सध्या विद्यार्थी आणि पालकांची सर्वत्र लगबग दिसत आहे. आपल्या मुलाला, ‘ठरल्याप्रमाणे’ अमुक अमुक शाळेतच आणि एका विशिष्ट महाविद्यालयातच प्रवेश मिळावा म्हणून ही लगबग सुरू आहे. ‘ठरल्याप्रमाणे’ या शब्दाला विशेष महत्त्व आहे. कारण आपल्या मुलाने दहावीनंतर काय करायचे, याचे नियोजन साधारणत: आठवीतच झालेले असते. पुढील तीन वर्षे मुलाकडून जास्तीत जास्त मेहनत करवून त्या दृष्टीने टक्के मिळविण्याचा प्रयत्न केला जातो. बरेचदा अपेक्षेप्रमाणे गुण मिळतातच असे नाही. त्यावरही उपाय असल्याने त्याचेही नियोजन पालकमंडळी करून ठेवतात. देणगी, मॅनेजमेंट कोटा वगैरेसारख्या कल्पना अस्तित्वात असल्याने तेही शक्य होते.
सध्याच्या काळात एक किंवा दोनच अपत्य असल्याने, संपूर्ण लक्ष त्यांच्या पालनपोषणावर केंद्रित असते. जे आपल्याला मिळाले नाही किंवा नशिबात नव्हते ते सर्वच आपण आपल्या पाल्यांना देण्याचा प्रयत्न करतो आणि प्रेमापोटी ते होणे स्वाभाविकदेखील आहे. परंतु, मुलांच्या सर्वच अपेक्षा पूर्ण करता येणे किंवा त्यांचे नशीब बदलणे, हे सर्वस्वी आपल्या हातात असते काय? त्यातील अपेक्षा पूर्ण करणे कधीकधी शक्य असते, मात्र त्याकरिता पालकांना कितीतरी तडजोडी कराव्या लागतात. तडजोडींमुळे मुलांना कळत नकळत काय शिकवण दिली जाते, हे आपल्याला कळतदेखील नाही! आपण आपल्या परी फारच व्यवस्थित, सर्व गोष्टी मुलांना कळू नये म्हणून काळजी घेतो, तरीही मुले आपल्या डोळ्यांतून, आपण काय करतो आहे, हे ताडतात. शेवटी तीपण आपलीच मुले असल्याने, तेही, त्यांना काही कळत नाही, असा बेमालूम अभिनय करतात. हे सर्व त्रयस्थाला चांगले कळत असते, दिसत असते.
प्रवेश घेताना फारच ठरावीक विद्यार्थ्यांना हवा तिथे प्रवेश मिळतो. कारण जागा मर्यादित असतात आणि प्रवेशार्थींची संख्या शेकडोपटीने असते. शाळेच्या सत्राला सुरुवात होते आणि मग यंत्रामध्ये टाकल्यागत मुलगा चार वर्षांनी पदवी घेऊन बाहेर पडलेला असतो! चार वर्षांनी पुन्हा तीच परिस्थिती असते. आता काय करायचे? पदव्युत्तर अभ्यासक्रम, की नोकरी? शिकायचे म्हटले की, परत प्रवेश परीक्षा, अभ्यास, रांगा लावणे; आणि नोकरी म्हटली की, बायोडाटा तयार करणे, मुलाखती देणे, ओळखपाळख काढून काही जमते का बघणे. या सर्व बाबी स्वातंत्र्योत्तर काळानंतर कमी-जास्त प्रमाणात सुरू आहेत. त्याला कुणी अपवाद असतील, असे वाटत नाही. ज्याचे अर्धे आयुष्य निघून गेले असते तो म्हणतो, ‘‘आमच्या वेळेस बरं होतं बुवा, आता सर्वच जीव घेणं आहे.’’
आपण आपल्या परिचितांपैकी काहींचा गेल्या १५ वर्षांचा काळ आठवा, ज्यात त्यांच्या वयाच्या १० वर्षांपासून २५ वर्षांपर्यंतचा प्रवास कसा राहिला? जर आपण शंभर मुलांवर लक्ष केंद्रित केलं, तर लक्षात येईल की, काही मुलांना अपेक्षेप्रमाणे यश आले नाही, काहींना आले, तर काहींना अपेक्षेपेक्षा फारच जास्त यश (यश:श्री पायीची दासी झाली!) हाती लागले. यावरून काय अनुमान काढता येईल? एकतर आपण पाल्यांकडून जास्त- अवाजवी अपेक्षा ठेवल्या, शिक्षण पद्धतीतील दोष, सरकारच्या ध्येय-धोरणांमधील दोष आणि यात काही दोष आढळला नसेल, तर नशिबावर दोष! दोष देणे म्हणजे स्वत:च्या निर्णयाचे समर्थन करणे. आपण खरोखरच आपले निर्णय बरोबर किंवा चूक आहेत, यासाठी इतरांना उत्तर द्यायला बांधील असतो का? आपल्या दु:खात किंवा अडचणीत खरोखरच कुणी आपल्याला मदत करतो का? करायची मनीषा असल्यास तो खरेच करू शकतो का? आपले दु:ख निवारण करण्यासाठी अशी कोणती व्यक्ती आहे की, जी स्वत:च्या सर्व समस्यांवर उत्तर शोधून आता तुमच्या समस्या सोडवणार आहे? ही वस्तुस्थिती लक्षात आली की, कुणाकडून अपेक्षा करणे कमी होते, त्याने अपेक्षाभंग कमी होतो.
आपण आपल्या पाल्याच्या शैक्षणिक मार्गासंबंधी, तो आठवीत असतानाच ठरवितो- ‘सबसे तेज’च्या स्पर्धेत राहण्यासाठी! त्या शिक्षणाची पूर्तता त्याच्या वयाच्या २५ वर्षांनी होते. आज ठरविलेल्या गोष्टी बरेचदा १० वर्षांनी तितक्याशा लागू राहत नाहीत. जसे- १९७० च्या काळात नोकरी म्हटली की, शाळामास्तर किंवा स्टेशनमास्तर. कालांतराने बँक, डॉक्टर, इंजिनीअर किंवा इंजिनीअरिंग म्हटले की, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल किंवा सिव्हिल. नंतर मात्र त्यात सॉफ्टवेअर, इलेक्ट्रॉनिक्स, फायर, मेटलर्जी, माइन्स वगैरे शाखा आल्या. या पोटशाखेतील अनेक इंजिनीअर्स असे आहेत की, त्यांना इंजिनीअरिंग कळलेच नसते! इंजिनीअरिंग हे पदवीपेक्षा कुठेतरी उपजत असेल, तरच तो यशस्वी इंजिनीअर म्हणून गणला जातो. (उदा. चार चाकी वाहनाच्या रेडिएटरची हमखास दुरुस्ती करणारे- उपजत देण लाभलेले- एका विशिष्ट समाजातील मिस्त्री-कारागीर आहेत, असे म्हणतात.) अनेक कारखान्यांत इंजिनीअर अधिकार्याचे काही खास लेबर असतात. ज्यांच्या भरवशावर तो यशस्वी होतो. हा कामगार इंजिनीअर नसतो, पण त्याला ‘इंजिनीअरिंग सेन्स’ असतो. आता ‘इंजिनीअरिंग सेन्स’ काय प्रकार आहे? आपण जर काही कार चालवणार्यांकडे पाहिले, तर असे लक्षात येईल की, एखादी व्यक्ती १० वर्षांनंतरदेखील बिचकतच गाडी चालविते, टेन्शनमध्ये चालविते. तेच दुसरी एखादी व्यक्ती सहा महिन्यांतच सराईतपणे गाडी चालविते. ही तुलना तुम्हाला, पार्किंगमध्ये गाडी ठेवताना, गर्दीत किंवा गाडी मागे नेताना सहज लक्षात येईल. याचे कारण काय, तर प्रत्येकाला भूमितीचा म्हणजेच ‘जॉमेट्रिक सेन्स’ नसतो, अनेक लोक बंद खोलीमध्ये पत्ता समजविताना, त्यांना सांगायचे असते उत्तर दिशेला जा, पण त्यांचे हात जातात दक्षिण दिशेकडे!
मग प्रश्न पडतो, पालकांनी करायचे तरी काय? त्याचे उत्तर सोपे आहे. प्रथम त्यांनी स्वत:बद्दल गैरसमज दूर करणे आवश्यक आहे की, त्यांना त्यांच्या पाल्याच्या भल्याचे काय आहे, हे सर्वांत जास्त चांगले कळते. त्यांनाच खरेतर मार्गदर्शनाची जास्त आवश्यकता आहे. काही गोष्टी काळानुरूप आपल्या मुलांनादेखील जास्त कळतात. ते इतके बुद्धू नसतात. काही गोष्टी त्यांच्यावर सोडल्यास ते जास्त यशस्वी होतात. दुसरं म्हणजे पदवी घेणं, शिक्षण घेणं म्हणजे माहिती मिळविणं. माहिती म्हणजे ज्ञान नसते. ज्ञान हे विज्ञानावर अधारित असते, माहिती ही कुणीतरी पसरविलेलीदेखील असू शकते. ज्ञान प्राप्त केल्याने सर्वकाही मिळाले, हे समजणे चुकीचे आहे. ज्ञान मिळविणे म्हणजे गाडी चालविण्याचा परवाना मिळविणे.
ज्ञान मिळवून तुम्ही फार फार तर शिक्षक होऊ शकाल, बौद्धिक देऊ शकाल, मात्र यशस्वी व्यक्ती होऊ शकणार नाही. म्हणूनच सर्वच शिक्षक विद्यार्थ्यांच्या पसंतीला उतरत नाहीत. जे प्रॅक्टिकल अनुभव घेतात व त्याला शिकवताना उपयोगात आणतात ते यशस्वी होतात. आता यशस्वी व्यक्ती म्हणजे काय, हा वादाचा मुद्दा होऊ शकतो. पण, त्याची एक व्याख्या अशी असू शकते की, ‘जो प्राप्त परिस्थितीचा सामना करून स्वत:ला तारून नेऊ शकेल तो!’ संकटांवर मात करण्यासाठी केवळ ज्ञान अर्जित करून उपयोग नाही.
ज्ञानाबरोबर जोपर्यंत त्याचे अप्लिकेशन करायला आपण शिकत नाही, तोपर्यंत त्याचा उपयोग नाही. ज्ञानार्जन हा एक सततचा प्रवास असला पाहिजे आणि त्याचे अप्लिकेशनदेखील. असे केल्याने कुशलता प्राप्त होते. सचिन तेंडुलकर सतत क्रिकेटवर मनन व त्यावर दररोजच्या सरावाने अप्लिकेशन करत राहिल्याने, तो सर्वांत कुशल फलंदाज होऊ शकला. आपल्या मुलांना केवळ पदवीच्या मागे न लावता, कुशलता कशी प्राप्त होईल, याचा विचार करा. ज्याच्याजवळ कौशल्य आहे त्याला कधीच मरण नाही. आपण आपल्या पाल्याला आशीर्वाद काय देतो- ‘‘तर खूप मोठा हो, चांगली नोकरी मिळो.’’ मोठा हो म्हणजे पैसा कमव. पैसा कमविण्यासाठी खूप शिक म्हणजे पदव्या घे. केवळ या ऍप्रोचमुळे चांगली नोकरी मिळतेच, असे सर्वांच्या बाबतीत घडत नाही. अनेक प्रसिद्ध उद्योजक किंवा गर्भश्रीमंतांच्या पदव्या पाहा? राजकारण्यांच्या पदव्या पाहा? मग ते यशस्वी का होतात? तर त्यांच्याजवळ काही कौशल्य असते, निपुणता असते, निर्णयक्षमता असते, धडाडी असते, सातत्य असते, लक्ष्यप्राप्तीसाठी त्याग करण्याची तयारी असते, सर्वकाही गमावण्याची तयारी असते. लोकांशी कसे वागावे, त्यांना कसे आपलेसे करावे ही त्यांची विषेशता असते. हे सर्व गुण आत्मसात करायला पदवीची आवश्यकता असतेच असे नाही. पदवीद्वारे त्याला या गोष्टी जास्त पद्धतशीरपणे करायला उपयोग होऊ शकतो.
आताच आपल्या देशाच्या पंतप्रधानांनी ‘डिजिटल इंडिया’ची घोषणा केली आहे. त्यात चार लाख पन्नास हजार कोटींची गुंतवणूक होणार आहे, अठरा लाख रोजगार निर्माण होणार आहेत. या दृष्टीने केवळ पदवी या आधारावर पुढील पाऊल ठेवलेल्या संधी किती जण मिळवू शकतील? म्हणून आपण शिकताना, नोकरी करताना सतत आपल्यामध्ये जे काही गुण आहेत, त्याला प्रोत्साहन देऊन कौशल्य निर्माण करा. त्याचाच उपयोग शेवटी जास्त होणार असतो. अमुक अमुक महाविद्यालय व विशिष्ट शाखा मिळाली तरच आपण यशस्वी होऊ शकू, असा अट्टहास पाल्यांनी व पालकांनी- दोघांनीही करण्याची गरज नाही.