पू. रज्जूभैय्या एकदा आमच्या शाखेत आले होते. मी पू. रज्जूभैय्यांना विचारले की, संघ आणि संघाचे काम कधीपर्यंत चालत राहील? उपस्थित स्वयंसेवक माझ्या प्रश्नावर हसले. पू. रज्जूभैय्या गंभीरपणे म्हणाले, "संपूर्ण समाज संघमय होईल त्यावेळी संघाचे काम झालेले असेल." १९८० च्या दशकाच्या सुरुवातीचा हा संवाद होता. आज २०२५ साली संघ शताब्दीच्या वेळी संघमय समाजाच्या उद्दीष्टाच्या दिशेने खूप मोठी वाटचाल झालेली दिसते.
माझे वडील वसंतराव पाठक मजदूर संघाचे काम करायचे. ते अत्यंत धडाडीचे आणि उत्साही नेते होते. आमचे संपूर्ण कुटुंब संघाचे होते. नागपूरजवळ अजनी येथे रेल्वे कॉलनीतील एका छोट्या रेल्वे क्वार्टरमध्ये आम्ही राहत होतो. वडिलांमुळे घरात सदैव संघ, जनसंघ, विश्व हिंदू परिषद आणि मजदूर संघाच्या अधिकाऱ्यांचे येणे जाणे असे. अजनीची रेल्वे कॉलनी म्हणजे कम्युनिस्टांची वसाहत होती. रेल्वेच्या कर्मचाऱ्यांमध्ये त्यांचे वर्चस्व होते. त्यात आमचे संघाचे घर एखाद्या बेटासारखे होते. घरची परिस्थिती कनिष्ठ मध्यमवर्गीयाची होती. त्या काळात बहुतांश कुटुंबात असे तशी महिनाअखेर असायची. लहानपणी मला एकदा विजयादशमीला संघाच्या संचलनाला जायचे होते. पण गणवेश नव्हता म्हणून जाता आले नाही. खूप वाईट वाटले. अखेरीस वडिलांनी माझी समजूत काढली. त्यांनी माझ्या खिशात दहा रुपये ठेवले आणि म्हणाले की, पुढच्या वर्षी गणवेश घेऊ मग संचलनाला जा.
आमच्या परिसरात अजनी ध्रुव नावाची संघाची शाखा चालत असे. ध्रुव नाव का दिले होते माहिती नाही. कम्युनिस्टांच्या वेढ्यात अढळ ध्रुव ताऱ्याप्रमाणे आमची शाखा ठाम होती. त्यामुळे असेल कदाचित. माधवराव पांढरीपांडे शाखा चालवायचे. अविनाश हरदास, राजाभाऊ घरोटे शाखेत असायचे. मी शाखेत जाऊ लागलो त्यावेळी शिशू होतो. पाच सहा वर्षांचा असेन. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी १९७५ साली आणीबाणी लादली आणि संघावर बंदी घातली. त्यावेळी माझ्या वडिलांनी भूमिगत राहून काम केले होते. आणीबाणी उठल्यानंतर संघाच्या कामाला पुन्हा गती आली. पुढे नागपूरच्या भगवाननगरमधील शरद नेऊरगावरकर यांची शाखा चालविण्यासाठी संघाने नेमणूक केली होती. त्यांच्यामुळे स्थायी रुपाने प्रभात आणि सायंशाखा भरत असे. माझे मोठे बंधू बन्सी पाठक शाखेचे कार्यवाह होते. शशांक शनवारे मुख्य शिक्षक होते. मी स्वतः गटनायक होतो.
माझ्या बंधूंचा आणि माझा शाखेच्या कामात उत्साही सहभाग असे. घरी संघाचे वातावरण असल्यामुळे असेल, त्याचबरोबर संघाच्या शक्तीमुळे असेल पण शाखेसाठी काम करण्यात आनंद वाटत असे. आमच्या शाखेत अधिकाधिक उपस्थिती असावी आणि स्वयंसेवक जोडले जावेत यासाठी आमचे प्रयत्न चालत असत. माझे मोठे बंधू दहावीत होते. ते आणि मी आमच्यापेक्षा लहान असलेल्या विद्यार्थ्यांच्या घरोघर जाऊन मोफत शिकवण्या घेत असू. त्यामुळे घराघरात संपर्क निर्माण झाला होता. त्याचा उपयोग असा झाला की, शाखेवरील दैनंदिन उपस्थिती शंभरची संख्या गाठू लागली.
आमचे भाग्य असे की, संघातील मोठमोठ्या अधिकाऱ्यांचा सहवास आणि मार्गदर्शन आम्हाला लाभले. आमचे मंडल कार्यवाह हरिअप्पा महाजन होते तर विभाग कार्यवाह रामभाऊ हरकरे होते. त्याच काळात अजनी नगर प्रचारक रविजी देशपांडे होते. त्यांना गोष्टी रंगवून सांगत महत्त्वाचे तत्त्व सोप्या शब्दात उलगडून सांगण्याची हातोटी होती. नागपूर प्रांताचे प्रचारक म्हणून डॉ. मोहनराव भागवत यांची नियुक्ती झाली होती. आता नागपूर नगर रचना असली तरी त्यावेळी नागपूर, विदर्भ आणि महाराष्ट्र हे तीन प्रांत होते.
मोहनजींचे व्यक्तीमत्व भारदस्त पण आपुलकी वाटणारे होते. पिळदार मिशा, भक्कम शरीरयष्टी, पायात मोजडी घातलेले मोहनजी रुबाबात व्हेस्पा स्कूटरवरून यायचे. त्यांच्या व्यक्तिमत्वात आत्मविश्वास आणि सहजता जाणवत असे. मोहनजी शाखेत येणार म्हटले की दहा दिशांनी आसपासची मुले धावत येत असत. कार्यकर्त्यांना कसे घडवायचे, त्यांना कसे पुढे न्यायचे याबाबतीत मोहनजींची अपार क्षमता जाणवत असे. मोहनजी संघात मोठ्या पदावर जातील अशी कुजबूज त्यावेळी चालत असे. झालेही तसेच. आज प. पू. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या नेतृत्वात संघ दिमाखात शताब्दी साजरी करत आहे.
शाखेचे कार्यवाह बन्सी पाठक नोकरीनिमित्त नागपूर सोडून गेले त्यावेळी शाखा कार्यवाह म्हणून माझ्यावर दायित्व देण्यात आले. मी पंधरा वर्षांचा होतो. शाखेत यायला लागलो त्याला नऊ दहा वर्षे झाली होती तरी कार्यवाहपदाच्या दायित्वासाठी लहान होतो. पण वरिष्ठांना माझ्याबद्दल विश्वास वाटला. शाखा जोमाने चालण्यासाठी मी योग्य रितीने काम करावे, यासाठी त्यांनी माझी तयारी करून घेतली. केवळ नववी पास असताना मला १९८० साली प्रथम वर्ष प्रशिक्षणाला पाठविण्यात आले. त्यावेळी नागपुरात प्रथम वर्षाचे प्रशिक्षण द्वीतीय आणि तृतीय वर्षासोबत चाले. त्यामुळे मला पंधराव्या वर्षीच तत्कालीन सर्व अखिल भारतीय अधिकाऱ्यांचे बौद्धिक ऐकण्याचे भाग्य लाभले. त्यापैकी बरेच माझ्या डोक्यावरून गेले, हा भाग वेगळा. पण एक महिन्याच्या प्रथम वर्ष प्रशिक्षणाच्या वर्गानंतर शाखेचा कार्यवाह म्हणून काम करण्यास मी बराच तयार झालो होतो. संघाचा सर्व भर व्यक्तीनिर्माणावर असतो. संघाच्या शाखेत विविध खेळ खेळताना न कळत व्यक्तीनिर्माण होत जाते. नेतृत्व गुण, वक्तृत्व, परोपकार याचे संस्कार सहज होत असत. संघात जातपात पाळली जात नाही. समरसतेचा संस्कारही होत असे. शाखेचे काम करताना मलाही संघ संस्कारांचा लाभ झाला.
एकूण देशात संघ कार्यात प्रतिकूलता असूनही १९८० च्या दशकात नागपुरात संघाचा वेगळाच प्रभाव होता. नागपूरच्या प्रत्येक वस्तीतून दोन तीन पूर्णकालिक प्रचारक निघायचे. माझ्या वडिलांची फार इच्छा होती की आम्हा दोघा भावांपैकी एक प्रचारक व्हावा. आम्हाला ते जमले नाही. पण मला एक समाधान आहे की, वयाच्या पाचव्या सहाव्या वर्षी अजनी ध्रुव शाखेत जाऊ लागल्यापासून जवळजवळ एक तप म्हणजे १२ वर्षे मी त्या शाखेत होतो व पूर्ण समरस होऊन संघाचे काम करत होतो.
संघाचे काम हे विराट यज्ञासारखे आहे. मला संघ तपस्येत एक तप समीधा टाकण्याची संधी मिळाली. वयाच्या अठराव्या वर्षी नोकरी मिळाली. घरच्या परिस्थितीमुळे अर्थार्जन करणे गरजेचे होते. नोकरीसाठी मी भुसावळला गेलो आणि अजनी ध्रुव शाखा सुटली. पण माणूस एकदा स्वयंसेवक झाला की, तो आयुष्यभर स्वयंसेवक असतो. तसे भुसावळला गेल्यानंतर किंवा नंतर नोकरी व्यवसायासाठी ठिकठिकाणी गेल्यावरही संघकार्यात यथाशक्ती सहयोग देत राहिलो.
संघाच्या शंभर वर्षांच्या वाटचालीपैकी अर्ध्या शतकाच्या वाटचालीचा मी सहयोगी साक्षीदार राहिलो. अपार संकटे, उपेक्षा, अपमान आणि हाल अपेष्टांवर मात करून संघाचे दैवी कार्य टिकून राहिले आहे. आज समाजाच्या सर्व क्षेत्रात संघ स्वयंसेवकांच्या यशाचा झेंडा फडकत आहे. पण त्यावेळी पू. रज्जूभैय्यांनी आम्हाला सांगितल्याप्रमाणे समाज संघमय व्हायचा आहे. आपल्याला अजून बरीच वाटचाल करायची आहे. समाधान याचे आहे की, आमच्या पाठक कुटुंबाप्रमाणे लाखो कुटुंबे संघकार्यात आनंदाने सहभागी झाली आहेत आणि माझ्यासारखे कोट्यवधी स्वयंसेवक अभिमानाने संघकार्य करत आहेत.