उत्तर आयुष्यातील साथीदार

Vishwasmat    08-Mar-2016
Total Views |


default pic_1   
मागील आठवड्यात मुंबईतील कांदिवली भागात एक संमेलन झाले. 240 पुरुष व 70 स्त्रिया- सर्वच मंडळी उत्साहात व आशावादी दिसत होती. निवेदिका सूचना देत होती. पाच-पाच स्त्रियांना मंचावर बोलावून त्यांचा थोडक्यात परिचय करून दिला जात होता. पुरुषमंडळी मन लावून त्या सूचना व माहिती ऐकत होते. निमित्त होते- वृद्धापकाळात ज्यांनी आपला जोडीदार गमावला आहे त्यांनी साथीदार निवडण्याचे. कारण काय, तर या वयात काय करावे, कसे जगावे हे कळत नसल्यामुळे. घरची मंडळी, मुलं-मुली, सुना-जावयांसोबत आपापल्या संसारात रममाण झालेली असतात. वृद्ध मंडळींकडे ते जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात िंकवा नकळत तसे घडत असते िंकवा त्यापैकी काही खरे नसले, तरी आपणास तशी वागणूक मिळत आहे, असा वृद्धांचा समज होत असतो.
 
संमेलनातील काहींनी आपापली व्यथा मांडली. एक वृद्ध म्हणाले, ‘‘मला बारा हजार पेन्शन मिळते. मी मुलीकडे 1800 रुपये महिना भाडे म्हणून देतो व राहतो; तर मुलाला सहा हजार रुपये जेवणाच्या डब्याचे देतो. परंतु, डब्यात थंडगार अन्न असते व बरेचदा खाताना एकटेपणा सतावतो.’’ वृद्ध स्त्री म्हणाल्या, ‘‘साफसफाई, फुलं वेचणे, पूजाअर्चा याच्यात मी वेळ घालविते, पण एकटेपणा मात्र सतावत असतो.’’ एकाचे म्हणणे होते की, ‘‘मी सर्वांसोबत घरी असतो, पैशाची कमतरता नाही, परंतु घरातील मंडळी माझ्याशी बोलतच नाही, मी अडगळीचा वाटतो त्यांना.’’ अशा अनेक प्रकारच्या तक्रारी घराघरांत ऐकायला मिळतात.
निसर्गाने स्त्री व पुरुष हे असे दोन प्रकार निर्माण केले आहेत ते उगाचच नाही. ते दोन्ही परस्परपूरक आहेत व एकाविना दुसरा पूर्ण होऊच शकत नाही. त्याला अपवाद असतात, जे ध्येयाने िंकवा अध्यात्मासाठी अविवाहित राहतात. मात्र, तसे जगण्यासाठी दृढनिश्चय लागतो, खडतर आयुष्य जगावे लागते. मात्र, अशी मंडळी विरळाच! सर्वसामान्यांचा विचार केला, तर स्त्रीला पुरुष व पुरुषाला स्त्री साथीदार म्हणून असणं ही अत्यंत आवश्यक िंकबहुना अपरिहार्य बाब आहे. स्त्री व पुरुष यांच्या एकत्रिकरणामुळेच पृथ्वीचे रहाटगाडगे अव्याहतपणे सुरू आहे. अपत्यनिर्मिती हा जरी त्यातील एक महत्त्वाचा भाग असला, तरी तोच केवळ एकमेव मात्र नक्कीच नाही. मित्राला मैत्रीण व मैत्रिणीला मित्र असावे, असे वाटणे स्वाभाविकच आहे. त्यातूनच विवाहबंधनाचे पवित्र संस्कार जन्माला आले. भारतामध्ये विवाहसोहळा नसतो तर विवाहबंधन असते. केवळ शारीरिक गरज म्हणून त्याकडे बघितले जात नसून, स्त्रीला आपल्या अपत्यांची माता, तर पुरुषाला पिता म्हणून पाहिले जाते. संसाररूपी वृक्ष फुलत जातो व नात्यांची गुंफण घातली जाते. नंतर नातवंडं होतात आणि ते पाहताना दोघांनाही ‘अहो’ आनंद प्राप्त होत असतो. त्या गोतावळ्यात ते इतके रममाण होतात की, अनेकदा त्यांना एकमेकांचा विसर पडतो!
 
पतीला वाटते की, पत्नी आपल्याकडे लक्षच देत नाही. सदासर्वदा देवापाशी घंटा वाजविते, पोथ्यापुराण वाचते, स्वयंपाकघरातच राहते वगैरे. पत्नीचीदेखील तक्रार असते की, पतीचे तिच्याकडे लक्षच नसते. तोदेखील पूजापाठ करण्यात रममाण असतो िंकवा चौकात उभा राहून चकाट्या पिटतो वगैरे. त्यातून वादविवाददेखील होतात. खडाजंगी होते. अबोला धरला जातो वगैरे वगैरे. तर काहींच्या स्वभावानुसार खुसखुशीत शैलीत संभाषण होते, नथीतून तीर मारले जातात… या सर्व बाबी वयाने तरुण मंडळी न्याहाळत असतात व फिरकीदेखील घेत असतात. तरुणांचा आविर्भाव पूर्णपणे असाच असतो की, आम्ही तर तरुणच राहणार सदैव, म्हातारपण आमच्या वाट्याला येणारच नाही! बघता बघता आयुष्य सरत असते. पती व पत्नीला ठाम विश्वास बसतो की, ते आता एकमेकांना विसरले आहेत व त्यांचे एकमेकांकडे लक्ष नाही. तो मात्र भास असतो, गैरसमज असतो. कारण दोघेही एकमेकांना गृहित धरून जगत असतात. ते खरे तर एकरूप झाले असतात, त्यामुळे त्यांना ते कळतच नाही.
 
दुर्दैवाने मात्र जेव्हा एक साथीदार अचानक दुसर्‍यास सोडून जातो, तेव्हा पायाखालची जमीनच सरकते. भले भले या प्रसंगात गर्भगळीत होतात. सुरुवातीला काहीच कळत नाही. जीवनप्रवाह थांबवल्यासारखा वाटतो, असल्याचं नसल्यात रूपांतर होते, सर्वच आनंदिआनंद वाटणारे जीवन निरस होते. मग मनुष्य भूतकाळात जातो. भूतकाळातील सोबतीच्या आनंदाच्या क्षणापेक्षा एकमेकांना दुखावणार्‍या घटनाच जास्त प्रकर्षाने आठवतात. मन कासाविस होतं. प्रत्येक घटनेतून हाच बोध घ्यायला मिळतो की, किती क्षुल्लक विषय होता तो. केवळ अहंकार आणि अहमहमिका याच्याशीच निगडित विषय असतात. साथीदार गेला की शरीर जातं, शरीर गेलं की त्याप्रतीचा अहंभाव, शत्रुत्व- सगळंच जातं. मग आपण केवळ, मी कसा चुकलो, हेच तपासतो. मन हळुवार होतं. मन मोकळं करावंसं वाटतं. आयुष्यात परत उभारी घेण्यासाठी धडपड सुरू होते. मृत्यू येत नाही तोपर्यंत जीवन तर जगावंच लागते. रथाचे एक चाक निखळल्यामुळे आयुष्याची गतीही खुंटते व ते दिशाहीनही होऊ लागते. मग असे वाटते की, आपल्याला समजून घेणारं, मायेची फुंकर घालणारं, आधार देऊ शकणारं, मन हलकं करण्यासाठी मदत करणारं कुणीतरी असावं. नेमकं याच अवस्थेमध्ये साथीदाराचं महत्त्व कळत असते, िंकबहुना त्याची तीव्र आवश्यकता असते.
 
वरील संमेलनाचा उद्देश हाच असावा. आपल्याकडे दुसर्‍यांदा विवाह करणं हे अजूनही मान्य होणारं नाही. पुरुष असेल तर तो धारिष्ट्य तरी करतो, मात्र स्त्रीला हे करता येत नाही. मुलं काय म्हणतील, सासू-सासरे काय म्हणतील, सुना िंकवा जावई काय म्हणतील आणि शेवटी समाज काय म्हणेल, या विचारांनी मार्ग सुचत नाही. भोग मात्र सुरू झालेला असतो. समाज व रीतिरिवाज आपापल्यापरीने ज्ञान पाजण्याचे काम करताना दिसतात. मात्र, ज्याच्यावर बितते त्याला हे सगळंच मान्य नसते. त्यातही मुख्यत: पैसाअडका वा मालमत्ता याच्या हिस्सेवाटीमुळेदेखील परवानगी मिळत नसते िंकवा हिस्सेवाटीतील वाट्याच्या मोहामुळे ती व्यक्तीदेखील ‘इकडे आड तिकडे विहीर’ यासारख्या स्थितीत जीवन जगत असते. पती व पत्नीचं नातं, कोणत्याही इतर प्रकारच्या नात्यापेक्षा कितीही जवळचे असले, तरी भरून निघूच शकत नाही. रीतिरिवाज, शास्त्र या सर्व गोष्टी शंभर टक्के मान्य असतात, जोपर्यंत एखादा प्रसंग आपल्यावर गुदरत नाही. म्हणून अशा व्यक्तींच्या, ज्यांच्यावर हा प्रसंग बितलेला आहे, मनातील भावना समजणेदेखील महत्त्वाचे आहे.
 
वरील संमेलनाच्या अनुषंगाने काही बाबी लक्षात घेण्यासारख्या आहेत. प्रत्येक व्यक्तीला उतारवयात साथीदाराची आवश्यकता असतेच, िंकबहुना जास्त असते. साथीदार हा पुनर्विवाहाच्या माध्यमातून िंकवा केवळ सहवासातून शक्य होऊ शकते. 2005 ला सर्वोच्च न्यायालयाने ‘लिव्ह इन रीलेशनशिप’ला मान्यता दिली. मात्र भारतामध्ये, आपली संस्कृती विचारात घेता, पुनर्विवाहाला त्यातल्या त्यात मान्यता जास्त आहे. कारण तेथे बंधन व जबाबदारीची जाण असते. ‘लिव्ह इन’मध्ये तशी बंधने नसतात, म्हणून त्या दृष्टीने पुरस्कार करणारादेखील मोठा वर्ग आहे. नवीन पिढीदेखील आता आपल्या, उत्तरायुष्यातील एकटे पडलेल्या नातेवाईकांना स्वत: पुढाकार घेऊन जोडीदार निवडायला प्रोत्साहित करते व लग्न लावून देते. हादेखील एक व्यवहारी असाच विचार आहे. कारण आज भारताची 50 टक्के लोकसंख्या पंचवीसच्या खालची व 65 टक्के लोकसंख्या 35 च्या वयाच्या खालची आहे. म्हणजेच 25 वर्षांनंतर आपल्या देशाची लोकसंख्या कशी असेल? निम्म्याहून जास्त लोक साठीत असतील. या सर्व बाबी लक्षात घेता. वरील संमेलनाची आवश्यकता, उत्तरायुष्यात जगणार्‍या व्यक्तींच्या अडचणी सोडविण्यास उपयुक्तच ठरेल…