‘संघ’र्ष!

Vishwas Pathak2    22-Mar-2016
Total Views |

struggle_1  H x
 
 
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची प्रतिनिधी सभा आटोपली. ती दरवर्षीच होत असते व त्या सभेचा उद्देश वार्षिक सर्वसाधारण सभेसारखाच असतो. खरे तर सभेची कार्यसूचीदेखील ठरलेली असते. त्यामुळे त्यातून बातमी निघणे िंकवा काढणे सहज शक्य नसते. मग, वरिष्ठ पातळीवर फेरबदल होणार, गणवेश बदलणार, भाजपाच्या पदाधिकार्‍यांची कानउघाडणी होणार, यांसारख्या चर्चा झडायला लागतात. प्रतिनिधी सभा झाली की परत माध्यमे शांत होतात. यावेळी मात्र ‘लांडगा आला रे आला’ असेच झाले. गेल्या दशकापासून, संघ गणवेशात बदल करणार, अशा बातम्यांना पेव फुटत होते, जे या प्रतिनिधिसभेपूर्वी तितक्या जोरात चर्चेला नसतानादेखील, संघाने गणवेशात बदल केल्यामुळे माध्यमांची पंचाईत झाली. मग, तो निर्णय कसा आवश्यक होता वा कसा आवश्यक नव्हता, या दोन्ही बाजूंनी चर्चा झडणे सुरूच आहे.
 
खरे तर संघाच्या गणवेशात बदल होणे ही काही नावीन्यपूर्ण बातमी होऊ शकत नाही. कारण, संघाने टोपीपासून तर पायातील बुटांपर्यंत आवश्यकतेनुसार बदल केला. पूर्वी खाकी टोपी होती, खाकी सदरा होता, मिलिटरीसारखे लांब बूट होते, पट्‌टा चामड्याचा होता. काळानुरूप व तत्कालीन आवश्यकतेनुसार काळी टोपी, पांढरा सदरा, छोटे काळे बूट, रेक्झिनचा पट्‌टा असे बदल झाले. या बदलांचा काळ बघितला, तर साधारणत: दुसर्‍या महायुद्धाच्या काळापासून तर शेवटचा बदल जो पट्‌ट्याचा होता तो 2010 मध्ये झाला. म्हणजेच संघ बदलत नाही हा समज चुकीचा आहे. िंकबहुना कोणत्याही विचारांनी िंकवा संस्थेने शतकपूर्तीकडे वाटचाल करणे म्हणजेच त्यात लवचीकता आहे, हेच सिद्ध होते.
 
हे मात्र खरे की, यावेळचा बदल हा हाफपॅण्टवरून फुलपॅण्टवरचा असल्याने दृश्यस्वरूपात मोठाच आहे. संघाची हाफपॅण्ट हा अनेकदा टेहळणीचा विषय होत राहिला. संघाला जेव्हा संघर्ष करून वाटचाल करायची होती, तेव्हा हाफपॅण्टमध्ये समाजात वावरणे ही एक आव्हानात्मक बाब होती. विशेषत: नवीन वस्त्या, पाडेे, खेडे, यामध्ये जाणे म्हणजे विरोधी विचारधारेचे लोक स्वयंसेवकांना टार्गेट करीत असत. भारतात पाश्चात्त्यीकरणाचा प्रभाव व्हायच्या आधी हाफपॅण्ट घालणे तरुणांना लाजिरवाणे वाटायचे. त्याकाळातदेखील, संघाची हाफपॅण्ट घालण्यासाठी आग्रह करणे म्हणजे कठीणच बाब होती. कोणत्याही प्रदेशात नैसर्गिक आपत्ती आली की स्वयंसेवक, हाफपॅण्टमध्ये सर्वांत पुढे जाऊन सेवा देत असतात. प्रभात शाखेत स्वयंसेवक हाफपॅण्ट घालून वस्तीतून जाताना िंकवा सायं शाखेत स्वयंसेवक, शाखेत व शाखा सुटल्यावर संपर्काचे काम करताता हाफपॅण्टवर असतात. एकीकडे हाफपॅण्ट चर्चेचा विषय होत असतानाच, संघाच्या त्या हाफपॅण्टने केव्हा लोकांच्या मनात आदराचे, विश्र्वासाचे स्थान निर्माण केले, हे विरोधकांना कळलेच नाही!
 
ज्या प्रमाणे एखादा साधू, संन्यासी त्यांच्या वस्त्रात दिसला की, लोकमानस नतमस्तक होते, त्याचप्रमाणे संघाच्या स्वयंसेवकाकडे सामाजिक सेवाकार्य करणारा, राष्ट्रहिताय काम करणारा, लोकांच्या मदतीला धावून जाणारा, समाजातील वाईट प्रवृत्तींशी लढा देणारा, घराच्या चार िंभतिपलीकडे जाऊन संपूर्ण समाजच आपलं कुटुंब मानणारा व समाज ज्याच्याकडे एक आदर्श व्यक्ती म्हणून पाहू शकेल, अशा प्रामाणिक व्यक्तीचा संपूर्ण परिचय केवळ ती हाफपॅण्ट परिधान केल्यावर होत आलेला आहे. त्या गणवेशामध्ये निसर्ग आपत्तीचे मदतकार्य असो, मैदानावरील खेळ असो, शारीरिक व्यायाम असो, सर्वच बाबींसाठी ती फारच सोईस्कर आहे.
 
आज संघाची हाफपॅण्ट म्हणजे ब्रॅण्ड झाली होती. ब्रॅण्ड म्हटला की, ब्रॅण्डव्हॅल्यू आली. व्यावसायिकाच्या नजरेतून, संघाने शंभर वर्षे खपवून निर्माण केलेल्या ब्रॅण्डवर एका दिवसात अचानक पाणी कसे सोडले, याचे आश्चर्य वाटणे स्वाभाविक आहे. आज आपण अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय ब्रॅण्डचे मूल्यांकन अब्जो कोटींचे झाल्याचे वाचतो. तोच निष्कर्ष येथे लावला, तर हाफपॅण्टचा प्रामाणिकपणा दर्शवणारा, राष्ट्रप्रेम जागृत करणारा, समाजाचे उत्थान करणारा, संपूर्ण समाजाला एकत्र घेऊन जाणारा, जातिभेद न मानणारा असा ब्रॅण्ड- याचे मूल्यमापन केले तर तो सर्वांत मोठ्या किमतीचा ठरू शकेल. परंतु, जेथे मूल्ये जपली जातात- ते किमतीच्या तराजूत मोजताच येत नाही आणि ते अमूल्यच राहतात. मात्र, संघाने ते आपल्या परंपरेला साजेसे एका झटक्यात करून टाकले! कुणी असेही म्हणेल की, संघाला व्यावसायिक दृष्टिकोन नाही िंकवा व्यवहार कळत नाही. पण, एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की, आजचा देशाचा पंतप्रधान पूर्वीचा प्रचारक होता, अनेक राज्यांचे मुख्यमंत्री प्रचारक िंकवा स्वयंसेवक आहेत व देशाचा विकास, अर्थकारण कसे असावे याची ओळख जगाला करून देत आहेत.
 
संघ कधीच एखाद्या गोष्टीत गुरफटलेला नसतो. त्याग करून पुढे जाणे, हा त्याचा स्थायीभाव. कारण, व्यक्तीला तेथे महत्त्व नसून रचनेला महत्त्व आहे. व्यक्ती बदलत असतात, रचना नाही. आणि आवश्यकता पडलीच तर सामूहिक रीत्या स्वयंसेवक एकत्र येतात व रचनादेखील बदलतात. ते करताना अंतिम ध्येय व उद्दिष्टाला बाधा न येऊ देणे, याला सर्वोच्च प्राधान्य दिले जाते. त्यामुळे संघाचा एखादा निर्णय फारच अचूक वाटत नसला, तरी तो पूर्णपणे चुकला असे कधीच होत नाही. त्यामुळे हाफपॅण्टची जागा फुलपॅण्टने घेतल्यावर, माध्यमांनी व विरोधकांनी जी िंचता व्यक्त केली आहे ती दखल घेण्यासारखी नाही. गणवेशाला महत्त्व आहे, मात्र एखाद्या मर्यादेपर्यंतच. संघाचे काम आहे, सुसंस्कृत व्यक्ती निर्माण करण्याचे- घडविण्याचे. त्यामुळे संघाच्या स्वयंसेवकाने कोणता वेश परिधान केला, याला एका मर्यादेनंतर काही अर्थ नाही. जसे- संघाच्या विचारधारेतून निर्माण झालेली संस्था- भारतीय मजदूर संघ, तेथील सदस्यांसाठी कोणताही गणवेश नाही, परंतु इतर क्षेत्रातील कामगार प्रतिनिधी व भारतीय मजदूर संघाचा प्रतिनिधी यात फरक आढळतोच ना! कॉर्पोरेट जगतामध्ये, सरकारी यंत्रणेत, व्यवसायामध्ये सहजच आणि आपसूकच एका विशिष्ट वागणुकीमुळे खाजगीत विचारले जातेच की, ‘‘तुम्ही संघाचे का?’’ िंकवा अनेकदा मोठ्या अभिमानाने, व्यावहारिक अडचणी असल्या, तरीही ‘‘मीपण संघाचाच, बरे का!’’असे म्हणणारा मोठा वर्ग आहेच. पूर्वीचे केंद्रीय मंत्री वसंत साठेंसारखी अशी अनेक उदाहरणे देता येतील की ज्यांनी, ‘‘मी स्वयंसेवक होतो,’’ असे कबूल केले आहे.
 
संघाची खरी ओळख व ताकद ही स्वयंसेवकाच्या व्यवहारातूनच होत असते. गणवेश बदलले तरी त्याने फरक पडत नसतो. गणवेशच जर इतका महत्त्वाचा भाग असता, तर आणिबाणीच्या काळातदेखील संघाचे काम चालले व वृिंद्धगत झालेच नसते! भारताबाहेर जगात िंहदू स्वयंसेवक संघाच्या गणवेशात हाफपॅण्ट नाही, मात्र संघ तेथेही वाढतच आहे.
 
संघाने जेव्हा केव्हा बदल केला आहे तो विचारान्ती केलेला आहे व बदलानंतर संघकार्य वृिंद्धगतच झालेले आहे. फुलपॅण्टचा निर्णयदेखील तसाच सिद्ध होणार आहे. त्यामुळे बाल-शिशू-वृद्ध स्वयंसेवकाना, थंड प्रदेशातील थंडीची अडचण कमी होणार आहे, विशेष म्हणजे तरुणांना आकृष्ट करता येणार आहे व संघकार्य करणार्‍या कार्यकर्त्यांना सोयीचेच होणार आहे. एवढेच नव्हे, तर यातून अर्थकारणालादेखील बळकटी लाभणार आहे. आज 120 कोटी लोकसंख्येच्या देशात निम्म्या स्त्रिया धरल्या, तरी उर्वरित साठ कोटी जनतेपैकी किमान सहा कोटी स्वयंसेवक तरी असतीलच. सहा कोटी फुलपॅण्ट, पाचशेच्या भावाने म्हटले, तरी तीन हजार कोटींची उलाढाल देशात होणार आहे. कुणी त्याला ‘मेक इन इंडिया’चा उपक्रम म्हणूनदेखील बघू शकतात. बघता बघता फुलपॅण्टमधील गणवेशातला स्वयंसेवकदेखील तेवढाच स्वीकारार्ह राहील, हे लवकरच सिद्ध होईल. संघर्षातच संघ दडला आहे…!
 
– विश्र्वास पाठक
9011014490