पैसा नव्हे; प्रेमच महत्त्वाचे

Vishwasmat    05-Apr-2026
Total Views |
'रेमंड' हा कापड उद्योगातील अग्रणी बँड जागतिक पातळीवर प्रस्थापित करणारे प्रख्यात उद्योगपती पद्मभूषण विजयपत सिंघानिया यांचे नुकतेच निधन झाले. त्यांना मी विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या एका वक्तव्यावरून सोशल मीडियावर जी उलटसुलट चर्चा सुरू आहे, त्याबद्दल मला माझे मत व्यक्त करणे गरजेचे वाटते.
 
विजयपत सिंघानिया यांचा जन्म व्यापार उद्योगातील प्रतिष्ठित सिंघानिया कुटुंबात झाला. त्यांनी 'रेमंड' या भारतातील प्रख्यात वस्त्रनिर्माण कंपनीचे नेतृत्व केले. त्यांच्या कर्तृत्वामुळे रेमंड हा आंतरराष्ट्रीय पातळीवरील प्रतिष्ठित बँड झाला. त्यांनी रेमंडचा उत्पादन, किरकोळ विक्री आणि निर्यात या क्षेत्रात प्रचंड विस्तार केला. सिंघानिया यांनी मुंबईचे शेरीफ या मानाच्या पदावर काम केले. त्यांना विमान उड्डाणाची आवड होती. विमान उड्डाण आणि बलून उड्डाणाच्या बाबतीत त्यांनी अनेक विक्रम प्रस्थापित केले. ते प्रशिक्षित पायलट होते व मानद एअर कमोडोर पदवीही मिळाली होती. उद्योग आणि समाजासाठी त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल भारत सरकारने त्यांना पद्मभूषण हा किताब प्रदान केला.

Vijaypat Singhania 
विजयपत सिंघानिया यांचे वैयक्तिक आयुष्य वादळी होते. त्यांनी त्यांच्या मुलाकडे गौतम सिंघानिया यांच्याकडे आपले रेमंड कंपनीतील मालकीचे सर्व शेअर्स हस्तांतरित केले होते. त्यानंतर गौतम सिंघानिया यांच्याकडे कंपनीची सूत्रे आली. विजयपत सिंघानिया यांना कुटुंबात वाईट वागणूक मिळाल्याचे सांगण्यात येते. एकेकाळी रेमंड या जागतिक कंपनीचे प्रमुख व हजारो कोटींच्या मालमत्तेचा मालक असलेल्या या उद्योगपतीला कुटुंबात उपेक्षा झाल्यामुळे रस्त्यावर यावे लागले व जगणे कठीण झाले. त्यांच्याकडे उरलेल्या थोड्या रकमेवर त्यांना गुजराण करावी लागली.
 
वरील पृष्ठभूमीवर विजयपत सिंघानिया यांनी २०२३ साली 'बिझनेस टुडे' या नियतकालिकाला दिलेल्या मुलाखतीतील त्यांचे वक्तव्य पुन्हा एकदा सोशल मीडियात चर्चेत आले आहे. त्यावेळी त्यांनी म्हटले होते, 'पालकांना माझे आवाहन आहे की, आपल्या मुलांना आपल्याकडचे सर्व काही देताना काळजीपूर्वक विचार करावा. मी असे म्हणत नाही की मुलांना देऊ नका. माझे एवढेच सांगणे आहे की, तुमच्या मृत्यूनंतरच त्यांना द्या. तुमच्या जिवंतपणी देऊ नका. कारण तुम्हाला खूप मोठी किंमत मोजावी लागेल.'
सिंघानिया कुटुंबात नक्की काय झाले हे आपल्यासारख्या बाहेरच्या लोकांना माहिती नाही. त्यामुळे त्याबद्दल न बोललेले बरे. खरे तर कोणच्याही वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलू नये. तथापि, विजयपत सिंघानिया यांनी जाहीर मुलाखतीत कुटुंब संस्थेविषयी केलेल्या वक्तव्याबद्दल आपण बोलू शकतो. मुलांना आपल्या हयातीत सर्व काही देऊ नका, असे त्यांचे म्हणणे होते. अनेकांनी त्यांचे मत उचलून धरले. तथापि, त्याबद्दल माझे वेगळे आहे.
 
सनातन पद्धतीत विश्वास महत्त्वाचा
पालक मुलांना वाढवतात. मुलांना जास्तीत जास्त चांगले आयुष्य मिळावे यासाठी धडपडतात. अफाट कष्ट करतात. त्याग करतात. आपल्याला ज्या अडचणींना तोंड द्यावे लागले त्या अडचणी मुलांच्या आयुष्यात नसाव्यात, असे पालकांना वाटते. मुलेही लहानपणापासून आपले आईबाप आपल्यासाठी किती कष्ट करीत आहेत, हे पाहत असतात. मुलांचे आणि आईबापाचे नाते हे नैसर्गिक प्रेमाचे नाते असते. त्यामध्ये आर्थिक देवाणघेवाणीचा मुद्दा नसतो. आईबाप गरीब असले तरीही मुलांना त्यांच्याबद्दल प्रेम आणि कृतज्ञता असते. अशा पालकांची मुले मोठी झाली आणि आयुष्यात यशस्वी झाली तरी आपल्या गरीब आईबापांना प्रेमाने सांभाळतात. त्यांच्या आजारपणात त्यांची सेवा करतात. कारण हे नाते आर्थिक निकषावर नसते तर प्रेमाचे नाते असते. मुलांचा आईबापावर पूर्ण विश्वास असतो. लहानपणी तर आपले पालक म्हणतील तेच खरे असे मुलांना वाटते. पालकांनीही मुलांवर भरवसा ठेवला आणि प्रेमाने वागविले तर मुले सहसा कधी विश्वासघात करत नाहीत. अनेकदा मुले मोठी झाली तरी आपल्या आईला किंवा वडिलांना बाहेर काय घडले हे सर्वकाही सांगतात. आपल्या सनातन समाजामध्ये अशीच रीत आहे. पालक मुलांसाठी सर्वस्वाचा त्याग करतात, मुले त्यांना आत्मीयतेने सांभाळतात, पुढे मुले त्यांच्या मुलांसाठी सर्वस्वाचा त्याग करतात. हे सनातन चक्र चालू राहते. आपणा सर्वांसमोर श्रीरामाचा आदर्श आहे. वडिलांच्या वचनपूर्तीसाठी वनवास सोसणाऱ्या श्रीरामाने त्यागाचा आदर्श निर्माण केला आहे.
 
विजयपत सिंघानिया यांनी मुलाखतीत मुलाला सर्वकाही देण्याच्या विरोधात मत व्यक्त केले. त्यांच्या निधनानंतर सोशल मीडियावर तशीच चर्चा करणाऱ्यांना भारतीय सनातनी वास्तव ध्यानात आले नाही, असे मला नम्रपणे वाटते. आपल्या आसपास पाहा, पालकांचे मुलांसोबतचे नाते हे विश्वासाचे असते. आपण मुलांना प्रेमाने वाढविले; ते आपल्याला म्हातारपणी आधार देतील, असे त्यांना खात्रीने वाटते. आपल्या भोवती पाहा, बहुतांश असेच घडताना दिसते. विजयपत सिंघानिया यांच्या बाबतीत जे घडते ते अपवाद आहे, असे माझे मत आहे. अशा अपवादावरून सनातन समाजातील प्रेमाच्या नात्याबद्दल शंका घेणे चांगले नाही.
आमचे वडील संघाचे समर्पित स्वयंसेवक होते. मजदूर संघाच्या कार्याला त्यांनी वाहून घेतले होते. रेल्वेमध्ये नोकरीला होते. निवृत्तीच्या वेळी त्यांना मिळालेले १ लाख २० हजार रुपये त्यांनी मला आणि माझ्या भावाला दिले. आमच्या आयुष्याच्या सुरुवातीला मदत होईल, असे त्यांना वाटले. वडिलांच्या निवृत्तीनंतर त्यांनी त्यांच्याकडचे सर्व पैसे आम्हाला दिले असले, तरी कुटुंबातील कर्ता पुरुष म्हणून त्यांनाच मान होता. पुढे त्यांच्या आजारपणाच्या काळात आम्ही सर्वांनी त्यांची सेवा केली. वैद्यकीय उपचारांचा खर्चही केला. एकदा मी आणि माझ्या भावाने सहज हिशेब केला त्यावेळी ध्यानात आले की, वडिलांच्या उपचारांवर आम्ही १३ लाख रुपये खर्च केले होते. वडिलांनी कुटुंबात कधी पैशाचा विचार केला नाही. त्यांच्याबाबतीत आम्हीही कधी विचार केला नाही. आज पैशाच्या आधारावर नाती मोजण्याचा प्रकार चालू आहे, म्हणून हे सांगावेसे वाटले.
 
केवळ पैशाच्या जोरावर नाती मोजणाऱ्यांना मी आणखी एक वास्तव नजरेस आणू इच्छितो. विजयपत सिंघानिया म्हणाले त्याप्रमाणे पालकांनी मुलांना हयातीत सर्व काही दिले नाही व स्वतःसाठी संपत्ती राखून ठेवली तरी सर्व प्रश्न सुटतात असे नाही. मला नागपुरातील, पुण्यातील, मुंबईतील अनेक पालक माहिती आहेत. त्यांनी आपल्या आयुष्यात भरपूर पैसे कमावले, मुलांना चांगले शिक्षण दिले, त्यांना आयुष्यात सेटल केले आणि आता दोघे ज्येष्ठ नवरा-बायको आपल्या बंगल्यात किंवा मोठ्या फ्लॅटमध्ये एकटेच राहतात. घर आहे, पैसा आहे पण एकाकीपणा खायला उठतो. कारण आता मुले परदेशी गेली, परगावी गेली, त्यांची जबाबदारी नाही, त्यांना काही द्यावे लागत नाही, पण त्यांच्याशिवाय करमतही नाही. माणसाला माणसांशिवाय करमत नाही. आपली रक्ताच्या नात्याची माणसे सोबत असावीत असे वाटते. विशेषतः म्हातारपणी ही गरज अधिक असते. ती केवळ आर्थिक नसते. अनेकदा पैसा असूनही माणूस सोबत नसेल तर हतबल आहे. किमान आजारी पडल्यावर, रुग्णालयात दाखल केल्यावर ऑपरेशनच्या वेळी फॉर्मवर सही करण्यासाठी तर आपला माणूस सोबत हवा.
 
मानवी नात्यांचा केवळ पैशात विचार करणे चुकीचे आहे. विजयपत सिंघानिया यांच्याबाबतीत नक्की काय झाले हे माहिती नाही. तथापि, त्यांच्याबद्दल बातम्यांमध्ये जे चित्र उभे राहिले त्यावरून मतप्रदर्शन करणाऱ्यांनी व्यापक विचार करायला हवा. मानवी नात्यांत पैशापेक्षा प्रेमच महत्त्वाचे ठरते. आपला सनातन समाज यावर उभा आहे. उगाच एखाद्या अपवादावरून मूळ विचारांबद्दल शंका निर्माण करू नये. विजयपत सिंघानिया विषय हा अपवादात्मक आहे. आपण अपवादला नियम मानून संपूर्ण आपली सनातनी संस्कृती नाकारायची का?