इस्रोचा ऐतिहासिक पराक्रम

26 Sep 2014 14:20:01

 
भारताने मागील नोव्हेंबर महिन्यात मंगळावर अंतरिक्ष यान पाठविण्याचा घाट घातला होता. त्याची तयारी आणि नियोजन हे तीन वर्षे आधी करण्यात आले होते. तेव्हाची वृत्तपत्रांतील चर्चा आठवली तर लक्षात येईल की, एक सूर असा होता की, ज्या देशात लोकांना अजून पिण्याचे पाणी मिळत नाही किंवा कित्येक लोकांच्या अंगावर धड वस्त्रं नाहीत, त्या देशाने अंतरिक्षात यान का पाठवावे? पृथ्वीवरील आहे त्या लोकांना धड सांभाळता येत नाही, तर मंगळावरील जीवसृष्टीचा अभ्यास करून काय साधणार? ४५० कोटी रुपये का मोजावे, वगैरे. प्रश्‍न तसा बरोबरच म्हणावा लागेल. तरीही आपल्या देशाने ते यान अंतराळात पाठविलेच. इंडियन स्पेस रीसर्च ऑर्गनायझेशन(इस्रो)चे म्हणणे होते की, हे यान आम्ही अगदी कमीतकमी पैशात पाठविणार आहोत. गेल्या बुधवारी सकाळी सात वाजून चाळीस मिनिटांनी ते कार्य पंतप्रधानांच्या उपस्थितीत सफल झाले. सर्वत्र आनंदिआनंद पसरला. आबालवृद्धांना देश जिंकण्याचा अनुभव आला.
 
जे यान इस्रोने पाठविले तसेच एक यान अमेरिकेने ४५०० कोटी खर्च करून पाठविले, तब्बल १० पट! आणि त्याच यानावर अमेरिकेत ‘ग्रॅव्हिटी’ नावाचा चित्रपट काढला, त्यावर तब्बल १००० कोटी खर्च केले! अमेरिकेला हे यश प्राप्त व्हायच्या आधी सहादा अपयश आले, तर रशियाला १० वेळा अपयश आले. भारताने ते पहिल्याच प्रयत्नात यशस्वीपणे प्राप्त केले. आता भारत थेट अमेरिका, रशिया आणि युरोपियन युनियन या देशांच्या पंक्तीत जाऊन बसला आहे. यावरून ‘इस्रो’च्या शास्त्रज्ञांनी काय पराक्रम केला, हे लक्षात येईल. जे ‘इस्रो’ला शक्य झाले किंवा होत आले ते इतर भारतीय संस्थांना का शक्य होत नाही, हे विचार करण्यासारखे आहे.
 
‘इस्रो’ची सुरुवात मोठी रंजक आहे. दुसर्‍या महायुद्धानंतर एका तल्लख शास्त्रज्ञाला परत इंग्लंडला जाणे शक्य नव्हते म्हणून एका उद्योगपतीने त्याला सांगितले की, तुला जे काही करायचे आहे ते या मुंबईतच कर. तो शास्त्रज्ञ म्हणजे होमी भाभा आणि उद्योगपती म्हणजे जेआडी टाटा! याच डॉ. भाभांनी भारत सरकारच्या ऍटोमिक एनर्जी विभागाचे सचिव असताना भारतीय अंतरीक्ष विभागासाठी भरपूर आर्थिक मदत केली. थोडक्यात काय, तर ‘शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी…!’ ‘इस्रो’ ही संस्था डॉ. विक्रम साराभाई यांच्यासारख्या असामान्य प्रतिभावान शास्त्रज्ञाच्या नेतृत्वात सुरू झाली. तिचा पाया आणि ध्येयधोरणे ही पारदर्शक आणि भक्कम आहेत. तिथला प्रत्येक शास्त्रज्ञ राष्ट्रप्रेमाने भारलेला असतो. केवळ कार्यक्षमता आणि गुणवत्ता याच्या भरोशावर तो कामगिरी पार पाडत असतो. तेथे संपूर्ण स्वायत्तता आहे. ती जरी इतर सरकारी संस्थांसारखीच पगार देणारी असली, तरी तेथे राजकीय हस्तक्षेप किंवा अमक्याला किंवा तमक्याला नोकरीत घेण्यासाठी दबाव नसतो. गुणवत्ता हाच केवळ निकष. वरील योजना ज्याने तीन वर्षांपूर्वी आखली होती, तो शास्त्रज्ञ आज नोकरीत नव्हता. तरीही त्यामुळे कुठे अडचण आली नाही. म्हणजेच ‘सिस्टम ड्रिव्हन’ संस्था काय असतात, याचा उत्तम नमुना म्हणजे ‘इस्रो’ संस्था!
 
सामान्यांना एक प्रश्‍न नेहमीच भेडसावत असेल की, हे यान अंतराळात पाठविले म्हणजे नक्की काय केले आणि काय कमावले? त्याने काय होणार? वगैरे. यामागचा उद्देश एकच होता की, हजारो वर्षांपासून जी मान्यता होती की, मंगळ हा ग्रह पृथ्वी या ग्रहाशी बरेच साधर्म्य साधतो. तेथे जीवसृष्टी असावी किंवा होऊ शकते का हे तपासणे. तेथे पाण्याचा साठा आहे का, वायुमंडल कसे आहे वगैरे. याने सामान्यांचा पोटापाण्याचा प्रश्‍न सुटणार का, हेदेखील विचारले जाऊ शकते. एक बाब लक्षात घ्यायला पाहिजे की, काही विषय हे वरील चर्चेच्या पलीकडले असतात. येथे देशाच्या अस्मितेचा प्रश्‍न असतो, शास्त्रज्ञांच्या उत्साहाचा प्रश्‍न असतो. जगाला त्यातून काही संदेश घ्यायचा असतो. २६ जानेवारीला आपले सैन्य दिल्लीला परेड करतेे तसेच. माझ्या मते, यामागे मुख्य कारण हेच आहे की, या मार्फत आपल्या देशाची बलस्थाने जगासमोर रेखांकित करणे. आपल्या शास्त्रज्ञांच्या आणि अभियंत्यांच्या अफाट कार्याची ओळख जगाला पटवून देणे. विषम वातावरणात ग्रह पाठविताना कोणते धातू वापरणे, पृथ्वीवरून ६८ कोटी किमी अंतरावरील यानाला कसे नियंत्रित करावे, क्षणक्षणाचे गणित मांडून ईप्सित स्थानी यानाला पोहोचविणे, गुरुत्वाकर्षण शक्तीचा अनुमान काढून यानावर नियंत्रण राखणे वगैरे.
 
ज्याने कुणी तो क्षण टीव्हीवरून अनुभवला त्याला लक्षात आले असावे की, त्या १२ मिनिटांत सर्व शास्त्रज्ञांच्या चेहर्‍यावरील भाव कसे होते? दिलेल्या सूचनांवर यान काम करीत आहे की नाही, याचा अहवाल पृथ्वीवर यायला १२ मिनिटे लागणार होते. याच १२ मिनिटांत सर्व यश आणि अपयशाचा निर्णय लागणार होता. या मोहिमेतील परीक्षेची घडी होती मंगळाच्या गुरुत्वाकर्षण कक्षेत यानाचा प्रवेश! हे आव्हान अवघड असले, तरी अतिआवश्यक होते. अपोगी इंजिनाच्या साहाय्याने हा कक्षाप्रवेश प्रोग्राम्ड होता. या इंजिनात द्रवरूप इंधन होते. त्याचा वापर मंगळाच्या कक्षेत करणे हे खरे आव्हान होते. तसेच हे इंधन ९-१० महिने पडून होते. नेमक्या वेळी म्हणजे २४ सप्टेंबरला सकाळी ते इंजीन सुरू होईल की नाही, ही धाकधुक ‘इस्रो’च्या वैज्ञानिकांना होती. अर्थात, पर्यायी व्यवस्था तयार होतीच, पण ते यश मानले गेले नसते. आत्मविश्वासाने ही मंडळी आपापली कार्ये करीत होती आणि तो क्षण आला, अपोगी इंजीन ठरल्याप्रमाणे सुरू झाले. सर्व संबंधितांचा जीव भांड्यात पडला. भारताचे पंतप्रधान, हा संघर्ष आणि हे कौतुक बघण्यासाठी प्रत्यक्ष हजर होते. थोडक्यात काय, तर आपल्या क्षमतांचा प्रत्यय जगाला आणून दिला.
 
भारतीय शास्त्रज्ञांना आता यशाची चव चाखायची सवय लागली आहे. १९६० च्या दशकात अनेकदा आपली बरीच याने असफल होऊन निकामी झाली होती. त्याची कारणे म्हणजे आतासारख्या दूरसंचार पद्धती, संगणक, आंतरराष्ट्रीय दर्जाचा अनुभव नव्हता. आता मात्र यात आपली ‘मास्टरी’ झाली आहे, असे म्हणता येईल. जे चीन, जपानला किंवा आशियात कुणालाच जमले नाही ते भारताला जमले आहे. भारताचे स्थान आता अजून बळकट झाले आहे.
या अनुषंगाने काही रंजक प्रश्‍न निर्माण झाले. १३५० किलोग्रामच्या यानाने ९ महिन्यांत ६८ कोटी किमी अंतर कापले आणि मंगळावर जाऊन विसावले, या गोष्टीवर विश्‍वास बसत नाही. मंगळ हा आपल्या पुराणातला आवडीचा विषय. मंगळीची कुंडली आपल्याला माहितच आहे. चक्क तेथे आपण जाऊन पोहोचलो! तेथील उडत्या तबकड्यांची चर्चापण अधूनमधून होतच असते. एक मात्र सिद्ध झाले की, एकेक वर्षाचा प्रवास, हे प्रत्यक्षात आले आहे. गरुडपुराणात अनेक उल्लेख आहेत, ज्यामध्ये असेही म्हटले जाते की, मृत्यूनंतर आत्मा देहत्याग करून अनंताच्या प्रवासाला निघतो आणि त्याला एक वर्षाचा काळ लागतो. म्हणून आपण पहिले वर्षश्राद्ध करीत असतो. का म्हणून आपण असा विचार करू शकत नाही की, तो अनंताचा प्रवास मंगळाच्या पलीकडे असावा? का म्हणून त्यादृष्टीने अधिक अभ्यास करू नये?
 
दुसरी रंजक बाब मनात आली की, हे मिशन पितृपक्ष आणि अमावास्या या दिवशी पूर्ण झाले. मग पितृपक्षाला किंवा अमावास्येला अमंगळ ठरविणे कितपत रास्त आहे? पुराणातील काही गोष्टी तर्कनिष्ठ आहेत, तर काही अतर्क्य. काही धुरिणांनी आपल्या सोईसाठी म्हणा किंवा मर्यादित आकलनामुळे म्हणा, काही गोष्टी शास्त्रात घुसविल्या तर नाही ना, हेदेखील तपासणे आवश्यक आहे. असे तर नाही ना की, अमावास्या ही कल्पना मंगळाला लागू होत नाही, कारण त्यांचा संबंध केवळ चंद्र आणि पृथ्वी याच्याशीच आहे. आपल्या अमावास्येचे आणि पौर्णिमेचे गणित हे चंद्रोदयावर आधारित पंचांगावर ठरत असते म्हणून…?
Powered By Sangraha 9.0