अभिनेत्री कंगना राणावत वर असभ्य , पातळी सोडून केलेली टीका , कंगनाचे कार्यालय तोडण्यात दाखवली गेलेली तत्परता यामुळे बचावात्मक भूमिकेत गेलेल्या शिवसेनेला अचानक राज ठाकरे यांचे स्मरण झाले. सत्तेसाठी शिवसेनेला काँग्रेस , राष्ट्रवादीच्या दावणीला बांधणाऱ्या श्रीमान संजय राऊत यांनी राज ठाकरे यांना ‘ ठाकरे ब्रँड ला साथ द्या ‘ अशी भावनिक साद घातली आहे. राऊत यांनी राज ठाकरे यांना ठाकरे ब्रँड ला साथ द्या , असे आवाहन करत आपल्या पक्षाची अगतिकताच जगजाहीर केली आहे. राऊत यांचा राज ठाकरेंविषयीचा उमाळा हा पुतनामावशीच्या पान्ह्यासारखाच आहे. याविषयी आपण लेखात नंतर बोलूच. सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे राऊत यांनी उल्लेख केलेल्या ब्रँड चा. ग्राहकाभिमुख अर्थव्यवस्थेत उत्पादकाला आपल्या उत्पादनाचे बाजारपेठेत अस्तित्व तयार करण्यासाठी त्याचे ब्रॅण्डिंग करावे लागते. मात्र त्या उत्पादनाचा एका रात्रीत ब्रँड तयार होत नाही.
गुणवत्ता , विश्वासार्हता , उपयुक्तता अशा विविध कसोट्यांवर ते उत्पादन उतरले तरच त्याचा ब्रँड तयार होतो. टाटा , बजाज , महिंद्र हे ब्रँड बनले आहेत ते उत्पादकांनी वर्षानुवर्षे घेतलेल्या मेहनतीच्या आधारावर. राऊत महाशयांनी महाराष्ट्राच्या राजकारणात ठाकरे , पवार हे दोन ब्रँड असल्याचे नमूद केले आहे. त्याविषयी बोलू. शरद पवार हा राज्याच्या राजकारणातील लक्षणीय ब्रँड आहे हे कोणीही नाकारणार नाही. मात्र या ब्रँड ला १९८० पासून स्वतः च्या ताकदीवर राजकारणाची बाजारपेठ काबीज करता आलेली नाही. हा ब्रँड कायम उत्तेजनार्थ पुरस्कारच मिळवू शकला आहे. पवारांच्या समाजवादी आणि नंतर राष्ट्रवादी काँग्रेसला गेलंय ४० वर्षांत एकदाही ७५ जागांचा टप्पा गाठता आलेला नाही. ठाकरे ब्रँड हा सर्वस्वी बाळासाहेब ठाकरे नामक श्रेष्ठ व्यक्तिमत्वाशी निगडीत आहे. बाळासाहेबांनी ८० च्या दशकांत ज्या तडफेने हिंदुत्वाचा झेंडा हाती घेतला त्यामुळेच बाळासाहेब ठाकरे नावाच्या ब्रॅण्डचा राज्यात नव्हे तर देशात दबदबा तयार झाला. हिंदुत्वाच्या विचारांशी प्रामाणिक राहून त्यांनी सोनिया काँग्रेस , शरद पवार यांच्या हिंदुत्वविरोधी राजकारणाला कायमच प्रखर विरोध केला. सत्तेसाठी हिंदुत्वाच्या विचारधारेशी कधीच तडजोड न केल्याने बाळासाहेब ठाकरे नामक ब्रँड ला विश्वासार्हता प्राप्त झाली. अशी विश्वासार्हता माननीय मुख्यमंत्र्यांना का मिळाली नाही याची फिकीर संजय राऊत यांना नसावी.
भारतीय जनसंघ व नंतर भारतीय जनता पक्ष हा ब्रँड १९५२ पासून हळूहळू कसा देशव्यापी होत गेला. याच्या अनेक पिढ्या साक्षीदार आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रखर राष्ट्रवादाच्या मुशीतून घडलेल्या जनसंघाला प्रारंभिक काळात कमालीच्या विपरीत स्थितीत काम करावे लागले. गांधी हत्येच्या पार्श्वभूमीवर उत्पन्न झालेल्या विद्वेषी , विखारी वातावरणात जनसंघाची स्थापना झाली. ३७० वे कलम रद्द करणे , समान नागरी कायदा या जनसंघाच्या स्थापनेपासूनच्या मागण्या होत्या. राष्ट्रवादाच्या विचारसरणीशी प्रामाणिक रहात जनसंघाने संथ परंतु दमदार पावले टाकत राष्ट्रीय राजकारणात आपले स्थान निर्माण केले. जनसंघाच्या स्थापनेच्या काळात समाजवादी , कम्युनिस्ट विचारधारेचे पक्ष काँग्रेसचे प्रमुख विरोधक होते. समाजवादी , प्रजा समाजवादी , दोन्ही कम्युनिस्ट या पक्षांच्या तुलनेत त्याकाळी जनसंघाची ताकद खूपच कमी होती. मात्र विचारधारेवर निरंतर श्रद्धा ठेवत केलेल्या वाटचालीमुळे जनसंघ आणि नंतर भाजप या ब्रॅण्डची हळूहळू विश्वासार्हता तयार होत गेली. समाजवादी , कम्युनिस्ट या विचारधारांचे प्रतिनिधित्व करणारे पक्ष आज कुठे आहेत या प्रश्नांत जनसंघ /भाजप या ब्रॅण्डची महती लक्षात येईल. प्रखर राष्ट्रवाद , काँग्रेसशी कधीच तडजोड न करणे या दोन मुद्द्यांवर आजचा भाजपा उभा आहे. रा. स्व. संघाने संघटनेची रचना करताना व्यक्तीला नव्हे तर विचारसरणीला सर्वोच्च महत्व दिले आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी शिवसेना , द्रमुक, मुलायमसिंगांचा समाजवादी हे पक्ष एका कुटुंबाभोवती फिरत राहिले. भाजपाचा पुढचा अध्यक्ष कोण हे आज सांगता येणार नाही . मात्र या पक्षांचे उद्याचे , त्यापुढील काळाचे अध्यक्ष कोण असतील हे राजकारण थोडंफार कळणाराही सांगू शकेल.
आता राहिला मुद्दा राज ठाकरेंची आत्ताच आठवण का झाली याचा. राज ठाकरेंनी अनेकदा आपल्या मावस / चुलत भावापुढे सहकार्याचा हात पुढे केला होता. मात्र प्रत्येकवेळी उद्धवरावांनी राज ठाकरेंशी युती / आघाडी / समझोता करण्याचे टाळले. बाळासाहेबांच्या काळातील अनेक ज्येष्ठ शिवसैनिकांनी राज ठाकरेंचा समझोत्याचा प्रस्ताव स्वीकारा , अशी आर्जवे केली होती. मात्र शिवसेना नेतृत्वाने या आर्जवांना त्यावेळी भीक घातली नाही. आता कोरोना स्थिती हाताळण्यात व एकूणच राज्यापुढील प्रश्न हाताळण्यात आलेले अपयश , यावरून संतप्त होऊ लागलेले जनमत पाहूनच संजय राऊतांना राज ठाकरेंची आठवण झाली असावी.काळाचा महिमा दुसरं काय ?