…यशाची रेष वाढवा!

22 Sep 2015 13:50:04
 
प्रत्येक विद्यार्थ्याचे शालेय जीवनापासून एक स्वप्न असते. कुणाला यशस्वी राजकारणी, कुणाला डॉक्टर, कुणाला इंजिनीअर, तर कुणाला वकील व्हायचे असते. हे स्वप्न बाळगताना त्या त्या क्षेत्रातील आदर्श व्यक्ती आपल्या डोळ्यांसमोर उदाहरण म्हणून असतात. राजकारणी म्हणा, डॉक्टर म्हणा किंवा वकील, तेथे अनेक लोक असले, तरी अत्युत्तम व्यक्ती विरळाच असतात. शालेय जीवनात एकाच वर्गातील सर्वच मुले आपापल्या परीने पराकाष्टा करतात. काहींच्या बाबतीत, त्यांच्या हुशारीमुळे ते तर नक्कीच यशस्वी होणार, असा तर्क लावला जातोच. प्रत्यक्षात मात्र तसे घडलेले उदाहरण विरळाच असते. किंबहुना एखाद्या विद्यार्थ्याकडून फारशी अपेक्षा नसतानादेखील तो बाजी मारून जातो व यशस्वी म्हणून किंवा प्रसिद्धीच्या पटलावर उजाळून निघतो. का असे घडत असावे?
 
कुणी त्याला प्रारब्ध म्हणतो, कुणी त्याला कर्माच्या सिद्धांताशी जोडतो, तर कुणी सरळ सोप्या भाषेत नशीब म्हणतो! हे जरी खरे आहे असे मानले, तरीही या सर्वांसाठी एक गोष्ट आवश्यक आहे, ती म्हणजे प्रयत्न करणे. प्रयत्नदेखील कसे? तर अविरतपणे आणि आयुष्याच्या सर्वच टप्प्यांवर करणे. यश मिळविण्यासाठी साधारणतः तीन टप्पे गाठणे आवश्यक आहे. त्यातील पहिला टप्पा आहे क्रियाशीलतेचा. भरपूर श्रम करून, भरपूर मेहनत करून नावारूपास येणे. पिरॅमिडचे उदाहरण घेतले, तर त्याचा पाया रूंद व मोठा असतो आणि तेथे सर्वांनाच समान संधी असते. जसे-मेहनत करून उत्तम गुण प्राप्त करणे व पदवी प्राप्त करणे. या टप्प्यावर लोकांची वाहवा मिळते, शाबासकी मिळते व लौकिक प्राप्त होतो. आनंदोत्सव साजरा करण्याचा हा टप्पा असतो. सर्वांनाच भरपूर गुण मिळून प्रत्येक विद्यार्थी येथे आलेला असतो. प्रत्येकासाठी मागील परीक्षा ही आयुष्यातली सोपी परीक्षा असते. कारण पुढे चढ असतो. मात्र, जो या टप्प्यावरच विसावला त्याचा कार्यभाग बुडालाच समजा! ती तर सुरुवात असते. खरी परीक्षा तर येथूनच सुरू होते.
 
त्यानंतर पिरॅमिड जसा अरुंद होत जातो तशी स्पर्धा वाढत जाते. दुसर्‍या टप्प्यावर पदवीसोबत गुणवत्ता सिद्ध करायची असते. गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी योग्यता प्राप्त करावी लागते. हाती आलेल्या संधीला दोन्ही हातांनी आत्मसात करायचे असते. कामात लक्ष पूर्णपणे केंद्रित करून त्यात निपुणता आणता आली पाहिजे, यालाच ‘स्किल डेव्हलपमेंट’ म्हणतात. या टप्प्यावर मोठ्या प्रमाणात लोक माघारलेले असतात. या टप्प्यावर जिद्द, चिकाटी, मेहनत व लक्ष्यप्राप्तीचे डोहाळे आवश्यक असतात. ते सर्व गुण सिद्ध करता आले, तरच पिरॅमिडचा तिसरा टप्पा गाठता येतो. तो टप्पा अरुंदच नाही, तर टोकदार असतो. म्हणजेच काय, तर तेथे सर्वच मंडळी माघारणार असून, केवळ एकच व्यक्ती विराजमान होणार असते.
 
तिसर्‍या टप्प्यावर विराजमान होण्यासाठी विचारांची स्पष्टता अत्यंत आवश्यक असते. त्याला विचारांमध्ये गल्लत करणे अपेक्षित नसते. विचारांमध्ये व्यापकता हवी, दिशा हवी, परिणामांची जाण हवी आणि काळानुरूप निर्णयक्षमता हवी. या टप्प्यावरील व्यक्तींची स्पर्धा स्वतःशीच असते. स्वतःचेच मापदंड पार करून नवनवीन कीर्तिमान करायचे असतात. आता विचार करून बघा, का एखादी व्यक्ती राजकारणात, वकिली व्यवसायात किंवा डॉक्टर म्हणून सर्वांत जास्त यशस्वी होते? आज नरेंद्र मोदी त्या पदावर विराजमान आहेत व करोडो लोकांचे आदर्शस्थान आहेत. त्यांच्या देहबोलीपासून तर आवाजाची फेक व विचारांची स्पष्टताच लोकांना आकृष्ट करते ना. केवळ भारतातच नाही तर विदेशात देखील ते लोकांना भुरळ घालताना दिसतात. त्यांच्या आयुष्यातला पहिला टप्पा म्हणजे १९९० चे दिवस आठवा. गुजरातमध्ये केशुभाई पटेल, शंकरसिंग वाघेलांसारखे अनेक दिग्गज होते. दुसर्‍या टप्प्यात ते गुजरातचे मुख्यमंत्री झाले आणि गोधरा हत्याकांडाचे आरोप किंवा तेथील भूकंपाने गुजरातचे झालेले अतोनात नुकसान, यावर मात करून ते तिसर्‍या टप्प्यावर पोहोचले आणि आज ते त्या ठिकाणी विराजमान आहेत. चांगल्या वकिलाचे उदाहरण घेऊ या. अनेक वकील परीक्षेत उत्तम गुण मिळवितात, मात्र त्यातील काहीच उच्च न्यायालयात ‘चांगला वकील’ म्हणून नाव कमावतात व त्यातूनही काहीच वकील सर्वोच्च न्यायालयात आपली छाप पाडतात. त्याचे कारण म्हणजे, आलेल्या केसचा अभ्यास करून त्याचा वेगळेपणाने विचार करू शकतात म्हणून! न्यायाधीशांसमोरदेखील आपला मुद्दा मांडताना शब्दांची निवड, आवाजाची फेक, मुद्दा पटवून देणे व हे करताना न्यायाधीशाला खिळवून ठेवणे. एखादा प्रतिप्रश्‍न न्यायाधीशाकडून आल्यास त्याला अलगदपणे फिरवून परत मूळ मुद्यावर आणणे. न्यायालयात हजर असलेले लोक सहजच विचार करतात की, आता हाच वकील केस जिंकणार. जेव्हा तेवढ्याच तोडीचा वकील प्रतिवाद करतो, तेव्हा पुन्हा विचारांचा पेंडुलम विरुद्ध दिशेकडे जातो. असा अनुभव जेव्हा घ्यायला मिळतो, तेव्हा विचारांची स्पष्टता काय असते, हे कळते.
राजकारण्यांचेही बघा ना. एकाने काही बाण सोडला की, तो रामबाण भासत असतो. मात्र, विरोधी नेत्याने प्रतिबाण सोडला की कळते, हे सर्व तिसर्‍या टप्प्यावर असलेले यशस्वी लोक कसा विचार करतात म्हणून. विनोद कांबळी व सचिन तेंडुलकर यांनी दोन टप्पे एकत्र काढले, मात्र तिसर्‍या टप्प्यात विनोद कांबळी मागे पडला आणि तेंडुलकर का सर्वोच्च पदी गेला, हे आपण बघतोच. यश प्राप्त झालेल्या व्यक्तीला आपण यशस्वी म्हणतो. मात्र, यशस्वी व्यक्तीला त्या स्थानावर निरंतर टिकून राहण्यासाठी किती कष्ट घ्यावे लागतात, याची आपणास कल्पना नसते. यश प्राप्त करण्यापेक्षा ते टिकवून ठेवणे जास्त आव्हानात्मक असते. काहींच्या बाबतीत आपण आपसूकच म्हणतो की, तो ‘बॉर्न लीडर’ आहे म्हणून. काहींच्या बाबतीत ते गुणधर्म कालांतराने कळतात. ते बरेचदा त्याच्यात असतात, पण सुप्त असतात. कधीकधी ते प्रयत्नपूर्वक आत्मसात केले जातात. मात्र, ते असणे आवश्यक आहे. अन्यथा तुम्ही यशस्वी व्यक्ती म्हणून आपले स्थान टिकवू शकणार नाही. कारण तेथेही सततची स्पर्धा असणारच. काय असतात ते गुणविशेष? एकतर त्या व्यक्तीमध्ये आत्मविश्‍वास ठासून भरलेला पाहिजे आणि नसल्यास दाखवता आला पाहिजे. तो ‘बोले तैसा चाले’ या उक्तीप्रमाणे वागणारा पाहिजे. तो लोकांमध्ये मिसळणारा पाहिजे व त्यांचे म्हणणे शांतपणे ऐकून घेणारा पाहिजे. ऐकून घेणे ही फार कठीण बाब आहे. त्याने लोकांच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी पूर्णपणे प्रयत्न करणे अपेक्षित आहे. कठीण प्रसंगात धीर न ढळू देणारा- कणखर असणे आवश्यक आहे. कुणाला काय वाटेल, यापेक्षा कुणाच्या काय हिताचे आहे, हे समजून निर्णय घेणारा पाहिजे. त्याच्या विचारांचा पल्ला लांब असणे आवश्यक आहे. तो लहान असल्यास, तो नेतृत्व करताना संस्थेला किंवा देशाला प्रगतिपथावर नेऊ शकत नाही. चारित्र्याचे बाबतीत तो निष्कलंक असला पाहिजे. यापैकी कोणत्याही बाबतीत तो कमी पडला, तर आपोआपच पिरॅमिडच्या कडावरून तो पायथ्याशी यायला वेळ लागत नाही.
वरील चर्चेवरून लक्षात येईल की, का म्हणून आपल्यापैकी व्यक्ती ‘मुलाचे पाय पाळण्यात’ दिसत असतानादेखील माघारते. केवळ अभ्यास व चांगले गुण मिळविणे ही तर सुरुवात असते. त्याने तुम्हाला वाहन चालविण्याचा परवाना मिळण्यास मदत होते. मात्र, वाहन रस्त्यावर हाकताना, वेळेत पोहोचायचे असताना, अपघात न करता ईप्सित स्थळी पोहोचण्यासाठी काय करावे लागते, हे आपण अनुभवातून जाणतोच. म्हणून एकमेकांची ईर्ष्या न करता स्वतःची रेघ कशी मोठी करता येईल, यावर विचार केल्यास व तसे प्रयत्न केल्यास आपल्या यशाचा पल्ला वाढविता येतो स्वत:ला दु:खी होण्यापासून वाचविण्याचा हाच खरा राजमार्ग आहे!
Powered By Sangraha 9.0