मागील पंधरवड्यात नागपुरातील एका वृद्ध दाम्पत्याने आत्महत्या करून आपले आयुष्य संपविले. त्यांना एक मुलगा होता आणि तो अमेरिकेत स्थायिक आहे आणि मुलगी पुण्यात. परवाच दुसरी बातमी वाचली की, १९९५ मधील युती सरकारात राहिलेले एकमेव मुस्लिम, पण शिवभक्त मंत्री साबीर शेख यांचा दीर्घ आजाराने मृत्यू झाला. गेली काही वर्षे ते एकाकी पडले होते. आधी ते वृद्धाश्रमात गेले, नंतर परत लोकाग्रहास्तव आपल्या पुतण्याकडे कल्याणला आले, तरीही मन रमत नव्हते. तीनदा आमदार म्हणून निवडून आलेले आणि मंत्री राहिलेले शेख, स्वत:ला एकटे समजत होते. अशा प्रकारच्या अनेक घटना आपल्या अवतीभवती घडताना दिसत असतात. मात्र, आपण आपल्या गतिमान जीवनात व्यग्र असल्याने म्हणा किंवा आपले म्हातारपण तर चांगलेच जाणार, या अतिआत्मविश्वासाने म्हणा, आपण या घटनांकडे डोळसपणे पाहायचे टाळतो.
वृद्धावस्था आणि त्याचे नियोजन ही फारच महत्त्वाची बाब आहे. विशेषत: भारतामध्ये वृद्धांकरिता बरेच काही करणे गरजेचे आहे. केवळ बसभाड्यात किंवा रेल्वेभाड्यात सवलत दिल्याने आपली जबाबदारी संपली, अशा प्रकारचा दृष्टिकोन सरकारने ठेवू नये. विकसित देशांमध्ये सामाजिक सुरक्षेला फार महत्त्व आहे. तेथील वृद्धांना पेन्शनव्यतिरिक्त अगदी घरात वैद्यकीय सुविधा देण्याचा प्रयत्न असतो. त्यासाठी त्यांच्याकडे मोठे बजेट असते. आपल्याकडे ज्या वृद्धांना निवृत्तिवेतन मिळते, त्यांचे जीवन बरे आहे. त्यांना घरात मानही मिळतो. आलेल्या पाहुण्यांसाठी चहा करण्यास ते सुनेला सांगू तरी शकतात. परंतु, ज्यांना निवृत्तिवेतन मिळत नाही, ते मुलांच्या घरात अक्षरश: आश्रित म्हणून राहतात. असे आपण अनेक ठिकाणी बघतो.
आपले पंतप्रधान गौरवाने सांगतात की, २०२० पर्यंत भारत हा जगातील सर्वांत तरुण देश असेल. त्याची ६५ टक्के लोकसंख्या ही कार्यरत असणारी असेल, त्यामुळे भारताला विश्वगुरुपदाकडे जाण्यासाठी सुवर्णसंधी आहे. उद्योगधंद्यात आपल्या नागरिकांचा सहभाग राहणार आहे. आर्थिक प्रगती आपण साधणार आहोत, हे मान्य आहे. मात्र, २०४० मध्ये काय स्थिती राहणार आहे? तर आपल्या देशात वृद्धांची संख्या वाढणार आहे आणि कदाचित २०५० पर्यंत आपण जगातला सर्वांत वृद्ध देश म्हणून गणले जाऊ शकतो. तत्कालीन परिस्थितीचा लाभ नक्कीच घ्यायला हवा. मात्र, त्याचबरोबर सर्वंकष आणि समग्र विचार करूनच विकास केला, तरच आपल्याला वृद्धांच्या समस्यांचा सामना करता येईल. वृद्ध म्हणजे ‘नॉन परफॉर्मिंग ऍसेट’ ही संकल्पना रूढ होताना दिसत आहे. पूर्वी वृद्ध म्हणजे ‘बँक डिपॉझिट’ असे समजले जात असे. त्यांच्या अनुभवाचा आणि ज्ञानाचा उपयोग कुटुंबात जोपर्यंत जास्त प्रमाणात घेतला जात होता, तोपर्यंत कुटुंबव्यवस्था मजबूत आणि संस्कारक्षम होती. आज जे तरुण आहेत ते उद्या वृद्ध होणार आहेत. त्यामुळे त्याचे नियोजन आजपासूनच केले, तर वृद्धत्व एक शाप न वाटता जीवनाचा भाग वाटेल. त्यासाठी निरोगी जीवनाची कास धरावी लागेल. व्यायाम, योग्य आहार आणि योग्य सवयी यांनीच वृद्धत्व सुकर होण्याची शक्यता आहे.
आपण अशी अनेक उदाहरणे बघतो की, जी व्यक्ती तारुण्यात जिवाची पर्वा न करता धडाडीने कार्य करीत असते, तीच व्यक्ती वृद्धपणी जीव वाचवण्यासाठी धडपडताना दिसते. जी व्यक्ती, वृद्धांना सहज सांगत असे की, ‘‘बाबाजी, आता वयोमानाने हे होणारच.’’ ती व्यक्ती स्वत: वृद्ध झाली की हतबल वाटते. जी व्यक्ती आपल्या जोडीदारासह आनंदी आणि भक्कम असते, तीच आपला जोडीदार गमावल्यावर अचानक गर्भगळीत का होते, मुलं, आपली स्वत:ची ठेव समजणारे आईवडील, अचानक मुलांकडून भ्रमनिरास झाला म्हणून आयुष्याला का कंटाळतात, कंटाळ्याचे रूपांतर आत्महत्येेत करतात. या समस्या दिवसेंदिवस समाजाला भेडसावत आहेत.
वृद्धापकाळातील समस्या या प्रामुख्याने मानसिकतेशी निगडित असतात. मन कणखर, वास्तववादी, परिस्थितीला समजून, तथ्याला स्वीकारून जगू शकले, तर आयुष्य सुकर वाटते; आणि विपरीत परिस्थिती असली तर ते अतिकठीण वाटते. आपण शारीरिक व्याधींसाठी डॉक्टरांकडे रांगा लावून औषध घेतो. मात्र, ज्या अनेक व्याधींचे मूळ मन आहे, त्यासाठी मानसोपचारतज्ज्ञांकडे जायला कचरतो. कारण काय, तर समाज काय म्हणेल? मला कुणी वेडा तर म्हणणार नाही ना? या भयापोटी मानसोपचारतज्ज्ञांकडे जात नाही. आयुष्यातील अधिकाधिक समस्या या मानसिकतेशीच संबंधित आहेत. मग त्यावर उपाय काय? तर प्रत्येकाने, आपले आयुष्य म्हणजे हे माझे आयुष्य आहे आणि मी ते माझ्या मनाप्रमाणेच जगीन, असा प्रयत्न केला की, निश्चितच आनंद उपभोगता येईल.
मात्र, तसे जगायला गेलो तर ‘परोपकारा’चे काय? हा प्रश्न निर्माण होतो. एखादा छंद जोपासताना जर नाव होणार असेल किंवा प्रसिद्धी मिळणार असेल, तर ‘प्रसिद्धिपराङ्मुख’तेचे काय, हा प्रश्न निर्माण होतो. घरी आजी, आजोबा जेव्हा तीर्थाटन किंवा भजन-कीर्तनात रमायचा प्रयत्न करतात तेव्हा ‘सूनबाई आणि नातवंडं काय म्हणतील,’ असा प्रश्न मनात येतो. चांगले कपडे घालायची इच्छा झाली, तर ‘विरक्ती’चे काय, हा प्रश्न निर्माण होतो. जीवनसाथी अर्ध्यातच डाव सोडून गेला, तर परत दुसरा जोडीदार घेतला तर समाज काय म्हणेल, मुलं काय म्हणतील, असे अनेक प्रश्न आपल्याला भेडसावतात. आपण द्वंद्वामध्येच आयुष्य व्यतीत करतो आणि मानसिक रीत्या कमकुवत होतो. प्रत्येकाने कोणत्याही स्थितीत, वयात योग्य व्यक्तीचा सल्ला घेतला, तर त्याला नक्कीच फायदा होत असतो. अशी अनेक उदाहरणे आहेत. जसे, मोरारजी देसाई, ज्योती बसू किंवा हयात असलेले नागपूरचेच मा. गो. वैद्य किंवा सहस्रभोजनी यांनी वयाची नव्वदी पार केली. हे किती कठीण काम आहे, हे आपण सर्वच जाणतो. या सर्वांमधील एक समान धागा काय, तर आयुष्य हे जगण्यासाठीच असते, आयुष्यात जगण्यासाठी स्वत:च स्वत:ला घालून दिलेल्या मर्यादा, साधी राहणी, मी म्हणजेच समाज, त्यामुळे समाजास काय वाटते, यापेक्षा मला योग्य वाटते काय, याचा विचार करणे.
मोरारजी देसार्ईंचा एक किस्सा आहे. ते पत्रकाराला मुलाखत देत असताना त्यांचा नातू दुडुदुडु धावत त्यांच्याकडे आला. अशा स्थितीत बहुतांश आजोबांनी काय केले असते, तर त्या नातवाकडे लक्ष देऊन, आपण किती चांगले आजोबा आहोत, हे दर्शविण्याचा प्रयत्न केला असता. मात्र, मोरारजीभार्ईंनी काय केले, तर ते नातवावर सरळ खेकसले आणि त्याला पिटाळून लावले. त्यावर साहजिकच त्या पत्रकाराने विचारले की, आपण पंतप्रधानपदावर असताना असे वागणे कितपत योग्य आहे? त्यावर मोरारजीभाई शांतपणे म्हणाले, मी तसे वागलो नसतो आणि चांगुलपणाचा आव आणला असता, तर माझे मन सतत द्वंद्वात असते, मला त्रास झाला असता, मला माझी मुलाखत व्यवस्थित देता आली नसती. मात्र, त्याच्या उलट, माझ्या मनाला जे वाटले तसे वागल्याने मला त्रास झाला नाही. झाला असेल तर माझ्या नातवाला!
तुम्ही जेव्हा, आहे त्या गोष्टीत आनंद मानता तेव्हा खरा आनंद तुमचा पाठलाग करतो. ‘कोण काय म्हणेल,’ याचा विचार न करता ‘मला काय वाटते,’ असाही विचार करून जगायला शिकले, तर आयुष्य सुलभ होऊ शकते. राहिला प्रश्न वर उल्लेख केलेल्या दाम्पत्याच्या आत्महत्येेचा. आपण, आपला मुलगा म्हणजे आपलीच मालमत्ता आणि त्यावर आपलेच सर्व अधिकार चालावे, असे आग्रही असतो. त्यापेक्षा एक ऋणानुबंध म्हणून तो आपल्या घरात जन्माला आला, आपले संचित कर्तव्य म्हणून त्याला मोठे करणे आणि ते करताना त्यालादेखील स्वत:चे मन, मेंदू, आशा-आकांक्षा असतात, तोदेखील त्याचे निर्णय घेऊ शकतो, ही वस्तुस्थिती मानली, तर समस्या उद्भवणार नाही. एका छोट्या उदाहरणावरून लक्षात येईल की, घरोघरी दु:खाचे कारण काय?
माझा एक मित्र आहे. तीन बहिणींच्या पाठीवर त्याचा जन्म झाला. मुलगा म्हणून अतोनात कौतुक, लाड आणि प्रेम. त्याने डॉक्टर मुलीशी लग्न केले. त्याला आम्ही मित्र भेटायला गेलो. घरातील सर्व मंडळी एकत्र बसली होती. अचानक त्यांच्या शेजारील काकू आल्या आणि नुकतेच लग्न झालेल्या मित्राला म्हणाल्या, ‘‘पप्पू, आता लवकरच गोड बातमीपण दे!’’ त्यावर पप्पूचे पप्पा तत्परतेने उत्तरले, ‘‘अजून तीन वर्षे नाही!’’ आम्ही सर्वच विस्मित झालो…