पटेल, नापटेल…

02 Sep 2015 14:04:50
 

आपल्या देशात ठरावीक काळाने ‘अवतार पुरुष’ जन्माला येत असतात. अण्णा हजारे, अरविंद केजरीवाल आणि आता नव्याने येऊ घातलेला हार्दिक पटेल! या प्रातिनिधिक नावावरून एक गोष्ट लक्षात येते की, आपल्या जनतेला ‘अवतार पुरुष’ कोणत्याही वयाचा असलेला चालतो. तो फक्त आपला तारणहार आहे, हे अभिनयाद्वारे सिद्ध करू शकला पाहिजे. तो केवळ अभिनय करणारा असल्यास वेगाने आपटी खातो आणि अभिनयासोबत काही प्रामाणिक गुणवैशिष्ट्य असल्यास जरा वेळाने आपटी खातो! त्याचे कारण म्हणजे, जेव्हा एक व्यक्ती संस्था म्हणून उदयाला येते, तेव्हा व्यक्तीचे गुणदोष संस्थेचे गुणदोष धरले जातात आणि संस्थाच खालसा होत असते. असे जरी असले, तरी मग कालांतराने जनता नवनव्या व्यक्तींच्या मागे का लागते, हेदेखील विचार करण्यासारखे असते.
 
व्यक्तिगत पातळीवर व्यक्ती सारासार विचार करणारी असते. मात्र, समूह म्हणून जेव्हा विचार करतो, तेव्हा त्या एकत्रित विचाराची पातळी फारच खालची असू शकते. समूह केव्हा एकत्रित होतो, तर त्याला जेव्हा पाहिजे तसे प्राप्त होत नाही, प्राप्त झाले असेल तर त्याला अजून पाहिजे असते, सर्वांत जास्त मिळाले असेल, तर इतरांना नेहमी त्याच्यापेक्षा कमी मिळायला पाहिजे, या विचारांनी तो पछाडलेला असतो. मग तो एकटा काही करू शकत नाही म्हणून कळपामध्ये घुसतो, कळपाद्वारे त्याला एकत्रित बळ मिळालेले असते. शक्तिप्रदर्शनाने त्याला वाहवादेखील मिळते. मात्र, ते करताना त्याचा वैयक्तिक अजेंडा मनामध्ये ठासून भरलेला असतो. तसे असणे हे फारच स्वाभाविक आहे. कारण व्यक्ती म्हटले की स्वार्थ हे असणारच! समूहाला जोपर्यंत काही गमवायचे नसते, तोपर्यंत सर्वच उत्साही व एकत्रित माहोल असतो, आंदोलने होतात, प्रसिद्धी मिळते, टाळ्या पडतात आणि मग आपल्या शक्तीचा साक्षात्कार होतो. मग प्रत्येकाला उमगते की, हे जे काही आहे ते केवळ त्याच्याचमुळे आहे. जसे अण्णा हजारे हे सर्वोच्चपदी विराजमान होते. नंतर किरण बेदी, अरविंद केजरीवाल, योगेंद्र यादव, प्रशांत भूषण या सर्वांनाच वाटले की, केवळ माझ्यामुळे हे घडले आणि मग सर्वच विखुरले. अण्णांनाही स्वत:बद्दल आणि इतरांबद्दलचा गैरसमज लक्षात असेल.
हे सर्व का घडते, तर अशा प्रकारचे कार्य म्हणजे पावसाळी उगवणार्‍या छत्र्यांसारखे असते म्हणून! या प्रकारच्या कार्याला कोणतेही अधिष्ठान नसते, ना वैचारिक उंची. केवळ गर्दी एकत्र करणे किंवा मिळालेल्या गर्दीला आकृष्ट करणे, एवढेच यांना जमत असते. सामान्य माणूसदेखील दोन भूमिकेत जगत असतो. एक तर केवळ स्वत:चा विचार करून आणि जे स्वत:ला शक्य नाही ते समूहाच्या माध्यमातून मिळविण्यासाठी, म्हणजे दुसर्‍यांचा ध्वज खांद्यावर घेऊन पंढरपूर करणे!
 
अशाच प्रकारची गर्दी, मागील आठवड्यात गुजरातमध्ये हार्दिक पटेल नामक २२ वर्षीय तारणहार भासणार्‍या तरुणाच्या मागे दिसली. पटेल समाजाला आरक्षण, या विषयाला घेऊन आंदोलन सुरू झाले आहे. हे आंदोलन म्हणजे मुंबईच्या पेडर रोड किंवा नागपूरच्या सिव्हिल लाइन्स किंवा पुण्याच्या सदाशिव पेठमधल्या लोकांनी, आम्हाला वीजदरात माफी हवी, अशा प्रकारची मागणी म्हणावी लागेल! संपूर्ण देश खरे तर गुजराती समाजाकडे मोठ्या अभिमानाने पाहतो. कारण हा समाज नोकरीसाठी हात न पसरता, स्वयंरोजगार निर्मिती किंवा दुसर्‍याला रोजगार देण्यात धन्यता मानणारा समाज म्हणून. शेवटी आरक्षणाचा अर्थ काय? समाजातल्या दुर्बल घटकाला चांगले शिक्षण मिळावे व त्याद्वारे त्याला चांगली नोकरी मिळून त्याच्या जीवनात लक्षणीय बदल व्हावा. आज पटेल म्हटले की सरदार पटेल, केशुभाई पटेल, आनंदीबेन पटेल किंवा अमेरिका व कॅनडात गेलात, तर सर्व हॉटेल्स चालविणारे पटेलच! या समाजाला आरक्षण मिळावे म्हणून हार्दिक पटेल आता कंबर कसून उभे आहेत. त्यांचा युक्तिवाद असा की, केवळ ८-१० टक्के पटेल समाज श्रीमंत आहे. बाकी सर्वच खाण्यापिण्यासाठी मोताज! हे जर खरे असेल, तर इतर समाजातले जवळजवळ ९९ टक्के लोक खाण्यापिण्यासाठी मोताज आहेत, असेच म्हणावे लागेल! त्याचाच अर्थ असा की, ज्या समाजाला आर्थिक उन्नतीची गुरुकिल्ली गवसली आहे, केवळ त्याच समाजाने उन्नत व्हावे. बाकी समाज आहे तिथेच तो खितपत पडावा. खरेतर आपल्या देशात सात धर्म आणि १६५ जाती आहेत. त्या नष्ट व्हाव्या म्हणून आपल्या राज्यघटनेमध्ये प्रावधान केले. ते करताना विषमता दूर व्हावी म्हणून काही काळासाठी आरक्षण हा उपाय सुचविला. तो काळ केव्हा संपणार, हे काळच ठरवेल! आर्थिक विषमता या आधारावर आरक्षण दिले गेले तरच त्याचा फायदा होऊ शकतो. धर्माच्या आणि जातीच्या आधारावर आरक्षण असल्याने, जातीय व्यवस्था नष्ट होण्यापेक्षा वाढतच आहे. त्यात राजकीय पक्षांनीदेखील खतपाणी घातल्याने समस्या अजूनच गंभीर होत आहे.
 
सर्वोच्च न्यायालयाने ५० टक्क्यांच्या वर आरक्षण मान्य केलेले नसताना, नवनवीन समाज आरक्षण मागतो आहे. त्यांचे हे वागणे म्हणजे केवळ स्वत:पुरता विचार करणे, हेच आहे. या सर्वांचीच नेतेमंडळी शिक्षित तर आहेच ना. मग ते का नाही विचार करू शकत की, विहिरीत जेवढे आहे त्यापेक्षा जास्त पोहर्‍यात कसे येणार? पन्नास टक्क्यात सर्वांनाच कसे काय सामावता येणार आहे? का म्हणून जनतेला फूस लावून देशात दुही निर्माण करायची? हार्दिक पटेल तर प्यादे आहे, मात्र त्याच्यामागे फार मोठी प्रायोजित शक्ती दिसत आहे. वेळीच आपण सावध झालो नाही, तर ९० च्या दशकात जे विश्‍वनाथ प्रताप सिंगांच्या वेळी झाले तीच परिस्थिती निर्माण होणार आहे! देशामध्ये दुफळी निर्माण होऊ शकते. त्याचे कारण, देशात पहिल्यांदाच एवढे बहुमत घेऊन विकासाच्या मुद्यावर सरकार विराजमान आहे. विकासाच्या मुद्याला विकासाचे उत्तर देेणारा पक्ष किंवा नेता सध्यातरी दिसत नसल्याने, भावनिक मुद्यांवर देशाला विभाजित करणे व नरेंद्र मोदींना शह देणे, हे एकच ध्येय दिसते. जनतेनेदेखील धीराने घेणे आवश्यक आहे. देशाची स्थिती इतकी बिकट आहे की, तिला दुरुस्त करण्यासाठी पाच-दहा वर्षे एकहाती सत्ता ठेवणे आवश्यक आहे. जनतेलादेखील अधीर होण्याचे कारण म्हणजे, तिला तिच्या हयातीत सर्व पाहायचे असते. मात्र, फळ मिळायला जेवढा वेळ लगायचा तेवढा लागणारच (तूप खाल्ल्याबरोबर रूप येत नाही). विकासाच्या गतीवर शिक्कामोर्तब करताना, ‘ऍक्सिलेटर’चा ताबा मोदींना देणे व लागलीच ‘ब्रेक’चा ताबा एखाद्या हार्दिक पटेलकडे देणे, हे कितपत योग्य आहे?
 
हार्दिक पटेलांचा उत्साह इतका वाढला आहे की, ते आता संपूर्ण देशात २७ कोटी पटेल, कुर्मी, गुज्जर या सर्व समाजाला एकत्र करणार आहेत. कारण काय, तर आरक्षण पाहिजे म्हणून! म्हणजेच पोहर्‍यात जे आहे त्याचे लचके तोडणे, एवढाच कार्यक्रम दिसतो आहे व पर्यायाने राज्यघटना नाकारणे, हेच होय. सध्याच्या आरक्षण धोरणामुळे, आरक्षण नसलेल्यांच्या मनातली ती खदखददेखील म्हणता येईल. आज आवश्यकता आहे समाजातल्या प्रत्येक व्यक्तीने विचार करण्याची की, मला आरक्षण हवे आहे काय? त्याचे उत्तर, ‘होय’ असेच येणार! कारण, हव्यास हा माणसाचा गुण असतो व मिळत आलेली गोष्ट सोडणे त्यापेक्षा जास्त कठीण. पण, कधीतरी असा जर विचार झाला की, मला तर आवश्यकता आहे, मात्र माझ्या शेजारील बांधवाला माझ्यापेक्षा जास्त आवश्यकता आहे; तरच खरी आरक्षण पद्धती अस्तित्वात येऊन तिचा उपयोग होईल आणि हे केवळ जनतेला स्वत:च पुढाकार घेऊन करावे लागेल, नेत्यांच्या मागे लागून नाही! त्याकरिता जात-पात, धर्म याच्या पलीकडे जाऊन विचार करावा लागेल. देशाच्या हिताचा विचार करावा लागेल. ‘सर सलामत तो पगडी पचास!’ असा विचार करणारी संस्था नाही का आपल्या देशात? थोडा डोळसपणे विचार करा. अशी संस्था की, जी गेली ९० वर्षे सतत कार्यरत आहे. जिचे उद्दिष्ट संपूर्ण समाजाला जातिपातीच्या वर आणणे, एकत्रित करणे व सतत देशाच्या हिताचाच विचार करणे आहे. या संस्थेच्या कोणत्याही कार्यकर्त्याला किंवा पदाधिकार्‍याला, केवळ माझ्याच हयातीत सर्वकाही घडले पाहिजे, अशी अभिलाषा नाही. त्यामुळे विचारांमध्ये गल्लत नाही आणि कुठेेही शॉर्टकट नाही. ती संघटना नसेल पटत, तर राष्ट्रहिताच्या दृष्टीने विचार करणारी संघटना नव्याने सुरू करण्याचे धारिष्ट्य एकाने तरी दाखवावे…!
Powered By Sangraha 9.0