निकालावर बोलू काही…

20 Jun 2014 17:29:49
 
परवाच राज्याचा दहावीच्या परीक्षेचा निकाल लागला. यावर्षी तो प्रथमच ८८ टक्के लागला. म्हणजेच १५.५० लाखांपैकी १३.७० लाख विद्यार्थी उत्तीर्ण झाले. शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डांनी यानिमित्ताने आनंद व्यक्त करणे स्वाभाविकच आहे. महाराष्ट्रात आघाडीच्या सरकारमधील सर्वच मंत्री कामगिरीत माघारत असताना, एकमेव मंत्र्याने आपली पाठ का म्हणून थोपटवून घेऊ नये? मंत्रिमहोदय म्हणतात, महाराष्ट्र आता कॉपीमुक्त झाल्यामुळे असे घडले. खरे तर कॉपी बंद झाली तर उत्तीर्ण होणार्‍यांचा टक्का घसरायला पाहिजे, मात्र तो तर घवघवीतपणे वधारला म्हणून त्याची कारणे शोधणे गरजेचे आहे.
 
खरेतर विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेचे रोलनंबर आणि संगणकाद्वारे दिलेला बार कोड हे जुळत नसल्याने शिक्षण विभागाची भंबेरी उडाली होती. निकाल घोषित करण्यासाठी विलंब होत होता. त्यामुळे दबावात येऊन शिक्षण विभागाची यंत्रणा कामाला लागली होती. दबावात अजून चुकांना वाव होता. ते लपवण्यासाठी कदाचित असा एक उपाय केला गेला असावा, की सर्वच विद्यार्थ्यांना घवघवीत गुण देऊन कुणाचीही तक्रार येणार नाही. दुसरे म्हणजे ‘बेस्ट ऑफ फाईव्ह’ या नियमाप्रमाणे ज्या विषयात सर्वांत कमी मार्क आहेत तो विषय गुणांची टक्केवारी काढताना विचारात घेतला नाही. तिसरे कारण म्हणजे २०% मार्क शाळांच्या हातात दिले गेले. यंदा प्रथमच सर्वच विद्यार्थ्यांच्या चेहर्‍यावर आनंद ओसंडताना दिसत आहे आणि तक्रारी जवळजवळ नगण्य. यामुळे अशी शंका घेण्यास वाव आहे. चौथा मुद्दा असा की, परीक्षा केंद्रावरील कॉपींना कदाचित आळा बसला असेल, मात्र उत्तरपत्रिका तपासनिसास गाठून किंवा मार्कलिस्टमध्ये फेरफार करून घोटाळा थांबला, हे कसे काय म्हणणार? असो.
 
तरीही वर्षभर मेहनत करणार्‍या विद्यार्थ्यांचे श्रेय हिरावता येणार नाही. सर्व विद्यार्थ्यांचे हादिर्ंक अभिनंदन करावयास पाहिजे. आता त्यांची पुढील वाटचालीसाठीची लगबग सुरू झाली आहे. प्रवेशासाठी फॉर्मस् गोळा करणे आणि चांगल्या कॉलेजेसमध्ये प्रवेश मिळविणे. हे करताना विज्ञान की वाणिज्य, वाणिज्य की कला याविषयीदेखील संभ्रम मनात चालू असेल. कधी पाल्य बरोबर विचार करतो आणि पालक संभ्रमात असतात, तर कधी पालक बरोबर विचार करतात आणि पाल्य संभ्रमात असतो. गर्दीच्या मानसिकतेप्रमाणे पळापळ पाहायला मिळते आहे.
 
निकाल घोषित होईपर्यंत असे वाटते की, बघू या कसा निकाल लागतो, मग ठरवू या. मात्र, निकाल लागल्यावर सर्व प्रक्रिया पूर्ण करायला वेळ फारच कमी असल्याने विचारपूर्वक निर्णय घेता येत नाही. त्यात आवश्यकतेपेक्षा किंचित कमी टक्के पडले की, मग कुंपणावरची मानसिकता तयार होते. विचार इथपर्यंत जातात की, विज्ञान घ्यायचे की कला/वाणिज्य. मग शेजारचा काय करतो आहे, ती री ओढली जाते. पाल्य आपल्या मित्र-मैत्रिणींच्या कळपात वावरत असतो, त्यामुळे घरातील वातावरण तणावाचे असते. खरेतर दहावीच्या पाल्यांना आणि बरेचदा त्यांच्या पालकांना, पुढे काय करावे हे कळतच नसते. कळले तरी आपल्या मर्यादा आणि पाल्यांची कुवत हेदेखील डोळसपणे तपासता येत नाही. मग केवळ अट्टहास म्हणून निर्णय घेतला जातो आणि ताणतणावात आयुष्य जगावे लागते.
 
आवश्यकता आहे की, अभ्यासक्रमामध्ये एक असा विषय आणण्याची, ज्याद्वारे विद्यार्थ्यांना पुढे जाऊन काय काय कोर्सेस असतात, त्याला लागणारी पात्रता काय, खर्च किती, त्याच्यासाठी कॉलेजेसची माहिती, शिक्षणानंतर नोकरी कशा प्रकारची मिळू शकेल वा व्यवसाय करायचा असल्यास कोणते शिक्षण घेणे आवश्यक आहे इत्यादी… माझा एक अत्यंत हुशार मित्र पुढे जाऊन सीए झाला. तो म्हणाला की, त्याने ड्रायव्हिंग लायसेन्ससाठी क्लास लावला. मात्र, त्या क्लासचा शिक्षक शिकविताना फार घाणेरड्या शिव्या देतो. शिव्या का देतो, तर शिकायला येणार्‍या सर्वच प्रशिक्षणार्थींना तशीच भाषा कळते म्हणून! नंतर बोलण्याच्या ओघात लक्षात आले की, माझ्या मित्राने ऑटोरिक्षा चालविण्याचा क्लास लावला! मी विचारणा केल्यावर तो म्हणाला की, ‘‘माझ्याजवळ दुचाकीचे लायसेन्स आहे आणि चारचाकीचे लायसेन्स काढायच्या आधी तीनचाकीचे लायसेन्स काढायला नको का?’’ मी चाटच पडलो. आवश्यकता आहे माणसे घडविण्याची, केवळ परीक्षा पास करणार्‍यांची नाही!
 
विद्यार्थी परीक्षांमध्ये घवघवीत यश मिळवून उत्तीर्ण होत आहेत. सरकार चांगले विद्यार्थी घडविण्यात अनुत्तीर्ण होत आहे. शिक्षण घेणे, पदवी प्राप्त करणे म्हणजे पोपटपंची असे समीकरण झाले आहे. विद्यार्थी सुशिक्षित होत आहेत, मात्र सुसंस्कृत होत आहेत काय? सुसंस्कृत होण्यासाठी शिक्षित असणे आवश्यक नाही. बहिणाबाई चौधरी किंवा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे शिक्षण काय होते? तरीही कुठूनतरी त्यांच्यातील ज्ञानगंगा प्रवाहित होत होती… आजही खेड्यापाड्यातील अनुभवी व्यक्ती आपल्या बोलण्यातून किंवा आचरणातून असे काही वागून जाते की, ते ज्ञान पुस्तकातदेखील शोधून सापडत नाही! आपण रस्त्याने जाता-येता अनेक उच्चविद्याविभूषित, पान आणि खर्रा खाऊन चालत्या गाडीवर किंवा सार्वजनिक ठिकाणी घाण करण्यात, सिग्नल तोडण्यात, रांग मोडण्यात मर्दानकी मानतात.
 
सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांना खरे तर प्रबोधन करण्याची ही वेळ नाही. मात्र, एक लक्षात घेतले पाहिजे की, दहावीची परीक्षा ही आयुष्यातील सर्वांत सोपी अशी शेवटची परीक्षा आहे. ज्यामध्ये तुम्ही टक्के मिळविण्याची तहान भागवू शकता. मात्र, चांगले गुण मिळविले म्हणजे सर्व सोपे आणि सुरळीत समजू नका. कुणाला कमी गुण मिळाले असल्यास त्यांनीपण हिरमुसून जाण्याची आवश्यकता नाही. कारण ही परीक्षा म्हणजे आयुष्याची परीक्षा, असे अजीबात नसते. मात्र, या परीक्षेनंतर तुमच्या जीवनाला एक दिशा मिळणार असते आणि त्या दिशेने गांभीर्याने प्रवास केल्यास आयुष्याला कलाटणी मिळणार असते. हे करताना सर्वप्रथम एक बाब लक्षात घ्या की, आपले आणि आपल्या आईवडिलांचे आयुष्य उगाचच तणावात टाकू नका. आपली स्वत:ची आवड जोपासत असतानाच, आपली कुवत आणि आईवडिलांची आर्थिक मर्यादा याकडेही लक्ष द्या. तसे न केल्यास तुमचे आईबाबा तुम्हाला दुखवू नये या प्रेमापोटी पैशाची जुळवाजुळव करतीलही. त्यासाठी त्यांना अनेक तडजोडी कराव्या लागतील. पालकांनीदेखील पाल्यास हमखास सांगण्यास हरकत नाही की, बाबा रे, हे आपल्या आवाक्यातील नाही. आपण बाजारात गेल्यावर, एखादी गोष्ट कितीही आवडली तरीही शेवटी आपल्या बजेटमधीलच घेतो ना?
 
पाल्य आणि पालक दोघांनाही हे समजून घेणे आवश्यक आहे की, आपल्या मर्यादित संसाधनांमध्येदेखील आपण प्राप्त परिस्थितीत एखादा कोर्स प्रामाणिकपणे केला, तर यश हमखास असतेच. डॉक्टर-इंजिनीअर व्हायचे म्हणजे विज्ञान शाखा घेणे किंवा सीए/सीएस व्हायचे म्हणजे वाणिज्य शाखा घेणे इतपर्यंतच आपणास माहिती असते. सर्वच जण इंजिनीअर किंवा डॉक्टर होण्याचा प्रयत्न करतात. मात्र, सर्वच जण सारखेच दिवे लावतात का? का म्हणून उगाचच अट्टहास करून खाजगी कॉलेजेसमध्ये प्रवेश घेऊन ऐपत नसताना इंजिनिअरिंगच करायचे? वाणिज्य शाखा घेऊन सीए, सीएस, आयसीडब्ल्यूए, एमबीए, एलएलबी, एमपीएससी, युपीएससी, आयएएस या परीक्षा देता येतात. हे सर्व कोर्सेस तुलनेने स्वस्त असतात. आज आयएएस जर पाहिलेत तर एमबीबीएस, बीई झालेल्या विद्यार्थ्यांबरोबर बी.ए आणि बी.कॉम. विद्यार्थीपण पास होतात आणि खांद्याला खांदा लावून तेच काम करतात. व्यवसाय करायचा म्हटले की, त्यास विशेष एका पदवीची आवश्यकता नसते. जसे एखादी फॅक्टरी टाकायची म्हटली की, कोणतीही व्यक्ती कोणतीही पदवी घेऊन व्यवसाय करूच शकते ना? राजकारणात किंवा सिनेमाक्षेत्रात, क्रीडाक्षेत्रात किंवा कलाक्षेत्रात अमुकच पदवी पाहिजे, हे आवश्यक आहे का? थोडक्यात काय, तर यशस्वी होण्यासाठी कोणतीही एक पदवी घेणे पर्याप्त आहे. नंतर आवश्यकता असते कष्टाची, प्रामाणिकपणाची, चंटपणाची, सतत ज्ञानार्जन करणार्‍या वृत्तीची. पदवी घेणे म्हणजे लर्निंग लायन्सेस मिळवणे. नंतर मात्र रस्त्यावर गाडी चालविताना सर्वच गोष्टी कशा वेगळ्या भासतात? त्या समजून, त्यानुसार जो गाडी चालवू शकतो, तो आयुष्याच्या प्रवासातदेखील यशस्वी होतो…!
Powered By Sangraha 9.0