अखंड भारत

05 Aug 2015 14:14:38
 

 
ब्रिटिशांच्या जोखडातून भारत देश १९४७ च्या ऑगस्टमध्ये मुक्त झाला. काहींना भारतीय म्हणून, तर काहींना पाकिस्तानी म्हणून स्वातंत्र्य मिळाले. पुढे पाकिस्तानचे तुकडे होऊन १९७१ मध्ये बांगलादेशची निर्मिती झाली. काश्मीरचा विषय अर्धवट राहिल्याने, अजूनही पाकव्याप्त काश्मीर/आझाद काश्मीर आणि भारतव्याप्त काश्मीर/जम्मू-काश्मीर अशा प्रकारचा वाद भारत आणि पाकिस्तानमध्ये सुरूच आहे. मात्र, यापेक्षा वेगळा एक विषय- जो गेली ६८ वर्षे अनिर्णीत अवस्थेत होता- आणि जवळपास पन्नास हजार लोक अजूनही ना भारताचे, ना बांगलादेशचे नागरिक होते. त्यांना कोणत्याही प्रकारची ओळख नव्हती. अन्न, शिक्षण, वैद्यकीय सेवा यांपैकी काहीही मिळविण्यासाठी परवानाच नव्हता. स्वत: ओळख लपवून जीवन जगत होते. मागील शुक्रवारी, भारताचे केंद्र सरकार व बांगलादेशचे सरकार यांनी मिळून, ६८ वर्षे भिजत पडलेला निर्णय घेऊन, मानवतेच्या दृष्टीने एक मोठे पाऊल टाकले आहे.
 
स्वातंत्र्यापासून भारत आणि बांगलादेश (पूर्वीचा पाकिस्तान) या सीमाभागावर १६२ असे भूभाग होते, जे परकीय देशाच्या सीमेने वेढलेले होते. त्यातील १११ भारतीय भूभाग बांगलादेशमध्ये, तर ५१ बांगलादेशी भूभाग भारतामध्ये नांदत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पुढाकाराने हा विषय मागील शुक्रवारच्या मध्यरात्रीपासून मार्गी लागला. भारतात सर्वच बांगलादेशी भूभागातील जनतेने भारतीय नागरिकत्व स्वीकारले. एवढेच नव्हे, तर बांगलादेशमध्ये राहणार्‍या तब्बल १००० लोकांनी भारतामध्ये येण्याची व नागरिकत्वाची इच्छा व्यक्त केली. त्यापैकी शंभरी ओलांडलेल्या एका मुस्लिम वृद्धाची प्रतिक्रिया बोलकी होती. तो म्हणाला, ‘‘मी भारतीय म्हणून आता शेवटचा श्‍वास घेऊन जगाचा निरोप घेऊ शकतो.’’ यावरून अनेक प्रश्‍न पुन्हा उपस्थित होतात. आज माध्यमांच्या माध्यमातून, राजकीय भाषणावरून, आतंकवादी कारवायांवरून असेच वाटते की, भारत आणि पाकिस्तान किंवा भारत आणि बांगलादेश हे कट्टर दुश्मन आहेत आणि दोन्ही देशांचे नागरिक एकमेकांचे कट्टर वैरी आहेत. वरील घटना बोलकी आहे. प्रत्येक नागरिकाला इतर देशातल्या नागरिकांप्रति प्रचंड कुतूहल आहे. आजही अनेक भारतीय नागरिकांना पाकिस्तान पाहायची इच्छा आहे; तसेच पाकिस्तानी नागरिकांना किंवा बांगलादेशी नागरिकांनादेखील भारत पाहायचा आहे. एका देशातील खेळाडू, गायक, कलाकार दुसर्‍या देशात प्रचंड कुतूहलाचा विषय होतात.
 
याचे कारण म्हणजे, या संपूर्ण भारत खंडाची संस्कृती एकच आहे. साम्य आणि साधर्म्यातूनच जास्त कुतूहल आणि जिव्हाळा निर्माण होत असतो. धर्माच्या नावाने रक्ताचे, जिवाभावाचे नाते मिटू शकत नाही, हेच खरे! शेवटी धर्म म्हणजे तरी काय? तो जर असेल, तर मानवजातीत जन्म घेतल्यावर निसर्गनियम बदलतात काय? निसर्गनियम किंवा ईश्‍वरी नियम यात कुठे मूलभूत फरक आहेत काय? जे काही फरक आहेत ते मूठभर लोकांनी स्वत:च्या स्वार्थासाठी लोकांवर लादलेले नियम आहेत. जे नियम मानवनिर्मित असतात ते काळाच्या प्रवाहात लोप पावतात, त्याला काहीच आधार नसतो. जे नियम निसर्गाशी किंवा विज्ञानाशी सुसंगत असतात तेच काळाच्या कसोटीवर टिकतात. देशाच्या सीमा जर निसर्गाने प्रदान केल्या असतील, तर त्या टिकतात. त्या बदलता येतात. मात्र, देशाच्या सीमा कुंपण घालून निर्माण केल्या की, त्या ध्वस्त होणारच!
 
या अनुषंगाने थोडे मागे जाऊ या. अखंड भारतावर इंग्रजांनी राज्य करायला सुरुवात केली. त्यांच्या चतुर व्यावसायिक विद्वत्तेसमोर आपली भाबडी, साधी-सरळ विद्वत्ता कमी पडली. आपला समाज सुस्त आणि विसकळीत होता. त्याचा फायदा इंग्रजांनी घेतला. आपण एकत्र यायला जवळजवळ ३०-४० वर्षे लागलीत. एकत्र यायची सुरुवात झाली तेव्हा अखंड भारताचे स्वातंत्र्य हाच एक विषय सर्वांच्या मनात होता. तेव्हाचे स्वातंत्र्यसेनानी बघितले, तर सर्वच राष्ट्रभक्त हिंदू, मुस्लिम, शीख, पारशी, इसाई- सर्वच आघाडीवर होते. भारतमातेसाठी जीव देण्यासाठी सज्ज होते. ते तसे नसते, तर मग केवळ पाकिस्तानच नव्हे, तर अजून जास्त देशांची निर्मिती झाली असती! मग मुस्लिमबहुल पाकिस्तानचीच निर्मिती का झाली? तेथील लोकांना ते हवे होते, की काही मूठभर लोकांच्या फायद्यासाठी ते होते? या पार्श्‍वभूमीवर अखंड भारताचे स्वप्न पाहणे म्हणजे वास्तवाला धरूनच नाही का? असे अनेक प्रश्‍न या अनुषंगाने निर्माण होतात.
 
खरे तर १९३० पर्यंत पाकिस्ताननिर्मितीचा विषयच नव्हता. मात्र, तद्नंतर इंग्रजांच्या ‘फोडा व झोडा’, ‘फोडा व राज्य करा,’ या नीतीला मुस्लिम नेतृत्व बळी पडू लागले. तिकडे इंग्लंडमध्ये १९४५ ला सार्वत्रिक निवणुका झाल्या, ज्यात लेबर पक्षाचा विजय झाला. त्या पक्षाचे धोरण असे होते की, ब्रिटिशांना परदेशात जास्त काळ राज्य करणे शक्य होणार नाही, तो पसारा सांभाळणे पेलवणारे नाही. कारण सर्वत्रच आणि विशेषत: भारतामध्ये इंग्रजांविरुद्ध जबरदस्त असंतोष निर्माण झाला होता. त्याच काळात दुसरे जागतिक महायुद्धदेखील जगाने अनुभवले. जागतिक महायुद्धाला भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचा विरोध असल्याने, अनेक नेते तुरुंगात डांबले गेले होते. भारतातील ब्रिटिश व्हाईसरॉय माऊंटबॅटनला जून १९४८ ची कालमर्यादा दिली होती- भारताला स्वातंत्र्य बहाल करण्याकरिता. जिनांच्या ऑगस्ट १९४६ च्या ‘डायरेक्ट ऍक्शन डे’मुळे वातावरण तापायला लागले होते. महायुद्धाच्या झळा भारतामध्ये लागायला सुरुवात झाली होती. अन्न, आरोग्य, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ लागला होता. आजचा जो पाकिस्तान आहे तेथे बहुसंख्य सधन व जमीनदार मुस्लिमांची संख्या जास्त होती. त्यांच्या मनात विचार घोळायला सुरुवात झाली की, स्पर्धेपेक्षा, आयता स्वतंत्र देश आपल्याला मिळाला, तर आपले फावेल. अनेक हिंदू सावकार व मुस्लिम कर्जदार अशी स्थिती असल्याने, तेथील मुस्लिम कर्जदारांना स्वातंत्र्य म्हणजे कर्जमुक्तीची संधी! असे वाटले. माऊंटबॅटनलादेखील सर्व परिस्थिती, गंभीर समस्या पेलवत नव्हती, त्याला घाई झाली. त्याने स्वातंत्र्याची तारीख जून १९४८ वरून ऑगस्ट १९४७ केली. एवढेच नव्हे, तर १९४७ ला १७ ऑगस्ट ठरली असताना १४ व १५ ऑगस्टलाच देशाची फाळणी केली.
 
देशाची फाळणी कुणाच्या मार्गदर्शनाखाली केली? तर सीरिल रॅडक्लिफ नावाचा एक इंग्रज वकील-ज्याला येथील भौगोलिक परिस्थितीची अजिबात जाण नव्हती! त्याने वापरलेले नकाशे व जनगणनेचे आकडेदेखील अद्ययावत नव्हते. भारतीय कॉंग्रेसचे अनेक नेते शेवटपर्यंत तुरुंगातच असल्यामुळे, फाळणीच्या वेळी कोणत्याही पद्धतशीर अभ्यासाशिवाय निर्णय घेण्यात आले. एक कोटीच्या वर नागरिकांचे स्थलांतरण व १० लाखांपेक्षा जास्त लोकांना कंठस्नान, अशा प्रकारची फाळणी जगाने पहिल्यांदाच अनुभवली! फाळणीमध्ये मुंबई, दिल्ली आणि कोलकाता भारतात असल्याने, तीनचतुर्थांश आर्थिक सत्ता भारताकडे होती. भारताला लोकशाहीचा भक्कम आधार मिळाला, तर पाकिस्तानला मिलिटरीचा! ज्या देशाची रचनाच कोणत्याही प्रकारच्या आधारावर झाली नाही, त्याचे भवितव्य किती दिवस टिकणार आहे? तेथे कुणाचे राज्य चालते, हे जग बघतेच आहे. अशा प्रकारचा गाडा देशाच्या इतिहासात अजून काही दशके चालेल. पुढे काय? आजही आपण दुबईत गेलो, तर तेथील पाकिस्तानी सामान्य जनता आपल्याशी कसे वागते, हे अनुभवण्यासारखे आहे. त्यांच्या मनात प्रचंड कुतूहल आहे. ते म्हणतात, ‘‘आम्ही आमच्या कराचीत मुंबई, तर लाहोरमध्ये दिल्ली बघतो व दुधाची तहान ताकावर भागवतो!’’ जे आज ६८ वर्षांनंतर बांगलादेशातील ५१ ठिकाणांबाबत घडले, तेच पाकिस्तानच्या बाबतीत घडेल, कदाचित १६८ वर्षांनी! पण घडणार, ही तर काळ्या दगडावरची रेघच आहे! कारण तोपर्यंत दोन्हीही समुदायांच्या लक्षात एक बाब आली असेल. ती म्हणजे, दोघांनाही एकमेकांशिवाय गत्यंतर नाही आणि नांदण्यासाठी भारतासारखी दुसरी संस्कृती नाही…!
Powered By Sangraha 9.0