नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान म्हणून आपला एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केला आहे. या एक वर्षाच्या कार्यकाळात त्यांनी भारतातच नाही तर जगात आपला ठसा उमटवला आहे. आपल्या कार्यपद्धतीची वेगळी छाप पाडली आहे. मोदींची लोकप्रियता अफाट आहे. यात पं. जवाहरलाल नेहरुंनाही त्यांनी मागे टाकले आहे, यात शंका नाही.
आजपर्यंत या देशात अनेक पंतप्रधान झाले, पण मोदी यांनी ज्या पद्धतीने काम केले त्याला तोड नाही. प्रत्येक पंतप्रधान आपल्या पद्धतीने काम करतो, आणि देशात आपली ओळख निर्माण करतो, पण मोदींची गोष्टच वेगळी आहे. जीवनात यशस्वी झालेल्या व्यक्ती काही जगावेगळ्या पद्धतीने काम करत नाही, तर काम करण्याची त्यांची पद्धत फक्त इतरांपेक्षा वेगळी असते. मोदींचेही तसेच आहे.
मोदींच्या कार्यपद्धतीचा मी व्यवस्थापन शास्त्राचा अभ्यासक म्हणून विचार करतो, तेव्हा त्यांचे काही वेगळे पैलू लक्षात येता. नरेंद्र मोदींनी काही व्यवस्थापन शास्त्राची अधिकृत पदवी घेतली नाही. पण व्यवस्थापन शास्त्रात पारंगत व्यक्तीही जेवढ्या कुशलतेने काम करू शकणार नाही, त्यापेक्षा जास्त चांगल्या आणि प्रभावीपणे मोदी काम करत आहेत.
व्यवस्थापन शास्त्राचे सामान्यपणे दोन प्रकार मानले जातात. पहिला प्रकार म्हणजे मॅनेजमेंट बाय इन्व्हॉल्वमेंट आणि दुसरा म्हणजे मॅनेजमेंट बाय एक्सेप्शन. मॅनेजमेंट बाय इन्व्हॉल्वमेंट म्हणजे प्रत्येक गोष्टीत स्वत:ला गुंतवून घेणे. काम मग ते कोणतेही असो त्यात स्वत:ला सहभागी करून घेणे. तर मॅनेजमेंट बाय एक्सेप्शन म्हणजे अधिकाराचे विकेंद्रीकरण करणे. म्हणजे कामाची जबाबदारी इतरांवर सोपवून अगदी मोजक्या कामात स्वत: लक्ष देणे. यातील कोणती कार्यपद्धती चांगली हा नेहमीच वादाचा विषय राहिला आहे. प्रत्येक कार्यपद्धतीचे काही गुण आहेत, तर काही दोष. त्यामुळे मोदींनी आवश्यक तेव्हा या दोन्ही पद्धतीचा यशस्वीपणे अवलंब केला आहे. त्यांच्या यशाचे रहस्य यात आहे.
आतापर्यंत देशात कॉंग्रेसचेच शासन राहिले आहे. कॉंग्रेसचे शासन कसे असते, याचा अनुभव देशवासीयांनी घेतला आहे. कॉंग्रेसच्या कार्यपद्धतीतच दोष होता. त्यामुळे देशासमोर अनेक समस्या उद्भवल्या. भ्रष्टाचार वाढला. लोकांना अपेक्षित असा देशाचा विकास झाला नाही. सत्तेचा उपयोग कॉंग्रेसने स्वत:च्या फायद्यासाठी केला होता.
मोदींनी या सगळ्या स्थितीचा अभ्यास केला आणि आपली स्वत:ची कार्यपद्धती निश्चित केली. कारण त्यांचे ध्येय निश्चित होते, आपल्याला काय करायचे आहे, आणि कोणासाठी करायचे आहे, याबाबतच्या त्यांच्या कल्पना स्पष्ट होत्या. सत्ता ही स्वत:साठी नाही तर देशातील गोरगरीब जनतेच्या कल्याणासाठी त्यांना राबवायची होती. गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून पहिल्यांदा सूत्रे स्वीकारली तेव्हा नरेंद्र मोदी यांनी मॅनेजमेंट बाय इन्व्हॉल्वमेंटचा अवलंब केला, आणि दुसर्या कार्यकाळापासून मॅनेजमेंट बाय एक्सेप्शनचा. त्यामुळेच मोदी मुख्यमंत्री म्हणून यशस्वी झाले. देशातील सर्वांत विकसित राज्य म्हणून गुजरातची ओळख निर्माण झाली.
पाच वर्षात आपल्याला जनतेसाठी काय करायचे आहे, याची ब्ल्यू प्रिंट ज्याच्याजवळ तयार असते, तो नेता म्हणून यशस्वी होत असतो. मोदींजवळ सुरुवातीला गुजरातच्या विकासाची अशीच ब्ल्यू प्रिंट तयार होती. त्यामुळेच ते आपल्याला पाहिजे त्या पद्धतीने गुजरातचा विकास करू शकले. संपूर्ण देशात गुजरातची वेगळी ओळख निर्माण करू शकले. मुख्यमंत्री म्हणून ते यशस्वी झाले. त्यांची हीच कार्यपद्धती गुजरातच्या जनतेला भावली. आणि लागोपाठ तीनवेळा गुजरातच्या जनतेने त्यांना मुख्यमंत्री म्हणून निवडून दिले.
गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून मोदींनी केलेल्या कामाची तुलना आज त्यांच्या पंतप्रधानपदाच्या एक वर्षाच्या कार्यकाळाशी केली जात आहे, जी चुकीची आहे. पहिल्या कार्यकाळाच्या पहिल्या वर्षात मोदींचा गुजरातवर पाहिजे तसा ठसा पडला नव्हता. कारण त्यावेळी त्यांनी नुकतीच कामाला सुरुवात केली होती. त्याचे परिणाम लोकांना दिसत नव्हते. कोणत्याही मोठ्या कामाचे परिणाम लोकांना दिसायला आणि जाणवायला तीन ते चार वर्षांचा कालावधी जाऊ द्यावा लागतो. तीन चार वर्षांनी मोदींनी लावलेल्या विकासाच्या झाडाला जेव्हा फळे यायला सुरुवात झाली तेव्हा गुजरातच्या लोकांनी मोदींना डोक्यावर घेतले. त्यांची लोकप्रियता वाढायला लागली.
ध्येयाने वेड्या व्यक्तींसमोरचे ध्येय स्पष्ट असते. ज्याप्रमाणे अर्जुनाला फक्त माशाचा डोळाच दिसत होता, तसेच मोदींना फक्त गुजरातचा विकासच दिसत होता. त्यामुळे गुजरातच्या विकासासाठी ते झपाटल्यासारखे काम करत होते. ज्या व्यक्तींचा स्वत:वर अदम्य विश्वास असतो, तेव्हा ती जगाची पर्वा करत नाही. लक्ष्यप्राप्तीसाठी आपल्या परीने काम करत असते. धोनी कर्णधार म्हणून यशस्वी झाला कारण, त्याने पारंपरिक पद्धतीने निर्णय घेतले नाही तर परिणामांची पर्वा न करता आपल्या पद्धतीने निर्णय घेतले, त्यामुळेच तो यशस्वी झाला. देशातील मोजक्या यशस्वी कर्णधारांच्या यादीत जाऊन बसला. मोदींचेही तसेच झाले. मोदींनी स्वत:ची व्यवस्थापन पद्धत विकसित केली.
कार शिकताना सुरुवातीला सगळ्यांचा भर थेअरीवर असतो, प्रत्यक्षात कार चालवताना तुम्हाला अनुभवाच्या आधारेच, समोर पाहून निर्णय घ्यावे लागतात. थेअरीच्या ज्ञानाचा येथे काहीच उपयोग होत नाही, असे नाही. पण तुम्हाला थेअरीवर पूर्णपणे अवलंबून राहता येत नाही. मोदींच्या बाबतीत व्यवस्थापन कौशल्याचेही तसेच झाले. त्यांनी आपल्या राजकीय अनुभवाच्या आधारे स्वत:चे व्यवस्थापन शास्त्र विकसित केले. काय केले म्हणजे काय होऊ शकेल, याचा त्यांचा अंदाज अचूक होता. त्यामुळे परदेश दौर्यावर गेले तेव्हा त्यांनी जाणीवपूर्वक हिंदीतून भाषण करण्याचा निर्णय घेतला. याचा अर्थ त्यांना इंग्रजी येत नव्हते, असा नाही. पण आपली राष्ट्रवादी प्रतिमा उभी करण्यासाठी त्यांनी अगदी अमेरिकेतही हिंदीतून भाषण करुन लोकांची मने जिंकली. स्वत:च्या वेशभूषेच्या बाबतीतही मोदी खूप सतर्क होते. लोकांचे अनुकरण करण्यापेक्षा आपले अनुकरण लोकांनी केले पाहिजे, अशी त्यांची वागणूक होती.
कामाच्या बाबतीत तर मोदी वाघ आहेत. अगदी झपाटल्यासारखे ते काम करत असतात. त्यांचा काम करण्याचा आवाका पाहून समोरचा थक्क होतो, पण मोदी थकत नाहीत. त्यांच्या गतीने काम करताना सर्वांची तारांबळ उडते. त्यांची शारीरिक क्षमता प्रचंड आहे. एवढी ऊर्जा त्यांच्यात कुठून आणि कशी आली, याचे सर्वांना आश्चर्य वाटते. पण, यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही. कारण त्यांच्यासमोरचे लक्ष्य भव्यदिव्य आहे. जास्त काम केल्याने कोणी मरत नाही. कामाच्या अतिताणाने कोणी मेल्याचे एकही उदाहरण जगात नाही. त्यामुळे जास्त काम करणे गैर नाही. मोदींचा इमोशनल कोशंट वेगळाच आहे. तुम्ही समोरच्या व्यक्तीला कसे हाताळता यावर तुमचा इमोशनल कोशंट ठरत असतो. मोदींसारख्या व्यक्तीला रिझल्ट हवा असतो. त्यामुळे त्यांना रिझल्ट देणार्या व्यक्ती हव्या असतात. रिझल्ट न देणार्या व्यक्तींना त्यांच्या जीवनात स्थान नसते. त्यामुळे व्यक्तीकडे ते व्यक्ती म्हणून पाहू शकत नाही. विस्तवावर पाय पडला तर चटका हा बसणारच. त्यावेळी आपल्यावर कोणाचा पाय पडला हे विस्तव पाहत नाही. पाय कोणाचाही असो त्याला चटका बसणारच. त्यात लहानमोठा, उच्चनीच असा भेद नसतो. मोदींच्या कार्यपद्धतीचेही तसेच आहे. त्यामुळे त्यांच्याबद्दल समज गैरसमजही खूप आहे. याची किंमतही त्यांना चुकवावी लागते. पण त्यांना त्याची पर्वा नसते. त्यांच्यादृष्टीने लक्ष्य महत्वाचे आहे. देशातील गोरगरीब जनतेचे कल्याण हा त्यांच्या दृष्टीने सर्वोच्च प्राधान्याचा विषय आहे. त्यात आड न येणार्यांना मोदींच्या दृष्टीने क्षमा नाही.
मोदी हे बेस्ट सेल्समन आहेत. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी त्यांचा तसा उल्लेख केला आहे. तो चुकीचा नाही. पण काही विकण्यासाठी आधी तुमच्याजवळ काही असले पाहिजे. म्हणजे तुम्ही काही पेरले असेल तरच ते विकू शकाल. विकण्यासाठी काही पेरण्याची, ते वाढवण्याची आवश्यकता आहे. मोदींनी नेमके तेच केले. आधी पेरले, ते उगवले आणि नंतर ते विकले. डॉ. मनमोहनसिंग यांनी काही पेरलेच नाही तर ते विकणार कसे? त्यामुळेच मी उत्कृष्ट सेल्समन नाही याची कबुली त्यांना द्यावी लागली. लोककल्याणाचे बी नरेंद्र मोदी यांच्या मनात कित्येक वर्षांपूर्वीच रुजले होते. मधल्या काही वर्षात त्या बिजाला पालवी फुटली. नंतर त्याला फळे लागली. त्यामुळे पंतप्रधान झाल्यानंतर आपण पाहिलेल्या स्वप्नांची फळे ते देशातील गोरगरीब जनतेला उपलब्ध करून देत आहे.मोदींच्या मनात आणि पोटात काय आहे, याची सहजासहजी कोणाला कल्पना येत नाही. एखादी गोष्ट पटली की त्यासाठी ते अतिशय आग्रही असतात. त्यासाठी कोणत्याही स्तराला जाण्याची त्यांची तयारी असते. त्यामुळे कोणाला ते हट्टी आणि दुराग्रही वाटू शकतात. पण प्रत्यक्षात तसे नाही. दुर्दम्य आत्मविश्वास असलेल्या व्यक्तींचे तसेच असते. आपल्या स्वप्नपूर्तीसाठी अफाट मेहनत करण्याची त्यांची तयारी असते. आणि मोदींचे स्वप्न तर भारतमातेला जगद्गुरू बनवण्याचे आहे. देशातील कोट्यवधी गोरगरीब जनतेच्या जीवनात अच्छे दिन आणण्याचे आहे. त्यांचे स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी आपली सर्वांची आहे. त्यासाठी आपण त्यांना सहकार्य केले पाहिजे.