनो, मला कार्यव्यस्ततेमुळे, ‘तरुण भारत’ विषय सांभाळून आणि नवीन ‘कोअर’ कार्यावर फोकस करायचा असल्याने, दर आठवड्यात ‘विश्वासमत’ या सदराखाली लिखाण करणे शक्य होणार नाही. म्हणून मी आपली तात्पुरती रजा घेतो. माझ्या लेखणीद्वारे कोणता प्रमाद घडला असल्यास मी त्यांची क्षमा मागतो. वाचकांनी वेळोवेळी जे प्रेम दाखविले, त्या ऋणातच मला राहायला आवडेल…