अर्थव्यवस्थेचे तीनतेरा

20 Aug 2013 16:45:12

 
मागील आठवडा देशाच्या आर्थिक क्षेत्रात मोठा घडामोडींचा ठरला. डॉलरच्या तुलनेत रुपयाचा दर ६३.३० रुपयांपर्यंत पोचल्यामुळे झालेले ऐतिहासिक अवमूल्यन, शेअर बाजाराच्या निर्देशांकात एकाच दिवशी ७७० अंकांनी झालेली घसरण, नॅशनल स्पॉट एक्स्चेंजमधील ६००० कोटींचा भ्रष्टाचार, चालू खात्याच्या वाढत्या तुटीमुळे गांेंधळून गेलेले सरकार, अमेरिकेतील आर्थिक घडामोडी, रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदी रघुरामन राजन यांची निवड; इत्यादी. या सर्व घटनांनी सामान्य माणूस आणखीच धास्तावला. सामान्य माणूस स्वत:ला आर्थिक घडामोडींपासून हेतुपुरस्सर दूर ठेवून आनंदी राहण्याचा प्रयत्न करीत असतो. तरीही त्याला नाईलाजाने का होईना लक्ष द्यावेच लागते.
 
कारण या घडामोडींचा आणि त्याला दैनंदिन जीवनात पेट्रोलसाठी, दुधासाठी, भाजीपाल्यासाठी, कांद्यासाठी, अन्न धान्यासाठी पैसे मोजतांना जी कसरत करावी लागते त्याच्याशी वरील घडामोडींचा संबंध असू शकतो असे त्याला वाटत असावे. पूर्वी सामान्य माणूस आपल्या चाकोरीतून वर्षाचे नियोजन करायचा. आता त्याला महिन्याचे किंबहुना दर दिवसाचे नियोजन करावे लागते. ते करताना कोणता खर्च केव्हा वाढेल याचा त्याला अंदाजच नसतो आणि आवक मात्र ठरलेली. आपले जागतिक व्यापार उदीम फार पूर्वीपासूनचे आहे. एकेकाळी आपला त्यावर दबदबा पण होता. आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यापार करायचा म्हटला की, आपल्याला जे नाणे आंतरराष्ट्रीय व्यापारात चालते त्याद्वारेच व्यापार करावा लागतो. स्वतंत्र भारताने १९७५ पर्यंत ब्रिटिश स्टर्लिंग पाऊंड्‌सच्या माध्यमातूनच व्यापार केला. रुपयांची किंमत पाऊंड्‌सच्या किमतीशी निगडीत होती. कालांतराने अमेरिकेचा दबदबा वाढला आणि जागतिक व्यापारात अमेरिकेच्या डॉलरने आघाडी घेतली.
 
जगाशी स्पर्धा करताना आणि व्यापार करताना परकीय गंगाजळी ही अत्यंत आवश्यक असते. परकीय गंगाजळी मिळविण्याचे अनेक मार्ग आहेत. जसे, वस्तूंची किंवा सेवांची निर्यात करणे. हे करीत असताना वस्तूंची किंवा सेवांची आयात करणे देखील क्रमप्राप्त असते. अशाप्रकारे निर्यात जास्त आणि आयात कमी असेल तर चालू खात्यामध्ये गंगाजळी निर्माण होते. त्यालाच ‘करंट अकाऊंट सरप्लस’ असे म्हणतात. याउलट झाले तर मग ते ‘करंट अकाऊंट डेफिसिट’ म्हणजे चालू खात्यातील घट असे म्हणतात. ही स्थिती कोणत्याही देशासाठी चिंतेची बाब असते.
 
त्याप्रमाणे आपण आपल्या देशातील अचल संपत्तीची विक्री करून परकीय गंगाजळी मिळविली तर त्याला परकीय गुंतवणूक म्हणतात किंवा ‘फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट’ म्हणतात. त्याचप्रमाणे भारतातील उद्योगपतींनी जर विदेशात गुंतवणूक केली आणि अचल संपत्ती प्राप्त केली तर त्याला ‘रिव्हर्स एफडीआय’ म्हणतात किंवा ‘ओव्हरसीज इन्व्हेस्टमेंट’ म्हणतात. या प्रक्रियेला ‘कॅपिटल अकाऊंट ट्रान्झॅक्शन’ म्हणतात. कधी कधी एकाच देशात करंट अकाऊंट ‘डेफिसिट’ असते तर त्याच वेळी कॅपिटल अकाऊंट ‘सरप्लस’ राहू शकते. सोप्या भाषेत, आपण आपले मासिक खर्च मासिक पगारातून करणे म्हणजे ‘करंट अकाऊंट ट्रान्झॅक्शन’ आणि काही खर्च आपली जमीन किंवा घर विकून केला किंवा त्यात गुंतवणूक केली म्हणजे ‘कॅपिटल अकाऊंट ट्रान्झॅक्शन.’
 
सध्या भारतात दोन्ही आघाड्यांवर सरकार अपयशी ठरत आहे. त्यात अमेरिकेमध्ये सुगीचे दिवस येऊ घातले असल्याने सर्व गुंतवणूदार तिकडे वळण्याच्या मनस्थितीत आहेत. त्यात आपल्या परकीय गंगाजळीची स्थिती सुधारावी म्हणून ‘आरबीआय’ ने काही ठोस पावले उचलण्याचा निर्णय घेतल्याने परत ‘दंडाराज’ येणार असा समज झाल्याने, मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक धाडकन कोसळला. तब्बल ७७० अंकाने आणि त्यामुळे सर्वत्र हाहाकार माजला. खरेतर शेअर बाजाराचा निर्देशांक केवळ आघाडीच्या ३० कंपन्यांचे प्रतिनिधित्व करतो. त्यात एकूण लोकसंख्येच्या किती प्रमाणात लोक जोडलेले आहेत? तरीही त्याला अनन्यसाधारण महत्त्व दिल्या गेले आहे. सध्या कांद्यामध्ये गुंतवणूक करण्यापेक्षा शेअरमध्ये गुंतवणूक करावी, असे बोलले जात आहेे. निर्देशांक वधारला तर आपले अर्थमंत्री सुटीवर जातात आणि आपटला की खाडकन जागे होतात.
 
जाताजाता का होईना, रिझर्व्ह बँकेच्या पूर्वीच्या गव्हर्नरांनी कणा दाखविला आणि सरकारला सुनावले की तुमच्या चुकांमुळेच परकीय गंगाजळीची समस्या निर्माण झाली आहे. चूक काय झाली तर कच्च्या तेलाची आणि सोन्याची नियोजनशून्य मोठ्या प्रमाणात आयात झाली. त्याने ‘करंट अकाऊंट डेफिसिट’ निर्माण झाला. म्हणजेच आता स्मगलिंगला पुन: सुगीचे दिवस येतील.
सामान्यत: परकीय गंगाजळी म्हणजे आरबीआयचा विषय असा समज आहे. म्हणून आरबीआयची व्याप्ती आणि अधिकार समजावून घेणे आवश्यक आहे. रिझर्व्ह बँक एकतर बँकाची बँक म्हणून काम करते, दुसरे केंद्र सरकारची बँक म्हणूनही काम बघते आणि तिसरे म्हणजे परकीय गंगाजळीचे नियंत्रण आणि व्यवस्थापन पाहते. थोडक्यात ती व्यवस्थापकाच्या भूमिकेत असते. मात्र कोणत्या मार्गाने परकीय चलन मिळवायचे त्याचे नियम करणे, जसे एफडीआयचे नियम, परकीय चलनातील कर्जाचे नियम, व्यापारविषयक नियम हे ठरविण्याचे काम सरकारचे आहे, रिझर्व्ह बँकेचे नाही. गुंतवणूकदारांमध्ये विश्वास निर्माण करणे हे काम सुद्धा सरकारचेच आहे.
 
मात्र, सध्या सरकार आहे तरी काय? अनेक पक्षांच्या कुबड्यांवर स्वार झालेले सरकार. असा पंतप्रधान की ज्याच्या नेतृत्वामध्ये देशाने ‘न भुतो न भविष्यती’ असे घोटाळे अनुभवले, कायदा आणि सुव्यवस्था म्हणजे आनंदी आनंद, प्रगतीदर खुंटत चालला आहे. हे करत असताना मी किती प्रामाणिक आहे, हे दाखविण्यातच त्यांचा भर आहे. निर्णय अजीबात घेत नाही. परीक्षेला बसायचेच नाही आणि म्हणायचे की मी कधीच नापास झालो नाही. आता आपले पंतप्रधान म्हणतात की मागील ५ वर्षांतला आर्थिक प्रगतीचा दर जरी सरासरी ५ पेक्षा कमी असला तरी मागील दहा वर्षांतला दर ६ टक्केपेक्षा अधिक आहे. कशासाठी ही धुळफेक आणि खटाटोप? संपुआच्या पहिल्या पाच वर्षांत विकासाचा दर ९ टक्केपर्यंत होता. त्याचे कारण म्हणजे त्यांना रालोआने दिलेला भक्कम प्लॅटफॉर्म. जेव्हा आपले पंतप्रधान ‘आचरेकरसरां’च्या भूमिकेत होते तेव्हा त्यांनी नरसिंहराव रूपी ‘सचिन तेंडुलकर’ घडवला. आणि जेव्हा स्वत:च बॅट हातात घेतली आणि मैदानावर गेले तेव्हा मात्र सपशेल बाद झाले. प्रत्येक चेंडूवर बाद होत असले तरी त्यांना बाद दिल्या जात नाही कारण त्यांच्यावर पंच म्हणून राहुल गांधी आणि अहमद पटेल आहेत. आणि त्याही वर तिसरा पंच म्हणजे सोनिया गांधी. विरोधकांनी कितीही अपील केले तरी काही फरक पडत नाही.
मात्र, यामुळे प्रेक्षकरूपी जनता आता कंटाळली आहे. मागील आठवड्यातील अजून एक उल्लेखनीय घटना म्हणजे नेहरू घराण्याच्या बाहेरील पंतप्रधान व्यक्तीने केलेले १० वे भाषण कले, हाही इतिहास आहे. मागील आठवड्यात माझा एक यशस्वी मित्र म्हणाला की, जर मनमोहनसिंग पुन्हा पंतप्रधान झाले तर आम्ही तर देशच सोडून जाऊ. कारण इतके दूषित वातावरण देशाने कधीही अनुभवले नव्हते.
 
मागील आठवड्यातील एक ‘एसएमएस’ देखील बोलका होता! विषय होता पुढील पंतप्रधान कोण होणार या चर्चेविषयी. नेहरूंच्या रूपाने हे सिद्ध झाले की एक श्रीमंत, इंदिरा गांधींनी सिद्ध केले की एक स्त्री, शास्त्रींनी सिद्ध केले की एक गरीबही, मोरारजींनी सिद्ध केले की वयोवृद्ध देखील, राजीव गांधींनी सिद्ध केले की एक तरुण, अटलजींनी सिद्ध केले की अविवाहित आणि कवी देखील पंतप्रधान होऊ शकतो. मात्र, मनमोहनसिंगांनी हे सिद्ध केले की हा देश पंतप्रधानांंशिवाय चालू शकतो. मग पुढचा पंतप्रधान कोण, या विषयी चर्चा का करावी? खरे राम भक्त मनमोहनसिंगच आहेत. कारण त्यांच्याच कृपेने, रामभरोसे देश चालू आहे.
Powered By Sangraha 9.0