बेसुरी आनंद!

22 Aug 2014 11:44:06


 
समाजाचा एक घटक म्हणून प्रत्येकाने सामाजिक नियमांचे पालन करणे अपेक्षित असते. समाजात वावरताना कसे वागले पाहिजे, कसे बोलले पाहिजे याचे संकेत आहेत. अनेक वेळा इच्छा असो वा नसो, शिष्टाचार पाळावा लागतो. शिष्टाचाराचेही विविध प्रकार आहेत. सर्व शिष्टाचार पाळले जाणे, ही आदर्श जीवनशैली आहे. कुणालाही कुणापासून त्रास होऊ नये यासाठीच शिष्टाचार असतात. ते पाळले गेले नाही, तर सर्वांनाच अडचणींचा सामना करावा लागतो.
 
भारतीय संस्कृतीत सामाजिक संकेतांना पारंपरिक आणि धार्मिकतेची जोड होती. पाश्‍चात्त्यांसारखे वेगळे शिष्टाचाराचे नियम करण्याची गरजही नव्हती. प्रथम मुघलांनी आपली ‘तहजीब’ आणली. पुढे इंग्रजांनी त्यांच्या दृष्टिकोनात बसणारे ‘प्रोटोकॉल’ रुजवले. आता तंत्रज्ञानाच्या प्रगतीने सामाजिक संकेतांची परिभाषाही बदलली आहे.
 
नवनवीन यंत्रांनी आमच्या रोजच्या जीवनात प्रवेश केला आहे. कित्येक यंत्रं तर जीवनावश्यक बाबींमध्ये मोडतात. स्वयंपाकघरातील गॅसस्टोव्ह, तर इतर खोल्यांतील पंखे आणि इतर यंत्रे याशिवाय शहरातीलच काय, ग्रामीण जीवनही अशक्य झाले आहे. याच यंत्रांमध्ये टीव्ही या यंत्राने गेली तीन दशके गाजवली. सामाजिक परिवर्तनाच्या या काळात टीव्हीचा चांगला आणि वाईट परिणाम निश्‍चितच घडला आहे. गेले दशक मोबाईलने संवादाचे होते. जे काम टीव्हीने ३० वर्षांत केले ते मोबाईलने केवळ दहा वर्षांत केले. त्याहीपुढे जाऊन ‘स्मार्टफोन’ या यंत्राने तर शहरांमध्ये गेल्या चार वर्षांतच सामाजिक क्रांती आणली, असे म्हणावे लागेल.
 
मोबाईल संस्कृतीने आमच्या सर्वांच्या जीवनात मोठे बदल घडवून आणले. कुठलेही बदल हे चांगले अथवा वाईट ठरवण्यासाठी परिस्थिती जबाबदार असते. घरातून बाहेर गेलेला मुलगा वा मुलगी ईप्सित स्थळी पोहोचली की नाही, याची चिंता केवळ एका मिस्‌कॉलने मिटते. घरी येण्यास उशीर होत असलेल्या व्यक्तीशी ताबडतोब संपर्क होऊन चिंता मिटते. रस्त्याने एकटी चाललेली मुलगी मोबाईलवर पूर्ण वेळ संपर्कात असेल, तर आई-वडील निश्‍चिंत असतात. रिकामपणी कितीतरी संपर्क व्यवस्थित होऊ शकतात. मोबाईलचे असे एक ना शंभर फायदे आपण रोज घेत असतो. आपल्या जीवनात प्रवेश केलेली ही एक चांगली बाब असली, तरी त्याला दुसरी बाजूसुद्धा आहेच.
 
मोबाईलचे फायदे घेत असताना ते वापरण्याचे नियम अजूनही संदिग्ध आहेत. वागण्याचे जे नियम कालपरवापर्यंत होते ते या तांत्रिक यंत्रांनी बदललेले आहेत. परंतु, मूळ शिष्टाचाराची संकल्पना ज्याने अंगी बाणली आहे त्याच्यासाठी हे नियम अगदी साधे व सरळ आहेत.
 
मोबाईलची ट्युन किंवा रिंग ही तर सर्वांत मनोरंजक बाब आहे. प्रत्येक जण आपापल्या आवडीप्रमाणे रिंगटोन निवडतात. भक्तमंडळी एखादे भजन निवडतात- ‘काया ही पंढरी…’ वगैरे, तर तरुणाई एखादे रिदमवाले उडत्या चालीचे नवे गाणे पसंत करतात. सामान्यत: लोक जी मिळेल ती धून वापरतात. मात्र, दर्दी मंडळी ट्युन निवडीबाबत आग्रही असतात. गाण्याची रिंगटोन खूप आनंद देते. आवडीचे गाणे सातत्याने ऐकल्याने मनाला एक प्रकारची उभारी येते. परंतु, काही वेळेस नको तो प्रसंगही आणते. एका मरणासन्न रुग्णाला भेटण्यासाठी काही मंडळी जमली होती. जमलेले सर्वच चिंताग्रस्त होते. अचानक एकाच्या मोबाईलची ‘आज ब्ल्यू है पानी पानी…’ अशी ढिंच्याक रिंगटोन वाजली. प्रसंगाच्या गांभीर्याने सर्वच खजील झाले. त्या मोबाईलधारकाला काय वाटले हे कळले नाही, त्याने तो पटकन बंद करण्याचा प्रयत्न केला नाही. अशाच एखाद्या शोकमग्न प्रसंगांना किंवा स्मशानातील प्रसंगांकडे मागे वळून पाहताना गंमत वाटते. मात्र, जो त्या प्रसंगाचा प्रत्यक्ष साक्षीदार असतो त्याची काय अवस्था होते, हे तोच जाणे!
 
एकदा फॅमिली कोर्टाच्या परिसरात घटस्फोटासाठी अर्ज केलेले पती-पत्नी समोरासमोर येतात आणि नवर्‍याचा मोबाईल वाजतो- ‘‘हम तेरे बिन रह नही सकते, तेरे बिना क्या वजुद मेरा
|’ पत्नी त्याच्याकडे रागाने बघते, पती तोंड फिरवतो आणि सोबत असलेले शरमेने मान खाली घालतात. दुसर्‍या एका प्रसंगात नुकतेच लग्न झालेले एक जोडपे हनीमूनला गेले. लाडिक गप्पा ऐन रंगात आल्या असतानाच नवविवाहितेचा मोबाईल सूर काढतो ‘‘मैं तेरी दुष्मन, दुष्मन तु मेरा…’’. बरेचदा एखाद्या गाण्याचा रिंगटोन आवडला तर तो आपल्या मनात आणि सतत ओठावर आपण ते गुणगुणत असतो आणि त्याने आपल्या कामावरचा फोकस उडतो, चुका होतात, कामात विलंब होतो.
एकाच कारमध्ये प्रवास करताना जो गाडी चालवत होता त्याचा फोन वाजला. अशीच एक त्याच्या आवडीची ट्युन होती. मात्र, गाडी चालवत असल्यामुळे तो फोन घेऊ शकत नव्हता. पर्यायाने गाडीतील इतर कुणालाच न आवडणारे ते गाणे वारंवार ऐकावे लागत होते. असे कित्येक प्रसंग आपण अनुभवतो. पुरुषांना खिसा असतो अथवा मोबाईल पटकन काढता येतो, त्यामुळे अशा प्रसंगी ताबडतोब बंद करता येतो. स्त्रियांचे मोबाईल त्यांच्या पर्समध्ये असतात. त्या पर्सला पाच कप्पे, कोणत्या कप्प्यात ठेवले हे माहीत नाही, पर्सच्या सर्व चेन उघडून पाहिल्यावर वाजणारा फोन सापडतो. एवढ्या वेळात इतरांची मात्र परीक्षाच असते.
हल्ली कुठल्याही सामाजिक कार्यक्रमाच्या वेळी निवेदक प्रथमच फोन बंद करण्याची वा सायलेंट करण्याची सूचना देतो. अनेक महाभाग या सूचनेकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करतात. संभाजी राजांच्या जीवनावरील एका नाटकाचा प्रवेश चालू होता. डॉ. अमर कोल्हे संभाजीच्या भूमिकेत समरस होऊन गेले होते. उत्कट प्रसंगी समोरच्या दुसर्‍या की तिसर्‍या रांगेतील प्रेक्षकातून एक फोन वाजला आणि ती मोबाईलधारी व्यक्ती नाटकात इतकी रंगली की, त्यांना ऐकू आले की नाही माहीत नाही, मात्र त्यांनी फोन बंद केला नाही. डॉ. अमर यांनी चालू प्रसंगातून बाहेर येऊन त्या व्यक्तीला सुनावले. पण, ऐन रंगात आलेल्या प्रेक्षकांच्या मनात ती सल राहिली. कार्यक्रमांच्या मध्ये अशीच भयानक ट्युन वाजते. त्या व्यक्तीला फोन लवकर सापडतही नाही आणि कार्यक्रमाचा विचका होतो. आज मोबाईल आपल्या हाती येऊन दोन दशकं झाली, तरीही आम्ही या साध्या शिष्टाचाराचा पूर्णपणे अंगीकार करू शकलो नाही.
 
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा एक किस्सा आहे. त्यांनी गुजरातचे मुख्यमंत्री असताना, मुंबई भाजपाच्या कार्यकर्त्यांसमोर स्वत:चादेखील कार्यकर्ता म्हणून परिचय करून दिला. ते म्हणाले, ‘‘मी गुजरातचा मुख्यमंत्री नरेंद्र मोदी, माझा मोबाईल मी ऑफ केला आहे आणि तरीही माझे गुजरात राज्य व्यवस्थित चालणार आहे.’’ स्व. प्रमोद महाजन भाजपाचे नेते आणि केंद्रीय मंत्री असताना भाषणाच्या सुरुवातीला गमतीने म्हणायचे की, ‘‘ज्यांना भारताच्या प्रधानमंत्र्यांचा फोन येणार आहे त्यांनीच आपला मोबाईल ऑन ठेवावा!’’
 
मोबाईलवरून संवादाच्या गमती तर सांगाव्या तितक्या थोड्या आहेत. एखादा सेल नंबर डायल केला की, समोरची व्यक्ती तीच आहे असे समजून बोलणे सुरू करून देतात. आपल्याला हवी ती व्यक्तीच बोलते आहे की नाही, याचा अंदाजही घेत नाही. मग गमतीदार प्रसंग निर्माण होतात. एका अनाहूत व्यक्तीचा फोन आला. फोन उचलल्याबरोबर समोरून प्रश्‍न आला, ‘‘साहब माल डाल दू?’’ मी काही सेकंद विचार करीत होतोच, तर माझ्या तोंडून अहेतुक आवाज निघाला. त्यालाच त्याने होकार समजून फोन ठेवला. पुढे काय झाले मला माहीत नाही. याउलट मोबाईलवर नंबर सेव्ह असून वाजल्यावर नाव वाचलेले असतानाही, कोण बोलतंय्? असे विचारणारे महाभागही कमी नाहीत. दोन्हीही क्लेशकारक आहेत. यासाठी सातत्याने चांगल्या सवयींविषयी बोलत राहिले पाहिजे.
 
रेल्वेच्या प्रवासात काही प्रवाशांना आपल्याजवळच्या मोबाईलचा उपयोग स्वत:च्या आनंदासाठी आणि इतरांना त्रास देण्यासाठी करण्यात फार पुरुषार्थ वाटतो. मोठ्या आवाजात आपल्याच भाषेतील गाणे लावतील किंवा व्हिडीओ पाहताना आवाजाचे तारतम्य न ठेवणे, हे सर्व आपण कधीतरी अनुभवले आहे. एखादा, आपण कुठे बसलो आहे याचा विचार न करता मोठमोठ्याने वैयक्तिक विषयांवर मोबाईलवर बोलतो. इतर प्रवाशांचा मूड चांगला असेल तर मनोरंजन होते अन्यथा ती एक डोकेदुखी होऊन बसते. थोडक्यात काय, तर कधीतरी अशी वेळ येईल की, कुणाचा रिंगटोन वाजला की लोक हमरीतुमरीवर येतील आणि एकमेकाची गच्ची पकडतील…
Powered By Sangraha 9.0