दोन ओंडक्यांची…

21 Nov 2014 15:11:13
 
चार दिवसांपूर्वी बाळासाहेब ठाकरेंची द्वितीय पुण्यतिथी पार पडली. दोन वर्षं कशी निघून गेली, ते कळलेेदेखील नाही. किंबहुना, आजही बाळासाहेब हयात नाहीत, यावर विश्वासच बसत नाही. ते केवळ एक व्यक्ती नव्हते, तर विचार, झंझावात आणि स्वत:च एक संस्था होते. व्यंग्यचित्रकार म्हणून कारकीर्द सुरू करणारे बाळासाहेब, बघता बघता समाजसेवेत इतके रममाण झाले की, पुढे महाराष्ट्राच्या राजकारणात एक दबदबा निर्माण करण्याइतपत ताकद त्यांनी उभी केली. ‘कुछ बनने का सपना मत देखो, कुछ करनेका सपना देखो,’ हा विचार जरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आता मांडला असला, तरी तो विचार बाळासाहेब प्रत्यक्ष जगले. साधी नगरपालिकेची निवडणूक स्वत: न लढविता, आपल्या स्वत:च्या पक्षाच्या कार्यकर्त्याला, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री करणारे केवळ बाळासाहेबच होऊ शकतात! त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी शिवाजी पार्कवरील त्यांच्या स्मृतिस्थळी सर्व पक्षाच्या पुढार्‍यांनी आदरांजली वाहिली. त्यात उद्धव व राज ठाकरे एकत्र बसलेले आहेत, असे चित्र दूरचित्रवाहिन्यांवर सर्वांनीच पाहिले.
 
ते दृश्य पाहिल्याबरोबर सर्वच प्रसारमाध्यमांनी, दोघांच्या देहबोलीवरून काय अर्थ निघतो, याबद्दल चर्चा सुरू केली. खरेतर राज आणि उद्धव, सख्खे चुलत आणि सख्खे मावस भाऊ आहेत. त्यांना नातेसंबंध जपण्याचा पूर्ण अधिकार आहे, तो पूर्णत: वैयक्तिक आहे. तरीही दूरचित्रवाणी या माध्यमातून ‘मराठी माणूस’ आणि त्याचे हित यावर चर्चा झडायला सुरुवात झाली. खरोखरच काय प्रकार आहे ‘मराठी माणूस?’ आतातर हिंदी वाहिन्यादेखील ‘मराठी मानूस’ असला शब्दप्रयोग करतात. शिवसेना जन्माला यायच्या आधी काय मराठी माणूस नव्हता, की तो जगू शकण्याच्या लायकीचाच नव्हता? शिवसेनेने आणि नंतर सोबत मनसेने, आम्हीच मराठी माणसाचे तारणहार आहोत, असा आभास निर्माण केला. त्यांच्यामार्फत मराठी माणूस म्हणजे गिरणीत काम करणारा, वडापावची गाडी चालविणारा इतकाच काय तो मर्यादित समाज रंगविण्यात आला. बुद्धिवादी, प्रगत, उद्योजक असा वर्ग ‘मराठी माणूस’ या व्याख्येत बसत नव्हता. या सर्वांचा तारणहार म्हणजे शिवसेनाच, बाकी सर्व पक्ष मराठीविरोधी किंवा उत्तर भारतीयांचे लांगूलचालन करणारे! मूळ प्रश्‍न आहे की, मराठीचा मुद्दा जर सर्वतोपरी होता, तर मग कोणत्या मुद्यावरून ठाकरे कुटुंबात भाऊबंदकी झाली आणि आता अशी कोणती परिस्थिती मराठी माणसावर उद्‌भवली की, ज्यामुळे ठाकरे कुटुंब परत एकत्र येणे मराठी जनांच्या हिताचे आहे असे वाटते.
 
खरे तर बाळासाहेबांचा वारसा कोण चालविणार, हाच मुख्य प्रश्‍न होता आणि त्यातून विभागणी झाली. राजकारणात नातेसंबंधांपेक्षा संधी-सिद्धतेला जास्त महत्त्व असते. म्हणूनच, दोन भाऊ काय किंवा दोन पक्ष काय, यात छोटा आणि मोठा भाऊ असा दावा करणे हेच विरोधाभासी लक्षण आहे. अन्यथा २००९ च्या विधानसभा निवडणुकांमध्ये मराठी मतांची विभागणी मनसेने केलीच नसती आणि महाराष्ट्राला पुढील पाच वर्षांत आघाडी सरकारद्वारे खड्ड्यात टाकण्याचा प्रयोग सफल झालाच नसता. आता शिवसेनेला चुकीच्या व्यूहरचनेमुळे सर्व असूनही उपभोगता येत नाही, तर मनसेला सर्वच गमावल्यामुळे भोगावे लागत आहे. या दयनीय स्थितीला तोंड देण्याची बाळासाहेबांसारखी इच्छाशक्ती आणि ताकद उद्धव व राज दोघांमध्येही दिसत नाही. शिवसेना आणि मनसे आता दोघेही स्वतंत्र पक्ष आहेत आणि दोघांनाही पक्षप्रमुख म्हणून काम करायची सवय जडली आहे. त्यामुळे दुय्यम भूमिका कोण स्वीकारणार, हा मोठाच प्रश्‍न आहे. त्यामुळे ते एकत्र येणे अशक्यच आहे आणि आलेतरी एकत्र किती दिवस नांदू शकतील, हा मोठाच प्रश्‍न आहे.
दोघांनाही आता पक्ष वाढवायचा असल्यास मराठीच्या मुद्यावरून जरा वर यायलाच हवे. कारण मराठीचा मुद्दा हा मुंबई आणि कोकणपुरता मर्यादित आहे आणि तो संपूर्ण महाराष्ट्राला लागू होत नाही. आज अकरा कोटी लोकसंख्येपैकी तीन कोटींच्या घरात अमराठी लोक राहत आहेत. दुसरे, भाजपा आणि कॉंग्रेस हे राष्ट्रीय पक्ष काय मराठी लोकांच्या विरुद्ध आहेत, असे म्हणता येईल का? या पक्षाला भूतकाळात आणि आता वर्तमानकाळात राज्याच्या जनेतेने निवडून दिले आहे, त्यात काय मराठी मतदार नव्हते का? कोणत्याही राजकीय पक्षाला वाढायचे असल्यास त्यांचा विचार हा सर्वसमावेशकच असायला हवा. सर्वसमावेशक मुद्दा कोणता असू शकतो, तर तो राष्ट्रहिताचाच! राष्ट्रहिताचे बाळकडू ज्याला लाभले तेच केवळ समाजहिताचा विचार कृतीतून दर्शवू शकतात. जे नेहरूंनी केले, वाजपेयींनी केले किंवा आज जे मोदी करीत आहेत- त्यांनाच उज्वल भविष्यकाळ राहणार आहे.आज मोदी का यशस्वी होत आहेत, तर गुजरातचे मुख्यमंत्री असताना ६ कोटी गुजरातची जनता आणि पंतप्रधान झाल्यावर १२० कोटी जनता यांच्या कल्याणाचाच ते विचार करतात. अनेक दशकांनंतर देशाला मोदींच्या रूपाने एक नेतृत्व लाभले आहे. ज्यांच्याबद्दल जगभरात जबरदस्त कुतूहल आहे. ते ज्या ज्या देशात जात आहेत तेथे, तेथील स्थानिक नेत्यांपेक्षापण जास्त गर्दी खेचत आहेत. पुढील किमान १०-१५ वर्षेतरी मोदींच्या नेतृत्वात भाजपाचे वर्चस्व देशभर दिसणार आहे. त्यांची गुजरातची आणि आता दिल्लीतील कार्यशैली लक्षात घेता, त्यांचा मित्रपक्ष वगैरे कल्पनेवर फार विश्वास दिसत नाही. विकास करायचा असल्यास एकहातीच सत्ता आवश्यक आहे, असे त्यांचे मत असावेे आणि त्यांनी ते प्रत्यक्षपणे दिल्लीत करवून दाखविले, जे अत्यंत कल्पनातीत होते. त्यामुळे महाराष्ट्रात शिवसेनेला आता अस्तित्वाची लढाई लढायची आहे. त्यात त्यांनी विधानसभा निवडणुकांच्या दरम्यान भाजपावर, दिल्लीतील नेतृत्वावर अफजलखानाची उपमा देऊन आणि नंतर त्यांच्या मुखपत्रातून मोदींच्या पिताश्रींपर्यंत जे अनुदार उद्गार काढले, त्या सर्वांची त्यांना जबर किंमत चुकवावी लागत आहे, किंबहुना अजूनही पुढे चुकवावी लागेल, असेच मोदींच्या कार्यशैलीवरून आणि कर्तृत्वावरून दिसते.
 
सध्याची शिवसेनेची स्थिती फारच केविलवाणी झाली आहे. नेत्यांच्या देहबोलीवरून ते दिशाहीन झाल्यासारखे वाटत आहेत. केवळ अट्टहासामुळे प्रारंभीच घेतलेला चुकीचा निर्णय बदलवून योग्य ते मार्गक्रमण त्यांना करता आले असते. मात्र, कळत असूनदेखील चुकांवर चुका असा सततचा प्रवास त्यांचा सुरू आहे. ज्याला व्यवहारशास्त्र कळत नाही, तोच नीतिशास्त्राच्या आणि अस्मितेच्या मुद्यावर रममाण होत असतो. शरद पवारांना कुणी काही म्हटले, तरी ते एक सफल राजकारणी का आहेत, ते समजून घेणे आवश्यक आहे. त्यांना पूर्णपणे जाण आहे की, पत्त्यांच्या डावामध्ये नेहमीच सारखेच किंवा चांगलेच पत्ते आपल्या नशिबी येत नसतात. मात्र, नशिबी आलेल्या पत्त्यांपैकी कोणता पत्ता केव्हा टाकायचा हे कौशल्य त्यांच्यापेक्षा जास्त कुणाजवळ आहे? भाजपाकडे सर्व एक्के असताना, शिवसेनेजवळ चांगले पत्ते असताना पवारांनी आपल्याजवळची दुर्री-तिर्री अशी टाकली की, पत्त्यांचा डावच बदलून गेला! तिसर्‍या क्रमांकावरून ते थेट चर्चेच्या माध्यमातून प्रथम क्रमांकावर आले!! राजकारणात व्यवहारीपणा आणि लवचीकता आवश्यक आहे. त्याचप्रमाणे देवंेंद्र फडणवीसांनीदेखील विश्वासमत प्राप्त करताना जे ‘फ्लोअर मॅनेजमेंट’ केले त्याला तोड नाही. त्यांनीदेखील आपल्या पक्षाच्या मर्यादा लक्षात घेऊन व्यवस्थित चाल खेळली. त्यात काही दिवस गदारोळ होणार होता. मात्र, तो लवकरच शमणार हे त्यांना माहितच होते.सत्ता प्राप्त करण्यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करणे वेगळे आणि सत्ता चालविताना लागणारे चातुर्य वेगळे. ती शिवसेनेची स्ट्रेन्थ कधीच होऊ शकत नाही, म्हणून तर विश्वासमत ठरावाच्या दिवशी त्यांना, काय झाले, हे कळायला बराच वेळ लागला. राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवारांच्या भाषेत सांगायचे, तर स्टेशनवर पोहोचायला वेळ लागल्यास गाडी थोडी पकडता येते. मग ‘माझ्याजवळ कन्फर्मड तिकीट आहे’ म्हणून कांगावा करण्यात काहीच अर्थ उरत नाही.
 
थोडक्यात काय, तर महाराष्ट्रातील राजकीय पटलावर अनेक बदल घडणार आहेत. त्यात राज आणि उद्धव एकत्र आलेच, तर ते केवळ भाऊ आहेत म्हणून नाही, तर ती एक राजकीय अपरिहार्यता किंवा अस्तित्वासाठी येऊ शकतात. त्यासाठी ‘मराठी माणूस’ या संकल्पनेचा आधार घेतला जाईल. जसे, बिहारमध्ये लालूप्रसाद आणि नितीशकुमारांना एकत्र यावे असे वाटते, त्याच धर्तीवर हे होईल. मात्र, ते होण्याआधी तू मोठा की मी मोठा, हाच मुद्दा चर्चिला जाणार आहे. कारण एकीकडे ‘कृष्ण(कुंज)’ आहे, मात्र सेना मर्यादित आहे, तर दुसरीकडे ‘मातोश्री’ची अमाप सेना, परंतु कृष्ण नाही, अशी ती असमतोल परिस्थिती…!
Powered By Sangraha 9.0