…अजब तुझे सरकार!

28 Oct 2015 12:41:45
 

सहा वर्षांपूर्वी, बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचा वारसदार कोण, यावर भरभरून चर्चा झडत होत्या. वारसदार हा वारसच होत असतो, हे साधे गणित माहीत असतानादेखील, लोकांना राज ठाकरेंमध्ये बाळासाहेब पाहायला आवडत होते. त्यांची बोलण्याची ढब, लकब, देहबोली या सर्वच बाबींमध्ये हुबेहूब बाळासाहेब डोकावतात. त्या तुलनेत उद्धव ठाकरेंमध्ये शिवसेना पुढे नेण्याचे नेतृत्वगुण आहेत काय, यावर शंका होती. उद्धव ठाकरेंची तेव्हाची प्रतिमा म्हणजे छायाचित्रकार, निसर्गप्रेमी, सोज्ज्वळ अशीच होती. त्यांच्या बोलण्यातदेखील सुसंस्कृतपणा होता. या पृष्ठभूमीवर बाळासाहेबांची गादी ते सांभाळू शकतील का, याबद्दल साशंकता होती. बाळासाहेबांनी वारसालाच वारसदार घोषित केले. आता उद्धव ठाकरेंनीपण आपला वारसदार आदित्यला अघोषितपणे प्रस्तुत केले आहे. परवाच्या दसर्‍याच्या सोहळ्यात ज्या प्रकारे आदित्य ठाकरेंना बसविले होते, इतर ज्येष्ठ-श्रेष्ठ सर्वच नेतेमंडळी ज्या अदबीने ठाकरे पिता-पुत्रांना मानाचा मुजरा करत होते, त्यावरून शिवसेनेला घराणेशाहीबद्दल तरी भाष्य करायचा अधिकार नाही, हे स्पष्ट होते. त्याच मंचावरून उद्धव ठाकरेंचे भाषण होणार होते, जनता त्याची वाट पाहत होती व ते भाषण सुरू असताना सर्वांनी उद्धव ठाकरेंचा नवा अवतार अनुभवला.
 
प्रारंभीचे उद्धव ठाकरे व आताचे यामध्ये आता जमीन-अस्मानाचे अंतर म्हणावे लागेल. त्यांची देहबोली, भाषा, आवाजाची फेक सर्वच शिवसेना स्टाईलने होते. मनात प्रश्‍न निर्माण झाला की, चांगल्या नेतृत्वासाठी जन्मत: गुण असायला हवे हे खरोखरच बरोबर आहे का? मग उद्धव ठाकरेंच्या बाबतीत ते का लागू होत नाही? म्हणून जरा अजून खोलात शिरून ते कसे बोलले व काय बोलले, या दोन्हींचा विचार सुरू झाला. कसे बोलले, याचे उत्तर आले, छान बोलले. बोलण्यात तडफ होती, शब्दफेक चांगली होती, लोकांना खिळवून ठेवणारी होती. याचाच अर्थ, त्यांनी ही कला सरावाने प्राप्त केली, असे म्हणता येईल. सरावाने अभिनय वठतोच. राजकारणी अभिनयात नटांपेक्षाही सरस असतात. जनता मात्र त्यांच्यावर भाळते. अभिनयाबरोबर फलश्रुती नसली, तर ते नेतृत्व कुचकामी सिद्ध होत असते. आता वळू या उद्धव ठाकरे हे काय बोलले याकडे. त्यांनी सुरुवातच राज्य आणि केंद्रातल्या सरकारचा उल्लेख करीत केली. राममंदिराच्या मुद्याला हात घातला, पाकिस्तानचा मुद्दा उपस्थित केला, कोणा कोणाची कबर, सत्ता कशी चालवायला पाहिजे, सध्याचे राज्य सरकार कशात कमी पडते आहे वगैरे. एकेक मुद्दा तपासला तर लक्षात येईल की, केवळ भावनिक गोष्टींमध्ये हात घालून टाळ्या मिळविण्याचा सगळा प्रयत्न होता. समोर बसलेल्यांना ‘वाघ’ असे संबोधून इतर सर्व शेळ्या आहेत, हे म्हणायला ते विसरले नाहीत. त्यांच्या भाषणात राज्याच्या दृष्टीने एकही विधायक दृष्टिकोन नव्हता, केवळ भावनिक मुद्यांवर बोलून त्यांना संपूर्ण महाराष्ट्र पादाक्रांत करायचा आहे,
 
केवळ भाजपाला पाण्यात पाहून महाराष्ट्र पादाक्रांत करायचा आहे. आपली रेष मोठी करण्यापेक्षा दुसर्‍याची रेष छोटी करून मोेठे होण्याचा हा प्रयत्न आहे. त्यांच्याच मंचावरील उपस्थित नेत्यांच्या चेहर्‍यावरून लक्षात येत होते की, किती दिवस तेच ते घासले जाणार आहे? केवळ भावनिक मुद्यांवर किती दिवस आपला गुजारा होणार? भाषणात त्यांनी अनेक समस्यांकडे लक्ष जरूर वेधले. परंतु, केंद्र आणि राज्यातील सरकारमध्ये सहभागी असतानाही त्यांनी उपाय कोणतेच सुचविले नाहीत. सत्तेत सहभागी असताना खरे तर सरकारच्या उणिवांकडे बोट दाखविण्याचा त्यांना अधिकार नाही. पण, आम्ही जनतेला उत्तरदायी आहोत, असे सांगत त्यांनी सरकारच्या उणिवा दाखविल्या. या उणिवांसाठी आपणही जबाबदार आहोत, याचे भान ते विसरले. उणिवा दाखवतानाच त्यांनी उपाय सुचविले असते तर अधिक बरे झाले असते, असे वाटते.
एकीकडे मर्दुमकीची भाषा करायची व दुसरीकडे सत्तेत राहायचे. सत्तेत भागीदारी घेऊन विरोधी पक्षाची भूमिका बजावायची. शिवसेना नेतृत्व सध्या अत्यंत गोंधळलेल्या स्थितीत आहे. वस्तुस्थितीला न स्वीकारता मांजर डोळे मिटून दूध पिते त्याप्रमाणे वागणे सुरू आहे. ‘मंदिर वही बनायेंगे; तारीख नही बतायेंगे|’ या उद्धव ठाकरे यांच्या घोषणेला तुम्ही काय म्हणणार? शेवटी हे कायद्याचे राज्य आहे की नाही? मर्दुमकीचीच तुलना करायची, तर विश्‍व हिंदू परिषदेने १९९२ मध्ये जे काही करायचे ते केलेच ना? कोणते शिवसैनिक अयोध्येस गेले होते? केवळ गुलामअली व पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमांना विरोध दर्शवून पाकिस्तानला का घाबरता म्हणून प्रश्‍न विचारणे म्हणजे फारच बालिशपणा आहे. सध्या केंद्रीय सरकारचे धोरण आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तानला एकाकी पाडण्यात यशस्वी होत आहे. परंतु, एवढे गंभीर विषय समजून घेण्याइतपत शिवसेना अजून तरी परिपक्व झाल्याचे अनुभवास येत नाही. असली तरीही वस्तुस्थितीमुळे त्यांना पाहिजे तसा मान मिळत नसल्याची ती खंत आहे. भाजपाकडून लालकृष्ण अडवाणींना कशी वागणूक दिली जाते, याबद्दल ते बोलतात. शिवसेनेत मनोहर जोशी यांची काय गत आहे, याकडे लक्ष दिल्यास जास्त बरे होणार नाही काय? उद्धव ठाकरेंच्या भाषणाचा सुरुवातीचा आवेश असा होता की, जणू आता ते सरकारचा पाठिंबा काढण्याची घोषणा करतात की काय? मात्र, शेवटी त्यांनी हात जोडून (शिवसेना स्टाईलने) विनंती केली की, आमच्या मंत्र्यांचा चांगला उपयोग करून घ्या म्हणून. त्यामुळे शेवट गोडच झाला, असे म्हणता येईल.
 
शिवसेना व भाजपा दोघांना मिळून राज्यात परिवर्तन करायची नामी संधी आहे. पहिल्याच वर्षात राज्य सरकारने अनेक चांगले निर्णय घेतले आहे. जलयुक्त शिवार असो, उद्योगांसाठी लागणार्‍या परवान्यांची संख्या कमी करणे असो, राईट टु सर्व्हिस असो, ऊर्जा मंत्रालयातील सकारात्मक गोष्टी असो, नवीन गुंतवणुकीस चालना देणारी धोरणं असो, ई-टेंडरिंग असो, हे सरकार सफल झाले तर त्याचे श्रेय शिवसेनेलाही मिळणार आहे. त्यांची सकारात्मक भूमिका राज्याच्या हिताची आहे. जे वाटोळे कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीने करून ठेवले आहे, त्यातून राज्याचे गाडे बाहेर काढणे ही खरी आव्हानात्मक बाब आहे. तीन लाख कोटींचे कर्ज आपल्या राज्यावर आहे. आमचे हिंदुत्व श्रेष्ठ की तुमचे, आमचा पाकिस्तान विरोध मोठा की तुमचा, आम्ही सच्चे राष्ट्रभक्त की तुम्ही, अशा प्रकारच्या तू तू मैं मैं ने राज्याला कुठलाच लाभ होणार नाही. जनतेने कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या विरोधात कौल दिला होता. याचाच अर्थ, भाजपा आणि सेनेला स्वीकारले होते. जनतेने जो कौल दिला आहे, त्याचा सन्मान करीत राज्यात परिवर्तन घडवून आणण्याची जबाबदारी पार पाडण्याऐवजी सत्तेत राहून अशा प्रकारचे वागणे सुरूच राहिले, तर जनता म्हणेल- ‘‘उद्धवा, अजब तुझे सरकार…!’’
Powered By Sangraha 9.0