मुंबई लोकल : अनंत प्रश्न, अफाट प्रयत्न...

27 Jun 2025 13:20:15
 
Mumbai Local
 
मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या लोेकल रेल्वेच्या प्रवासावर मुंब्रा येथे नुकत्याच झालेल्या दुर्घटनेनंतर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. साहजिकच मुंबईकरांच्याही लोकल रेल्वे यंत्रणेकडून सुधारणेच्या प्रचंड अपेक्षा आहेत. पण, मागील ११ वर्षांत मुंबई लोकलच्या सेवेमध्ये निश्चितच काही सकारात्मक बदल झाले आहेत. त्यांचाच यानिमित्ताने आढावा घेणारा हा लेख... मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या लोकल रेल्वेचा नुकताच एक दुर्दैवी अपघात घडला. मुंब्रा स्थानकाजवळ लोकलमधून पडून चार प्रवाशांचा मृत्यू झाला आणि नऊ प्रवासी जखमी झाले. मृतांना मी श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबीयांवर किती मोठे संकट ओढावले, याची आपण कल्पना करू शकतो. बातम्यांनुसार दोन लोकल गाड्या विरुद्ध दिशेने एकमेकांच्या जवळून जात असताना एका गाडीतील प्रवाशाची बॅग दुसर्या लोकलमधील प्रवाशांना लागल्यामुळे १३ जण खाली पडले व त्यापैकी चारजणांचा मृत्यू झाला. लोकल गाड्यांमधून प्रवासी दारात लटकून प्रवास करतात, त्यामुळे असे घडू शकते. चौकशीअंती सत्य समजेल.
 
मुंबईत रेल्वेच्या लोकल सेवेची सुरुवात दि. ३ फेब्रुवारी १९२५ रोजी झाली. स्थापनेपासूनच लोकल रेल्वेसेवा मुंबईकरांची जीवनवाहिनी बनली. स्वस्त आणि गतिमान प्रवास हे लोकलचे वैशिष्ट्य. मुंबईकराला वेळेचे महत्त्व सर्वाधिक असते. वेळ वाचविणार्या लोकलमध्ये गर्दी असली, तरी ती सहन करून लाखो मुंबईकर लोकलने प्रवास करतात. सामान्यतः एक हजार, २०० प्रवाशांची क्षमता असलेल्या लोकलगाडीतून ‘पीक अवर’मध्ये सुमारे साडेतीन हजार प्रवासी प्रवास करतात. तीनपट प्रवासी प्रवास करतील, तर अवस्था होईल, हे स्पष्ट आहे.
 
मुंबई महानगर क्षेत्रातील दोन कोटी, ६० लाख लोकांच्या सेवेसाठी दररोज लोकलच्या तीन हजार, २१६ फेर्या होतात. मुंबई महानगर क्षेत्राची लोकसंख्या ही ऑस्ट्रेलिया देशाच्या लोकसंख्येएवढी आहे. लोकलमधून दररोज ६८ लाख प्रवासी प्रवास करतात. म्हणजे डेन्मार्क किंवा बल्गेरिया किंवा सर्बिया किंवा काँगो अशा संपूर्ण देशाने प्रवास करण्यासारखे आहे. मुंबईच्या लोकल रेल्वेचा अचाट कारभार आहे.
 
मुंब्र्याजवळच्या लोकल रेल्वेच्या अपघातामुळे मुंबई हादरली. मुंबईत प्रत्येक कुटुंबातील कोणीतरी दररोज लोकलने प्रवास करतो. आपल्याही बाबतीत असा अपघात घडू शकतो, या कल्पनेने मुंबईकरही हादरले. रोज लोकलच्या गर्दीतून कसा प्रवास करतो हे जाणवले. अस्वस्थ वाटणे स्वाभाविक आहे. पण, वर्षानुवर्षे असंख्य अडथळ्यांवर मात करत मुंबईकरांची सेवा करणार्या रेल्वेवर एखाद्या अपघाताच्या निमित्ताने टीकेचा भडीमार करणे धक्कादायक होते.
 
वळणदार मार्गावर लोकल गाड्या एकमेकांच्या जवळून गेल्याने अपघात घडला. हे वळण आधीच दुरुस्त करायला हवे होते, आता तरी दुरुस्त करा अशी मागणी करण्यात आली. कोणत्याही रस्ते किंवा रेल्वेमार्गावर वळणे, चढउतार आणि पूल असतातच. येथेही वर्षांनुवर्षे वळणावरून लोकल धावत होत्याच. रेल्वेमार्गातील एखादे वळण हटवून सरळ मार्ग करण्यासाठी जागा उपलब्ध आहे का, तांत्रिक समस्या काय येतील, अशा बाबींचा तरी विचार करायचा होता. पण, अपघात झाला की रेल्वेवर तुटून पडावे, असा प्रकार झाला.
 
रेल्वेचा अफाट पसारा
 
एक अपघात घडला आणि अनेकांनी रेल्वेवर राग काढण्यास सुरुवात केली. सामान्य प्रवाशांपासून एखाद्या पक्षाच्या प्रमुखापर्यंत अनेकांनी चिडचिड केली. जणू काही रेल्वेला प्रवाशांसाठी अनेक गोष्टी सहज करणे शय आहे. पण, रेल्वे तसे करत नाही म्हणून प्रवाशांचे हाल होतात, असे गृहीत धरून टीका केली. हे गृहीतकच चुकीचे आहे. लोकल रेल्वेचा अफाट पसारा आहे. मुंबईचे भौगोलिक क्षेत्र चिंचोळे आहे. नवे रेल्वेमार्ग उभारणे किंवा विस्तार करण्यासाठी जमीन उपलब्ध होणे ही मोठी समस्या आहे. उपलब्ध मर्यादित जागेत आणि प्रवाशांचा लोंढा चालू असताना रेल्वेला आपले विकास प्रकल्प राबवावे लागतात, ही मर्यादा तरी ध्यानात घ्यावी.
 
जागेच्या मर्यादेसोबतच रेल्वेला महानगरपालिका, ‘मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण (एमएमआरडीए)’, राज्य सरकार यांच्यासोबत समन्वयाने काम करावे लागते. पावसाच्या पाण्यात रेल्वे रूळ बुडाले की, लोकल ठप्प होते. पण, पावसाच्या पाण्याचा निचरा करण्याची व्यवस्था निर्माण करण्याचा अधिकार आणि जबाबदारी महानगरपालिकेची आहे. अशा असंख्य मर्यादा असूनही मुंबईत रेल्वे रोज लोकलच्या तीन हजार, २१६ फेर्या चालविते. या गाड्यांमधील अंतर केवळ तीन ते पाच मिनिटांचे असते. त्यासोबतच मुंबईत रोजच्या ४३५ मेल अथवा एक्सप्रेस गाड्या धावतात आणि सुमारे ११० मालवाहतूक रेल्वेगाड्यांचीही ये-जा चालू असते.
 
एक अपघात घडला आणि रेल्वेने काय केले पाहिजे, याबद्दल सूचनांचा भडिमार सुरू झाला. मुंब्र्यासाठी स्वतंत्र गाडी सोडा, अशीही मागणी झाली. सध्या मुंबईत रेल्वेची लोकलची ३६ टर्मिनल आहेत. केवळ ठाणे, कल्याण, कर्जत किंवा बोरिवली, विरार एवढीच टर्मिनल्स लोकलसाठी नाहीत, याची नोंद घ्यावी. एका पाठोपाठ तीन ते पाच मिनिटांच्या अंतराने सुरक्षितपणे लोकल गाड्या चालवायच्या असताना एखादे टर्मिनल वाढविण्याचा निर्णय सोपा नाही. अनेक तांत्रिक अडचणी निर्माण होतात.
 
मुंब्र्याच्या घटनेनंतर रागाच्या भरात अनेकांनी भलतेच मुद्दे उपस्थित केले. कोणी म्हणे की, एसी लोकल सुरू केल्यामुळे साध्या गाड्यांवर ताण आला आणि गर्दी वाढली. मुंबईत लोकलच्या एकूण तीन हजार, २१६ फेर्यांपैकी केवळ १८९ वातानुकूलित अर्थात एसी आहेत. केवळ पाच टक्के फेर्या एसी करण्याने साध्या गाड्यांमधील गर्दी अनेकपटींनी कशी वाढू शकते?
 
प्रवाशांसाठी अनेक प्रकल्प सुरू
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात २०१४ साली केंद्रात भारतीय जनता पक्ष आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यापासून गेल्या ११ वर्षांत रेल्वे प्रवाशांसाठी अनेक सुविधा सुरू करण्यात आल्या. मुंबईच्या लोकल प्रवासात प्लॅटफॉर्म बदण्यासाठी जिने चढावे लागतात. प्रवाशांना विशेषतः ज्येष्ठ नागरिक, लहान मुले व महिलांना जिने चढणे त्रासदायक होते. मुंबईत २०१४ सालापर्यंत रेल्वे स्थानकांवर प्रवाशांसाठी केवळ तीन लिफ्ट होत्या आणि गेल्या ११ वर्षांत त्यांची संख्या १६१ झाली. त्याचप्रमाणे ‘एस्कलेटर’ म्हणजे सरकते जिने ११ वरून वाढून २८५ झाले. प्रवाशांच्या सोईसाठी फूट ओव्हरब्रिजची संख्या ९४ वरून वाढवून २८९ करण्यात आली. जवळजवळ प्रत्येक स्थानकावर उभारलेल्या लिफ्ट आणि एस्कलेटरमुळे प्रवाशांसाठी उत्तम सुविधा निर्माण झाली. तरीही लोकलचे प्रश्न सोडविण्याऐवजी प्रशासन लिफ्ट आणि एस्कलेटर उभारत आहे, अशी टीका या काळात झाली.
 
सर्वसामान्य मुंबईकरांचे जगणे लोकलवर अवलंबून आहे. लोकलसेवा उत्तम असावी, अशी अपेक्षा रास्त आहे. पण, मुळात ही लोकल रेल्वेसेवा अनंत आव्हानांना तोंड देत खूपच प्रभावीपणे चालविली जात आहे, याची नोंद घेतली पाहिजे. इतकी आव्हाने असली, तरी लोकल सेवा अधिकाधिक सुधारण्यासाठी रेल्वेचे अफाट प्रयत्न चालू आहेत.
 
नेरूळ ते खारकोपर हा दहा किमीचा नवा उपनगरीय रेल्वेमार्ग गेल्या दहा वर्षांत चालू झाला. तसाच खारकोपर-उरण हा २९ किमीचा मार्ग. लोकमान्य टिळक टर्मिनस, परळ टर्मिनस, पनवेल-कळंबोली टर्मिनस, कल्याण टर्मिनस यांच्या विस्ताराचे काम सुरू आहे. छशिमट-कुर्ला पाचवी आणि सहावी लाईन, मुंबई सेंट्रल ते बोरिवली सहावी लाईन, गोरेगाव ते बोरिवली हार्बर लाईनचा विस्तार, बोरिवली-विरार पाचवी सहावी लाईन, विरार-डहाणू तिसरी आणि चौथी लाईन, पनवेल-कर्जत कॉरिडोर, ऐरोली-कळवा इलेव्हेटेड कॉरिडोर, कल्याण-आसनगाव चौथी लाईन, कल्याण-बदलापूर तिसरी आणि चौथी लाईन, कल्याण-कसारा तिसरी लाईन, नायगाव-जुचंद्र दुहेरीकरण आणि निळजे-कोपर दुहेरीकरण असे ३०१ किमी लांबीच्या विस्तारीकरणाच्या रेल्वेमार्गांचे काम सुरू आहे.
 
लोकल ही मुंबईची जीवनवाहिनी आहे, याची जाणीव ठेवून रेल्वे प्रवाशांना अधिकाधिक सुविधा देण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहे. अनंत आव्हाने आणि अफाट प्रयत्न अशी रेल्वेची स्थिती आहे. या सेवांचा लाभ घेणारे भागधारक म्हणून प्रवाशांनीही वास्तवाचे भान ठेवून अवास्तव अपेक्षा करू नये. तीन पिढ्या रेल्वेची सेवा करणार्या कुटुंबातील व्यक्ती म्हणून मी रेल्वेचे कर्मचारी किती ताणाखाली आणि जबाबदारी काम करतात, हे पाहिले आहे. मी स्वतः १५ वर्षे मुंबईत ‘पीक अवर’मध्ये लोकल रेल्वेने प्रवासही केला आहे. अनुभवाने सांगतो, रेल्वेवर भरवसा ठेवा, प्राप्त परिस्थितीत जास्तीत जास्त चांगली सेवा देण्याचा प्रयत्न रेल्वे करत आहे.
Powered By Sangraha 9.0