फडणवीस गिअर बदलणार

03 Nov 2015 12:38:07
 
जनतेला भोग भोगायला लावले. जनता त्रस्त होती, त्यामुळे तिला बदल हवा होता. तिकडे नरेंद्र व इकडे देवेंद्र, अशा प्रकारचा निर्णय झाल्यासारखाच होता. तीन लाख कोटींचे कर्ज, आरक्षणाविषयीचे राजकीय निर्णय, फोफावलेली गुंडागर्दी, विकासातील असमतोल, विदर्भ-मराठवाड्याकडे होणारे दुर्लक्ष, राज्यासाठी दूरदृष्टी दाखवून धोरण आखण्याची मर्यादा, या सर्व गोष्टींनी महाराष्ट्र संकटात होता.
 
या पृष्ठभूमीवर, देवेंद्र फडणविसांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. वर्षपूर्ती झाल्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसने मुंबईतील वरळीसारख्या छोट्याशा मैदानात ‘भरगच्च’ मेळावा आयोजित केला होता. प्रेक्षकांपेक्षा मंचावरील नेत्यांची उपस्थिती लक्षणीय होती. अर्थात, तो पक्ष कार्यकर्त्यांचा नसून नेत्यांचाच पक्ष आहे! त्यांनी फडणवीस सरकारला दहापैकी शून्य गुण दिले. एवढेच करून ते थांबले नाहीत, तर हे सरकार कुठे कुठे कमी पडले, कायदा व सुव्यवस्था कशी माघारली याबद्दल सांगितले. यावरून त्यांनी फडणवीस सरकारला दहापैकी उणे दहा गुण दिले, असेच म्हणावे लागेल. आघाडीच्या नेत्यांना १५ वर्षे सत्ता उपभोगल्यावर असे मूल्यमापन करण्याचा नैतिक अधिकार आहे काय? एकीकडे नाकं मुरडायची व दुसरीकडे भाजपाला न मागता पाठिंबा द्यायचा, हा त्यांचा धर्म! अजूनही राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेसचे नेते, आपण विरोधी पक्षात आहोत, हे पचवू शकलेले नाहीत.
दुसरीकडे शिवसेना सत्तेत असूनही विरोधी पक्षाची भूमिका बजावण्यात धन्यता मानत आहे. त्यांचा पहिल्या क्रमांकाचा राजकीय शत्रू आता भाजपा झाला आहे. त्या आधी कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि मनसे हे पक्ष त्यांचे शत्रू होते. शिवसेनेचा प्रवासदेखील आधी मद्रासीविरोधी, मग उत्तरप्रदेशीविरोधी, बिहारविरोधी, गुजरातीविरोधी असाच राहिला. नंतर हिंदुत्ववादी झाले. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत त्यांचा काहीही सहभाग नसताना तो मुद्दा त्यांनी स्वत:कडे ओढून घेतला. बाबरी ढाचा पाडल्यावर एकही शिवसैनिक अयोध्येत गेला नसताना, त्या मुद्याचा उपयोग मोठ्या खुबीने करून घेतला. केवळ राजकीय चातुर्य व कोणतीही सातत्यपूर्ण भूमिका नसताना शिवसेनेचा प्रवास सुरू आहे. त्यांच्या दृष्टीने आता भाजपा व त्यातही मुख्यमंत्रीच त्यांचे शत्रू आहेत, अशा प्रकारचा पावित्रा ते घेत आहेत.
 
देवेंद्र फडणविसांपुढे महायुतीतील इतर घटकपक्ष व पक्षांतर्गत धुरिणांनादेखील सोबत घेऊन जाण्याचे आव्हान होते. सरकारी यंत्रणा वर्षानुवर्षे एका ठरावीक पद्धतीने काम करायला शिकली होती. वर्षानुवर्षे आघाडीचे सरकार असल्याने, त्यांचे संबंध आघाडीच्या नेत्यांबरोबर ‘सलोख्या’चे असणे स्वाभाविकच होते. रक्ताच्या संबंधापेक्षा ‘हित’संबंध दीर्घकाळ टिकणारे असतात, त्यामुळे सरकारी यंत्रणा पूर्णपणे फडणवीस सरकारच्या हातात यायला वेळ लागणार होता. परवा मुख्यमंत्र्यांनी ती खंत बोलून दाखविली की, आजही ५० टक्क्यांपेक्षा जास्त बाबू हे, सरकार कसे चालते किंबहुना कसे अयशस्वी होते, याकडे डोळे लावून बसले आहेत! उदाहरणादाखल त्यांनी मांसविक्रीबंदीवर व टीका करणार्‍यांना देशद्रोही ठरविण्याबाबतचे जे परिपत्रक काढले, ते सरकारी बाबू पातळीवरच सरकारला अडचणीत आणण्यासाठी काढल्याचे म्हटले.
 
या पृष्ठभूमीवर, देवेंद्र फडणविसांनी एक वर्षात काय केले हे विचारणे जरी अपेक्षित असले, तरी त्याची तुलना आघाडीच्या १५ वर्षांशी करणे कितपत सयुक्तिक आहे, याचा विचार केला पाहिजे. त्यांनी घेतलेल्या निर्णयांद्वारे-बीजारोपणाद्वारे पुढे त्यांना कसे यश वा अपयश येणार आहे, या आधारावर चर्चा करणे जास्त रास्त होऊ शकते.
जी शेती आपल्या राज्याच्या विकासाचा कणा आहे, त्याकडे सर्वप्रथम त्यांनी लक्ष वेधले. व्यक्तीला ज्याप्रमाणे अन्न-वस्त्र-निवारा ही मूलभूत गरज आहे; तसेच शेतीला वीज-पाणी-अर्थसाहाय्य याची आवश्यकता त्यांनी ओळखली. शेतीच्या शाश्‍वत विकासाचा विचार करून, सिंचन हमीसाठी जलयुक्त शिवार ही योजना राबविली. मुख्यमंत्री म्हणतात, ‘‘जर शेतकरी सुखी झाला तरच राज्य सुखी होईल.’’ शेतकर्‍यांना दोन रुपयांत गहू व तीन रुपयांत तांदूळ, आरोग्यसेवा, शिक्षणात सवलत अशा प्रकारचे निर्णय त्यांनी घेतले. एकाच वर्षात एक कोटींपेक्षा जास्त शेतकर्‍यांना ९००० कोटींची आर्थिक मदत दिली. कर्जाची फेररचना केली. त्याबरोबर टोलमुक्तीचा निर्णय, सेवा हमी कायदा, ई-टेंडरिंग, प्रकल्पाच्या कामाची पाहणी करण्यासाठी सॅटेलाईट कॅमेराद्वारे देखरेख, शेतकर्‍यांना एसएमएसद्वारे हवामानबदलाची माहिती, वीजदर कमी करणे, भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी उपाययोजना, विदर्भाचा व मराठवाड्याचा असमतोल घालविण्यासाठी ‘एम्स’च्या धर्तीवर मेडिकल कॉलेज आणणे, आयआयटी आणणे, विदेशामध्ये जाऊन लाखो रुपयांची गुंतवणूक खेचून आणणे, रोजगारनिर्मितीवर भर देणे, इंदू मिलचा प्रश्‍न मार्गी लावणे… अशा प्रकारचे अनेक निर्णय चर्चिले जाऊ शकतात.
 
देवेंद्र फडणविसांसारखा कुशाग्र बुद्धीचा, लोकांची नाळ ओळखणारा, संतुलित गुण असलेला नेता हे नक्कीच जाणून असणार की, पाहिजे तशी गती अजून आलेली नाही. सर्व यंत्रणा व सहकारी यांची गती वाढल्यास सरकारच्या कामाची गती वाढणार आहे. कोणताही चालक नवीन वाहनावर बसला की, सर्वप्रथम त्या वाहनाचे ब्रेक, ऍक्सिलेटर, हवा, इंधन या सर्व गोष्टींचा आढावा घेत घेत, सावधपणे सुरुवातीच्या गीयरमध्ये वाहन हाकतो. एकदा वाहनाच्या मर्यादा व शक्तिस्थळं, रस्त्यांची स्थिती लक्षात आली की, गंतव्यस्थानासाठी गाडी सुसाट हाकतो. कल्याण-डोंबिवलीच्या निवडणूक प्रचारादरम्यान पाहायला मिळालेल्या फडणविसांनी आता गाडी वरच्या गीअरमध्ये टाकलेली दिसते. कल्याण-डोंबिवलीत त्यांनी प्रचारात चौफेर फटकेबाजी केली. अनेक सभांच्या माध्यमातून मतदारांना आकृष्ट केले. त्यांच्या प्रयत्नांना यश म्हणून भाजपाने आठवरून ४२ अशी मुसंडी मारली. तब्बल ४०० टक्क्यांची वाढ! तोच पराक्रम कोल्हापूरच्या निवडणुकीतदेखील पाहायला मिळाला. येणार्‍या काळात सरकारी यंत्रणा, सहकारी मंत्री, सहकारी सत्तारूढ पक्ष, विरोधी पक्ष या सर्वांनाच देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये- ‘लाड करणारी आई व धपाटा मारणारी आई’ असा बदल पाहायला मिळणार आहे. ती काळाची गरजही आहे…
Powered By Sangraha 9.0