हार्ट ट्रान्सप्लाण्ट

Vishwasmat    12-Aug-2015
Total Views |

heart transplant_1 & 
मागील आठवड्यात मुंबईतील एकाच मोठ्या इस्पितळात, हृदय प्रत्यारोपणाच्या दोन शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडल्याचे ऐकले. पहिले हृदय पुण्याहून थेट मुलुंडमध्ये एअरऍम्बुलन्सद्वारे, तर दुसरे वाशीहून मुलुंड येथे रस्त्याने आणले. दोन्ही घटनांमध्ये मुंबई पोलिस दलाने माणुसकी दाखवून विशेष व्यवस्था केली. रस्त्याने वाहतूक नियंत्रित केली. ज्या मुंबईत सरकारी यंत्रणेसाठी किंवा विशेष लोकांसाठी वाहतूक रोखून ठेवल्यास लोक नाक मुरडतात, तेच लोक अशा प्रसंगी संपूर्णपणे साहाय्य करतात, हेही दिसून आले. कोणतेही अवयव प्रत्यारोपित करायचे असल्यास त्याचा कमाल कालावधी चार तासांचा असतो.
 
अवयव प्रत्यारोपणाचे प्रमाण आपल्या देशात अत्यल्प आहे किंबहुना आताशा सुरुवात आहे, असेच म्हणता येईल. युरोप व अमेरिकेसारख्या देशात याचे प्रमाण फार आहे. आपल्या देशात एकतर त्या विषयी पुरेशी जागृती नाही आणि तशी मानसिकताही नाही. ज्या काही प्रत्यारोपणाच्या घटना आपण ऐकतो, त्या केवळ चेन्नईच्या अपोलो हॉस्पिटलमधल्याच असतात. तेथे या घटना का जास्त? तर तामिळनाडूमध्ये तुलनेत याबाबत जागृती जास्त आहे आणि मानसदेखील. आपल्या देशात अवयव प्रत्यारोपणाचा कायदा खरं तर १९९४ सालीच अस्तित्वात आला. त्या कायद्याप्रमाणे अवयव दान, कोण व कसे करू शकतो, यासाठी इस्पितळात नोंदणी कशी करावी, दान करू इच्छिणारी व्यक्ती ‘ब्रेनडेड’ असावी, वगैरेसारख्या तरतुदी दिल्या आहेत. शरीराचे काही अवयव अंशत:देखील दान करून रुग्ण बरा होऊ शकतो, तर काही अवयव, जसे हृदय हे अंशत: दान होऊ शकत नाही. अवयव दाता हा ब्रेनडेड असणे अपेक्षित आहे. ब्रेनडेड म्हणजे काय, तर ज्याच्या शरीरातून मेंदूला रक्तपुरवठा बंद झालेला आहे, मात्र त्याचे इतर अवयव, जसे हृदय, यकृत, स्वादुपिंड कार्यरत आहेत. अशा वेळी रुग्णाच्या जवळील नातेवाईकांकडून अनुमती घेऊन अवयव दान करता येतो. ज्या रुग्णाला अवयवाची आवश्यकता असते त्याची नोंदणी इस्पितळात असल्याने ताबडतोब प्रत्यारोपणाचा मार्ग मोकळा होत असतो. खरे तर शरीरात साधे रक्तदान करतानादेखील रक्तगट जुळवून पाहिला जातो. मग संपूर्ण अवयव शरीरात रोपण करताना जुळवणी होते का? तेही इतक्या कमी कालावधीत? अशा प्रकारचे प्रश्‍न मनात येणे स्वाभाविक आहे. खरे तर वैज्ञानिकदृष्ट्या हे सर्व जुळले, तर अवयव दान घेणार्‍या रुग्णाला जास्त अनुकूल असते. मात्र, प्रगत तंत्रज्ञानाच्या भरोशावर प्रत्यारोपित करावयाचा अवयव संपूर्णपणे निर्जंतुक व त्यावर वैज्ञानिक प्रक्रिया केली जाते. मात्र, त्यामुळे प्रत्यारोपणानंतर रुग्णाचे आयुष्यमान वाढण्यात अवरोध निर्माण होता.
 
प्रत्येकाच्या शरीरात निसर्गत: रिजेक्शन (नकार)ची प्रक्रिया तीव्रपणे होत असते. जसे आपल्या शंभर किलो वजनाच्या धष्टपुष्ट शरीरात छोटासा काटा गेल्यास काय होते? संपूर्ण शरीर त्याला रिजेक्ट केल्याशिवाय स्वस्थ बसत नाही. काटा बाहेर पडल्यावर शरीर स्थिर होतं. मग एवढे मोठाले अवयव शरीर स्वीकारणार काय? संपूर्ण शरीर ताकदीनिशी त्याला नकार देत असते, रिजेक्ट करत असते. यावर उपाय म्हणून वैद्यकीयशास्त्र काय करते, की शस्त्रक्रिया करण्याआधी रुग्णाची प्रतिकारशक्ती औषधांद्वारे शून्यावर आणली जाते. मग प्रत्यारोपण केले जाते. शस्त्रक्रियेनंतर टप्प्याटप्याने त्या रुग्णाची प्रतिकारशक्ती परत आणली जातो. या प्रक्रियेमुळे रुग्णाला त्रास कमी होतो, तरीही शरीर आलेल्या नव्या पाहुण्याला स्वीकारायला तयार नसते. रुग्णाचे काय हाल होतात, याबद्दल कधी आपण चर्चा ऐकतो काय? काही अवयवांच्या प्रत्यारोपणाने काही रुग्ण बरे होऊन अनेक वर्षे जगल्याची उदाहरणे आहेत, मात्र ती विरळाच! हृदय, यकृत, फुफ्फुस प्रत्यारोपित केलेल्या रुग्णांचे जीवन काही तासांनी, काही दिवसांनी, काही महिन्यांनी, तर फारच कमी घटनांत वर्षांनी वाढलेले दिसते. विज्ञानाचा चमत्कार या नावाखाली पेपरबाजी, चर्चा फार घडून येतात. मात्र, किती रुग्ण, किती दिवस व कशा प्रकारे जगले, याबद्दल चर्चा ऐकायला मिळत नाही.
 
प्रत्यारोपण करणे म्हणजे अक्षरश: ‘बुचरिंग’ म्हणजेच शास्त्रोधारित खाटकाचे काम करणे होय. ऑपरेशननंतर रुग्ण एक तास जगला, तरी सर्जन त्याला यशस्वी शस्त्रक्रिया म्हणतात. मात्र, रुग्णाचे काय हाल होतात, तो किती दिवस जगतो, शस्त्रक्रियेनंतर सर्जन म्हणतो, आमचे काम झाले. आता औषधासाठी फिजिशियनकडे जा. बरेचदा अशा नाजूक शस्त्रक्रियेनंतर औषधोपचारच नसतो! असला तरी तो आपल्या देशात उपलब्ध नसतो. रुग्णाचे नातेवाईक तीस ते पन्नास लाखापर्यंत रक्कम खर्च करतात. त्यानंतर परत खर्च करण्याची ताकद सर्वांचीच असते, असेही नाही. हाच खर्च विदेशात दोन-तीन कोटींच्या घरात जातो. सर्वच शस्त्रक्रियांसाठी हे लागू पडत नाही. जसे- हृदयाची बायपास सर्जरी, यात त्याच रुग्णाच्या शरीराच्या नसा वापरत असल्याने, फॉरेन अवयव नसल्याने रुग्णांना पुनर्जन्म मिळाल्याचे आपण पाहतो. मात्र, प्रत्यारोपणामध्ये रिजेक्शनचे प्रमाण जास्त असल्याने, ही शस्त्रक्रिया करावी की नाही, याचादेखील विचार व्हायला हवा.
 
एक शक्यता नाकारता येत नाही ती म्हणजे, आजचे इस्पितळ म्हणजे कॉर्पोरेट हॉस्पिटल झाले आहे! कॉर्पोरेट म्हटले की, प्रोजेक्ट आला. पर्यायाने प्रोजेक्ट रिपोर्ट आला. प्रोजेक्ट म्हणून शेकडो कोटींची गुंतवणूक होते, त्यात ७० टक्के भाग हा कर्जाचा असतो. कर्ज म्हटले की, महिन्याचा हप्ता आला. त्यामुळे हॉस्पिटलदेखील नव्या नव्या निदानांद्वारे पैसे कसे आकारायचे याचा विचार करणारच. तिकडे प्रश्‍न जीवनमरणाचा असल्याने, रुग्णाचे नातेवाईक प्रेमापोटी म्हणा किंवा समाजाच्या दबावापोटी म्हणा, वाटेल तेवढे पैसे खर्च करायला तयार असतात. अनेक धर्मादाय संस्थादेखील या प्रकारची मदत करतात. त्यात भर पडली आहे ती मेडिक्लेमची! त्यामुळे रुग्णांच्या उपचाराबरोबर पैशांचा मामलादेखील त्यात असतोच. माझ्या जवळच्या व्यक्तीला फुफ्फुसाचा आजार जडला होता- ‘लंग्ज फायब्रॉसिस.’ तो कळला त्यानंतर ती व्यक्ती आठ वर्षे जगली. सरासरीपेक्षा जास्त, असे डॉक्टरांचे मत होते. तरीही शेवटचा उपाय म्हणून त्या व्यक्तीला चेन्नईच्या अपोलो हॉस्पिटलमध्ये पूर्ण तयारीनिशी नेले. अर्थात रुग्णाची ऑपरेशनची अजिबात तयारी नव्हती. चेन्नईला न्यायच्या आधी कौटुंबिक डॉक्टरांनी एक सहज सल्ला दिला. त्या म्हणाल्या की, बाहेरील उत्तमातल्या उत्तम अवयवापेक्षा शरीरातील कितीही अशक्त अवयव असला, तरी तोच जास्त चांगला आणि उपयोगी असतो. त्यानंतर देवावर सोडून देणेच योग्य असते. पण, अपोलोमध्ये पाच दिवस सर्व चाचण्या झाल्या. डॉक्टरांनी सांगितले, सध्याची रुग्णाची स्थिती ऑपरेशनला मानवणारी नाही. काही दिवस वाट पाहू या. मी त्यांना विचारले, आतापर्यंत या हॉस्पिटलने किती लंग्ज ट्रान्सप्लाण्ट केले? त्यांनी सांगितले, आठ! मी त्यांना विचारले, ते साधारणत: किती जगले? त्यावर त्यांचे उत्तर होते-पंधरा दिवस ते चार महिने. तेव्हाच मनात विचार आला, काही काही ऑपरेशन करणे म्हणजे मृत्यू निश्‍चित करणे व रुग्णाला जास्त यातना देणे. या घटनेनंतर ती व्यक्ती आठ महिने जगली.
 
तात्पर्य एवढेच की, विज्ञानाची महती नक्कीच आहे. वैद्यकीय शास्त्र फार पुढे गेले आहे. बहुतांश डॉक्टर हे देवासमानच असतात. मात्र, काही बाबतीत आपल्या रुग्णांच्या बाबतीत भावनिक न होता, विवेकपूर्ण निर्णय घेणे गरजेचे आहे. प्रत्येक जिवाचे हृदयाचे ठोके जन्मापूर्वीच ठरवून ठेवले असतात. म्हणूनच कित्येकदा अशक्त व्यक्ती वयाची ८० गाठते, तर धष्टपुष्ट व्यक्ती अल्पायुषी ठरते! डॉक्टरांकडे- दवाखान्यात त्यांनीच लिहून ठेवले नसते का की ‘आम्ही उपचार करतो, ‘तो’ बरा करतो!’ वैद्यकीयशास्त्र जरी उपलब्ध असले, तरी त्याच्या मर्यादा आहेतच. अन्यथा, मनुष्य हा अमर झाला नसता काय…?