‘डंका’ भारतीयांचा…!

19 Aug 2015 10:19:00

 
संगणकाचा शोध जरी विसाव्या शतकाच्या सुरुवातीला लागला, तरी त्याचा खरा उपयोग आणि जगाशी परिचय व्हायला बराच अवधी लागला. १९८० च्या सुमारास त्याचा खरा परिचय जनसामान्यांना होऊ लागला. राजीव गांधींना एका गोष्टीसाठी धन्यवाद द्यायला हवेत की, भारतात टोकाच्या विरोधाचे वातावरण असतानादेखील त्यांनी १९९० मध्ये संगणक आणायला परवानगी दिली! बघता बघता २५ वर्षांत जग आणि भारत या क्षेत्रात किती पुढे गेला आहे, हे आपण अनुभवतोच आहे. जगातील नकाशावर आपली गुणवत्ता सिद्ध करायला भारतीय तरुणांना हे एकमेव व्यासपीठ मिळाले होते. परकीय गंगाजळी मिळवायला खर्‍या अर्थाने सुरुवात झाली ती टाटा कन्सलटन्सी, इन्फोसिस, विप्रो यांसारख्या सॉफ्टवेअर कंपन्यांमुळे!
 
मोठमोठ्या कंपन्यांबरोबर आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय अधिकार्‍यांनी छाप पाडायला सुरुवात केली. मागील आठवड्यातील एका बातमीने सर्व भारतीयांची मान ताठ झाली. ‘गुगल’- या २२ लाख कोटींचे बाजारमूल्य असलेल्या कंपनीने तिच्या प्रमुखपदी, चेन्नईच्या ४३ वर्षीय सुंदर पिचाई नावाच्या आपल्या अधिकार्‍याची नियुक्ती केली. त्यांचा पगार किती? तर जवळजवळ १२० कोटी वर्षाला- म्हणजेच दहा कोटी महिन्याला- म्हणजेच तीस लाख दिवसाला! आपल्याला वाटेल, सुंदर पिचाई खूपच सुंदर- उत्कृष्ट पार्श्‍वभूमी असलेला, हाडामांसाचा नसलेला आणि स्वर्गातून प्रकटलेला…! पण, तसे नाही. तो चेन्नईच्या एका सामान्य कुटुंबातला मुलगा. छोट्याशा घरात राहणारा, आई स्टेनोग्राफर, बाबा इंजिनीअर, घरात टीव्ही, एसी, कार वगैरे काहीच नव्हते. होती एक लँब्रेटा- फटफटी! आयआयटी खरकपूरहून त्याने पदवी प्राप्त केली आणि चाणाक्ष बुद्धिमत्तेवर ‘गुगल’मध्येच गेली ११ वर्षे सतत नावीन्यपूर्ण कल्पना राबविल्या. ‘गुगल’च्या पुढे जगात एकच कंपनी आहे ती म्हणजे ‘ऍपल!’ ‘ऍपल’चे बाजारमूल्य ‘गुगल’च्या दुप्पट म्हणजे ४४ लाख कोटी! ‘गुगल’च्या प्रगतीने ‘ऍपल’च्या पोेटात धडकी भरत आहे.
 
सुंदर पिचाईसारखाच हैदराबादचा तरुण सत्या नादेला- जो ‘मायक्रोसॉफ्ट’ कंपनीचा प्रमुख आहे-त्याचे शिक्षण बी. ई., एम. एस., एम. बी. ए. व पगारही सुंदर पिचाईएवढाच! म्हणजे जागतिक क्रमवारीत पहिल्या पाच कंपन्यांपैकी दोन कंपन्यांच्या प्रमुखपदी भारतीय अधिकारी आहेत! ही यादी येथेच थांबत नाही. ‘पेप्सी’ कंपनीची प्रमुख इंद्रा नुई यादेखील तेवढ्याच पगारावर काम करीत आहेत व त्या चेन्नईच्याच आहेत. ‘मास्टर कार्ड’चे प्रमुख अजित बांगा, ‘सॅनडिस्क’चे संजय मेहरोत्रा, ‘सिटी बँके’चे विक्रम पंडित, ‘बोईंग’चे दिनेश केसकर… अशी अनेक नावे घेता येतील. सध्या चर्चेत असलेले नाव म्हणजे अजित जैन- जे वॉरेन बुफेटचे उत्तराधिकारी म्हणून ‘वर्कशायर हॅथवे’ कंपनीची धुरा सांभाळण्याची शक्यता आहे!
 
का बरं भारतीय तरुणांना जागतिक नकाशात एवढ्या संधी चालून आल्या असतील? त्यातील प्रमुख कारण म्हणजे आपल्यावर लादली गेलेली इंग्रजी भाषा! ती इष्टापत्तीच ठरली. आज जगात या भाषेच्या प्रभावामुळे आपली मुले चटकन जगाशी जोडली गेली. चीनसारख्या देशाला विशेष प्रयत्न करून, त्यांच्या मुलांना इंग्रजी शिकवण्यासाठी १५-२० वर्षांचा काळ लागला. दुसरे म्हणजे आपली शिक्षण पद्धती- ज्यात प्रत्येक विद्यार्थ्याला किमान विज्ञान, गणित, भौतिकशास्त्र याचे धडे दिले जातात. गणितामध्ये आपली मुले सरासरीपेक्षा जास्त तल्लख असल्यामुळे अग्रेसर होता आले. त्याहीपेक्षा आपल्याकडील बाळकडूच असे असते की, मुलगा आई-वडिलांच्याच सान्निध्यात जास्त वाढविला जात असल्याने त्याची प्रगती खुंटते. मात्र, तोच मुलगा जेव्हा घराबाहेर पडतो, तेव्हा ती त्याच्यासाठी, त्याच्या कुटुंबीयांसाठी फारच आव्हानात्मक बाब म्हणून गांभीर्याने घेतली जाते. तोच मुलगा बाहेर पडल्यावर भरारी घ्यायला सुरुवात करतो आणि थेट सुंदर पिचाईच होतो!! मूल बाहेर पडले की, पदोपदी ते शिकत असते. चांगल्या गोष्टींचे अनुकरण करते. ‘घाट घाट का पानी पिना’ म्हणजेच काय, तर माणसं वाचायला- समजायला शिकणे. त्याने त्यांची उत्तरोत्तर प्रगती होत असते.
 
सर्वच यशस्वी लोकांची गाथा पाहिली की, एक गोष्ट लक्षात येते, ती म्हणजे कठोर परिश्रम! कठोर परिश्रम दिशाहीन असले की, यश मिळत नाही. त्यासाठी फोकस होेणे गरजेचे आहे. म्हणजे काय? असे म्हणणे म्हणजे शांतपणे डोळे मिटा, देवाचे मनन करा म्हणजे देव पावेल. अशाने देव कधीच पावत नाही. फोकस होणे म्हणजे, आज आपल्याला जी चालून आलेली संधी आहे, तिला पूर्णपणे कवेत घेऊन तिचे सोने करणे! ‘मी हे करू का, की नाही?, याने काही फायदा होणार आहे काय? मला तर अमुक गोष्ट हवी आहे, मग ही संधी माझ्या काय कामाची?’ या विचारात अडकला की, समजा गाडीला फुल ऍक्सेलेटर दिला, तरी ती न्यूट्रलमध्ये खरखर आवाज करणार! कालांतराने आपल्याला कळते की, आपली गाडी आहे तेथेच आहे अन् इतर गाड्या समोर निघून गेल्यात…!
 
संधीचे सोने करणे म्हणजेच आयुष्यात एक पायरी पुढे जाणे. पायरी ओलांडली, तरच दुसरी संधी तुमची वाट पाहत असते. अशा प्रकारे एकेका संधीचे सोने करायची सवय लागली की, तुमचा प्रवास उच्च स्थानाकडे मार्गक्रमण करीत असतो. यश हे नदीच्या वाहत्या प्रवाहासारखे असते. पायरीवर स्थिरावले की समजायचे, प्रगती खुंटली! सुंदर पिचाईला आता ‘गुगल’चे प्रमुखपद मिळाले म्हणून तो थांबणार नाही. तो ‘गुगल’ला ‘ऍपल’ कंपनीच्या पुढे नेण्यासाठी प्रयत्न करणार आहे. ‘ऍपल’ला मागे टाकल्यावर काय, तर त्याला त्याचेच ‘मैलाचे दगड’ ठरवावे लागणार आहे. क्रिकेटमध्ये कित्येक वर्षे गावसकरच्या ३४ शतकांचा विक्रम अबाधित होता. मात्र, सचिन तेंडुलकरने ३४ वर प्रवास थांबविला नाही, तर एकदिवसीय आणि कसोटी मिळून १०० शतकांचा पल्ला गाठला! जेव्हा शरीराने आदेश दिला- ‘आता थांब!’ तेव्हाच तो थांबला. उगाचच नाही ‘भारतरत्न’ म्हणून त्याला मान मिळाला.
डॉ. एपीजे अब्दुल कलामांबद्दल काय बोलायचे? त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या एकेक गाथा मनाला थक्क करून सोडणार्‍या आहेत. एकाच व्यक्तीमध्ये संताचे गुण, राष्ट्रप्रेम, तरुण पिढीला घडवण्याची तळमळ, अफाट ज्ञान व बुद्धिमत्ता, साधेपणा, पैसा आणि प्रसिद्धीपासून दूर… हे सर्वच विस्मित करणारे आहे. आपल्याला साधा गणेशोत्सव मंडळातर्फे पुरस्कार मिळू शकत नाही! कलामसाहेबांना एक नव्हे, १६ ‘डॉक्टरेट’, ‘भारतरत्न’, ‘भारतभूषण’, ‘पद्मविभूषण’, ‘पद्मश्री’… सर्वच पुरस्कार मिळतात आणि भौतिक प्रगती म्हणून त्यांच्या नावावर काय जमा आहे? तर एक छोटासा फ्लॅट- जो संशोधनासाठी दान केला! पुस्तके मात्र २५००. कपडे किती? तर तीन पॅण्ट आणि तीन सूट! स्वत:ची पेन्शनदेखील ते आपल्या गावासाठी दान देत असत. मृत्यूही किती चांगला म्हणता येईल- तो म्हणजे- त्यांचे अत्यंत आवडीचे काम- शिकवताना येणे!
 
थोडक्यात काय, तर प्रत्येकाच्या यशोगाथेवरून एकच लक्षात येते की, कुणालाही यश सरळसोप्या मार्गाने मिळत नाही. त्याचबरोबर कठोर परिश्रम, सातत्य, चिकाटी, प्रामाणिकपणे प्रयत्न हेदे़खील आवश्यक असते. हा प्रवास करताना खरी कसोटी असते की, वेगवेगळ्या प्रकारचे आकर्षण कसे हाताळायचे? कारण, मनुष्यस्वभाव म्हणून सर्वच गोष्टी एकाच वेळी करायची इच्छा होत असते. त्यात त्या एकाच वेळी मिळाल्या की, मग निश्‍चयातळी दृढता कमी व्हायची शक्यता जास्त असते. बहुतांश लोक त्याला बळी पडतात, त्यामुळे ‘काबिलियत’ असूनदेखील यशाच्या शिखरावर पोहोचता येत नाही. तसे आयुष्य जगणे म्हणजे फारच त्यागमय असते. आपल्याला देवाचे रूप आवडते. त्याला मिळणारा प्रसाद, दर्शनार्थींची रांग, दानपेटीतला पैसा, भव्यदिव्य प्रासाद, ओवाळलेली आरती… सर्वच किती छान वाटते. मनात असे विचार येतात की, आपणदेखील देवासारखे होऊ शकलो तर…? पण, आपल्याला त्याच्या वेदना काही कळत नाहीत. प्रत्येक व्यक्ती त्याच्यापाशी गार्‍हाणेच घेऊन जाते अन् चमत्कार मागते. प्रत्येकाला आपापले दु:ख डोंगरासारखे वाटते. देवाकडून दु:खहरण करवूनही घेतो; मात्र देवाचे दु:ख, त्याच्या यातना, त्याच्या अडचणी तो कुणाकडे सांगू शकतो काय…?
Powered By Sangraha 9.0