दिव्यत्वाची जेथ प्रचीती…

19 Jan 2016 17:15:33
 

महाराष्ट्र राज्य देशात प्रगत आणि अग्रेसर राज्य म्हणविले जात होते. आज ते काही राज्यांपेक्षा काही क्षेत्रात मागासले, असे म्हटले जाते. ते पुन्हा पूर्वपदावर आणण्याच्या दृष्टीने विद्यमान सरकार प्रयत्नशील आहे. या सरकारने पहिल्याच वर्षी 287 निर्णय घेतलेे आहेत. महाराष्ट्र सर्वांत अग्रेसर होण्याचे कारण काय? पश्चिम महाराष्ट्राच्या राजकीय मुत्सद्यांमुळे िंकवा त्यांच्यातील दूरदृष्टीमुळे? वगैरे प्रश्न नेहमीच मनात घोळत असत. त्यातील महत्त्वाचे कारण व उत्तर मागील आठवड्यात मला मिळाले. निमित्त होते- कोयना धरण पाहण्याचे व पोफळी येथील जलविद्युत निर्मितिप्रकल्प पाहण्याचे. विद्युतप्रकल्प पाहिल्यावर तर डोळ्यांचे पारणेच फिटते! सह्याद्री पर्वतरांगामध्ये, उंच उंच पर्वतांच्या पोटात, पायथ्याशी भुयार खोदून तो प्रकल्प निर्माण झाला. 2-2 कि.मी. लांबीच्या बोगद्यातून आत गेल्यावर हा प्रकल्प पाहायला मिळतो. तेथे 2000 मे. वॅ. क्षमतेची वीजनिर्मिती अव्याहतपणे होत असते. का व कसे हे ऊर्जानिर्मिती केंद्रं उभारले असतील, याचा शोध घेणे स्वाभाविकच होते.
 
एकोणविसाव्या शतकाच्या सुरुवातीला इंग्रजांचे राज्य होते व महाराष्ट्राचा बहुतांश भाग मुंबई राज्यात होता. तेव्हा दुष्काळ, दुर्भिक्ष, रोगराई यामुळे जनता त्रस्त होती. इंग्रजांना यासाठी काहीतरी उपाय शोधणे आवश्यक होते. ती जबाबदारी बेले नावाच्या इंजिनीअरने स्वीकारली. त्याचे लक्ष कोयना नदीकडे गेले. कोयनेचा उगम महाबळेश्वरच्या दक्षिण टोकाकडून होतो. तेथेच कृष्णा नदीचा उगम होतो. कोयना नदी प्रतापगडला वळसा घालून वाहते, तर कृष्णा दुसर्‍या मार्गाने वाहत जाते. कोयना नदीची एकूण लांबी, जी सह्याद्री पर्वतरांगेतून वाहते ती, 65 कि.मी. आहे. हेलवाक या गावाजवळ ती 90 अंशाच्या कोनात वळण घेते आणि पुढे 56 कि.मी.चा प्रवास करून कृष्णेला मिळते. इंजिनीअर बेलेंनी वर्षानुवर्षे कोयनेच्या प्रवाहाचा खोलात जाऊन अभ्यास केला. तिचे पात्र, चढाव-उतार, वळण, मागे येणारा प्रवाह या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून कोयना धरणाची जागा निश्चित केली. हे करताना त्याने इतर तीन ठिकाणेही तपासली होती, मात्र ती कल्पना रद्द केली.
 
धरण बांधण्याचा उद्देश होता पाणी अडवून िंसचन वाढविणे व त्याचबरोबर वीजनिर्मिती करणे. तेव्हा विजेची मागणी वाढत होती, म्हणून धरणाची जागा निश्चित करताना जलविद्युत ऊर्जानिर्मिती केंद्रासाठी जागा तपासणी सुरूच होती. सह्याद्रीच्या उंचच उंच रांगा, तेथे विद्युतनिर्मिती केंद्र उभारणे म्हणजे आव्हानात्मक बाब होती. वीजनिर्मितीसाठी पाण्याच्या प्रवाहाचा अभ्यास केला गेला. तो जितक्या जास्त उंचावरून असेल तितके टर्बाईन जास्त गतीने व क्षमतेने फिरते व वीजनिर्मिती होते. ते दरीमध्ये मोकळ्या जागेत करणेही शक्य होते. मात्र, त्यासाठी पाण्याची उंची, केंद्र उभारण्यासाठी लागणारे लोखंड, पैसा इत्यादी गोष्टी अनुकूल नव्हत्या. लोखंड आयात करावे लागणार होते व त्यासाठी त्याकाळी एक कोटी ऐंशी लाखाचे परकीय चलन आवश्यक होते, जे तेव्हा नव्हते. म्हणून पोफळीचे वीजनिर्मिती केंद्र भुयार खोदून पर्वताच्या थेट पायथ्याशी निर्माण करण्याचा निर्णय घेतला. दगडांचा अभ्यास, लोड बेअरिंग वगैरेचा अभ्यास झाला. पाण्याच्या दबावाचा अभ्यास झाला. एकीकडे धरणाचे काम, तर दुसरीकडे विद्युत केंद्राचे काम झपाट्याने सुरू झाले.
 
पोफळीचा हा प्रकल्प, सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास दोन कि.मी.च्या परिघामध्ये तयार झाला आहे. आतील भागात गेल्यावर असे वाटते, जणू चांगले फिनििंशग केलेले मोठमोठे हॉल आहेत. प्राणवायूचे प्रमाण टिकविण्यासाठी विशेष व्यवस्था आहे. सर्वत्र स्वच्छता आहे. तेथील अभियंते आणि कर्मचारी शिस्तीत व वेगळ्या प्रकारच्या धाटणीत वावरताना दिसतात. एकाच एमएसईबी कंपनीत अशा प्रकारच्या दोन संस्कृती पाहून आश्चर्य वाटले. या प्रकल्पांना पंडित नेहरू, डॉ. राजेंद्र प्रसाद, झाकीर हुसेन, मोरारजी देसाई अशा मातब्बरांनी, काम सुरू असताना भेटी दिल्या होत्या व अभियंत्यांचा उत्साह वाढविला होता. जगातील सातपैकी पाच आश्चर्ये पाहण्याचा योग मला आला, पण माझ्या दृष्टीने हे सर्वांत मोठे आश्चर्य म्हणावे लागेल. सर्वांनीच आणि विशेषत: अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी तर हे पाहायलाच हवे. डिझायिंनग व इंजिनीअरिंगचा तेथे उत्तम मिलाफ आहे. एवढ्या परिश्रमानंतर 1963 मध्ये पहिले ऊर्जानिर्मिती केंद्र कार्यरत झाले. यात काकासाहेब गाडगीळ, शंकरराव किर्लोस्कर, आत्माराम भट, सी. डी. देशमुख; तर अभियंता म्हणून मूर्ती, देऊस्कर या सर्वांचे मोलाचे योगदान लाभले आहे. 1968 मध्ये मोठा भूकंप झाला तरीही ना धरणाला, ना ऊर्जानिर्मिती केंद्राला काही धक्का बसला. यावरून त्याच्या डिझायिंनगचे महत्त्व लक्षात येते.
आज पोफळीचे हे ऊर्जानिर्मिती केंद्र ऊर्जाक्षेत्रात फार महत्त्वाची भूमिका निभावते आहे. कारण वीज साठविता येत नाही, तिची मागणी व पुरवठा कमीजास्त होत असतो, अशा वेळी कोळशावर चालणारे प्रकल्प हे रेल्वे इंजीनसारखे असतात. चालू करायला व बंद करायला 8-10 तास लागतात. मात्र, जलविद्युत केंद्र केवळ 90 सेकंदात म्हणजेच दीड मिनिटात चालू करता येतात. दुसरे, त्याद्वारे पर्यावरणाला काहीही त्रास नाही. कोणतेही प्रदूषण होत नाही. या प्रकल्पाच्या निर्मितीच्या वेळेतील खोलात गेल्यावर असे लक्षात आले की, त्यात काम करणार्‍या सर्वांनी एका राष्ट्रीय भावनेतून ते काम करण्याचा चंग बांधला होता. पैसा नाही म्हणून रडत न बसता वेगवेगळे उपाय शोधले. पै-पैचा हिशोब ठेवला गेला, एका पैशाचाही भ्रष्टाचार झाला नाही. अहोरात्र, तहानभूक विसरून काम केले गेले. हे सर्व आपल्या भारतातच घडले, यावर विश्वास बसत नव्हता. आपण इस्रायलचे उदाहरण ऐकतो. आपल्याकडेही ते शक्य आहे, हे या अनुभवातून पाहायला मिळाले.
 
कोयना प्रकल्पामुळे केवळ पश्चिम महाराष्ट्रच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राला त्याचा लाभ झाला. मात्र, पुढे जाऊन क्षेत्रीय राजकारणामुळे असमतोल वाढला, ही बाब वेगळी. परंतु, कोयनेच्या प्रकल्पातून अनेक गोष्टी शिकायला मिळतात. जर आपण राष्ट्रीय कर्तव्य आधी, हा विचार केला तर सर्वांचेच भले होणार असते. आज प्रकल्प म्हटला की प्रत्येकाला स्वत:चीच प्रगती आधी दिसते! लहान-लहान कामामध्ये असफलता दिसतात. इमारती पडणे, रस्ते वारंवार खराब होणे, धरणांमधून पाण्याची गळती होेणे, हे काय दर्शविते? भ्रष्टाचारामुळे असे घडते. वारंवार डागडुजीचे काम निघणे म्हणजे कंत्राटदारांचे फावते. तेच कोयना प्रकल्प व पोफळी प्रकल्पामध्ये तेथील अभियंते मोठ्या अभिमानाने सांगत होते की, आम्हाला डागडुजी, मेंटेनन्सवर काहीच खर्च नाही. एका ध्येयाने केलेले ते काम आहे.
 
आज आपल्या देशाने जी काही प्रगती केली आहे त्याचे श्रेय आपण राजकारणी, उद्योजक यांना देत असतो. मात्र, प्रत्यक्ष काम करणारे अभियंते, मजूर यांना पाहिजे तसे श्रेय दिले जात नाही. अशाच प्रकारचे दुसरे उल्लेखनीय उदाहरण म्हणजे इस्रोसारखी संस्था. येथील इंजिनीअर व शास्त्रज्ञ अहोरात्र, वेडे होऊन काम करतात म्हणून अंतराळात आपण आता स्वत:च्या बळावर यान पाठवीत असतो. विज्ञानाच्या साहाय्याने गतीने प्रगती करण्यास मदत होत असते. अनेकदा अभियंते व शास्त्रज्ञ एखाद्या बंद वातानुकूलित खोलीत बोलताना फारच साधारण व्यक्ती वाटतात. त्यांना बरेचदा आपली बाजूदेखील मांडता येत नाही. मात्र, हेच अभियंते जेव्हा महाकाय मशिनीपाशी जातात, तेव्हा त्यांचा आविर्भाव, आत्मविश्वास पाहण्यासारखा असतो. जोपर्यंत मशीनवर प्रेम करणारे अभियंते, कामगार व शास्त्रज्ञ हयात आहेत, तोपर्यंत आपला समाज व देश सुरक्षित आहे. जे मशीनच्या दूर आहेत, वातानुकूलित खोल्यांमध्ये बसून सूत्रसंचालन करतात, केवळ वाणिज्य व आर्थिक बाबींवर लक्ष देतात, त्यांच्याकडून भ्रष्टाचाराच्या घटना जास्त अनुभवायला मिळतात…
Powered By Sangraha 9.0