परवा पुण्यालगत मारुंजी या ग्रामीण भागात, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ‘शिवशक्ती संगम’ या कार्यक्रमाला उपस्थित राहता आले. दीड लाखांच्या वर स्वयंसेवक गणवेशात, तर पन्नास हजारावर स्वयंसेवक तथा नागरिकांची अतिथी म्हणून उपस्थिती होती. विशेष म्हणजे सर्वच धर्माचार्य, सामाजिक कार्यकर्ते आवर्जून उपस्थित होते. स्वत: मुख्यमंत्री, आमदार, खासदार इ. सर्वच स्तरातील मंडळी उपस्थित होती. दीड लाखांच्या वर, वयोगट 18 ते 80, एकाच गणवेशात, एका स्वयंसेवकाच्या आज्ञेचे पालन करीत होते. आज घराघरांत कुणीच कुणाच्या आज्ञेचे पालन करताना दिसत नसताना, ही बाब नक्कीच नावीन्यपूर्ण आहे. जे स्वयंसेवक आहेत त्यांच्यासाठी ही परिपाठी आहे, मात्र जे नवखे आहेत, त्यांना सर्वच अद्भुत वाटत असते.
संघ कधीच शक्तिप्रदर्शनाच्या प्रयत्नात नसतो. केवळ संघटन मजबूत करणे, त्यातून समाज एकत्रित करणे, राष्ट्रहिताय जगण्याची शिकवण देणे, ती शिकवण भाषणातून िंकवा क्लासमधून नव्हे, तर प्रत्यक्ष दैनंदिन सेवाकार्यातून देत असतो. मग ते नैसर्गिक संकट असो, पूर असो, भूकंप असो, वस्तीमधील घटना असो, कुणाकडे निधन झालेले असो, मतदानाचे राष्ट्रीय कर्तव्य असो, घरोघरी संपर्क प्रस्थापित करणे असो… यातूनच संघकार्य सुरू असते. दैनंदिन शाखा हा त्याचा पाया असतो. म्हणून सरसंघचालकांपासून तर खालील सर्वच अधिकार्यांचा कटाक्ष- भर शाखाकार्य वाढविण्यावर असतो. अर्ध्या तासाच्या दैनंदिन कार्याने ते काम होते? असा प्रश्न स्वाभाविक आहे, मात्र अनुभूतीचा विषय आहे. आपण आपला मोबाईल फोन जर चार्ज करायला विसरलो तर काय होईल? तसेच शाखेत जाणे म्हणजे आपली सामाजिक दायित्वाविषयीची नाळ दररोज चार्ज करणे, असेच असते.
मोबाईलचा विषय निघाला म्हणून, शिवशक्ती संगम या कार्यक्रमात सुमारे दोन लक्ष नागरिक, मोबाईल कनेक्टिव्हिटीशिवाय जवळजवळ सहा तास शांतपणे बसले होते! संपूर्ण कार्यक्रम न्याहाळण्यात व्यग्र होते. व्यासपीठ भलेमोठे होते. 200 फूट रुंद, 150 फूट लांब व 80 फूट उंच म्हणजे सातमजली इमारतीएवढे उंच. सर्व गाड्यांसाठी सोयिस्कर पार्किंगव्यवस्था, 12 घोषपथकांचा नाद घुमत होता व ते एकत्र आल्यावर त्यांच्या स्वरांनी वातावरण अजूनच भारावले. स्वातंत्र्यवीरांचे काव्य गायिले गेले, वीररसाचे सामूहिक गीत… सर्वच कसे डोळ्यांचे पारणे फेडणारे होते. तिथे पाणी, प्रसाद आणि प्रसाधनगृहांची वगैरे सर्वच व्यवस्था अप्रतिम होती. 400 एकर जागेवर हा सोहळा चालला होता. सुरक्षेची संपूर्ण व्यवस्था स्वयंसेवकच पाहत होते. कार्यक्रमाच्या परिघाच्या सर्व दिशांकडून येणार्या रस्त्यांच्या 50 कि.मी. अंतरापासूनच स्वयंसेवकांचे मार्गदर्शन सुरू होते. विशेष म्हणजे, मंच शिवकालीन काळाची आठवण करून देत होता.
यापूर्वी 1983 ला पुण्याजळच तळजाईचे पठार येेथे 35,000 स्वयंसेवकाचे तीन दिवसांचे शिबिर झाले होते. नागपूरला खापरीजवळील शिबिर, बंगळुरूचे शिबिर, केरळातले शिबिर… हे सर्वच ऐकले होते. मात्र, या पश्चिम महाराष्ट्र प्रांताच्या शिबिराने कडेलोट केला व मोठा विक्रमच प्रस्थापित केला. कोल्हापूर-नाशिकपासून सर्वच रस्ते स्वयंसेवकांच्या वाहनांनी फुलून गेले होते. हा विक्रम जरी असला, तरी तो मोडला जाईल िंकवा नाही, ही चर्चाही ऐकायला मिळाली. मात्र, संघाच्या दृष्टीने हे शक्तिप्रदर्शन करणे फार महत्त्वाचे नसते. िंकबहुना संघाचा त्यावर विश्वास नाही. परंतु, तत्कालीन परिस्थितीला आवश्यक िंकवा काहींना जी भाषा कळते त्यादृष्टीने मधूनमधून संघ असे कार्यक्रम घेेत असतो. मात्र, यशस्वी सांगता झालेल्या कार्यक्रमात रममाण न होता, तो परत आपल्या जमिनीवरील छोट्या-छोट्या सेवाकार्यात व्यग्र होत असतो. प्रसारमाध्यमांसाठी व इतर नागरिकांसाठी मात्र तो विषय चघळायला मिळतो. हा लेख लिहिपर्यंततरी सर्वच माध्यमांनी सकारात्मक प्रसिद्धी दिली. मात्र, काहींना यातून अशी बातमी मिळू शकते की, ‘नव्वद वर्षांनंतरदेखील संघाला गणवेशधारी दोन लाख स्वयंसेवकांचा आकडा गाठता आला नाही,’ वगैरे वगैरे.
कार्यक्रमाला उपस्थितांचे कान, सरसंघचालकांच्या भाषणाकडे लागले होते. मोहनजी भागवतांची भाषणाची शैली ही ठासूून व चपखल शब्दांची असते. त्यात खोलवर विचार दडलेले असतात. बोलण्यात साधेपणा व सोपेपणा असतो. शिवाजी महाराजांच्या धर्माधारित कार्यशैलीची स्तुती असताना, धर्म म्हणजे काय, हेदेखील त्यांनी सोप्या भाषेत सांगितले. राजकारणी मंडळींसमक्ष, देश केवळ राजकारणी नव्हे, तर अंतिमत: समाज घडवितो, हेही सांगितले. धर्म म्हणजे अक्षता व फूल वाहणे नाही, हेही सर्व धर्माचार्यांच्या उपस्थितीत सांगितले. डॉ. आंबेडकरांचे विचार, सावित्रीबाई फुले यांचे विचार, वगैरे सर्वच बाबी ओघवत्या वाणीत संबोधिल्या. श्रोते अगदी मंत्रमुग्ध झाले होते. जणू देवी सरस्वतीच त्यांच्या जिभेवर विराजमान झाली होती!
त्यांनी रवींद्रनाथ टागोरांचा एक किस्सा सांगितला. टागोरांना नोबेल पुरस्कार मिळाल्यावर, त्यांना जर्मनीच्या एका विद्यापीठाने आमंत्रित केले होते. कार्यक्रमात त्यांचे भाषण होणार होते. भाषणाच्या वेळी प्राध्यापक मंडळी तर होती, मात्र विद्यार्थी उपस्थित नव्हते. विचारणा केल्यावर कळले की, विद्यार्थी म्हणतात, ‘‘एका गुलाम देशाच्या व्यक्तीचे विचार ऐकण्याएवढी दीनवाणी स्थिती अजून आमच्या देशावर आलेली नाही.’’ तुम्ही गुलाम असाल तर कसे बघितले जाते, याचे ते उदाहरण होते. शक्तिशाली देशांचे वाईटातले वाईट गुण व गुलामीत असलेल्या देशांचे चांगल्यातले चांगले गुण- दोन्हीही दडपून टाकले जातात. त्यांनी इस्रायलचे उदाहरण दिले. ज्यू धर्मियांनी दोन हजार वर्षे आपल्या स्वत:च्या देशाचे स्वप्न उराशी बाळगले, तेव्हा कुठे त्यांना एक वाळवंट मिळाला! नंतर वाळवंटातून त्यांनी नंदनवन तयार केले. युद्ध िंजकून स्वत: स्वत:चे रक्षण करू शकतो, हा संदेश दिला. त्यांच्या देशाकडे वाकडी नजर टाकण्याची िंहमत कोणतेही राष्ट्र करू शकत नाही, ही वस्तुस्थिती आहे.
हे सगळे समजल्यावर खचीतच भारताकडे लक्ष जाते. आमच्यात काय कमी आहे? सर्व प्रकारचे हवामान, नद्या, डोंगर, समुद्र, जंगल, लोकसंख्या, बुद्धिमत्ता, प्राचीन इतिहास… सर्वच तर आहे. आवश्यकता आहे ती फक्त मानसिकता बदलण्याची! स्वतंत्र झालो, पण आजही मानसिकता गुलामगिरीची!! या पृष्ठभूमीवर कुठेतरी बदलाचे वारे वाहताना दिसत आहेत. संघाचा एक प्रचारक पंतप्रधानपदी आरूढ आहे व तो, ती मानसिकता पुसण्यासाठी प्रयत्नशील आहे. ते उगाचच नाही इतक्या देशांचा प्रवास करीत आहेत! जोपर्यंत आंतरराष्ट्रीय जगतात आपली गुलामगिरीची प्रतिमा मिटत नाही, तोपर्यंत आपण प्रगती करू शकणार नाही. सरसंघचालकांनी इस्रायलचे उदाहरण का दिले? तर तेथील लोकांची राष्ट्रभक्ती वाखाणण्यासारखी आहे म्हणून! संघदेखील राष्ट्राचाच विचार करीत आहे. पहिल्यांदाच पंतप्रधान, राष्ट्रहिताचाच विचार प्रथम, या तत्त्वावर काम करीत आहेत. केवळ ‘योगदिना’चेच उदाहरण घ्या ना. एका झटक्यात ‘युनो’मध्ये सर्व देशांनी आंतरराष्ट्रीय योगदिनाला अनुमती दिली. शक्तीचे सामर्थ्य यालाच म्हणतात व ते सामर्थ्य मनात असावे लागते. गुलामगिरी ही मानसिक अवस्था आहे.
म्हणूनच नरेंद्र मोदी पहिली दोन वर्षे आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची प्रतिमा बदलणार आहेत. त्यानंतर आर्थिक गुंतवणूक वाढवणार आहेत, उद्योगधंद्यांना चालना देणार आहेत, रोजगार उपलब्ध करून देणार आहेत. आज आंतरराष्ट्रीय स्तरावर आर्थिक आघाडीवर अमेरिका व चीन दोघेही माघारत आहेत. त्यादृष्टीने भारत सज्ज होत आहे. वर्षानुवर्षे संघाचे विचार, विश्वगुरुपद, संस्कृती, मानवतेचा विचार… वगैरे गोष्टी ज्या आपण ऐकतो आहे, त्याचा अनुभव घ्यायचा असेल, तर मोदींनी धरलेल्या वाटेला पािंठबा देणे व संयम बाळगणे, यातच आपले व आपल्या देशाचे हित सामावले आहे…!