नारायणाचा झाला नर!

25 Jul 2014 17:05:17
 

राजकारणात व्यक्तीच्या करिष्म्यानेच पक्षाला फायदा होतो. मात्र, त्या व्यक्तीच्या डोक्यात हवा गेल्याने तो होत्याचा नव्हता होतो. अशात अटलबिहारी वाजपेयींसारखे व्यक्तिमत्त्व विरळेच म्हणायला हवे.
‘व्यक्तीपेक्षा समाज, समाजापेक्षा राज्य अन् राज्यापेक्षा देश मोठा,’ अशा प्रकारचे विचार ऐकायला आणि वाचायला नेहमीच छान वाटतात. अशा विचारांनी हजारो-लाखो लोक भारावून आपले जीवन पणाला लावतात. अशा विचारांच्या अनेक संस्था कार्यरत असल्याचे आपण अनुभवतो. याच धर्तीवर राजकीय पक्षदेखील एक संस्था म्हणून चालणे अपेक्षित आहे. व्यक्तिनिष्ठ पक्ष आज राज्याराज्यांत फोफावत आहेत. व्यक्ती संपली की पक्षपण संपणार, अशी आपण अटकळ बांधतो. मात्र, या नियमाला अपवाद आहे- राजकीय पक्षांचा!
 
राजकीय पक्षांचा मूळ उद्देशच मुळी सत्ता हस्तगत करणे, हा असतो. ती मिळविण्यासाठी अनेक आराखडे बांधले जातात, बोली लावली जाते. जसे घोडेस्वारीमध्ये ‘जॉकी’वर बोली लावली जाते तसेच राजकारणात व्यक्ती म्हणून एका नेत्यावर बोली लावली जाते. त्यामुळे देशातील राज्याराज्यांमधून, समाजामधून व्यक्तीचा शोध घेतला जातो. व्यक्तीच्या करिष्म्याचा फायदा घेऊन निवडणुका लढविल्या जातात. निवडणुका जिंकल्या म्हणजे, ‘मी होतो म्हणूनच पक्ष जिंकला,’ अशी भावना स्वाभाविकपणे निर्माण होते. समाजकार्यातून निर्माण झालेले गुडवील आणि पकड, सत्ताप्राप्तीनंतर, आप्तेष्टांकडे नकळत वळवली जाते. उद्दिष्ट प्राप्त करायचे असल्यास समाजाचा शिडी म्हणून वापर केला जातो आणि ती प्राप्त झाली की, त्याचा लाभ भाई-भतिजारूपी ‘सापा’ला मिळतो! मग समाज पाठ फिरवितो आणि नेत्याची चिडचिड सुरू होते अन् विवेक गमावला जातो.
 
महाराष्ट्रात युतीचे शासन असताना नारायण राणे- एक ‘दबंग’ व्यक्तिमत्त्व- शिवसेनेकडे होते. मजबूत संघटनकौशल्य, निर्भीडपणा, कामात वाघ असलेला नेता. म्हणूनच परत निवडणुका जिंकाव्या म्हणून शेवटी त्यांना मुख्यमंत्रिपद देण्यात आले होते. त्या नेत्याचेदेखील असेच झाले. महत्त्वाकांक्षा वाढली, की विवेक हरवतो आणि मग पाय घोळात (खोलात) शिरत जातो. बाळासाहेब ठाकरेंच्या हयातीत नारायण राणेंनी शिवसेना सोडली. सबब काय, तर नेतृत्वाचा उत्तराधिकारी कोण? महाभारतापासून आजतागायत आपण अनेक घटनांवरून काही बोधच घेत नाही. बाळासाहेबांनंतर उद्धव असताना नारायण राणेंनी म्हणा किंवा राज ठाकरेंनी म्हणा, तशी अपेक्षा करणे म्हणजे महाभारतास खोटे ठरविणे, असेच म्हणावे लागेल! राणेंनी आपल्या ताकदीचा उपयोग करून एक एक म्होरक्या सेनेतून बाहेर काढून कॉंग्रेसच्या तिकिटावर निवडून आणला. एकदम कुस्तीपटू ‘खली’च्या आवेशात राणे वावरत होते! कॉंग्रेसने त्यांना सहा महिन्यांत मुखमंत्री करतो म्हणून आश्‍वासन दिले. आज नऊ वर्षांनंतरदेखील हे आश्‍वासन पाळले गेले नाही. तसे जर झाले असते, तर कॉंग्रेसला आपले नाव बदलावे लागले असते! तरीपण राणेंना आशा आहेच. ज्या कारणास्तव राणेंनी शिवसेना सोडली, त्याच कारणामुळे त्यांचा ‘राजकीय बळी’ जात आहे. घराणेशाहीविरोधी भांडले, मात्र आपली सत्ता आपल्या मुलांच्या प्रेमापोटी दावणीस बांधली.
 
भारतीय राजकारणाच्या सारिपाटावर अशा अनेक ‘राणे’रूपी सोंगट्या आपापले योगदान देऊन गेल्या, देत आहेत आणि देतील… नागपुरातील ज्येष्ठ कॉंग्रेसी नेते- अगदी प्रदेशाध्यक्ष राहिलेले नेते रणजीत देशमुख- निवडणुकीत यश मिळाल्याबरोबर, ‘माझ्यामुळेच यश मिळाले. आता मी म्हणजेच पक्ष!’ असे समजत. पण, हायकमांडने योग्य वेळी आपली ताकद दाखविली. आज पक्षात स्थान नाही म्हणून पुढल्या पिढीसाठी इतर पक्षांच्या दरवाजात आलेले आहेत. पुन्हा इथे ‘परिवारवादाचा विरोध’ करणारे ‘परिवाराच्या भविष्या’साठी झगडत आहेत!
 
गुजरातचे शंकरसिंग वाघेला असेच एक ‘दबंग’ व्यक्तिमत्त्व. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे म्हणून वाढलेले आणि पुढे भारतीय जनता पक्षात चांगले काम केलेले हे नेते. महत्त्वाकांक्षी आणि आग्रही असल्यामुळे गुजरातमध्ये भाजपाच्या यशाच्या दृष्टीने मोठा बदल घडवून आणला. कॉंग्रेसकडून सत्ता हस्तगत करण्यात त्यांचा मोठा वाटा होता. त्याचेच फळ म्हणून भाजपाने त्यांना गुजरातचे मुख्यमंत्री केले. यशाची नशा काही औरच असते. ती व्यक्तीला अजून स्वनिष्ठ बनवते. तसेच वाघेलांचे झाले. त्यांना पक्ष छोटा वाटायला लागला. पक्षनेतृत्वाने घेतलेले निर्णय त्यांना आवडेनासे झाले. त्यामुळे त्यांनी १९९८ मध्ये पक्ष सोडला. कॉंग्रेसला त्या वेळी गुजरातमध्ये सशक्त नेत्याची गरज होती, त्यामुळे तेथे त्यांचे स्वागतच झाले. लोकसभेत त्यांनी कॉंग्रेसचे प्रतिनिधित्व केले. परंतु, आज पक्षाला यश न मिळाल्यामुळे कॉंग्रेसमध्येही त्यांची स्थिती केविलवाणी झाली आहे.
 
रामजन्मभूमी-मुक्तीच्या निमित्ताने देशात एक उत्साह भरलेला होता. त्याच काळात मुलायम सरकारने कारसेवकांवर केलेल्या अत्याचाराचा उद्रेक, यामुळे उत्तरप्रदेशात एक नेतृत्व ठळकपणे समोर आले, ते म्हणजे कल्याणसिंग! प्रखर हिंदुत्वाने भारलेले, सशक्त जनाधार प्राप्त असलेले आणि जहाल वक्तृत्वामुळे एके काळी देशवासीयांना मोहित केलेले व्यक्तिमत्त्व उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री होते. त्यांच्याच काळात तथाकथित बाबरी ढाचा पडला. त्या वेळी झालेल्या घटनाक्रमात उत्तरप्रदेश विधानसभा बरखास्त झ्राली. परंतु, कल्याणसिंग एक सबळ नेतृत्व म्हणून पुढे आले. त्यांनाही आत्मप्रौढीच्या ‘व्हायरस’ने ग्रासले! उत्तरप्रदेशात आपलेच नेतृत्व चालते, असा गैरसमज करून घेऊन, पक्षात योग्य स्थान न मिळाल्यामुळे त्यांनी भाजपाचा त्याग केला. स्वत:चा ‘राष्ट्रवादी जनक्रांती पक्ष’ काढला. केवळ लोधी समाजाची व्होटबँक हातात असल्यामुळे त्यांना यशाची खात्री होती. मात्र, उत्तरप्रदेशातील जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवून दिली. उत्तरप्रदेशाच्या पश्‍चिम क्षेत्रात त्यांना बर्‍यापैकी जनाधार आहे. परंतु, इतर कोणत्याही पक्षात त्यांना मित्र न मिळाल्यामुळे भाजपामध्ये त्यांचे येणे-जाणे चालले आहे.
 
दक्षिण भारतात भाजपाला प्रथम सत्ता मिळवून देणारे राज्य म्हणजे कर्नाटक! कर्नाटकात असलेल्या प्रचंड विरोधाला समर्थनात बदलवणारे अनेक जण असतील. परंतु, अगदी जनसंघापासून पक्षाची बांधणी करण्यात अग्रेसर असलेले येदियुरप्पांचे योगदान मोठे आहे. तेही ‘दबंग’ पंक्तीत येऊन बसले! अगदी सामान्य कुटुंबात वाढलेले येदियुरप्पा, १९७० पासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक होते. सरकारी कारकुनी सोडून त्यांनी स्थानिक राजकारणात भाग घेणे सुरू केले. शिकारीपुरा या छोट्याशा शहरातील पालिका निवडणुकीपासून राजकीय संघर्ष सुरू झाला. पुढे सहा वेळा आमदार, दोन वेळा मंत्री अन् पुढे मुख्यमंत्री, असा प्रवास त्यांनी केला. इथे त्यांनाही ‘ग’ची बाधा झाली! ‘दक्षिण भारतातील भाजपाचे यश म्हणजे माझेच यश आहे. त्यासाठी मी काहीही केले तरी पक्षाने त्याकडे दुर्लक्ष करावे. जे सर्व राजकारणी करतात ते मी केले तर काय झाले?’ अशी डोक्यात गेलेली नशा, प्रथम पार्टीने आणि नंतर जनतेने उतरवली! भाजपातून बाहेर पडल्यावर ‘कर्नाटक जनता पक्ष’ त्यांनी काढला. त्याच्या मर्यादित यशाने त्यांचे डोळे उघडले असावे. म्हणून त्यांनी भाजपात पुन्हा प्रवेश केला. पक्षाने त्यांना खासदार केले. भविष्यात त्यांचा ‘कल्याणसिंग’ होऊ नये!
 
रामजन्मभूमी-मुक्ती आंदोलनाची भाजपाला आणखी एक देण म्हणजे साध्वी उमा भारती! केवळ सहावीपर्यंत शिक्षण झालेली ही साध्वी, भल्याभल्या पंडितांना हरवेल! अगदी तारुण्यात भाजपाचे वरिष्ठ नेतृत्व मिळाले. खजुराहो या आपल्या क्षेत्रातून आणि पुढे भोपाळ येथून लोकसभेत प्रतिनिधित्व केले. महाराणी विजयाराजे शिंदे यांचे विशेष सान्निध्य लाभल्याने, पक्षात त्यांना महत्त्व होते. मध्यप्रदेशचे मुख्यमंत्रिपद त्यांना स्वकर्तृत्वाने मिळाले. दिग्वीजयसिंगसारख्या दिग्गज मुख्यमंत्र्याला त्यांनी लोळवले. मात्र, साध्वी असूनही क्रोधावर ताबा मिळविण्यात त्या यशस्वी झाल्या नाहीत! आज पक्षाने त्यांना पुन्हा मंत्रिपद देऊन, त्यांच्यावर मोठी जबाबदारी दिली आहे.
 
सारांश काय तर, राजकारणात व्यक्तीच्या करिष्म्यानेच पक्षाला फायदा होतो. मात्र, त्या व्यक्तीच्या डोक्यात हवा गेल्याने तो होत्याचा नव्हता होतो. अशात अटलबिहारी वाजपेयींसारखे व्यक्तिमत्त्व विरळेच म्हणायला हवे.
Powered By Sangraha 9.0