कचरा मुंबईचा

27 Jul 2015 17:09:30

 
मागील आठवड्यात मुंबईत हाहाकार माजला. २६ जुलै २००५ या दिवसाची आठवण झाली. पर्जन्यवृष्टी जरी जास्त असली, तरी हानी मात्र कमी झाली. सतर्कता आणि नियोजन यामुळे तुलनात्मकदृष्ट्या हानी कमी झाली, असे म्हणता येईल. २६ जुलै २००५ च्या संध्याकाळी मी स्वत:देखील अडकलो होतो. सर्व लोकल गाड्या बंद पडल्याने सर्व प्रवासी, रस्त्यात मिळेल त्या वाहनाकडे वळले. रस्त्यावर पाणी साचल्याने वाहनेही बंद पडली. संततधारेमुळे पाण्याची पातळी वाढतच होती आणि पाण्याचा निचरा बंद होता. लोक आपापल्या कारमध्ये एसी लावून, रात्र झाल्यामुळे झोपून गेले. पाण्याची पातळी वाढल्याने ऑटोमॅटिक लॉक सिस्टीम निकामी झाली. लोक कारमधेच अडकून पडले आणि गुदमरून मृत्युमुखी पडले. तो दिवस मुंबईकरांना आठवला की, आजही अंगावर काटा येतो. मागील आठवड्यात मात्र इतकी भीषण हानी वाचविता आली. कारण, यंत्रणेजवळ मागील अनुभव गाठीशी असल्याने लोकांना सतर्क राहण्याचे आदेश दिले, घराबाहेर न पडण्याचे आदेश दिले. स्वत: पालिका आयुक्त आणि मुख्यमंत्री, आपत्ती व्यवस्थापन केंद्रात जाऊन योग्य निर्देश देत होते.
 
चॅनेलवाले आपले ‘राष्ट्रीय’ कर्तव्य बजावत होते. मुंबईच्या बाहेर असे चित्र निर्माण होत होते की, मुंबई पूर्णच ठप्प झाली आहे. ‘सबसे तेज’च्या चक्करमध्ये नेहमीप्रमाणे ‘प्रत्यक्षाहुनी प्रतिमा भीषण’ असे दाखविले जात होते. वर्तमानपत्रात ‘शिवसेना नापास, पालिका नापास, सरकार नापास, नालेसफाईचा दावा फोल’ वगैरे लिहिले गेले. चॅनेलवर चर्चा झडल्या. आता परिस्थिती पूर्ववत् झाली. वाहिन्यांना नवीन विषय मिळाले. त्यामुळे मुंबईत आता सर्वच आलबेल आहे, असेही वाटू शकते. वस्तुस्थिती मात्र तशी नाही आणि राहूही शकत नाही. मुंबईची मूळ समस्या समजून घेणे आवश्यक आहे.
 
मुंबई हे नाव या ग्रामदेवतेच्या म्हणजे मुंबादेवीच्या नावाने पडले. या शहराला हजारो वर्षांचा इतिहास आहे. हे शहर सात बेटं मिळून तयार झाले. ही बेटं म्हणजे कोलाबा, माझगाव, माहीम, परळ, वरळी, मुंबई बेट व महिलांचे बेट, म्हणून आजही परळ, माझगाव, माहीम, कोलाबा किंवा वरळी गाव येथे जुनी वस्ती व पुरातन संस्कृती पाहायला मिळते. बेटं म्हटली की समुद्र आलाच आणि ती समुद्रसपाटीपासून उंच असणारच, हे सांगणे न लगे! जोपर्यंत लोकांची वस्ती बेटांवर असते तोपर्यंत पाऊस, भरती आणि ओहोटी या समस्या राहत नाही. मात्र, कालांतराने, विशेषत: स्वातंत्र्यानंतरच्या काळात ठाणे-कल्याण आणि बोरीवली-वसईपर्यंत उपनगरे अस्तित्वात आली. लोकांचा ओढा मुंबईकडे वळू लागला. सर्व बेटे एकमेकांना जोडायला सुरुवात झाली आणि मग सात बेटांचे मुंबई शहर एकसंध शहर म्हणून नांदू लागले. मात्र, जोडली गेलेली वस्ती ही समुद्रसपाटीपासून कमी उंचीवर असल्याने अडचणी निर्माण झाल्या. पूर्वी पावसाळी पाण्याचा निचरा करण्यासाठी पुरेशी व्यवस्था होती आणि सर्व सांडपाणी समुद्रात जात असे. नंतर लोकसंख्या वाढली आणि गगनचुंबी इमारती आल्याने निचरा जाण्याच्या यंत्रणेवर भार येणे साहजिकच होते. मात्र, त्यातूनही मुंबई काही काळ तरून निघणार होती. कारण नाल्याची रचना ही मुंबईच्या मिलचा कचरा, गाळ आणि पाणी वाहून नेऊ शकेल अशी होती. जेव्हा बांधकामे फारच जास्त वाढली, तेव्हा मात्र मुंबईची व्यवस्था कोलमडणारच, यात काही शंकाच नव्हती.
 
यावर उपाययोजना म्हणून सरकारने-पालिकेने काहीच केले नाही, अशी ओरड नेहमीच होत असते, ती पूर्णत: सत्य नाही. कारण, समस्येचे मूळ व निवारण केवळ शासन करू शकते, असा समज करणे चुकीचेच ठरेल. शहराचा कचरा आणि गाळ हा समुद्रात सोडून दिला जातो. या शहराला असे चार-पाच पंपिंग स्टेशन आहेत, ज्याला दारं असतात. समुद्राला भरती आली की, ही दारं बंद करून पंपाच्या साहाय्याने पाणी समुद्रात सोडले जाते आणि आहोटीच्या वेळेत हे काम नैसर्गिक रीत्या पार पडत असते. पालिकेचे कर्मचारी कामच करीत नाहीत, असेही म्हणणे चुकीचे आहे. ते आपापल्या परीने काम करीत असतातच. अन्यथा ही यंत्रणा सुरळीतपणे चालणे शक्य नव्हते. काही कामचुकार असतीलही, मात्र तो प्रश्‍न केवळ पालिकेतील कर्मचार्‍यांशी निगडित नसून ‘राष्ट्रीय’ प्रश्‍न आहे. कामचुकारपणा हा आपल्या समाजाला जडलेला रोग आहे. कोणतेही कार्यालय, संस्था हे केवळ सरासरी ३० टक्के लोकांच्या भरवशावर कार्यरत असते. इतर सर्वच तुमच्याआमच्यासारखे काम न करता यंत्रणेवर तोंडसुख घेणारे असतात. आज किमान कचरा साफ करणारे कर्मचारी उपलब्ध तरी आहेत. कालांतराने हे काम करणारे दुर्मिळच होतील. कोणती व्यक्ती हे काम स्वेच्छेने करणार आहे? आपल्यासारखे सुज्ञ लोक स्वत:च केलेला कचरा साफ करण्यातही कमीपणा बाळगतात. मूळ समस्या नालेसफाईची नाहीच, तर कचरा करण्याच्या सवयीची आहे!
 
आपलं घर स्वच्छ ठेवायला आपल्याला आवडते, मात्र आपल्या घरातला कचरा आपल्या उंबरठ्याच्या बाहेर ढकलून आपली जबाबदारी संपत नाही. आपणापैकी किती बरे कोरडा कचरा आणि ओला कचरा विभागून ठेवतात? आपल्या घराबाहेरील कचरा पुढे नेण्याची व्यवस्था आपण करतो का? कचर्‍यामध्ये प्लास्टिक, थर्माकोलसारखे पदार्थ किती प्रमाणात असतात? सार्वजनिक ठिकाणी कचरापेटी असतानाही आपण तिचा वापर करतो काय? जिथे वाटेल तिथे तोंडातून पिचकारी मारणे, थुंकणे, कचरा फेकणे हे सर्वच काय दर्शविते? नाल्याकाठी झोपडपट्‌ट्या हे तर समीकरणच झाले आहे. नालेसफाई करणार्‍यांची संख्या कचरा करणार्‍यांच्या संख्येपेक्षा जास्त करणे कोणत्याही शासनाला शक्य नाही. मात्र, जनतेने सुज्ञपणा दाखविला, तर कचरा करणार्‍यांची संख्या कमी होऊ शकेल आणि मग कचराही आपोआप कमी होईल.
 
शासनाने एक गोष्ट प्रकर्षाने अंमलात आणणे आवश्यक आहे की, कचर्‍यासाठी विशेष डम्पिंग यार्ड निर्माण करून त्याची सातत्याने विल्हेवाट लावणे. विदेशामध्ये हे का शक्य आहे? कारण तेथे सरकार आपले काम चोखपणे बजावते आणि जनतादेखील तेवढ्याच जबाबदारीने वागत असते. हातातील कचरा टाकण्यासाठी कचरापेटी शोधून तिथपर्यंत ते जातात. आपलीच मराठी मंडळी विदेशामध्ये, विशेषत: युरोपमध्ये मोठ्या प्रमाणात पर्यटनाला जातात. तेथे किती छान राहतात. ते भारतीय किंवा मराठी आहेत, यावर विश्‍वासच बसत नाही! स्वच्छतेचे महत्त्व गाडगेबाबा, गांधीजींसारख्या अनेक महानुभावांनी पटवून दिले आहे. स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदीदेखील त्यासाठी प्रयत्नशील आहेत. स्वच्छतेचा विषय हा आरोग्याशीदेखील निगडित आहे. आपण इतिहासातून काही धडा घेत नाही. अस्वच्छतेमुळे कितीतरी महामारी निर्माण झाल्या आणि लाखो लोक मृत्युमुखी पडलेले आहेत.
मुंबईचा विषय एक उदाहरण आहे. यावरून आपण बोध घेतला नाही, तर प्रत्येक मोठ्या शहरांमध्ये कमीजास्त प्रमाणात असेच प्रसंग अनुभवायला मिळणार आहेत. नागपूरसारख्या ठिकाणी समुद्र नसूनही पाऊस जर मोठ्या प्रमाणात पडला, तर पाणी साचण्याचे प्रमाण वाढत आहे. मागील महिन्यात परत युरोपला जाण्याचा योग आला. युरोपचे सर्वच खराब आणि म्हणून ते घेऊ नये, असे आपण मानतो. मात्र, त्यांनी केलेली काही बाबतीतील थक्क करणारी प्रगती कशी काय नाकारणार? एकीकडे दोन ते तीन हजार वर्षांपूर्वीची युरोपियन संस्कृती, तर दुसरीकडे दहा हजारांच्या वर वर्षांची असलेली भारतीय संस्कृती, या केवळ वर्षांच्या इतिहासात प्राचीनतेमध्ये आपण किती दिवस रमणार आहोत? गंगेसारख्या पवित्र नदीला आपण सोडले नाही! केवळ स्वच्छता या एकाच विषयावर अनेक देश पुढे चालले आहेत, आपण मात्र बेशिस्तपणे, बेजबाबदारपणे वागून ‘भारतीय रेल, हमारी संपत्ती’ या न्यायाने स्वत:चेच अतोनात नुकसान करीत आहोत.
राहिला प्रश्‍न मुंबईचा. मुंबईला केवळ नालेसफाईची नाही, तर प्रत्येक नागरिकाला सुज्ञ होण्याची आवश्यकता आहे, वास्तवाचे भान ठेवण्याची आवश्यकता आहे. आपणास झोपडपट्‌ट्‌‌‌या नको आहेत, मात्र झोपडपट्टीत राहणारे कामगार पाहिजेत. आपणास घाण नकोय्, मात्र आपल्या सवयी सोडायच्या नाहीत. पावसाने मुंबईचे जनजीवन ठप्प होते. त्याची चर्चाही होते, परंतु त्याची दुसरी बाजू काय? मोठ्या प्रमाणात तरुणाई समुद्राकाठी धिंगाणा घालते, कार्यालयाला सुट्टी मिळाली म्हणून मनोमन आनंदी होते, एक दिवस पाऊस अजून पडावा, असा धावा करतात. मात्र, दोषारोपण करण्यासाठी ती एक चांगली संधी असते.
Powered By Sangraha 9.0