अपयशाचे शिल्पकार कोण?

13 Oct 2015 18:01:06

मुलं जन्माला आल्या आल्या प्रत्येक क्षणाला काही ना काही शिकण्याची धडपड असते. तो आवाज काढायला शिकतो, हाक मारायला शिकतो, गायला शिकतो, बोलायला शिकतो. त्याचबरोबर पालथं पडायला शिकतो, रांगतो, बसतो, उभा राहतो, धावतो. धावायला शिकला की, सर्वांत पुढे कसा राहीन याचा प्रयत्न करीत असतो. म्हणजेच मनुष्य हा जन्मत: नवनवीन शिकण्यासाठी उत्सुक असतो- ज्याला आपण प्रगती म्हणतो. प्रगतीची दखल घेतली गेली की, बक्षीस मिळते किंवा आर्थिक लाभ होतो. आर्थिक लाभ वाढला की, श्रीमंती प्राप्त होते व त्याला आपण यश प्राप्त झाले, असे म्हणतो. काही लोक आर्थिक लाभार्थी नसतात, तरी ते यशस्वी म्हणून गणल्या जातात. जसे, सामाजिक कार्यकर्ते, आध्यात्मिक धर्मगुरू वगैरे वगैरे. या सर्व यशस्वी पुरुषांमध्ये एक समान धागा असतो, तो म्हणजे सतत त्या त्या क्षेत्रात प्रगती करत राहणे, प्रयत्न करणे व लक्ष्य ठरवून त्याच्या प्राप्तीचा ध्यास घेणे, प्रगती करणे, यश प्राप्त करणे. ही जर नैसर्गिक प्रक्रिया असेल, तर मग काहींची गाडी कुठे अडकते? याचाच अर्थ, ते कुठेतरी त्या नैसर्गिक प्रक्रियेला स्वत:च अडवतात, असे म्हणता येईल.
 
त्याचे मुख्य कारण म्हणजे अयशस्वी लोक आपले लक्ष्य ठरवत नाहीत आणि ठरविले तरी त्याचा पाठपुरावा करीत नाहीत, मधेच भरकटतात. जसे, समजा तुम्ही कार काढून सर्व आवश्यक वस्तू डिकीत भरून एका नवीन ठिकाणी प्रवासाला निघालात. सुरुवात चांगली झाली. मात्र, शेवटच्या टप्प्यात असे लक्षात आले की, रस्ता फारच खराब, कठीण व गाडी चालविण्यास लायक नाही. अशा परिस्थितीत आपल्याजवळ तीन पर्याय असतात. एकतर गाडी मागे वळविणे व घरी जाणे, दुसरे, गाडी दुसर्‍या एखाद्या निसर्गरम्य स्थळी नेणे व तिसरे, काहीही झाले, गाडी बंद पडली तरी पाहून घेऊ, या मानसिकतेतून प्रवास चालूच ठेवणे. यशस्वी लोक तिसरा पर्याय निवडतात किंबहुना ठरल्याप्रमाणे आपल्या मार्गावरून भरकटत नाहीत. मनात आलेल्या विचाराला धुडकावून लावले व मार्गात येणार्‍या प्रत्येक अडचणींना संधी समजून उपाय शोधले, तर त्या अनुभवातून वेगळाच आनंद मिळतो. तो आनंद ध्येयपूर्तीपेक्षाही जास्त आनंददायी असतो. ध्येयपूर्तीचा प्रवास म्हणजे आनंदयात्रा असते आणि ध्येयपूर्ती ही क्षणिक बाब असते. अर्थात, यश मिळाल्यावर त्यात फार काळ रममाण झालात की, आयुष्यातली आनंदयात्रा संपलीच समजा!
प्रगतीचा प्रवास ही नैसर्गिक बाब असली, तरी आपण आपल्या स्वभावाद्वारे तो प्रवास खंडित करीत असतो. आपल्याला थोडेसे यश प्राप्त झाले की, आपण स्वत:विषयीच बोलण्यात रममाण होतो- ‘‘मी ‘हे’ केले नि ‘ते’ केले. केवळ ‘मी’ होतो म्हणून झाले अन्यथा ते शक्यच नव्हते.’’ हे सांगताना ती व्यक्ती हे विसरते की, समोरचा माणूस आता कंटाळला आहे. दुसरे, त्याच्या बोलण्यातही सातत्य नसते. ‘‘मी पाच वाघ मारले,’’ असे सांगता सांगता त्याचा विश्‍वास एवढा बळावतो की, तो हळुवारपणे ‘‘मी दहा वाघ मारले,’’ हे सांगायला मागेपुढे पाहत नाही! मुळात ही व्यक्ती वाघाला पाहून पळ काढणारी असते!! मात्र, तिच्या या स्वभावामुळे लोक दुरावतात व त्यांना यशाच्या मार्गावरून घसरावे लागते.
 
दुसरा एक प्रकार असतो तो म्हणजे परिस्थितीला सतत दोष देणे. कधी त्यांना काम करतात त्या कार्यालयाविषयी तक्रारी असतात, कधी बॉसविषयी, कधी राहतो त्या घराविषयी, शेजार्‍याविषयी, सहकार्‍याविषयी, स्वत:च्या व व्यक्तिमत्त्वाविषयी, गरिबीविषयी, श्रीमंतीविषयी, सरकारविषयी, केंद्र सरकारविषयी, शेजारील देशांविषयी… खरे तर लक्ष्यप्राप्तीसाठी या परिस्थितीचा फार काही संबंध नसतोच. मात्र, स्वत:ला एका कोषात टाकून आपला प्रवास दिशाहीन करतात. आपणापैकी अजून एक मोठा वर्ग दुसर्‍यांशी बोलताना, जी व्यक्ती उपस्थित नाही तिच्या पाठीमागे वाईट बोलणे. तो सुरुवातच करतो की, ‘‘तुला म्हणून सांगतो, तू फार चांगला आहे म्हणून सांगतो, पण ‘तो’ ना फारच मतलबी आहे, चलाख आहे, स्वार्थी आहे, बुद्धू आहे वगैरे वगैरे.’’ जी व्यक्ती एखाद्याच्या पाठीमागे वाईट बोलते, ती तुमच्याविषयीपण वाईट बोलणारच, हे पक्के समजा! काहींना असे वाटते की, प्रत्येक ठिकाणी वशिलाच लागतो. वशिल्याशिवाय काहीच होत नाही. माझा वशिला नाही अन्यथा मी कुठल्या कुठे गेलो असतो वगैरे वगैरे. ही सर्व मंडळी केवळ आळसामुळे किंवा निराशेच्या मानसिकतेतून स्वत:ला यशाच्या मार्गावरून भरकटवत असतात.
मी आता मंत्रालयातच असतो म्हणून अनुभवतो. मुंबईला मंत्रालयात संपूर्ण महाराष्ट्रातून लोक आपापले काम करवून घेण्यासाठी येत असतात. अक्षरश: ग्रामीण भागातले कमी शिकलेले वा गरीब, सरळ रांगेत लागून मंत्रालयात शिरतात, मुख्यमंत्र्यांना थेट भेटतात. आपले काम सांगतात. जशी मुख्यमंत्र्यांकडे रांग असते तशीच प्रत्येक मंत्र्याकडे असते व त्या त्या खात्याशी संबंधित लोक आपापले काम करवून घेतात. त्यांना खेटा जरूर घालाव्या लागतात. मात्र, परिश्रम, सचोटी, ध्येयपूर्ती यामुळे त्यांना यशदेखील मिळते.
 
जे यशस्वी होतात ते स्वत: कधीच स्वत:विषयी बोलत नसतात. त्यांचा स्वभाव, त्यांचं काम, त्यांची सचोटी, त्यांचं वर्तन हेच त्यांचं बोलणं असते. या लोकांना समाज वाचत असतो, त्यांचे अनुकरण करत असतो. हे लोक परिस्थितीला कधीच दोष देत नसतात. परिस्थिती म्हणजे संधी, असे त्यांना वाटते. विषम परिस्थितीत ते डगमगत नाहीत. प्रत्येक व्यक्तीसाठी, समाजासाठी आपत्ती ही इष्टापत्ती ठरू शकत असते.
 
आपल्या देशाची लोकसंख्या हा मोठा चिंतेचा विषय वाटत होता. मात्र, नरेंद्र मोदींनी आल्या आल्याच आपल्या देशाची लोकसंख्या, विशेषत: तरुणांचे सरासरी वय ही बाब कशी जमेची बाजू आहे, हे आंतरराष्ट्रीय पटलावर बिंबवले. ‘यदा यदा ही धर्मस्य…’ अशी स्थिती येत असते.
सचिन तेंडुलकरला वयाच्या ३२ व्या वर्षी एल्‌बो इन्ज्युरीने खेळापासून दूर जावे लागले होते. त्याने त्या अवयवावर शस्त्रक्रिया करवून घेतली. खेळामध्ये हालचालींच्या मर्यादा लक्षात घेऊन खेळात बदल केला व क्रिकेटचा ‘बादशहा’ झाला! नरेंद्र मोदींची ‘मौत का सौदागर’सारखी प्रतिमा रंगवली गेली. विरोधक, प्रसारमाध्यमे ‘ग्लोबेज नीती’मध्ये सफल झाल्यासारखे वाटत असतानाच, त्यांनी विकासपुरुष म्हणून स्वत:ला प्रस्तुत केले व यशस्वी झाले. अटलबिहारी वाजपेयी व अडवाणी हे स्वत: निवडणुकीत हारले व पक्षाला केवळ दोन खासदारांवर समाधान मानून दारुण पराभव पत्करावा लागला होता. पुढे जाऊन भाजपाचे केंद्रात सरकारच आले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर अनेकदा बंदी घातली गेली. परंतु, गुरुजी गोळवलकर व बाळासाहेब देवरसांच्या नेतृत्वात संघाने अजून भरारी घेतली.
 
अशा प्रकारची उदाहरणे आपल्या अवतीभवतीदेखील असतात, ते आपण डोळसपणे वाचू शकलो पाहिजे. त्यासाठी मनाची व विचारांची कवाडं सतत उघडी असायला हवी. सध्या महाराष्ट्रात नगरपालिकेच्या निवडणुकांचा ज्वर आहे. मनसेला खरे तर सपाटून मार खावा लागला होता व तो पक्ष आता टिकेल की नाही, याचीच चर्चा होती. मात्र, त्याचे नेते राज ठाकरेंनी पहिलीच सभा घेऊन कार्यकर्त्यांमध्ये जोश भरला. हे गुण यशस्वी पुरुषाचे गुण असतात. अशा प्रकारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर, बाबा आमटे, प्रकाश आमटे, डॉ. माशेलकर, अब्दुल कलाम, नानाजी देशमुख, धीरूभाई अंबानी, अमिताभ बच्चन, दत्तोपंत ठेंगडी… अशी कितीतरी उदाहरणे आपल्या डोळ्यांसमोर येऊ शकतात. म्हणून प्रत्येकाने आपापल्या ध्येयाच्या मार्गावरून, कितीही संकट आले तरीही, न भरकटता मार्गक्रमण केले, तर आपलेही नाव या मान्यवरांच्या पंक्तीत बसू शकते!
Powered By Sangraha 9.0